मागें अतीथवेषें येऊन ॥ मज घेऊन गेला रावण ॥ माझिया वियोगें राम आपण ॥ वृक्षपाषाण आलिंगी ॥५१॥
मजनिमित्त राजीवनेत्र ॥ मित्र करोन चंडांशुपुत्र ॥ शक्रसुता वधोनि सर्वत्र ॥ कपिवीर सखे केले ॥५२॥
मग लोकप्राणेशनंदन ॥ धाडिला माझे शुद्धिलागोन ॥ तेणें जाळून लंकाभुवन ॥ रघुनंदन आणिला ॥५३॥
अष्टादशपद्में वानर ॥ संगें घेऊन आला श्रीरामचंद्र ॥ वेढूनियां लंकापुर ॥ युद्ध अपार पैं केलें ॥५४॥
संततीसमवेत ॥ रावण ॥ रणीं मारी रविकुळभूषण ॥ राज्यीं स्थापोनियां बिभीषण ॥ पुष्पकारूढ मग जाहले ॥५५॥
खालीं मी जों विलोकीं पूर्ण ॥ तंव अद्भुत केलें सेतुबंधन ॥ लंबायमान शतयोजन ॥ आणोनि पाषाण बांधिला ॥५६॥
समुद्र बांधिला पाषाणीं ॥ आश्चर्य मज वाटलें मनी ॥ हें जानकीनें विसरूनि ॥ सेतुचरित्र कथियेलें ॥५७॥
तों ते लोपामुद्रा बोलत ॥ काय सांगसी गोष्टी अद्भुत ॥ पाषाणीं बांधिला सरितानाथ ॥ काय पुरुषार्थ केला हा ॥५८॥
टाकूनियां एक शर ॥ कां शोषिला नाहीं सागर ॥ न लागतां क्षणमात्र ॥ माझे पतीनें प्राशिला ॥५९॥
ऐसें अगस्ति जाया बोलतां ॥ क्षणैक होय तटस्थ सीता ॥ म्हणे इणे उणे आणिलें रघुनाथा ॥ उत्तर आतां ईस देऊं ॥६०॥
म्हणे रघुत्तमाचा जातां बाण । सप्त समुद्र जातील आटून ॥ बिंदुमात्र नुरे जीवन ॥ जीव संपूर्ण मरतील ॥६१॥
रामापासीं वानरगण ॥ आहेत परम बळेंसंपन्न ॥ सप्त समुद्रांचें आचमन ॥ एकदांच करितील ॥६२॥
म्हणसी का केलें नाही आचमन ॥ तरी तुझ्या पतीचे मूत्र पूर्ण ॥ न शिवती वानरगण ॥ मग प्राशन केवीं करतील ॥६३॥
रघुनाथदास सोंवळे बहुत ॥ म्हणोनि तिहीं बांधिला सेत ॥ नाहींतरी सरितानाथ ॥ प्राशावया क्षण न लागता ॥६४॥
ऐसें बोलतां जनकतनया ॥ उगीच राहीली ऋषिजाया ॥ असो जानकीची पूजा करूनियां ॥ संतोषविलें ते काळीं ॥६५॥
अगस्तीनें पूजोनि रघुनंदना ॥ सवेंच ऋषींची घेऊनि आज्ञा ॥ पुष्पकीं बैसे आयोध्याराणा ॥ सीतेसहित ते काळीं ॥६६॥
पुष्पक उचलिलें तेथूनि ॥ चलिलें अयोध्यापंथ्ज्ञ लक्षोनि ॥ तों भारद्वाजआश्रमीं येऊनि ॥ उतरलें तेव्हां प्रयागीं ॥६७॥
मनांत विचारी रघुनंदन ॥ घ्यावें भारद्वाजदर्शन ॥ यालागीं उतरलें विमान ॥ इच्छा जाणून प्रभूची ॥६८॥
भारद्वाजासहित अपार ॥ चहूंकडून धांवती मुनीश्वर ॥ जैसें महानद्यांचे पूर ॥ सिंधूस जाती भेटावया ॥६९॥
रघुत्तमें खालतें उतरून ॥ नीमले समस्त ऋषिजन ॥ भारद्वाजें दिधलें आलिंगन ॥ प्रेमेंकरून तेधवां ॥७०॥
म्हण आजि धन्य ॥ दिवस ॥ घरा आला अयोध्याधीश ॥ जाहलीं वर्षें चतुर्दश चवदा दिवस अधिक पैं ॥७१॥
भारद्वाजें लक्ष्मण ॥ आलिंगिला प्रीतींकरोन ॥ ते दिवशीं रघुनंदन ॥ आपुले आश्रमीं राहविला ॥७२॥
मग तो जगदात्मा रघुनाथ ॥ स्नेहें हनुमंतासी सांगत ॥ म्हणे आम्ही आजि राहिलो येथ ॥ प्रीतीस्तव ऋषीच्या ॥७३॥
तरी पुढें जाऊनि त्वरित ॥ भरताप्रति करावें श्रुत ॥ श़ृंगवेरीं गुहक भक्त ॥ त्यासी हे विदित करावें ॥७४॥
ऐसी आज्ञा होतांचि पूर्ण ॥ वंदोनियां रघुवीरचरण ॥ वायुसुतें केले उड्डाण ॥ पित्याहून चपळत्वें ॥७५॥
गगनींहूनि अर्क उतरत ॥ तैसा गुहाकाश्रमीं हनुमंत ॥ येऊनि बोले अकस्मात ॥ अयोध्यानाथ आला कीं ॥७६॥
जो जगदानंद मूळकंद ॥ भरतहृदयारविंदमिलिंद ॥ रघुनाथ भक्तजनवरद ॥ जवळी आला जाणिजे ॥७७॥
परमानंद उदारघन ॥ अंतरंग मनमोहन ॥ परात्पर सोयरा जाण ॥ तो जवळीं आला कीं ॥७८॥
विश्वात्मक विश्वपाळक ॥ विश्वमनउदारक ॥ जनहृदयचाळक ॥ तों जवळी आला कीं ॥७९॥
ऐसें गुहके ऐकतां वचन ॥ वोसंडला आनंदेकरून ॥ धांवोनियां मारुतीचे चरण ॥ धरिले सद्रद होऊनियां ॥८०॥
ओळखोनियां परम भक्त ॥ त्यास हृदयी धरी हनुमंत ॥ गुहक मागुती लोळत ॥ चरणावरती मारुतीच्या ॥८१॥
म्हणे हें तन मन धन ॥ ओंवाळावें तुजवरून ॥ मग फळें सुमनें आणोन ॥ हनुमंत पूजिला गुहकें ॥८२॥
गुहकासी म्हणे हनुमंत ॥ चला नंदिग्रामासीं त्वरित ॥ स्वामी आला हें करूं श्रुत ॥ भरतप्रति जाऊनियां ॥८३॥
दोघेही उठिले ते क्षणीं ॥ एकमेकांचा हस्त धरूनि ॥ दोघेही भक्तशिरोमणि ॥ वेगेंकरूनि जाती ते ॥८४॥
तों नंदिग्रामीं भरत ॥ बोटानें दिवस मोजित ॥ म्हणे आतां न ये रघुनाथ ॥ चतुर्दश वर्षें लोटली ॥८५॥
भरत सर्वगुणी संपन्न ॥ तो भजनसमुद्रींचा मीन ॥ कीं वैरागरींचा पूर्ण ॥ अमोलिक मणि हा ॥८६॥
विवेकगंगेचा लोट थोर ॥ कीं ज्ञानाकाशींचा भास्कर ॥ कीं क्षमा धरिता सहस्रवक्र ॥ कीं सरोवर निश्चयाचें ॥८८॥
ऐसा तो भरत ते वेळीं ॥ म्हणे यावयाची सीमा जाहली ॥ राम प्रेमळाची माउली ॥ अजूनि दृष्टीं पडेना ॥८९॥
आतां हा देह टाकून ॥ धुंडीत जाईन रघुनंदन ॥ तत्काळचि कुंड रचून ॥ चेतविला अग्न कैकयीसुतें ॥९०॥
मग पाहिला दोन प्रहर ॥ अग्नींत घालावया शरीर ॥ सिद्ध जाहला भरत वीर ॥ परम प्रियकर रामाचा ॥९१॥
कुडासमीप उभा राहून ॥ अंतरीं आठविलें रामध्यान ॥ मुकुट कुंडलें आकर्ण नयन ॥ सुहास्यवदन सांवळे ॥९२॥
उडी घालावी जों आंत ॥ तों समीप जाला वायुसुत ॥ म्हणे आला आला रघुनाथ ॥ दशमुखांतक जगदात्मा ॥९३॥
आला सुरांचा कैवारी ॥ आला भक्तजनसाहाकारी ॥ भरत नेत्र उघडी तें अवसरीं ॥ तों मारुति घाली नमस्कार ॥९४॥
उष्णकाळ अत्यंत ॥ घायाळ रथ्ज्ञीं उदक मागत ॥ त्यासी जीवन पाविजे अकस्मात ॥ तैसा भरत सुखावला ॥९५॥
चकोर असतां क्षुधाक्रांत ॥ अवचित उगवे निशानाथ ॥ तैसा आनंदला भरत ॥ हनुमंतासी देखोनियां ॥९६॥
उचलोनियां परम प्रीतीं ॥ हृदयीं आलिंगिला मारुती ॥ म्हणे कोठें आहे रघुपति ॥ दावीं मज प्राणसखया ॥९७॥
प्राण जातां अमृत ॥ एकाएकीं घालिजे मुखांत ॥ तैसी शुभ वार्ता अकस्मात ॥ घेऊनि आलासी कपींद्रा ॥९८॥
मग हनुमंतासी बैसवून ॥ पुसिलें सकळ वर्तमान ॥ अमृतवर्षाव करीत घन ॥ तैसे येरें कथियेलें ॥९९॥
म्हणे कृपासिंधु रघुनंदन ॥ क्षणक्षणां तुमची आठवण ॥ करूनि म्हणे केव्हां जाईन ॥ भरताप्रति भेटावया ॥१००॥