अध्याय तेहतीसावा - श्लोक २०१ ते २२३

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


त्यावरी सत्यलोकनायक ॥ तेणें देखोन रावणांतक ॥ त्यास भासला हा माझा जनक ॥ क्षीराब्धिवासी जगदात्मा ॥१॥

इंद्रासी वाटलें ते अवसरीं ॥ पाठिराखा आमचा कैवारी ॥ ऋषि भाविती अंतरीं ॥ आराध्य दैवत आमुचें ॥२॥

कोटी कंदर्पांचा जनिता ॥ ऐसें सुरगण भाविती तत्वतां ॥ पूर्ण ब्रह्म हें तद्भक्तां ॥ हृदयीं भासलेसें ते काळीं ॥३॥

असो सदाशिव देखोनी ॥ सीतानाथ आनंदला मनीं ॥ आसन सोडूनि चापपाणी ॥ सामोरा पुढें धांवत ॥४॥

त्रिपुरारीच्या चरणांवरी ॥ नमर जों करी रावणारि ॥ तों शिवें धरूनि वरच्यावरी ॥ दृढ हृदयीं आलिंगिला ॥५॥

श्रीराम जीमूतनीलवर्ण ॥ कर्पूरगौर त्रिलोचन ॥ इंदुमंडळीं दिसे मृगचिन्ह ॥ तेसे शोभले ते काळीं ॥६॥

क्षीराब्धीमाजी नीलवर्ण ॥ शोभे जेवीं आदिनारायण ॥ कीं जान्हवीजळी यमुनाजीवन ॥ कृष्णवर्ण मिसळलें ॥७॥

कीं भक्तांचे संपुष्टांत ॥ शालिग्राममूर्ति शोभत ॥ तैसे शिव आणि सितानाथ ॥ क्षोभले तेव्हां आलिंगनीं ॥८॥

सेवावया सीतोत्पलमकरंद ॥ प्रीतीनें संघटे जैसा मिलिंद ॥ तैसा शिव आनंदकंद ॥ सीताजीवनें आलिंगिला ॥९॥

ते एक असती दोघेजण ॥ शिव विष्णू नामेंचि भिन्न ॥ अभेद अनाम निर्गुण ॥ तेथींचे कोंभ असती हे ॥२१०॥

असो यावरी कमलासन ॥ देता जाहला आलिंगन ॥ माझा पिता हा नारायण ॥ म्हणूनि हृदयीं धरियेला ॥११॥

याउपरी दशशतनेत्र ॥ घाली साष्टांग नमस्कार ॥ तप्तकांचनवर्ण सुंदर ॥ रघुवीर उठवी तयातें ॥१२॥

सहस्रनेत्रासी चापपाणी ॥ हृदयीं धरी प्रीतीकरूनि ॥ मग सुरांस कैवल्यदानी ॥ भेटता जाहला आनंदें ॥१३॥

असो सकळ देवांसमवेत ॥ सभेसी बैसले रघुनाथ ॥ एकचि वाद्यांचा गजर होत ॥ अष्टनायिका नाचती ॥१५॥

वीणा घेऊन सत्वर ॥ गाती नारद आणि तुंबर ॥ सामगायन परिकर ॥ ऐके रघुवीर सादरें ॥१६॥

रामविजय ग्रंथ पावन ॥ युद्धकांड संपले येथून ॥ उत्तरकांड गहन ॥ आतां येथोनि अवधारा ॥१७॥

मुकुटावरी मणि शोभत ॥ तेवीं उत्तरकांड गोड बहुत ॥ कीं देवालयावरी झळकत ॥ कळस जैसा सतेज ॥१८॥

भोजनांतीं दध्योदन ॥ कीं श्रवणांतीं मनन ॥ तपाचे अंतीं फळ पूर्ण ॥ उत्तरकांड रसिक तैसें ॥१९॥

आरंभी कथा सुरस तेथ ॥ भेटतील जानकी रघुनाथ ॥ मूळ जाईल हनुमंत ॥ राघवआज्ञा घेऊनियां ॥२२०॥

ती कथा गोड बहुत ॥ श्रवण करोत श्रीरामभक्त ॥ जे ब्रह्मानंदें डुल्लत ॥ प्रेमळ चित्त जयांचे ॥२१॥

श्रीमद्भीमातटविलासिया ॥ ब्रह्मानंदा गुरुवर्या ॥ श्रीधर अनन्य शरण पायां ॥ कायावाचामनेंसी ॥२२॥

स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत पंडित चतुर ॥ त्रयस्त्रिंशत्तमोध्याय गोड हा ॥२२३॥

अध्याय ॥३३॥

॥ इति युद्धकांड समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP