अध्याय तेहतीसावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


श्रीगणेशाय नमः श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

जानकीनेत्रसरोजमित्रा ॥ मित्रकुळभूषण स्कंदतातमित्रा ॥ मित्रकुळकैवारिया भूसुरमित्रा ॥ सौमित्राग्रजा श्रीरामा ॥१॥

भक्तमानसचकोरचंद्रा ॥ त्रिविधतापशमना आनंदसमुद्रा ॥ भरतहृदयारविंदभ्रमरा ॥ भवभयहरा राजीवाक्षा ॥२॥

मुमुक्षचातकनवमेघरंगा ॥ सकळरंगातीत अनंगा ॥ आनंदमय अमला निःसंगा ॥ अक्षय अभंगा निरुपाधिका ॥३॥

रणरंगधीरा रघुनंदना ॥ बोलवी पुढें ग्रंथंरचना ॥ हनुमंते द्रोणादि आणूनि जाणा ॥ सौमित्राप्राणा वांचविलें ॥४॥

यावरी बोले बिभीषण ॥ बाहेर युद्धा न ये रावण ॥ शक्रजिता ऐसें हवन ॥ गुप्त तेणें मांडिले ॥५॥

सुटले आहुतींचे परिमळ ॥ धुमे्रं कोंदलें नभमंडळ ॥ अग्नींतून रथ तेजाळ ॥ अर्धा बाहेर निघाला ॥६॥

पूर्णाहुति होतां पूर्ण ॥ संपूर्ण निघेल स्यंदन ॥ तरी अगोदरचि जाऊन ॥ विघ्न तेथें करावें ॥७॥

ऐसें बोलता बिभीषण ॥ मुख्य कपी उठिले दाहा जण ॥ नळ नीळ जांबुवंत वालिनंदन ॥ सीताशोकहरण पांचवा ॥८॥

गवय गवाक्ष गंधमादन ॥ शरभ केसरी पावकलोचन ॥ दशरथात्मजासी वंदून ॥ दाहाजण वीर उठिले ॥९॥

ते दाहाही पराक्रमेंकरून ॥ दशदिशा जिंकिती न लागतां क्षण ॥ अकस्मात उर्ध्वपंथें उडोन ॥ दशमुखावरी चालिले ॥१०॥

जैसे विहंगम उडती गगनीं ॥ तैसें लंकेंत आले तयेक्षणीं ॥ घरोघरीं रिघोनि ॥ रावणा शोधिती तेधवां ॥११॥

जे जे भेटती राक्षस ॥ त्यांती करिती ताडणास ॥ कोठें बैसला लंकेश ॥ दावा आम्हांस वेगेंसी ॥१२॥

शोधिले अवघे लंकाभुवन ॥ परी ठायीं न पडेचि रावण ॥ तों बिभीषणाची राणी येऊन ॥ दावी खुण गुप्तत्वें ॥१३॥

सरमा सांगे सत्वर ॥ नगरदुर्गाखालीं विवर ॥ त्यांत बैसला दशकंधर ॥ दुराचारी कपटिया ॥१४॥

ऐसें ऐकतां ते वेळां ॥ विवरमुखीं होती शिळा ॥ वानरीं फोडूनि मोकळा ॥ मार्ग केला ते समयीं ॥१५॥

तेथें राक्षस होते दारुण ॥ ते वधिले न लगतां क्षण ॥ आंत प्रवेशले वानरगण ॥ विवर विस्तीर्ण देखिलें ॥१६॥

तों तेथें शिवालय प्रचंड ॥ पुढें प्रज्वळिलें होमकुंड ॥ आहुति टाकी दशमुंड ॥ नेत्र वीसही झांकोनियां ॥१७॥

रक्त मद्य मांस पर्वत ॥ नरशिरें पडलीं असंख्यात ॥ रक्तें स्नान करूनि लंकानाथ ॥ वज्रासनीं बैसला ॥१८॥

आश्चर्य करिती वानरगण ॥ अजून न सांडीच हा प्रयत्न ॥ कुळक्षय जाहला संपूर्ण ॥ तरी जयआशा धरितसे ॥१९॥

असो वानरीं शिळा घेऊनि प्रचंड ॥ विध्वंसिलें होमकुंड ॥ सामग्री नासोनि उदंड ॥ यज्ञपात्रें फोडिली ॥२०॥

सावध नव्हेचि रावण ॥ वस्त्रें फेडूनि केला नग्न ॥ दाही मुखांमाजी संपूर्ण ॥ धुळी घालिती वानर ॥२१॥

एक वर्मस्थळी शिळा हाणिती ॥ एक वक्षःस्थळीं ताडिती ॥ तरी सावध नव्हे लंकापति ॥ नानाप्रयत्न केलिया ॥२२॥

मग तेथोनि उडाला वालिसुत ॥ प्रवेशला राणिवसांत ॥ मंदोदरीस उचलोनी अकस्मात ॥ रावणापाशीं आणिली ॥२३॥

परम सुंदर सुकुमार ॥ रावणावरी लोटिती वानर ॥ वीर कंचुकी अलंकार ॥ केले चूर वानरीं ॥२४॥

मदांदरी म्हणे दशवदना ॥ आग लागो तुझिया अनुष्ठाना ॥ वानरीं विटंबिली अंगना ॥ लाज कैसी नाही तूंतें ॥२५॥

ते पविव्रता करूनि नग्न ॥ रावणावरी देती ढकलून ॥ मयजा आक्रंदे दारुण ॥ ऐकतां रावण उघडी नेत्र ॥२६॥

तों मंदोदरीं आक्रंदत ॥ होम विध्वंसिला समस्त ॥ क्रोधें उठोनि लंकानाथ ॥ वानरांवरी धांवन्निला ॥२७॥

बहुत वानर ते वेळे ॥ पायीं धरूनि आपटिले ॥ अंगद मारुतीसी दिधले मुष्टिघात बहुत पैं ॥२८॥

सकळी वानर निघोन ॥ सुवेळेसी आले परतोन ॥ म्हणती उठविला रावण ॥ युद्धालागीं येईल पैं ॥२९॥

सभा मोडूनि रघुवीर ॥ कोदंड चढविलें सत्वर ॥ म्हणे मयजेचें सौभाग्य समग्र ॥ आजपासोनि खंडलें ॥३०॥

इकडे मंदोदरीचे समाधान ॥ करिता झाला रावण ॥ वस्त्रें भूषणें देऊन ॥ हृदयी दृढ धरियेली ॥३१॥

म्हणे प्राक्तनभोग दारुण ॥ प्रिये न सुटे भोगिल्याविण ॥ आतां गृहा जावें आपण ॥ समाधानें असावें ॥३२॥

आजि मी झुंजेन निर्वाण ॥ शत्रुशिरें आणीन छेदून ॥ नाहीं तरी प्रिये येथून ॥ तुमची आमची हेचि भेटी ॥३३॥

गृहा पाठविली मंदोदरी ॥ वस्त्रें भूषणे देऊन झडकरी ॥ रावण निघाला बाहेरी ॥ ठोकिल्या भेरी एकसरें ॥३४॥

राक्षसस्थळ जितकें उरलें ॥ तें अवघें सांगातें घेतले ॥ अपार रणतुरें ते वेळे ॥ वाजों लागलीं भयंकर ॥३५॥

पदातिदळ पुढें जात ॥ त्यापाठीं स्वार चौताळत ॥ त्यामागें गज उन्मत्त ॥ गुढारांसहित धांवती ॥३६॥

त्यांचे पाठीं रथ जाती ॥ रथीं बैसला लंकापती ॥ छत्रें मित्रपत्रें झळकती ॥ पुढें पढती भाट ब्रिंदें ॥३७॥

रावण रणनोवरा सत्य ॥ मुक्ति नोवरी वरू जात ॥ वऱ्हाडी पुढें गेले बहुत ॥ उरले ते सर्व घेत संगें ॥३८॥

मागें बंधु बिभीषण ॥ लंकेसी ठेविल रक्षण ॥ असो रणभूमीस रावण ॥ वायुवेगें पातला ॥३९॥

तों शिळा वृक्ष घेऊन ॥ वेगें धांवले वानरगण ॥ जैसा प्रळयांती पर्जन्य ॥ तैसा पाडिला पर्वतांचा ॥४०॥

दश धनुष्यां लावूनि बाण ॥ एकदांच सोडी रावण ॥ सर्वही पर्वत फोडून ॥ सैन्य बाहेर काढिलें ॥४१॥

प्रचंड पराक्रमी लंकानाथ ॥ शरीं वानर खिळिले समस्त ॥ ऐसें देखोनि रघुनाथ ॥ पुढें जाहला ते क्षणीं ॥४२॥

रघुनाथ म्हणे दशकंधरा ॥ मलिना शतमूर्खा पामरा ॥ सीता आणूनि तस्करा ॥ कुलक्षय केला व्यर्थचि ॥४३॥

संतति संपत्ति विद्या धन ॥ टाकिलीं वेदांची खंडें करून ॥ रासभासी चर्चिलें चंदन ॥ तैसं ज्ञान असुरा तुझें ॥४४॥

आजि समरांगणीं जाण ॥ तुज खंडविखंड करीन ॥ पुढील अवतारीं मुक्ति देईन ॥ असुरा जाण तुज निश्चयें ॥४५॥

तंव प्राणहर्तें माझे शर ॥ आले सावध होईं सत्वर ॥ यावरी दशद्वयनेत्र ॥ प्रत्युत्तर देत असे ॥४६॥

तूं म्हणविसी रामचंद्र ॥ परी मी राहु असे भयंकर ॥ आजि खग्रास करीन समग्र ॥ समरीं तुझा मानविया ॥४७॥

माझे समरीं सुटतां बाण ॥ मेरु मांदार होती चूर्ण ॥ तूं सुकुमार मानवनंदन ॥ कैसे साहसी पाहेन ते ॥४८॥

सीता सुंदर अत्यंत ॥ कष्टत होती अरण्यांत ॥ म्यां आणिली ते तुज प्राप्त ॥ पुनः न होय सर्वथा ॥४९॥

पश्चिमेस उगवेल तरणी ॥ जरी मशक उचलील धरणी ॥ गजमस्तकींचें मोतीं भिवोनी ॥ सिंह देईल जंबुका ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP