एप्रिल १८ - संत

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


प्रत्येकजण भक्ती करीतच असतो , कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ती म्हणजे आवड . परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे . सर्वांना विषयाची आवड असते , तेव्हा सर्व लोक एकपरीने विषयाची भक्तीच करीत असतात . विषयाची आवड ही देहबुध्दीला धरुन , देहबुध्दी वाढविणारी , आणि स्वार्थी असते . ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणे शक्य नाही . याकरिता भक्तिमार्गातेली पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्यारहित , निष्काम , नि : स्वार्थी परमात्मस्मरण करणे ; आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वत : ला विसरणे , देहबुध्दि विगलित होणे , ही होय . देहरक्षण परमात्मप्राप्तीकरिता करावे . केवळ विषयसेवनाकरिताच जगणे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट ?

जयंत्यादि उत्सव आपण करतो ते भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून . मुळात प्रेम नसेल तर , ज्याच्यावर प्रेम असते त्याला आपण जो उपचार करतो , तो उपचार करुन प्रेम आणायचे असते . प्रेम आणि उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो . या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो , आणि त्यामुळे भगवंतावरचे प्रेमही वाढते . आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते , त्याचे त्या लहान मुलाला काही सुख नसते , उलट थोडे दु : खच वाटते , पण त्यामुळे त्या आईला बरे वाटते म्हणून ती तसे करते . भगवंताला आपण दागिने वगैरे घातले तर ते स्वत : करिताच होय . वास्तविक भगवंताला काय कमी आहे ?

संत विषयात देव पाहतात , पण आम्ही मात्र देवातसुध्दा विषय पाहतो . रामाची मूर्ती काय उत्तम घडविली आहे , देऊळ किती सुंदर बांधले आहे , वगैरे आम्ही म्हणतो . आमची वृत्ती विषयाकार बनली , म्हणून आम्हाला जिकडेतिकडे विषयच दिसतो . संतांची वृत्ती राममयच असते , त्यांना सर्वत्र रामच दिसतो . तेरा कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होते असे म्हणतात . याचा अर्थ , तेरा कोटी जप व्हायला रोज दहाबारा तास या प्रमाणात जवळजवळ बारा वर्षे लागतात , इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रुपच तो होतो . नाम कधीच वाया जात नाही . केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही , तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असे समजावे ; मग ते विषयप्राप्तीकरिता असेल , किंवा त्याचे पूर्वपाप घटत असेल . विषयाकरिता नाम खर्च करु नये , नामाकरिता नाम घ्यावे .

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP