अध्याय पंधरावा - श्लोक २०१ ते २४१

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


वैभवसंपत्ति दावी समस्त ॥ वर्णीं आपुला पुरुषार्थ ॥ म्यां बंदीं घातले देव समस्त ॥ मज त्वरित वरीं कां ॥१॥

लाज न धरी कामातुर ॥ मरण नेणे प्रतापशूर ॥ मद्यपियास सारासार ॥ कांहीं विचार समजेना ॥२॥

कामुकांसी नव्हेचि विरक्ति ॥ मैंदासी काय हरिभक्ति ॥ व्याघ्रासी उपजेल शंाति ॥ काळत्रयीं घडेना ॥३॥

असो लाज सोडोनि दशवदन ॥ म्हणे जानकी ऐक वचन ॥ एकराशी रामरावण ॥ लावीं लग्न ऐक्यत्वें ॥४॥

चित्रा नक्षत्र तूळराशी ॥ समान रामरावणांसी ॥ तरी तूं अवज्ञा कां करिशी ॥ बोल वेगें शुभानने ॥५॥

जानकी म्हणे दशमुखा ॥ तस्करा महामलिना मूर्खा ॥ पतंग आलिंगितां दीपिका ॥ कैसा मग वांचेल ॥६॥

प्रळयाग्नींत स्नान करूनि ॥ मशक केवीं येईल परतोनि ॥ वासुकीचा विषदंत पाडूनि ॥ मूषक कैसा आणील ॥७॥

मृगेंद्रजिव्हेचें मांस देख ॥ तोडूनि केवीं वांचेल जंबुक ॥ आदित्यमंडळ मंडूक ॥ पाडील कैसें भूमितें ॥८॥

सौंदणी आणि समुद्र ॥ दोनी एकराशी साचार ॥ वायस आणि वैनतेय पक्षींद्र ॥ एकराशी होतसे ॥९॥

सिंह आणि श़ृगाल जाण ॥ मशक महेश राशी समान ॥ तम आणि तरणि पूर्ण ॥ केवीं समान सांगपां ॥२१०॥

रजक आणि रमावर ॥ कुक्कुट आणि कुंजर ॥ रजनीचर आणि रघुवीर ॥ केंवीं समान सांगपां ॥११॥

कंटक आणि कंजलोचन ॥ कपटी आणि कमळासन ॥ तैसा राम आणि रावण ॥ राशी गुण कासया ॥१२॥

मदनें सर्वांसी जिंकिलें ॥ परी शिवापुढें तें न चाले ॥ अग्नीनें सर्वांसी जाळिलें ॥ परी मेघापुढें काय तो ॥१३॥

सर्वांसी गांजिसी तूं परम ॥ परी मज स्पर्शतां होशी भस्म ॥ आतां तुज वधावया रघुत्तम ॥ पूर्णकाम येईल ॥१४॥

मनीं भावी रावण ॥ हिचें जों स्थिरावे मन ॥ तोंवरी अशोकवनीं नेऊन ॥ ठवूं इतें रक्षोनियां ॥१५॥

मग त्रिजटेचेनि अनुमतें ॥ अशोकवनीं ठेवी जानकीतें ॥ भोंवतीं दृढ रक्षणें बहुतें ॥ ठायींठायीं ठेविलीं ॥१६॥

अशोकवनाबाहेर ॥ पांचकोटी रजनीचर ॥ सावध बैसले अहोरात्र ॥ नव्हे संचार वायूचा ॥१७॥

निधानाभोंवत्या भूतावळी ॥ रक्षिती जैशी सर्वकाळीं ॥ तैशा राक्षसी सीतेजवळी ॥ वेष्टोनियां बैसल्या ॥१८॥

सत्वशीळ बिभीषण ॥साधु पुण्यपरायण ॥ म्हणे सीता आणून संपूर्ण ॥ कुळक्षय मांडिला ॥१९॥

रावण परम कामातुर ॥ जाहला उन्मत्त अविचार ॥ तप्त जाहले शरीर ॥ नावडे उपचार विलास ॥२२०॥

ब्रह्मयासी म्हणे रावण ॥ पुरे तुझें वेदाध्ययन ॥ अंगिरापती तुझें ज्ञान ॥ ठेवीं झांकोन क्षणभरी ॥२१॥

किन्नर हो पुरे गायन ॥ नका चेतवूं पंचबाण ॥ सीतेच्या भोगालागीं प्राण ॥ कासावीस होताती ॥२२॥

सकळ गंगा घरीं राबत ॥ तयांसी म्हणे लंकानाथ ॥ शीतळ उपचार बहुत ॥ करा आतां मजलागीं ॥२३॥

बोलावूनि राक्षसिणी ॥ रावण सांगे त्यांचे कर्णीं ॥ सीतेसी तुम्ही भेडसावुनी ॥ मम शयनीं वश करा ॥२४॥

अवश्य म्हणती निशाचरी ॥ अमंगळा धांविन्नल्या एकसरी ॥ म्हणती सीते तूं रावणासी वरीं ॥ नाहीं तरी तुज भक्षूं ॥२५॥

विकटरूप विशाळकर्ण ॥ एक वक्रमुख लंबस्तन ॥ बाबरझोटी आरक्तनयन ॥ भेडसाविती सीतेतें ॥२६॥

खरमुख व्याघ्रवदन ॥ सूकरगजमुख लंबचरण ॥ ज्यांच्या नासिकांमाजी जाण ॥ खर तुरंग गुंतले ॥२७॥

एकी स्तनचपेटें करूनि ॥ झाडें टाकिती मोडूनि ॥ एकपदा द्विपदा त्रिचरणी ॥ खाऊं म्हणती सीतेतें ॥२८॥

परम कुरूप कुत्सित वर्ण ॥ अमंगळ दुर्गंधि विटे मन ॥ एक म्हणे इचे नरडीं बैसोन ॥ घोट घेऊं आतांचि ॥२९॥

एक म्हणती काढा शिरा ॥ दांत खाती करकरां ॥ डोळे वटारिती पुढारां ॥ हांक देती आक्रोशें ॥२३०॥

ऐसें करिती राक्षसिणी ॥ परी ते त्रिभुवनपतीची राणी ॥ निर्भय परम अंतःकरणीं ॥ कदा न गणी तयांसी ॥३१॥

संसारदुःखें नाना गती ॥ ज्ञानियांचे आंगी आदळती ॥ परी ते सहसा न गणिती ॥ सीता सती तैशीच ॥३२॥

बहुत भुंकती श्र्वान ॥ परी कदा न भी वारण ॥ कीं जंबूक हाकें पंचानन ॥ कदा दचकोनि उठेना ॥३३॥

कीं सुटतां झंझामारुत ॥ धुळीनें तृण बहुत उडत ॥ परी बैसका न सोडी पर्वत ॥ निर्भय सत्य सीता तैसी ॥३४॥

जैसी कागांमाजीं कोकिळा ॥ तैसी त्रिजटा पुण्यशीळा ॥ राक्षसी दटावून सकळा ॥ दूर केल्या साक्षेपें ॥३५॥

त्रिजटा म्हणे जनकनंदिनी ॥ तूं चिंता न करीं मनीं ॥ तुज भेटेल कोदंडपाणी ॥ अल्पकाळेंकरूनियां ॥३६॥

वर्तमान अयोध्येपासोनि ॥ जें जें वर्तलें जनस्थानीं ॥ त्रिजटेप्रति जनकनंदिनी ॥ सांगे सकळ प्रीतीनें ॥३७॥

सिंहावलोकनेंकरून ॥ परिसा मागील चरित्र पूर्ण ॥ मृग वधोनि रामलक्ष्मण ॥ आश्रमासीं पातले ॥३८॥

ते कथा गोड अत्यंत ॥ श्रवण करोत ज्ञाते पंडित ॥ रसिक रामविजय ग्रंथ ॥ श्रवणें समस्त कोड पुरे ॥३९॥

अयोध्याधीशा ब्रह्मानंदा ॥ श्रीधरवरदा आनंदकंदा ॥ अभंग अक्षय अभेदा ॥ वेदवंद्या सुखाब्धी ॥२४०॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधारा ॥ सदा पसिसोत भक्त चतुर ॥ पंचदशोध्याय गोड हा ॥२४१॥

अध्याय ॥१५॥ ओंव्या ॥२४१॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP