अध्याय पंधरावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


आला चमकत पंचवटीं ॥ श्रीरामरूप न्याहाळी दृष्टीं ॥ हृदयीं झाला परम संतुष्टी ॥ अंतरीं कष्टी नव्हेची ॥५१॥

जैसें सुवर्णतगट सुरंग ॥ तैसें मृगाचें दिसे अंग ॥ ऐसें देखतां सीतारंग ॥ हात घाली धनुष्या ॥५२॥

मृग क्षणक्षणां परतोन ॥ पाहे राघवाकडे विलोकून ॥ तों ते पद्माक्षी बोले वचन ॥ पद्मजातजनकाप्रती ॥५३॥

म्हणे ऐसा मृग आजिपर्यत ॥ आम्हीं देखिला नाहीं यथार्थ ॥ याचे त्वचेची कंचुकी सत्य ॥ उत्तम होईल केलिया ॥५४॥

अयोध्येसी प्रवेश करितां ॥ ते कंचुकी लेईन प्राणनाथा ॥ षण्मास उरले आतां ॥ मनुसंवत्सरांमाजीं पैं ॥५५॥

सीतेची इच्छासरिता साचार ॥ कर्मजळाचा तुंबळ पूर ॥ दुःखसमुद्राप्रति साचार ॥ भेटावया जाऊं पाहे ॥५६॥

जाणूनि जानकीचें मानस ॥ आणि पुढील होणार भविष्य ॥ सत्वर चालिला अयोध्याधीश ॥ धनुष्यासी बाण लावूनियां ॥५७॥

म्हणे सौमित्रा सावधान ॥ रक्षीं जानकीचिद्रत्न ॥ परम कपटी पिशिताशन ॥ नसतींच विघ्नें करितील ॥५८॥

असों गुंफेत सीता च्रिद्रत्न ॥ द्वारीं रक्षपाळ लक्ष्मण ॥ जैसा महाभुजंग अनुदिन ॥ निधानकुंभ रक्षीतसे ॥५९॥

पार्वतीजवळ जैसा कुमार ॥ कीं इंदिरेपाशीं खगेश्र्वर ॥ तैसा तो भूधरावतार ॥ रक्षी द्वार गुंफेचें ॥६०॥

इकडे मृगाचे पाठी लागे ॥ राघव जात वातवेगें ॥ गौतमीतीराच्या पूर्वमार्गें ॥ केलें मृगें पलायन ॥६१॥

मनाहून वेग अत्यंत ॥ मनमोहन त्वरें जात ॥ घ्वजवज्ररेखांकित ॥ पदें उमटत धरेवरी ॥६२॥

पद्मोद्भव आणि भोगींद्र ॥ नीलग्रीव आणि वज्रधर ॥ चरणरज इच्छिती निरंतर ॥ दुर्लभ साचार तयांसी ॥६३॥

असो मृगाचें वर्म लक्षून ॥ रामें सोडिला दिव्य बाण ॥ भूमीवरी पडिला हरिण ॥ अचुक संधान रघुपतीचें ॥६४॥

सादर पाहे रघुवीर ॥ तों पडलें राक्षसाचें शरीर ॥ श्रीरामबाणें निशाचर ॥ पावला परत्र निर्धारें ॥६५॥

आश्र्चर्य करी अयोध्याधीश ॥ म्हणे परम कपटी राक्षस ॥ असो अश्र्वत्थाखालीं पुराणपुरुष ॥ श्रमोनियां बैसला ॥६६॥

इकडे काय जाहलें वर्तमान ॥ वनीं गुप्त उभा रावण ॥ गुंफेद्वारीं लक्ष्मण ॥ बैसला रक्षणा अव्यग्र ॥६७॥

शांतीजवळी परमार्थ ॥ कीं तपासी रक्षी सुचित्व ॥ तैसा द्वारीं सुमित्रासुत ॥ मग लंकानाथ काय करी ॥६८॥

श्रीरामासारखा शब्दध्वनी ॥ राक्षसें उठविला काननीं ॥ सौमित्रा धांव धांव म्हणोनी ॥ सीता कर्णीं आईकत ॥६९॥

सौमित्रा धांव धांव लौकरी ॥ वनीं वेष्टिलें रजनीचरीं ॥ संकट पडलें मजवरी ॥ तूं कैवारी पाठिराखा ॥७०॥

रणभूमीस बंधूविण ॥ उडी घालील सांग कवण ॥ राक्षसी घेतला माझा प्राण ॥ मग येऊन काय पाहसी ॥७१॥

ऐसें ऐकतां जनकनंदिनी ॥ परम घाबरली अंतःकरणीं ॥ म्हणे श्रीराम माझा पडिला वनीं ॥ करुणवाणी बाहती तुम्हां ॥७२॥

रणीं बंधु संकटी मित्र ॥ वृद्धापकाळीं ओळखिजे कलत्र ॥ विषमकाळीं सत्वपुत्र ॥ सांभाळिती पितयातें ॥७३॥

कीं शस्त्रमार होता अत्यंत ॥ करींचें वोडण पुढें होत ॥ कीं संसारतापें संतप्त ॥ साधु निववीत निजबोधें ॥७४॥

मग बोले लक्ष्मण ॥ जानकी हें कापट्यवचन ॥ संकटीं पडले रघुनंदन ॥ हे कल्पांतींही घडेना ॥७५॥

तो देवाधिदेव रघुत्तम । चराचरबीज सुफलांकित द्रुम ॥ त्यासी संकट पडेल दुर्गम ॥ हें कल्पांतींही घडेना ॥७६॥

जरी तमें झांकेल चंडांश ॥ जरी शीतज्वर बाधेल अग्नीस ॥ जगद्भक्षक काळास ॥ भूतबाधा जरी होय ॥७७॥

ऊर्णनाभीचे तंतूनें सहज ॥ जरी बांधिजेल महागज ॥ तरी संकटीं पडेल रघुराज ॥ जनकतनये जाण पां ॥७८॥

ऐसें बोलतां लक्ष्मण ॥ सीता जाहली क्रोधायमान ॥ तीक्ष्ण शब्दशस्त्रेंकरून ॥ लक्ष्मणासी ताडिलें ॥७९॥

म्हणे तुमचे कळलें बंधुपण ॥ ओळखिली म्यां मनींची खूण ॥ माझा अभिलाष धरून पूर्ण ॥ काननाप्रति आलासी ॥८०॥

राम राक्षसीं वधिलिया वनीं ॥ मग करूं इच्छिसी मातें पत्नी ॥ जैसा मैंद क्षमा धरूनि ॥ सेवा करी साक्षेपें ॥८१॥

सन्मुख देखोनि रघुनाथा ॥ म्हणसी जानकी जगन्माता ॥ कीं वनीं राम वधावया तत्वतां ॥ तुज कैकयीनें धाडिलें ॥८२॥

तूं दायाद परम दुर्जन ॥ सापत्नबंधु कपटी पूर्ण ॥ जळो तुझें काळें वदन ॥ कळलें ज्ञान वैराग्य तुझें ॥८३॥

रघुपतीस विपरीत होतां ॥ प्राण त्यजीन हा तत्वतां ॥ निर्दय पाहतां तुजपरता ॥ भुवनत्रयीं दिसेना ॥८४॥

माझा अभिलाष धरून ॥ रामासी इच्छितोसी मरण ॥ ऐसे जानकीनें वाग्बाण ॥ सौमित्रावरी सोडिले ॥८५॥

कीं तप्तशस्त्रांचे घाय पूर्ण ॥ त्याहूनि बोल ते तीक्ष्ण ॥ कीं पर्वताचे कडे जाण ॥ अंगावरी कोसळले ॥८६॥

वचनें नव्हेत तीं निश्र्चित ॥ कीं दुःखवल्लीचीं फळें यथार्थ ॥ परम दुःखी सुमित्रासुत ॥ प्रत्युत्तर देतसे ॥८७॥

म्हणे माते जनकनंदिनी ॥ मी निष्पाप बोलिलों वाणी ॥ कीं विजयी सदा चापपाणी ॥ दुःख वनीं त्यासी कैंचें ॥८८॥

पृथ्वी आप तेज वायु आकाश ॥ तुज मज साक्ष चंडांश ॥ मी बोलिलों निर्दोष ॥ जैसें कां यश सोज्वळ ॥८९॥

मी बाळक तूं जननी ॥ हाचि भावार्थ माझे मनीं ॥ तुझी तुज फळेल करणी ॥ पडसी बंधनीं षण्मास ॥९०॥

पुनः भेटे जों रघुनाथ ॥ तो भोगिसी महा अनर्थ ॥ ऐसें बोलोनि सुमित्रासुत ॥ चालिला त्वरित वनासी ॥९१॥

मग तो उर्मिलाप्राणनाथ ॥ जनकाचा कनिष्ठ जामात ॥ गुंफेद्वारीं रेखा ओढित ॥ धनुष्यकोटीनें तेधवां ॥९२॥

म्हणे तूं या रेखेबाहेर जासी ॥ तरी परम अनर्थ पावसी ॥ जो रघुवीर अयोध्यावासी ॥ त्याचीच शपथ तुज असे ॥९३॥

शोधीत घोर अरण्य ॥ सौमित्र जातां करी रुदन ॥ म्हणे होतांचि रामदर्शन ॥ प्राण त्यागीन निर्धारें ॥९४॥

श्रीरामपदांकित मुद्रा दिसत ॥ ध्वजवज्रादि चिन्हें मंडित ॥ मार्ग काढित सुमित्रासुत ॥ ऐका दृष्टांत येथें कैसा ॥९५॥

जैसे श्रुतीच्या आधारें निश्र्चित ॥ स्वस्वरूपीं प्रवेशती संत ॥ त्याचपरी सुमित्रासुत ॥ श्रीरघुनाथा पाहोंजाय ॥९६॥

कीं संसारतापें संतप्त पूर्ण ॥ तो सद्रुरूसी जाय शरण ॥ कीं तृषित जान्हवी लक्षून ॥ जात धांवोन त्वरेनें ॥९७॥

तैसा सत्वर जात लक्ष्मण ॥ तों अश्र्वत्थाखालीं मनमोहन ॥ श्यामसुंदर दैदीप्यमान ॥ मखपाळण बैसला असे ॥९८॥

कोमाइलें श्रीरामवदन ॥ तों येतां देखिला लक्ष्मण ॥ शोकें दिसे दीनवदन ॥ येऊन लोटांगण घातलें ॥९९॥

कंठ जाहला सद्रदित ॥ नयनीं आले अश्रुपात ॥ श्रीरामचरण क्षाळित ॥ पाहे तटस्थ रघुवीर ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP