अनुतापलघुचीर घेऊनी ॥ मायिक धुरोळा वारी ते क्षणीं ॥ तर्क पिकपात्र धरूनी ॥ मुख विलोकिती रामाचें ॥५१॥
सौमित्र भरत शत्रुघ्न बंधू ॥ हेचि सच्चिदानंद आनंदू ॥ स्वरूपप्राप्तीचे कुंजर अभेदू ॥ तयांवरी आरूढले ॥५२॥
हिरे जडले दांतोदांती ॥ वरी मुक्तजाळिया मिरवती ॥ कामक्रोधांचे तरु मोडिती ॥ सहज जातां निजपंथें ॥५३॥
आशा तृष्णा कल्पना भ्रांति ॥ वाटे जातां गुल्में छेदिती ॥ शुंडा होणोनियां दांतीं ॥ कडे फोडिती विषयांचे ॥५४॥
मदमत्सरदंभपर्वत ॥ रथचक्रातळीं पिष्ट होत ॥ कुमतें पाषाण पिष्ट करित ॥ रगडोन जाती घडघडां ॥५५॥
धैर्यतुरंग अलोट चपळ ॥ मायारणांगणीं तळपती सबळ ॥ वरी रामउपासक निर्मळ ॥ कळिकाळासी न गणती ॥५६॥
शमदमांचे पायभार ॥ निष्कामखंडें झेलिती समग्र ॥ भवदळभंजन प्रतापशूर ॥ आत्मस्थितीं चालती ॥५७॥
अनुहत वाद्यें वाजती ॥ ऐकतां कुतर्क पक्षी पळती ॥ कर्मजाळ वनचरें निश्र्चितीं ॥ टाकोनि जाती स्वस्थाना ॥५८॥
चारी साही अठराजण ॥ रामासी वानिती बंदिजन ॥ चारी मुक्ति आनंदेकरून ॥ नृत्य करिती राघवापुढें ॥५९॥
वाटेसी अविद्या वहाती सरिता ॥ ते कोरडी जाहली दळ चालतां ॥ भाव निश्र्चय तत्वतां ॥ वेत्रधारी पुढें धांवती ॥२६०॥
सोहंभाव गर्जत ॥ वाटेसी द्वैतजनांतें निवारित ॥ पुढें भक्त स्वानंदें नाचत ॥ गुण वर्णित राघवाचे ॥६१॥
एक जाहले निःशब्द मुके ॥ ऐकती रामचरित्र कौतुकें ॥ एक अत्यंत बोलके ॥ एक समाधिसुखें डोलती ॥६२॥
ऐसा निजभारेंसी रघुनंदन ॥ जो कौसल्याहृदयमांदुसरत्न ॥ निजभार थोकला देखोन ॥ गजारूढ पुढें झाला ॥६३॥
तंव तो क्षत्रियांतक महावीर ॥ वडील अवतार ऋृषिपुत्र ॥ कर जोडोनि नमस्कार ॥ करी तयांतें राघव ॥६४॥
किंचित निवाला फरशधर ॥ मग बोले पंकजोद्भवपुत्र ॥ तुज देखोनि राघवेंद्र ॥ गजाखालीं उतरेना ॥६५॥
तूं वीर आणि विशेषें ब्राह्मण ॥ हा तुज कांहींच नेदी मान ॥ यथार्थ म्हणे भृगुनंदन ॥ लाविला बाण चापासी ॥६६॥
रघुपतीस म्हणे भृगुनंदन ॥ तूं क्षत्रिय म्हणवितोसी दारुण ॥ अधमा त्राटिका स्त्री वधून ॥ अधर्म केला साच पैं ॥६७॥
स्त्री रोगी मूर्ख बाळ ॥ योगी याचक अशक्त केवळ ॥ पंकगर्तेत अंध पांगुळ ॥ वृद्ध ब्राह्मण गाय गुरु ॥६८॥
ज्येष्ठबंधु मातापिता ॥ जो कां शस्त्र टाकोन होय पळता ॥ इतुक्यांवरी शस्त्र उचलितां ॥ महादोष बोलिला असे ॥६९॥
म्हणोनि तूं अधम वीर ॥ स्त्रीहत्या केली साचार । त्यावरी जानकीहृत्पद्मभ्रमर ॥ काय बोलता जाहला ॥२७०॥
म्हणे ताटिका नव्हे माझी माता ॥ तुवां मातृवध केला जाणता ॥ यापरीस काय अधमता ॥ उरली असे सांगपां ॥७१॥
उच्चवर्ण तूं ब्राह्मण ॥ सांडून अनुष्ठान तपाचरण ॥ तुज शस्त्र धरावया काय कारण ॥ राजहिंसा केलिया ॥७२॥
तूं ब्राह्मण परम पवित्र ॥ तुजवरी आम्ही धरावें शस्त्र । हे कर्म आम्हां अपवित्र ॥ ऋृषिपुत्रा जाणपां ॥७३॥
ऐसें ऐकतां फरशधर ॥ सोडी तात्काळ निर्वाण शर ॥ इकडे कोदंडासी बाण रघुवीर ॥ लाविला परी सोडीना ॥७४॥
कल्पांतचपळेसारिखे जाण ॥ येती भार्गवाचे तीक्ष्ण बाण ॥ ते दृष्टीनें पाहतां सीताजीवन ॥ जाती वितळोन क्षणार्धें ॥७५॥
जैसा झगटतां चंडपवन ॥ दीप सर्व जाती विझोन ॥ कीं शिवदृष्टीपुढें मदन ॥ न लागतां क्षण भस्म होय ॥७६॥
कीं प्रगटतां निर्वाणज्ञान ॥ मद मत्सर जाती पळोन ॥ कीं अद्भुत वर्षतां घन ॥ वणवा विझोन जाय जैसा ॥७७॥
जें जें टाकी अस्त्रजाळ ॥ तें तें दृष्टीनेंच विरे सकळ ॥ भार्गव म्हणे हा तमाळनीळ ॥ क्षीराब्धिवासी अवतरला ॥७८॥
आमुची सीमा जाहली येथून ॥ खाली ठेवी धनुष्यबाण ॥ गजाखालीं उतरोन सीताजीवन ॥ भेटावया धांविन्नला ॥७९॥
जैशा क्षीराब्धीच्या लहरी धांवती ॥ एकासी एक प्रीतीनें भेटती ॥ कीं अद्वैतशास्त्रींच्या श्रुती ॥ दोनी येती ऐक्यासी ॥२८०॥
राम फरशधर जेव्हां भेटले ॥ एकरूप दोन्हीचें ओतिलें ॥ कीं दोनी दीप एकचि जाहले ॥ तैसेंचि भासलें जनांसी ॥८१॥
एकस्वरूप दोघेजण ॥ कालत्रयीं न होती भिन्न ॥ भृगुपति रघुपति अभिधान ॥ परी दुजेंपण असेना ॥८२॥
जेणें निर्दाळिले सकळ क्षत्री ॥ ते क्रोधज्योति होती अंतरीं ॥ ती रघुपतीच्या मुखाभीतरीं ॥ प्रवेशली अकस्मात ॥८३॥
मग भार्गवासी म्हणे रघुनंदन ॥ म्यां जो चपासी लाविला बाण ॥ यास सांगें कांहीं कारण ॥ कोणीकडे टाकूं आतां ॥८४॥
परशुराम म्हणे स्वर्गमार्ग ॥ निरोधोनि टाकीं सवेग ॥ मी चिरंजीव होऊनि सांग ॥ तपचरण करीन ॥८५॥
तों निमिष न लागतां गेला बाण ॥ टाकिला स्वर्गमार्ग रोधून ॥ चिरंजीव केला भृगुनंदन ॥ हे कथा संपूर्ण नाटकीं असे ॥८६॥
असो अज्ञा घेऊनि तें वेळां ॥ भार्गव बद्रिकाश्रमीं गेला ॥ जनकासी निरोप दीधला ॥ तोही गेला मिथिलेसी ॥८७॥
इकडे नरवीरपंचानन ॥ देवाधिदेव रघुनंदन ॥ दळभारेंसी संपूर्ण ॥ अयोध्येसी पातला ॥८८॥
नगरांतून धांवती जन ॥ दृष्टीभरी पाहिला रघुनंदन ॥ साक्षात शेषनारायण ॥ अयोध्येंत प्रवेशती ॥८९॥
जें आत्म्प्राप्तीचें स्थान॥ तें अयोध्यानगर दैदीप्यमान ॥ प्रथम दुर्ग स्थूळदेह जाण ॥ सूक्ष्म आंतूनि दुसरें ॥२९०॥
कारणदुर्ग जाणिजे तिजें ॥ पुढें महाकारण ॥ दुर्ग विराजे ॥ षट्चक्रांची गोपुरें सतेजें ॥ ठायीं ठायीं झळकती ॥९१॥
असो नगराबाहेरूनि ॥ चारी अवस्था चारी अभिमानी ॥ हुडे झळकती पाहतां दुरोनि ॥ दिव्य तेज तळपतसे ॥९२॥
स्थूळ सूक्ष्म तत्वें बहुत ॥ या चर्या दाट झळकत ॥ पंच प्राण दशेंद्रियें तेथ ॥ वीर गर्जती ठायीं ठायीं ॥९३॥
भू नीर अनळ अनिल निराळ ॥ हेचि भांडीं वरी विशाळ ॥ शमदमांचे वृक्ष वरी निर्मळ ॥ सदां सफळ विराजती ॥९४॥
रज तम अविद्या केर ॥ नगरांत नाहीं अणुमात्र ॥ श्रवणचंदनसडे निरंतर ॥ चहूंकडे घातले ॥९५॥
मननाचिया रंगमाळा ॥ घरोघरी घातल्या निर्मळा ॥ शांतिकस्तूरीचा सुवास आगळा ॥ चहूंकडे येतसे ॥९६॥
निजध्यास तोरणें बहुत ॥ साक्षात्कार कळस झळकत ॥ कर्दळीस्तंभ विराजित ॥ मनोजयाचे चहूंकडे ॥९७॥
पूर्णानंदाचे कुंभ ॥ निजबोधें भरलें स्वयंभ ॥ आत्मप्रकाश दीप सुप्रभ चहूंकडे लखलखित ॥९८॥
अयोध्यावासियांच्या गळां ॥ सदा डोलती सुमनमाळा ॥ दयेचा तांबूल रंगला ॥ चतुर्थ मोक्षविशेष ॥९९॥
समाधि आणि सुलीनता ॥ सर्वांसी लाविल्या गंधाक्षता ॥ शुद्धसत्ववस्त्रें समस्तां ॥ मळ तत्वतां नसेचि ॥३००॥
चारी चौबारें बारा बिदी ॥ सोळा बाजार बहात्तर सांदी ॥ चौदा दासी त्रिशुद्धी ॥ पाणी वाहती अयोध्येंत ॥१॥
निरभिमानी चौसष्टजणी ॥ सदा विलसती श्रीरामसदनीं ॥ आणिक एक चारी आठजणी ॥ प्रीति करोनि राबती ॥२॥
अष्टभाव मखरें कडोविकडी ॥ नव महाद्वारें तेथें उघडीं ॥ ऊर्ध्वमुख निजप्रौढीं ॥ दशमद्वार झांकिलें ॥३॥
अष्टांगयोगी रामभक्त ॥ तेचि त्या द्वारें येत जात ॥ आणिकांस तो न सांपडे पंथ ॥ असे गुप्त सर्वदा ॥४॥
चतुर्दश रत्नें साधोनि वृत्रारि ॥ जैसा प्रवेशे अमरपुरीं ॥ कौसल्यात्मज ते अवसरीं ॥ तैसा अयोध्येंत प्रवेशला ॥५॥
सफळ देखोनि दिव्य द्रुम ॥ बहुत धांवती विहंगम ॥ तैसा पहावया आत्माराम ॥ नगरजन धांवती ॥६॥
देव वर्षती सुमनसंभार ॥ धडकत वाद्यांचा गजर ॥ मंडपघसणी झाली थोर ॥ श्रीराम पहावयाकारणें ॥७॥
देखोनियां रामचंद्र ॥ वेधले जनननयनचकोर ॥ उंचबळला सुरसमुद्र ॥ प्रेमभरतें दाटलें ॥८॥
कीं राम देखतां दिनमणी ॥ टवटविल्या निजभक्तकमळिणी ॥ सकळ लोकां अलंकारलेणीं ॥ राघवेंद्रे दीधली ॥९॥
भांडारें फोडोनि दशरथें ॥ निजधन वांटिलें याचकांतें ॥ गजारूढ बंदिजन तेथें ॥ सूर्यवंश वाखाणिती ॥३१०॥
निजात्मसदनीं रघुनाथ ॥ सीतेसहित प्रवेश समर्थ ॥ तनमनधनेंसी यथार्थ ॥ मूद वरोनि ओंवाळिजे ॥११॥
रामविजयग्रंथ प्रचंड ॥ येथें संपलें बालकांड ॥ पुढें अयोध्याकांड परम गोड ॥ श्रवणें कोड पुरवी पैं ॥१२॥
अग्राकडोनि इक्षुदंड ॥ मूळाकडे विशेष गोड ॥ सप्तकांड तैसा हा इक्षुदंड ॥ बहुत रसाळ पुढें पुढें ॥१३॥
पापपर्वत जडभार ॥ रामविजय त्यावरी वज्र ॥ संतश्रोते पुरंदर ॥ चूर्ण करिती निजबळें ॥१४॥
श्रीमद्भीमातटविलासा ॥ ब्रह्मानंदा पंढरीशा ॥ श्रीधरवरदा पुराणपुरुषा ॥ अभंगा अविनाशा अक्षया ॥१५॥
स्वति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत श्रोते चतुर ॥ अष्टमाध्याय गोड हा ॥३१६॥
श्रीरामचंद्रापर्णमस्तु ॥ ॥ ॥ ॥