चौघी कन्या आणिल्या बाहेरी ॥ डौरिल्या दिव्यवस्त्रालंकारीं ॥ स्नुषा देखोनि ते अवसरीं ॥ आश्र्चर्य करी दशरथ ॥१॥
अंतरपट मध्यें धरून ॥ तो फेडावयासी विद्वज्जन ॥ सुरस मंगळाष्टकें म्हणोन ॥ सावधान म्हणताती ॥२॥
जनकाची जी पट्टराणी ॥ सुमेधा नामें पुण्यखाणी ॥ चौघे जामात देखोनी ॥ आनंद मनीं समाये ॥३॥
म्हणे श्रीरामाच्या मुखावरून ॥ कोटी काम सांडावे ओंवाळून ॥ जानकीचें भाग्य धन्य ॥ ऐसें निधान जोडलें ॥४॥
असो मंगळाष्टकें म्हणती पंडित ॥ लग्नघटिका संपूर्ण भरत ॥ ॐपुण्या आचार्य म्हणत ॥ तों अंतरपट फिटलासे ॥५॥
मंगलाकार चापपाणी ॥ त्याचे मस्तकीं मंगलभगिनी ॥ मंगलाक्षता घालोनी ॥ मस्तक चरणीं ठेविला ॥६॥
सीतेचे मस्तकीं रघुनाथ ॥ लग्नाक्षता घाली त्वरित ॥ तोचि मस्तकीं ठेविला हस्त ॥ अक्षय कल्याणदायक जो ॥७॥
सीतेनें वरितां रघुनंदन ॥ ऊर्मिळेने परिणिला लक्ष्मण ॥ मांडवीनें भरत सगुण ॥ श्रुतकीर्ति शत्रुघ्न वरीतसे ॥८॥
तो मंगलतूर्यांचा घोष आगळा ॥ परम जाहला ते वेळां ॥ तेथींचा वर्णावया सोहळा ॥ सहस्रवदना अशक्य ॥९॥
अक्षय भांडारें बहुत ॥ जनक वरदक्षिणा देत ॥ याचकजन समस्त ॥ तृप्त केले निजधनें ॥२१०॥
विवाहहोमालागीं निर्धारीं ॥ वेगीं चला बहुल्यावरी ॥ नोवऱ्या कडिये झडकरी ॥ घेवोनियां चलावें ॥११॥
ऐकोनि हांसे रघुपती ॥ म्हणे प्रपंचाची विपरीत गति ॥ तों वसिष्ठ म्हणे रघुपति ॥ कडिये घेईं सीतेतें ॥१२॥
सीता उचलितां श्रीरामें ॥ तैसेंच तिघे करिती अनुक्रमें ॥ बहुल्यावरी आनंदप्रेमें ॥ चौघेजण बैसले ॥१३॥
लज्जाहोमादि सर्व विधि सिद्ध ॥ करी अहल्यासुत शतानंद ॥ जनकासी जाहला परम आनंद ॥ तो आल्हाद न वर्णवे ॥१४॥
तों अंतर्गृहीं रघुवीर ॥ पूजावया चालिला गौरीहर ॥ सीतेसी कडिये घेऊनि सत्वर ॥ श्रीरामचंद्र चालिला ॥१५॥
गौरीहर पूजोनि त्वरें आंबा शिंपिती चौघें वोहरें ॥ निंबलोण निजकरें ॥ सुमेधा उतरी तेधवां ॥१६॥
सुमेधेनें जाऊनि ते क्षणीं ॥ प्रार्थोनि आणिल्या तिघी विहिणी ॥ दिव्य वस्त्रालंकारें गौरवूनि ॥ मंडपात बैसविल्या ॥१७॥
देखोनिया चौघी सुना ॥ आनंद जाहला तिघींचिया मना ॥ इकडे जनक विनवी रघुनंदना ॥ विज्ञापना परिसावी ॥१८॥
चार दिवसपर्यंत ॥ येथेंच क्रमावे माझा हेत ॥ साडे जाहलिया त्वरित ॥ मग अयोध्येसी जाइंजे ॥१९॥
पुढील जाणोनि वर्तमान ॥ तें न मानीच रघुनंदन ॥ म्हणे आम्ही आतां येथून ॥ करूं गमन अयोध्येसी ॥२२०॥
कां त्वरा करितो रघुवीर ॥ आतां युध्दासी येईल फरशधर ॥ तरी तो प्रचंड वीर अनिवार ॥ मिथिलानगर जाळील पैं ॥२१॥
यालागीं संहारावया दशकंधर ॥ जाणें सत्वर लंकेसी ॥२२॥
झेंडा नाचवूं लंकेपुढें ॥ राक्षसांची अपार मुंडें ॥ ओंवाळणी पडतील कोंडें ॥ करील साडे बिभीषण ॥२३॥
ऐसें श्रीरामाचें मनोगत ॥ वसिष्ठ जाणोनि त्वरित ॥ जनकासी सांगे गुह्यार्थ ॥ वोहरें आतांचि बोळवीं ॥२४॥
मग जे अयोध्यावासी जन ॥ समस्तांसी दीधलें भोजन ॥ चौघें वोहरें आणि अजनंदन ॥ राण्या समस्त जेविल्या ॥२५॥
तात्काळ साडे करून ॥ वस्त्रालंकार सर्वांस अर्पून ॥ चौघांजणांसी आंदण ॥ अपार दीधलें तेधवां ॥२६॥
अश्र्व गज दास दासी ॥ तन मन धन अर्पिलें श्रीरामासी ॥ जनक निघाला स्वभारेंसी ॥ दशरथासी बोळवित ॥२७॥
ऐसें देखोनि नारद ऋृषि ॥ वेगें धांविन्नला बद्रिकाश्रमासी ॥ देखोनियां भृगुकुळटिळकासी ॥ म्हणे बैसलासी काय आतां ॥२८॥
तूं द्विजकुळीं महाराज वीरेश ॥ आणि त्या रामें तुझें भंगिलें धनुष्य ॥ तुज थोर आलें अपयश ॥ रामें यश वाढविलें ॥२९॥
मग बोले भृगुकुळदिवाकर ॥ आमचें अवतारकृत्य जाहलें समग्र ॥ मग म्हणे कमलोद्भवपुत्र ॥ तुज अणुमात्र क्रोध नये ॥२३०॥
जमदग्नीनें क्रोध टाकिला ॥ तो तात्काळचि मृत्यु पावला ॥ तुजही तैशीच आली वेळा ॥ दशरथी तुजला न सोडी ॥३१॥
शिवें तुज दीधलें पिनाक जाण ॥ तेणें घेतलें क्षत्रियांचे प्राण ॥ ऐसें बोलतां ब्रह्मनंदन ॥ जमदग्निसुत क्षोभला ॥३२॥
किंवा मृगेंद्र निजेला ॥ तो पदघातें हाणोन जागा केला ॥ कीं नरसिंहचि प्रकटला ॥ स्तंभाबाहेर दुसऱ्यानें ॥३३॥
घृतें शिंपिला वैश्र्वानर ॥ कीं नासिकेवरी ताडिला व्याघ्र ॥ कीं बळेंचि खवळिला फणिवर ॥ कीं महारुद्र कोपविला ॥३४॥
मग विष्णुचाप चढविलें ॥ नारद भार्गव दोघे निघाले ॥ श्रीरामासी आडवे आले ॥ मनोवेगेंकरूनियां ॥३५॥
सांवळा पुरुष दैदीप्यमान ॥ विशाळनेत्र सुहास्यवदन ॥ जटामुकुट मस्तकीं पूर्ण ॥ यज्ञोपवीत झळकतसे ॥३६॥
कांसेसी विराजे पीतांबर ॥ तडित्प्राय उत्तरीयवस्त्र ॥ परम आरक्त दिसती नेत्र ॥ कीं सहस्रकर उतरला ॥३७॥
धनुष्यास बाण लावून ॥ मार्गीं उभा ठाकला येऊन ॥ सोळा पद्में दळ संपूर्ण ॥ कंपायमान जाहलें ॥३८॥
ती सप्तकें जेणें फिरोनि ॥ निर्वीर केली अवनि ॥ अवघे राजे टाकिले आटोनि ॥ कीं प्रळयाग्नि दुसरा ॥३९॥
ऐसा तो महाराज जामदग्न्य ॥ क्षत्रियजलदजालप्रभंजन ॥ कीं हा कुठारपाणि भृगुनंदन ॥ वीरकानन निर्मुळ केलें ॥२४०॥
मार्गीं देखतां महाव्याघ्र ॥ भयाभीत होती अजांचे भार ॥ तैसा देखतां रेणुकापुत्र ॥ शस्त्रें गळालीं बहुतांचीं ॥४१॥
गजबजिला दळभार समस्त ॥ मिथिलेश्र्वर होय भयभीत ॥ स्त्रियांमाजी दडला दशरथ ॥ म्हणे अनर्थ थोर मांडिला ॥४२॥
तो वैराग्यगजारूढ रघुनाथ ॥ वरी निर्धार चवरडोल शोभत ॥ पुढें अनुभव बैसला महावत ॥ विवेकांकुश घेऊनियां ॥४३॥
ज्ञानाचे ध्वज फडकती ॥ चपळेऐसे सतेज तळपती ॥ विज्ञानमकरबिरुदें निश्र्चिती ॥ पुढें चालती स्वानंदें ॥४४॥
निवृत्तीच्या पताका पालविती मुमुक्षुसाधका ॥ रामनामचिन्हांकित देखा ॥ दयावातें फडकती ॥४५॥
मनपवनाचे अश्र्वभार चालिले ॥ अनुसंधानवाद्रोरे लाविले ॥ विरक्तिपाखरेनें झांकिले ॥ अनुभवाचे सोडलिे मुक्तघोस ॥४६॥
चिद्ररत्नजडित दिव्य रथ ॥ चारी वाचा चक्रें घडघडित ॥ घोडे जुंपिले चारी पुरुषार्थ ॥ सारथि तेथें आनंद पैं ॥४७॥
नामशस्त्रें घेऊनि हातीं ॥ सोहंशब्दें वीर गर्जती ॥ क्षणें प्रपंचदळ विध्वंसिती ॥ नाटोपती कळिकाळा ॥४८॥
रामावरी अद्वयछत्र ॥ स्वानंदाचें मित्रपत्र ॥ तन्मय चामरें परिकर ॥ प्रेमकुंचे वरी ढाळिती ॥४९॥
हडपेकरी शुद्धसत्व ॥ निजभक्तीचे विडे देत ॥ अष्टभाव सेवक तेथ ॥ राघवा पुढें धांवती ॥२५०॥