पञ्चकोशविवेक - श्लोक १ ते २०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


गू० - " या वेद निहितं गूहांयां " या श्रुतीनें जें गूहेमध्यें असणारें ब्रह्म सांगितलें, तें पंचकोशांच्या विवेकानें समजण्याजोगें आहे, याकरितां आम्हीं पंचकोशाचें विवेचन करुन दाखवितों. ॥१॥

शि०- श्रुतींनीं जी गूहा सांगितली, ती कोणती? गू०- या अन्नमय स्थूल देहाच्या आंत प्राण आहेत, प्राण्याच्या आंतल्या बाजूस मन आहे मनाच्याही आंतल्या बाजूस कर्ता म्हणजे विज्ञानमय कोश आहे. त्याच्याही आंत भोक्ता म्हणजे आनंदमय कोश आहे. अशी जो अन्नमयापासून आनंदमयापर्यंत परंपरा सांगितली त्या परंपरेस गूहा असें म्हणतात. ॥२॥

शि०- या प्रत्येक कोशाचें स्वरुप काय आहे तें कृपा करुन सांगा. गू०- जो देह आईबापांनीं भक्षिलेंलें जें अन्न त्यापासून तयार झालेल्या वीर्यापासून उप्तन्न झाला. तो अन्नमय कोश होय. हा कोश आत्मा म्हणता येत नाहीं. कारण उप्तत्तीपूर्वी व मरणानंतर त्यांचा अभाव आहे. जो पदार्थ कार्य आहे. तो पदार्थ नाशवंत आहे देह हें कार्य असल्यामुळे त्याला अर्थातच नाश आहे. ॥३॥

शि०- आपण सांगितलेला हेतु खरा आहे, त्या हेतुपासून जी गोष्ट आपण सिद्ध केली, ती मात्र संभवत नाही. म्हणून तो हेतु अप्रयोजक आहे, असें मला वाटतें. कारण आपण देहाला जसें कार्यत्व लागू केलें; तसें माझ्या मतें आत्म्यालाही कार्यत्वच येतें तेव्हा देहालाच आत्मा ह्मणन्यास कोणची हरकत आहे. ? गू०- आत्म्यास कार्यत्व लागू केलें असतां दोन दोष प्राप्त होतात. एक अकृताभ्यागम म्हणजे कांहीं न करितां परिणाम घडणें आणि कृतप्रनाश म्हणजे केलेल्या कर्माचा कांहीच परिणाम नहोतां नाश होणें ह्या दोन्ही गोष्टी असंभवनीय आहेत. कारण या देहास जर तू आत्मा म्हणतोस तर, हा देहात्मा पुर्वजन्मीं नव्हता असें म्हणावें लागेल, आणि तसें समजल्यास या जन्माची प्राप्ति कशी होईल म्हणून येथें अकृताभ्यागम दोष आला तसेंच पुढील जन्मी हा देहरुप आत्मानाहीं म्हटल्यास आतां केलेल्या पुण्यपापाचा फलभोग घेण्यास पुढें कोणी नसल्यामुळे कर्मक्षय होऊन कृतप्रणाश दोष येऊं पाहतो. याकरितां आत्मा कशाचें तरी कार्य आहे म्हणून अन्नमय कोश आत्मा नव्हे हें सिद्ध झालें. ॥४॥

शिं- बरें हा अन्नमय कोश नसेल तर नसो; परंतु प्राणमय कोशास आत्मा म्हणण्यास कोणती हरकत आहे.? गू० अन्नमयाप्रमाणें प्राणमयालाही आत्मा म्हणतां येत नाहीं. याचें तुला स्वरुप दाखवुन नंतर अनात्मत्व सिद्ध करुन दाखवितों. जो वायु देहाचे ठायीं आपादमस्तक व्याप्त असून व्यानरुपाने शरीरास सामर्थ्य देतो व जो नेत्रादिक इंद्रियांचा प्रेरक आहे. त्या वायूस प्राणमय कोश असें म्हणतात या कोशालाही आत्मा म्हणता येत नाहीं. कारण याला चैतन्य म्हणजे ज्ञान मुळींच नाही. म्हणून हा जड आहे. याजकरितां काष्ठापाषाणादी पदार्थास आत्मा ह्मणणे जसें योग्य नाहीं तसे या प्राणमय कोशालाही आत्मा म्हणतां येत नाहीं. ॥५॥

शि० बरें मनोमय कोशाला तरी आत्मा म्हणतां येईल किंवा नाहीं? मला तर असें वाटतें कीं मन हें प्राणाप्रमाणें जड नाही म्हणून हेंच आत्मा आहे. गू०- त्यांचेही स्वरुप तुला सांगतों, म्हणजे पुर्वोक्त दोन कोशाप्रमाणें हा कोशही आत्मा नव्हें हें तुझ्या ध्यानांत येईल, जो या देहाला मी मी म्हणतो व गृहादिकांला माझेंमाझें असें म्हणतो, त्या कोशास मनोमया कोश असें म्हणतात हाही आत्मा होऊं शकत नाहीं, कारण हा कामक्रोधादिक वृत्तीय बनला असल्यामुळे चंचल व अनियमित आहे म्हणून यांस आत्मा म्हणता येत नाहीं. ॥६॥

शि०- बरें विज्ञानमय कोश तरी आत्मा होऊं शकेल की नाही. ? गू० त्याचेंही तुला लक्षण सांगतों जी बुद्धी चिंदाभासानें युक्त होऊन सूषुप्तीत लय पावते आणि जागृतीत शरीरास नखशिखांत व्यापून राहते, तिला विज्ञानमयकोश म्हणतात. हिला विलयादिक अवस्था असल्यामुळे आत्मा म्हणतां येत नाहीं. ॥७॥

शि०- मन आणि बुद्धि या दोनहीं अंतःकरणाच्या अवस्था आहेत. तेव्हा मनोमय आणि विज्ञानमय अशा दोन कोशाची कल्पना न करितां दोन्हीं मिळून एकच कोश असें कां मानलें नाहीं ? गू०- याचें कारण हेंच कीं, दोन्हीं जरी अंतःकरणाचीच रुपें आहेत तरी, कर्ता आणि कारण अशीं दोन रुपें दोहींची भिन्न भिन्न असल्यामुळे एकाला विज्ञानमय आणि दुसर्‍याला मनोमय असें म्हटलें एकच अंतःकरण आत असतांना कर्ता असतो. आणि तोच बाहेर आल्यावर मन होतें म्हणून दोन कोशांची कल्पना जी केली, ती योग्यच आहे. ॥८॥

शि०-हे चारही कोश आत्मा नव्हें अशी माझ्या मनाची खात्री बरीच झाली. परंतु पांचवा जो आनंदमय कोश, ज्यास भोक्ता असें म्हणतात, तो मात्र आत्मा नव्हे असे कधी म्हणता येणार नाहीं. गू०- त्याला देखील आत्मा म्हणतां येत नाही, त्याचे तुला येथे लक्षण सांगतो म्हणजे त्याचेंही आनात्मत्व तुझ्या लक्ष्यांत येईल पुण्यकर्मात फल अनुभवित असतां कोणी एक अंतःकरणाची वृत्ति अंतर्मुख होऊन तिजमध्ये आत्मस्वरुपाच्या आनंदाचें प्रतिबिंब पाडतें व तीच वृत्ति पुण्यभोग संपाला म्हणजे निद्रारुपानें लय पावते. ॥९॥

गू०- या वृत्तीसच आनंदमय कोश असें म्हणतात ही वृत्ति अमुक काळपर्यंतच राहणारी आहे, म्हणून ही अनित्य आहे तिला आत्मा कसें म्हणतां येईल ? पण या वृत्तीत ज्यांचें प्रतिबिंब पडलें अशी जी एक बिंबभूत वस्तु, तिला आत्मा म्हणतां येईल. कारण ती सर्वदा सारखी राहणारी आहे. ॥१०॥

शि०- अन्नमयापासून आनंदमयापर्यंत सर्व पांचही कोश आत्मा नव्हें असें आपण सिद्ध करुन दाखविलें खरें परंतु या पांच कोशांखरेज सहावा कोणीच दिसत नाहीं तेव्हा आपण जो आत्मा म्हणतां, तो कोठें आहे. ॥११॥

गू०- अरे आनंदमयापासून अन्नमयापर्यंत पांचही कोश ज्याच्या अनुभवास आले, तोच आमचा आत्मा तो नाहीं असें म्हणतां येईल काय? ॥१२॥

शि० तुम्हीं जो आत्मा सांगतां तो जर खरोखर असता, तर आमच्या अनुभवास आला असता; ज्या अर्थीं अनुभवास येत नाहीं त्या अर्थी तो नाहींच असे म्हटले पाहिजें. गू०- आम्ही जो पंच कोशांचा साक्षी सांगितला तो स्वतः अनुभवरुपच असल्यामुळें तो अनुभवास विषय होऊ शकत नाहीं. याचे कारण असें आहे कीं तेथे ज्ञाता व ज्ञान दोन्हींही नसल्यामुळे तो ज्ञानास विषय होत नाहीं, तथापि त्यांचें अस्तित्व कोठें जाईल? पूर्वोक्त पंचकोश ज्याच्या अनुभवास आले तो साक्षी असलास पाहिजे याला एक दृष्टीत देतों म्हणजे अनुभवरुप अत्माला अनुभवविषयत्व संभवत नाहीं हें तुला स्पष्टपणें समजून येईल. ॥१३॥

गू०- साखर व लिंबू यांसारखें जे स्वभावतः अनुक्रमें गोड व आंबट पदार्थ आहेत ते दुसर्‍या पिठासारख्या किंवा पाण्यासारख्या पदार्थाचा मिश्र केले असतां त्या पिठास किंवा पाण्यास गोडी किंवा आंबटपणा येतो. परंतु त्या साखरेस व लिंबास गोड किंवा आंबट करण्यास पिष्टादि पदार्थ समर्थ नाहींत. ॥१४॥

कारण ते स्वभावतः गोड व आंबट असल्यामुळें दुसर्‍या पदार्थांच्या मिश्रणाची त्यांस गरजच नाहीं. त्याप्रमाणें आत्मा हा अनुभवास विषय जरी न झाला, तरी स्वतःसिद्ध तो बोधरुप असल्यामुळे त्यांचें अस्तित्व कधीही नाहींसे करिता येणार नाहीं. यांस श्रुतींचें प्रमाणही आहे. ॥१५॥

हा पुरुष स्वयंज्योति आहे. सर्व विषयांच्या पुर्वी हा भासतो असा जो भासमान आत्मा त्याला अनुसरुनच सर्व जगत भासतें म्हणूण त्याच्या प्रकाशानेंच सर्व पदार्थ भासतात इत्यादीं श्रुतिवाक्यें आत्म्याचें स्वप्रकाशत्वे सूचवितात. ॥१६॥

आणखी दुसरीहीं अशींच प्रमाणे आहेत जेणेंकरुन हें सर्व जग जाणतें त्या आत्म्याला जाणण्यास कोण समर्थ आहे ? अरे, हा जो सर्व जगाचा साक्षी याला कोन जाणूं शकेल? मनानें याला जाणतां येईल अशी कोणी शंका घेईल, तर त्याजवर आमचें हें सांगणें की, आत्मा खेरीज करुन बाकीच्या सर्व पादार्थास जाणण्यास मात्र मन समर्थ आहे, परंतु मनाचा ही साक्षी जो आत्मा त्याला जाणण्यास तें कधीं समर्थ होणार नाहीं. ॥१७॥

तसेंच आणखीही दोन प्रमाणें तुला सांगतों "जें जाणण्यास योग्य आहे तें सर्व तो जाणतो" "त्याला जाणणारा दुसरा कोणीच नाहीं, ते ब्रह्म ज्ञात पदार्थ आणि अज्ञात पदार्थ यांहून अगदीं भिन्न असून केवळ बोध स्वरुप आहे. " ॥१८॥

शि०- ज्ञात आणि अज्ञात पदार्थाखेरीज बोध म्हणून जो तुम्हीं म्हणतां तो तरी अनुभवास कोठें येतो? गू०- घटादिकाच्या बोधाविषयीं अनुभव प्रत्यक्ष होत असून जो मनुष्य तसा अनुभव नाहीं म्हणतो, त्याला मनुष्य तरी कसें हणावें ? तों केवळ मनुष्याच्या आकृतीचा पाषाणच आहे असें, म्हटलें पाहिजें अशा दगडाला शास्त्रानें बोध तरी कसा करावा ? ॥१९॥

अरे, मला जिव्हा आहे की नाहीं असे जर कोणी पुसेल तर तें तें पुसणें केवळ लाजिरवाणें आहे. कारण जिव्हेवांचून तसें पुसतां तरी कसें येईल ? त्याप्रमाणें बोधाचा मला अनुभव नाहीं, असें म्हणणें मुढपणाचें नव्हे काय ? शि०- बरे आपण म्हणतां तसेंच का होईना परंतु प्रस्तुत जें आमचें ब्रह्मज्ञानाचें बोलणें चाललें आहे, त्याची सिद्धता कशी झाली. ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP