तत्वविवेक - श्लोक १ ते २०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

जगत्प्रपंचासहवर्तमान जें मूल अज्ञान तेंच कोणी एक मकर ( सुसर ) तिचा ग्रास करुन टाकणें हेंच मुख्य कृत्य ज्याचें असा जो आनंददायक आनंदरुपी परमात्मा गुरु त्याच्या पदकमलाला नमस्कार असो. ॥१॥

त्या श्रीसद्गुरुच्या पदकमलद्वयाची सेवा करुन ज्यांचें चित्त निर्मल झालें आहे, अशा पुरुषांना सुलभ रीत्या तत्त्वज्ञान व्हावें म्हणून आम्हीं येथें तत्त्वविवेकाचें निरुपण करितों. ॥२॥

जाग्रदवस्थेमध्ये भासणारे शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध. हे पांच विषय जरी एकमेकापासून भिन्न दिसतात, तथापि त्या सर्वाचें ज्ञान म्हणून एकच आहे. उदाहरण, आम्हास घट दिसतो आणि शब्द ऐकूं येतो. येथें जरी घटापासून शब्द भिन्न आहे, तरी त्या दोहोंचें ज्ञान एकच आहे. ॥३॥

त्याचप्रमाणें स्वप्नांतीलही प्रकार - स्वप्न म्हणजे जागृतीमध्यें जें आम्हास विषयज्ञान होतें त्याचाच संस्कार ज्या अवस्थेमध्यें पुनः इंद्रियांच्या सहायावांचून उमटतो ती अवस्था. या दोनही अवस्थांमध्यें भेद इतकार कीं, स्वप्नांतील पदार्थ केवळ भासरुप असून कालांतरी त्यांचा उपयोग होत नाहीं, आणि जागृतींतील पदार्थ अधिक स्थिर असून कालांतरी त्याचा उपयोग होतो. असा जरी भेद आहे तरी त्या अवस्थेंतील ज्ञान म्हणून एकच आहे. ॥४॥

वर आम्ही जागृती आणि स्वप्न या दोनही अवस्थांतील ज्ञानाचें ऐक्य सिद्ध केलें. आतां सुषुप्तींतील ज्ञानाविषयीं विचार करुं. कोणी म्हणेल कीं सुषुप्तींत ज्ञानच मुळी नाही. तर ही शंका योग्य नाहीं, कारण झोंपेंतून उठलला मनुष्य असें सांगतो कीं, " मी इतका वेळ सुखानें निजलों होतों, मला कांही समजलें नाही " असें जें त्याला स्मरण होतें तें पूर्वीच्या अनुभवावांचून कसें होईल ? जेथें स्मरण आहे, तेथें पूर्वीचा अनुभव असलाच पाहिजे. अमुक स्थळीं अमुक पदार्थ आहे असें समजण्यास जसा डोळा पाहिजे, तसा तो नाहीं असें समजण्यासही डोळाच पाहिजे. त्याप्रमाणें " कांही नाही " असें समजणें हें देखील ज्ञानच आहे; म्हणून जागृती व स्वप्न याप्रमाणें निद्रेंतही अज्ञानाचें ज्ञान आहे ही गोष्ट निर्विवाद सिद्ध झाली. ॥५॥

" मला कांही समजलें नाहीं " असें जें हें सुषुप्तीतील अभावज्ञान तेंही जाग्रत्स्वप्नांतील ज्ञानाप्रमाणें विषयापासून मात्र भिन्न आहे; ज्ञानापासून भिन्न नाही. याठिकाणी कांही न समजणें हाच विषय. म्हणून स्वप्नांतील व जागृतीतील ज्ञानांत जसा भेद नाहीं, तसा उभयावस्थेंतील ज्ञानांत व सुषुप्तीतील ज्ञानांतही भेद नाही. याप्रमाणें जाग्रत्स्वप्नसुषुप्ती यां तीनही अवस्थांमध्ये ज्ञान एकच रुपानें असतें हें सिद्ध झालें. ॥६॥

एकाच दिवशीं जाग्रत्स्वप्नसुषुप्ती या तीनही अवस्थांतील ज्ञान जसें एकच आहे त्याप्रमाणें आजपर्यंत गेलेला काळ व पुढें येणारा काळ म्हणतील दिवस, महिने, वर्ष, युगें व कल्पांची कल्पें जरी लोटलीं तरी ज्ञानाचा अभेदच आहे. आतां ज्या अर्थी सर्वकाळ ज्ञानाचें ऐक्य आहे त्या अर्थी तें उत्पत्ति - विनाशशून्य व स्वयंप्रकाश असलेंच पाहिजे; कारण यास उत्पत्ति - विनाश आहेत, असें जर म्हणावें तर त्या उत्पत्ति - विनाशांस पाहणारा कोणी साक्षी असलाच पाहिजे. उत्पत्ति विनाश ज्याचे त्यास दिसणें अगदीं अशक्य आहे. या साक्षीरुप ज्ञानाचे उत्पत्ति विनाश दुसर्‍या एका साक्षिरुप ज्ञानास दिसतात असें जर म्हणावें तर तेंही संभवत नाहीं; कारण या साक्षीवांचून दुसरें ज्ञानच नाही. याजवर अशी एक शंका आहे कीं, वरील साक्षीरुप ज्ञानावांचून दुसरें ज्ञानच नाहीं असे म्हटलें तर त्याला कोणी पहाणारा नसल्यामुळें साक्षीचें ही अस्तित्व नाहीसें होईल. तर याचें उत्तर हेंच कीं, वर सिद्ध केलेलें ज्ञान दुसर्‍या ज्ञानाला विषय न होतां प्रत्यक्ष आहे. घटादिपदार्थाची गोष्ट तशी नाहीं. ते प्रत्यक्ष होण्यास इंद्रियादि ज्ञानसाधनांची गरज आहे; तशी याला गरज नाहीं; हें आपणास आपणच जाणतें असेंही म्हणतां कामा नये. कारण तसें मानल्यास कर्मकर्तृत्वविरोध होईल. म्हणजे कर्म आणि कर्ता एकच होईल. म्हणून हें ज्ञान नित्य असून स्वयंप्रकाश आहे असें कबूल करणें भाग आहे. ॥७॥

वर सिद्ध केलेलें जें नित्य आणि स्वयंप्रकाश साक्षिज्ञान तेंच आत्मा म्हणणें योग्य आहे; कारण आत्मा सच्चिदानंदरुप आहे असें श्रुति म्हणत्ये. हें साक्षिज्ञानही सच्चिदानंदरुपच आहे. तीन रुपांपैकी पहिलीं दोन तर वर सिद्ध केलीच आहेत. आतां यास आनंदरुपता कशी येते ती सिद्ध करुन दाखवितों. जीवाची प्रीति सुखावर साहजिक आहे म्हणून जेथें ज्या मानानें सुख असतें तेथें त्या मानानें प्रीति असते, या नियमावरुन ज्या वस्तूचेठाई निःसीम प्रेम आहे, ती वस्तु परमानंदरुप असलीच पाहिजे. आतां आत्म्यावर आमची निरतिशय प्रीति आहे म्हणून आत्मा परमानंदरुप आहे, ही गोष्ट सिद्ध आहे. आतां कोणी अशी शंका घेईल कीं, " मला मरण येवो, मी व्यर्थ जन्मलों. " असा केव्हां केव्हां आपल्याविषयींचा कंटाळा आढळतो. मग आत्मा निःसीम प्रितीस विषय आहे असें कसें म्हणतां ? कारण यावरुन आत्म्याविषयींचे प्रितीसच मुळीं व्यत्यय येतो. मग ती निःसीम आहे ही गोष्ट तर दूरच या शंकेचे समाधान असें कीं, वरील प्रकारें आत्म्याविषयींचा जो द्वेष केव्हां केव्हां आढळतो, तो केवळ देहाच्या संबंधानें आहे आत्म्याच्या संबंधानें नव्हे. मनुष्यावर कांही वाईट प्रसंग प्रसंग गुदरला म्हणजे हा देह नको, प्राण नको कांही नको, दे माय धरणी ठाय, अशी मनुष्याची स्थिति होते, तीही आत्मसुखाकरितांच होते. ॥८॥

पुत्रांदिकांवर जी आम्ही प्रीति करतों ती केवळ आपल्या सुखाकरितां, व आपल्यावर जी करितों ती प्रीति दुसर्‍याकरितां कधींही नसते. म्हणून आत्मा परमानंदरुप आहे ही गोष्ट अगदीं निर्विवाद सिद्ध आहे. ॥९॥

याप्रमाणें ज्ञानाचें नित्यत्व सिद्ध करुन तें ज्ञान सच्चिदानंदरुप असल्यामुळें तेंच आत्मा ठरलें. हें आत्म्याचें सच्चिदानंदरुप केवळ युक्तीनेंच ठरलें, व त्यास श्रुतिप्रमाण नाहीं असें मात्र कोणी समजूं नये. कारण तशाच लक्षणांनीं युक्त परब्रह्म व त्याचें आणि आत्म्याचें ऐक्य वेदांतांत सिद्ध केलें आहे; म्हणून श्रुति आणि युक्ति या दोहोंच्या कसोटीनें आत्मा सच्चिदानंदरुप आहे हें सिद्ध झाले. ॥१०॥

या आत्म्याची परमानंदरुपता अशी आहे कीं, एकीकडून पाहिलें असतां तिची प्रतीति आहे, आणि दुसरीकडून पाहिलें असतां तिची प्रतीति नाहीं; असें नजरेस येतें. त्या आनंदाचें भान नाहीं म्हणावें तर मनुष्याची प्रीति स्वतः वर निःसीम आहे. कारण, विषयसौदर्यज्ञान जाहल्यावांचून प्रीति उत्पन्नच होत नाही. बरें त्याचें भान मनुष्यास आहे म्हणावें तर त्याची विषयांवर इतकी कां आसक्ती असावी ? फलप्राप्ति जाहल्यावर साधनास कोण विचारतो. निरतिशय आनंदाचा लाभ जाहला असतां क्षणिक आणि साधनावर अवलंबून असणारें जें वैषयिक सुख त्याजवर मनुष्याचें मन जाईल काय ? परंतु विषयावर आमची आसक्ति फारच आहे, तेव्हां त्या आनंदाचें भान आहे असेंही म्हणतां येत नाही. याप्रमाणें दोन्हीकडून दोष येतात. म्हणून भान आणि अभान हीं दोन्ही रुपें आत्म्यास आहेत म्हणणें भाग आलें. ॥११॥

पण तसें जर म्हणावें, तर एकाच वस्तूस एकदम भान आणि अभान कसें संभवेल असा एक प्रश्न उत्पन्न होतो, तर यावर आम्ही असें पुसतों कीं, तुम्ही जो असंभव मानितां त्यास दोन कारणें असलीं पाहिजेत. एक - कोणीही अशी गोष्ट जगामध्यें पाहिली नसावी. दुसरें - तिजविषयीं कोणचीही उपपत्ति जुळूं नये. ही दोन्ही येथें संभवत नाहींत. अशा गोष्टी जगामध्यें दृष्टीस पडतात हें पुढील दृष्टतांवरुन चांगलें ध्यानांत येईल, कल्पना करा कीं, कोणी एका गृहस्थाचा मुलगा वेदशाळेंत अध्ययन करीत आहे. एके दिवशीं आपल्या वर्गांतील मुलाबरोबर तो पंचिकेची आवृत्ति उच्च स्वरानें करीत असतां शाळेबाहेरच्या पडर्वीत त्याचा बाप येऊन ऐकत उभा राहिला. त्यास हा माझ्या मुलाचा स्वर आहे असें विशेंषेंकरुन सांगतां जरी न आलें तथापि त्या सर्व घोषांत आपल्या मुलाचा स्वर खचित आहे असें सामान्यत्वेंकरुन त्यास समजतें. त्याप्रमाणें आत्मानंदाचें भान आहे असें म्हणण्यास प्रत्यवाय कोणता ? याविषयीं उपपत्तीही तशीच जुळते. वस्तूंचे भान असून अभान जें होतें तें केवळ प्रतिबंधानें होतें. ॥१२॥

प्रतिबंध म्हणजे आहे व भासतें अशा व्यवहारास ज्या योग्य वस्तु त्यांच्याठायीं वरील आहे व भासतें याच्या विरुद्ध, नाहीं, व भासत नाहीं; अशा व्यवहाराची जी उत्पत्ति तीच येथें प्रतिबंध असें समजावें. ॥१३॥

आतां हा प्रतिबंध वरील दृष्टांतावरुन कसा जुळतो तो पहा. दृष्टांतात पुत्रध्वनि विशेषेंकरुन ध्यानांत न येण्यास समानभिहार ( सर्वांबरोबर सारख्या स्वरानें पठन करणें ) हेंच होय. त्याप्रमाणेंच आत्मा नित्य प्रतीतीस येण्यास येथें मुख्य प्रतिबंध म्हटला म्हणजे अविद्या होय. विपरीतज्ञानास तीच कारण होय. ॥१४॥

आतां ती अविद्या कोणती याचा विचार करुं. परतु तिचें स्वरुप सांगण्यापूर्वी तिचें मूळ जी प्रकृति ती प्रथम सांगतों. जिचेमध्यें सच्चिदानंद ब्रह्माचें प्रतिबिंब आहे जामध्यें सत्त्व, रज व तम हे तिन्ही गुण सारख्या मानानें आहेत तिला प्रकृति असें म्हणतात. ॥१५॥

तिचे दोन प्रकार आहेत. जीमध्यें शब्द सत्त्वगुण अधिक असून इतर दोन गुणांनी तो गढूळ जाहलेला नसतो; तिला माया असे म्हणतात. व जीमध्यें तो गुण इतर दोन गुणांनीं गढूळ जाहलेला नसतो; तिला माया असें म्हणतात. व जीमध्यें तो गुण इतर दोन गुणांनी गढूळ जाहलेला असतो; तिला अविद्या असें म्हणतात. पहिली शुद्धसत्त्वप्रधान आहे. पहिली जी माया सांगितली तिजमध्यें प्रतिबिंबित जो चैतन्य आत्मा त्याणें त्या मायेस आपले स्वाधीन ठेविलें आहे. तोच सर्वज्ञ व सर्व शक्तिमान् ईश्वर होय. ॥१६॥

आणि अविद्येमध्यें प्रतिबिंबित जो चिदात्मा तोच जीव. तो परतंत्र आहे. ती अविद्या नानाप्रकारची असल्यामुळें तिजमध्यें प्रतिबिंबित जो जीव तोही देव, मनुष्य, पशु, पक्षी या भेदेंकरुन नानाप्रकारचा जाहला आहे. या जीवास स्थूल, सूक्ष्म आणि कारण हीं तीन शरीरें आहेत. वर सांगितलेली जी अविद्या तीच याचें कारणशरीर आहे; आणि त्या कारणशरीरास तादात्म्याध्यासेंकरुन " मी " म्हणणारा जो जीव त्यास प्राज्ञ असें म्हणतात. ॥१७॥

आतां सूक्ष्म शरीर कोणतें, व त्याचा अभिमानी कोण, हें आह्मी सांगतों. परंतु हें शरीर कसें बनलें हें सांगण्यास त्यास कारणीभूत जी आकाशादि सृष्टि ती आधीं सांगितली पाहिजे. म्हणून ती येथें सांगतो. वर जो कारणशरीराभिमानी प्राज्ञ सांगितला त्यास सुखदुःखाचा भोग व्हावा म्हणून पूर्वोक्त तमः प्रधानप्रकृतीपासून ईश्वराच्या आज्ञे नें म्हणजे इच्छेनें आकाश, वायु, तेन, आप आणि पृथ्वी अशी पंचभूतें कर्मेकरुन एकापासून एकी अशी उत्पन्न झालीं. ॥१८॥

मूळप्रकृती विगुणात्मक आहे. तेव्हां तिजपासून उत्पन्न जाहलेलीं जीं पंचभूत तींहीं त्रिगुणात्मकच असली पाहिजेत; म्हणजे, प्रत्येकांत कांहीं अंश सत्त्वाचा, काही रजाचा आणि काही तमाचा असें तिन्ही अंश असेल पाहिजेत. त्या प्रत्येक भूताच्या सत्त्वांशांनी क्रमेंकरुन श्रोत्र, त्वचा, नेत्र, रसना आणि घ्राण अशी पांच ज्ञानेंद्रियें बनलीं; म्हणजे आकाशाच्या सत्त्वांशनें श्रोत्र, आपाच्या सत्वांशनें रसना, वायूच्या सत्त्वांशानें त्वचा, अग्नीच्या सत्वांशानें नेत्र आणि पृथ्वीच्या सत्त्वांशानें घ्राणेंद्रिय झालें, असें समजावें ॥१९॥

प्रत्येक भूताच्या सत्त्वांशानें एक एक इंद्रिय बनलें. त्याप्रमाणें सर्वांचे सत्त्वांश एकत्र मिळून त्या मिश्रणापासून अंतः करण बनलें. या अंतःकरणाचीं रुपें वृत्तिभदानें दोन आहेत. या ची वृत्ती जेव्हां संशयात्मक असते, तेव्हां त्यास मन असें म्हणतात. जेव्हां ती निश्चयात्मक असते, तेव्हां त्यास बुद्धि असें म्हणतात. ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 13, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP