३३६६.
ऎका पुण्यपावन व्रताचें महिमान आचरतां जन दोष जाती ॥१॥
सर्वांमाजीं सार व्रत एकादशी । रुक्मांगद सूर्यवंशी करी नेमें ॥२॥
तिथि नेमें व्रत करीत आदरें । पूजन स्मरण जागरे यथाविधि ॥३॥
एका जनार्दनी पुण्यपावन व्रत । आदरें आचरत रुक्मांगद ॥४॥
३३६७.
कांतीपुरीमाजीं राजा रुक्मांगद एकनिष्ठ शुध्द पुण्य गांठीं ॥१॥
सहनशील दया मूर्तिमंत अंगी । न भंगे प्रसंगी सत्वधीर ॥२॥
न्यायनीती राज्य पाळी ब्राम्हणासी । मूर्तिमंत धर्मासी स्थापियेले ॥३॥
दीनाचें रक्षण साधूचें पूजन । संतांचें वचन मान्य सदा ॥४॥
एका जनार्दनी साधियेला नेम । परि काहीं कर्म वोढवलें ॥५॥
३३६८.
पुण्यवंत जीव भूमी पुण्य देश । श्रीहरीची विशेष भक्ति जेथें ॥१॥
जाणोनियां इंद्र पाठवी विमान । आणवी सुमनें कांतीयेची ॥२॥
देवाच्या पूजना सूमनें न मिळतां । राय पाचारीत वनमाळा ॥३॥
सेवक म्हणती सायंकाळी कांही । दिसों येत नाहीं रात्रीमाजीं ॥४॥
रात्रीं जाग्रणा बैसली रक्षक । लाविला वृंतारक अग्नीकाष्ठीं ॥५॥
सावधान ठायी जागती सर्वही । विमान तें समयीं आलें तेथें ॥६॥
तोडिली सुमनें गुप्तरुपें त्यांनी । विमान तों तेथोनी न चलेची ॥७॥
एका जनार्दनीं देवदूत कष्टीं । न चले त्यांची युक्ति काहीं केल्या ॥८॥
३३६९.
उगवला दिन दूत ते धांवती । सांगती रायाप्रती धरिले चोरी ॥१॥
उगवले कोटी भानुप्रभा तेवीं दिसे । येऊनियां पुसे राजा तेथें ॥२॥
इंद्रें पाठविले न्यावया सुमनें । तुम्ही पुण्यवंत जाण म्हणोनियां ॥३॥
धन्य ग्राम पुण्यवंत भूमी जन । आम्हांलागी विघ्न कां हें आलें ॥४॥
राहावया तुम्हां कोणतें कारण । लागला धूम्र जाण वृंतारकाचा ॥५॥
एका जनार्दनीं यासी उपाय । पतिव्रता होय एकादशी व्रतीं ॥६॥
३३७०.
आणविल्या सर्व गांवींच्या युवती । नुचलें कल्पांती विमान तें ॥१॥
आतां यासी काय करावा उपाय । येरु म्हणती पाहे ग्रामामाजीं ॥२॥
पतिव्रता हो का भलते यातीची । शुध्द वासनेची एकनिष्ठ ॥३॥
एका जनार्दनीं घडेल एकादशी । तिचें पुण्य हातीं विमान जाये ॥४॥
३३७१.
रात्रीं जाग्रण नामस्मरण चित्तीं । घडली ते तिथी एकादशी ॥१॥
तियेचे हातीं विमानासी गती । चालावया पंथी वेळ नाहीं ॥२॥
तेव्हा पाचारिल्या अन्य याती नारी । नेणत्या कुमारी होत्या त्याही ॥३॥
तिळभरी नाहीं चालावया रीग । दवंडी पिटी वेगें शीघ्र राजा ॥४॥
एका जनार्दनी निघालिया सर्व । तो तेथें अपूर्व नवलाव ॥५॥
३३७२.
तरुणी रजकी नूतन यौवनी । बैसली रुसुनी एकान्तासी ॥१॥
धुंडुनियां मातें धाडी सासुरिया । तो म्हणे मी राया ऎसा नोहे ॥२॥
येरी म्हणे मी तों कुळींची निर्दोष । शुध्द माझा वंश रजकाचा ॥३॥
ऎकिला संवाद दौंडीकरें त्याचा । आणि विनोदाचा समाचार ॥४॥
एका जनार्दनीं धाऊनियां दूत । रायासी ती मात सांगताती ॥५॥
३३७३.
पाठवुनी दूत आणविलें तिसी । विस्मयो सर्वांसी होत जाला ॥१॥
साशंकित राजा लावीं म्हणे हात । विमान क्षणांत उचलिलें ॥२॥
धन्य म्हणे राजा ही माझी प्रजा । रजकाचेवे भाजा धन्य जाली ॥३॥
सांगे सकळांसी एकादशीर करा । हरिदिनीं जागरा निजूं नका ॥४॥
एका जनार्दनीं सांडोनी अभिमान । तेव्हांची साध्य होय ॥५॥
३३७४.
निर्धारे नेमेंसी करी एकादशी । तृणजीवन पशूंसी घेऊं नेदी ॥१॥
राष्ट्रामाजीं रुढी केली हरिभक्ती । दया सर्वांभूतीं समानची ॥२॥
हरिकीर्तनाच्या भरियेल्या रासी । भेदीत आकाशीं पुण्य जाये ॥३॥
मध्यें आला कांही व्रता अंतराय । अपाय तो पाहे मोहनीचा ॥४॥
एका जनार्दनी होतां स्त्रीसंग । नेमा होय भंग तात्काळीक ॥५॥
३३७५.
भुलविला राजा लावण्याच्या तेजें । नेम व्रतराज खोळंबिला ॥१॥
राजपत्नीपुत्र नाम धर्मांगद । चालवी सुबुध्द एकादशी ॥२॥
बहुदिन होतां न कळे रायासी । मोहोनियां पाशीं बांधियेला ॥३॥
पुढें आली जाणा तेव्हां हरिदिनीं । लोकांलागीं राणी सांगताहे ॥४॥
धेंडा पिटविला श्रीहरि जागरु । करा निरंतरु निजूं नका ॥५॥
एका जनार्दनी नृपें ऎकिलें कानीं । धिग म्हणोनि प्राणी जन्मा आलों ॥६॥
३३७६.
उतरला तळीं टाकियेली शय्या । स्नान केलें तया शीतोदकें ॥१॥
बैसे घालोनियां तृणाचें आसन । सारी नित्य नेम यथाविधी ॥२॥
नेम भंग जाला वर्जिली मोहिनी । नायके तो ध्यानीं बैसला ॥३॥
एका जनार्दनीं अनुतापावांचून । न घडे नामस्मरणं कालत्रयीं ॥४॥
३३७७.
अनुतापें करीं नामस्मरण वाचे । तंव मोहिनी येउनी साचे कर धरी ॥१॥
आडवी मोहिनी उगवतां दिन । सत्वाचें हरण करुं पाहे ॥२॥
मज दिली भाक उगवली आजी । प्रतिज्ञा हे माझी खरी जाली ॥३॥
देई मज आशा सोडी कां उदक । सुकृत सम्यक व्रताचें तें ॥४॥
चिंतावला राजा मागें म्हणॆ पाटलासी । इच्छिलें पदार्थांसी देईन मी ॥५॥
येरी म्हणे तुझा कुळींचा दीपक । तो देई सम्यक मजलागीं ॥६॥
नाहीं चाड मज पदार्थी अनेकां । कापोनियां दे कां मस्तकासी ॥७॥
एक जनार्दनीं राजिया संकट । न सुचे आणीक कांही तया ॥८॥
३३७८.
धांवे देवा तूं निर्वाणीं । तुजविण नाहीं कोण्ही ॥१॥
भुली पडली विषयसुखें । पात्र जालों महादु:खें ॥२॥
विसरलों हित । नेणें बुडालें स्वहित ॥३॥
एका जनार्दनीं । भुललासें नाहीं कोण्ही ॥४॥
३३७९.
मात कळों सरे पत्नीपुत्रा वेगें । पातलीसे दोघें रायापाशीं ॥१॥
गोंवियला राजा दिसे वेडा झाला । रानीं बोले तिला माग काई ॥२॥
येरी म्हणे शीर तुझिया पुत्राचें । आपुलिये वाचे रायें दिलें ॥३॥
एका जनार्दनीं मोहिनीचा शब्द । ऎकोनी धर्मांगद काय बोले ॥४॥
३३८०.
पित्याचिये काजा देह हें वेंचावें । तेव्हांची बरवें दिसे लोकीं ॥१॥
सरसावला पुत्र म्हणे मातेप्रती । वांचवीं भूपती सत्वा हातीं ॥२॥
तोषेल श्रीपती मज ऎसे किती । पुत्र तुम्हां होती सत्वधीर ॥३॥
एका जनार्दनी सत्वाचा आगळा । प्रिय तो गोपाळ तोचि एक ॥४॥
३३८१.
वोडवोनि मान आला रायापाशीं । निर्भय मानसीं धर्मांगद ॥१॥
घेऊनियां शस्त्र स्मरला अच्युत । उभारिला हात मारावया ॥२॥
अंतकाळीं केल्या देवाचें स्मरण । तेव्हा नारायण धांव घाली ॥३॥
धरियेला हात माथां ठेवी कर । म्हणे माग वर मज कांहीं ॥४॥
एका जनार्दनीं नाम आलें मुखा । पांडुरंग सखा होय त्याचा ॥५॥
३३८२.
आश्वासिलें भक्ता दिलें सर्व सुख । बैसविले लोक विमानांत ॥१॥
नारी नर पशू जीवजंतु भुते । विमानीं समस्तें बैसविलीं ॥२॥
पातली मोहनी म्हणे देवराया । सांडिसी कां वायां मजलागीं ॥३॥
कोण अपराध घडलासे मज । दीनानाथ साजे नाम तुम्हां ॥४॥
इंद्र आज्ञेमुळें छळियेलें राया । एका जनार्दनीं पायां लागतसे ॥५॥
३३८३.
आली कृपा तिची दिधलासे वर । राहें निरंतर मृत्युलोकीं ॥१॥
पुढे हरिदिनीं जे कोणी करिती । द्वादशीसी घेती निद्रा कांही ॥२॥
त्याचें पुण्य फ़ळ तुजलागीं प्राप्त । हो कां जरी आप्त मज प्रिये ॥३॥
तया पुण्यें तुझा होईल उध्दार । देऊनियां वर ठेवियेली ॥४॥
एका जनार्दनीं उक्ती हे भागवतीं । तुम्हां सर्वांप्रती निवेदली ॥५॥
३३८४.
सकळ नगरी वाहिली विमानीं । वैकुठ भुवनीं पावविला ॥१॥
करा एकादशी जागर कीर्तन । द्वादशी भोजन द्विजपंक्ती ॥२॥
दिवसा सावध हरीचें चिंतन । रात्रीं जागरण कीर्तनसार ॥३॥
एका जनार्दनीं साधावें हें व्रत । तेणे मोक्ष प्राप्त अर्धक्षणीं ॥४॥
३३८५.
व्रतामाजीं व्रत एकादशी पावन । दिंडी जागरण देवा प्रिय ॥१॥
अष्टही प्रहर हरिकथा करी । वाचें विठ्ठल हरी वदोनियां ॥२॥
टाळ मृदंग वाजती गजरें । विठ्ठल प्रेमभरें नाचतसे ॥३॥
एका जनार्दनीं व्रताचा छंद । तेणें परमानंद सुख पावे ॥४॥
३३८६.
आषाढी पर्वकाळ एकादशी दिन । हरिजाग्रण देवा प्रिय ॥१॥
निराहारे जो व्रत करी आवडी । मोक्ष परवडी त्याचे घरीं ॥२॥
व्रत आचरती हरिकथा करिती । नामघोष गाती आवडीनें ॥३॥
प्रदक्षणा तीर्थ आचरें सेविती । पूर्वज ते जाती वैंकुठासी ॥४॥
पुडलिकाचें दरुशन चंद्रभागे स्नान । विठठल दरुशनें धन्य होती ॥५॥
एका जनार्दनीं ऎसा ज्यांचा नेम । तया सर्वोत्तम नुपेक्षी तो ॥६॥
३३८७.
एकादशी एकादशी । जया छंद अहर्निशी ॥१॥
व्रत करी जो नेमानें । तया वैंकुठीचें पेणें ॥२॥
नामस्मरण जाग्रण । वाचें गाये नारायण ॥३॥
तोचि भक्त सत्य साचा । एका जनार्दन म्हणे वाचा ॥४॥
३३८८.
व्रत जे करिती तया जे निंदिती । त्याचे पूर्वज जाती नरकामधीं ॥१॥
भाळे भोळे भक्त वेडें वांकुडें गाती । तया जे हासती ते श्वानसम ॥२॥
स्वमुख देव आवडीने सांगे । तयाचिये मागें हिंडे देवो ॥३॥
एका जनार्दनीं भोळा देव । भक्ताचा गौरव करीतुसे ॥४॥
३३८९.
दशमी व्रताचा आरंभु । दिंडी कीर्तन करा समारंभु । तेणे तो स्वयंभु । संतोष पावे ॥१॥
एकादशी जाग्रण । हरिपूजन नामकीर्तन । द्वादशी क्षीरापती जाण । वैष्णव जन सेविती ॥२॥
ऎसें व्रत तीन दिन । करी जो आदरें परिपूर्ण । एका जनार्दनीं बंधन । तया नाहीं सर्वथा ॥३॥
३३९०.
क्षीरसागरीचें नावडे सुख । क्षीरापती देखे देव आला ॥१॥
कवळी कवळ पहा हो । मुख पसरुनी धांवतो देवो ॥२॥
एकादशी देव आला । क्षीरपतीलागीं टोकत ठेला ॥३॥
द्बादशी क्षीरापती ऎकोनी गोष्टी । आवडी देतसे मिठी ॥४॥
क्षीरापती घालितां वैष्णवा मुखीं । तेणें मुखें होतसे सुखी ॥५॥
क्षीरापती सेवितां आनंदु । स्वानंदे भुलला नाचे गोविंदु ॥६॥
क्षीरापती सेवितां वैष्णवा लाहो । मुखामाजीं मुख घालितो देवो ॥७॥
क्षीरापती चारा जनार्दन मुखीं । एकाएकीं तेणें होतसे सुखी ॥८॥
३३९१.
रुक्मांगदाकारणें एकादशीचा छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥१॥
अंबऋषीकारणॆं द्वादशीचा छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥२॥
प्रल्हादाकारणें हरिनामाचा छंद । तेणें परमानंद प्रगटला ॥३॥
एका जनार्दनीं एकविधा छंद । तेणॆं परमानंद प्रगटला ॥४॥
३३९२.
मागें संतें सांगितलें । तें हें आलें फ़ळासी ॥१॥
जावें शरण विठोबासी । मग सुखासी काय उणें ॥२॥
करावें व्रत एकादशी । द्वादशी क्षीरापती सेवन ॥३॥
नेमें जावें पंढरीसी । तेणें चौर्यांयशी चुकती ॥४॥
एका जनार्दनीं हेचिं सार । वाया भार कासया ॥५॥
३३९३.
नामस्मरण हरिकीर्तन । एकादशीचा व्रत हरिजागरण । द्वादशी क्षीरापती सेवन । सुकृता त्या पार नाहीं ॥१॥
घडतां तिन्ही साधन । कलिमाजीं तो पावन । त्याच्या अनुग्रहें करुन । तरती जन असंख्य ॥२॥
एका जनार्दनीं भाक । पुन्हां जन्म नाहीं देख । साधन आणिक । दुजें नको करणें ॥३॥
३३९४.
करा हरिभक्ती संतांचें पूजन । व्रत एकादशी रात्रो जाग्रण । वासुदेव नामाचें मुखीं उच्चारण । तेणें न होय बंधन यमाचें ॥१॥
रामकृष्ण वासुदेव वदे । रामकृष्ण वासुदेव ॥ध्रुव॥
नित्य वाचे नामावळी । वदे वदे सर्व काळीं । पातकांची होळी । क्षणमात्रें होईल ॥२॥
जनांसी तारक वासुदेव नाम । आणीक नको साधन वायांचि नेम ।
गावें तूं सुखें जनीं जनार्दन । एकाभावें वंदी एका जनार्दन ॥३॥