श्रीभानुदासांचे अभंग - नाममहिमा

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्री कृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


३६

आमुचिये कूळीं पंढरीचा नेम । मुखीं सदा नाम विठ्ठलांचें ॥१॥

न कळे आचार न कळे विचार । न कळे वेव्हार प्रपंचाचा ॥२॥

असों भलते ठायीं जपूं नामावळी । कर्माकर्म होळी होय तेणें ॥३॥

भानुदास म्हणे उपदेश आम्हां । जोडिला परमात्मा श्रीराम हा ॥४॥

३७

जपतां नाम विठठलांचे । भय नाहीं हो काळांचे ॥१॥

नाममंत्र त्रिअक्षर । करी सदा तो उच्चार ॥२॥

विठ्ठलनामें सुख आनंद । भानुदासा परमानंद ॥३॥

३८

तुमचें नाम गोड नाम गोड । पुरवी कोड जीवांचें ॥१॥

वाचे सुलभ नामावळी । महादोषां होय होली ॥२॥

सुख अनुपम्य गातां नाम । भानूदास म्हणे आम्हां विश्राम ॥३॥

३९

नामाचा महिमा शुक सांगे । परिक्षिती राजा जाणे अंगें ॥१॥

जपतांचि रामकृष्ण नामें । दहन होतीं कर्माकर्में ॥२॥

नामें दया शांति क्षमा । नामें शीतळ शंकर उमा ॥३॥

नाम जप ध्यानीं मनीं । भानुदास वंदितो चरणीं ॥४॥

४०

एक नामापरतें साधन । नाहीं नाहीं दुजें आन ॥१॥

वाया धावतीं बराडी । करती संसाराची जोडी ॥२॥

न चुकें जन्ममरण वेरझारा । हे तो नकळे पामरा ॥३॥

नामा वांचुनि जें जें कर्म । अवघा जाण तो अधर्म ॥४॥

भानुदास प्रेमें नाचे । सदा नाम घोष वाचे ॥५॥

४१

चार युगांमांजीं पावन । कलिमांजीं सोपें भजन ॥१॥

मना दृढ करुणि साचा । विठ्ठल विठ्ठल वदे वाचा ॥२॥

संकल्प विकल्प नको भिन्न । तेणें पावे हरिचरण ॥३॥

नामें जीवींचा जिव्हाळा । भानुदास जीवनकळा ॥४॥

४२

तारक नाम सोपें साचें । विठ्ठल विठ्ठल वदतां वांचे ॥१॥

जन्ममृत्यूचें खंडन । पापातापाचें दहन ॥२॥

नामें निजध्यास देखा । भानुदासा सुखें सुखा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP