* आवळीभोजन
कार्तिक शु. दशमीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी आवळीच्या झाडाखाली स्वयंपाक करून इष्टमित्रांसह भोजन करतात. पूजाविधी आवळीपूजनाप्रमाणेच असतो. महाराष्ट्रात व कर्नाटकात देवस्थान असेल त्या ठिकाणची देवाची मूर्ती पालखीत बसवून आवळीच्या झाडाखाली आणतात. मग देवाला तेथे महानैवेद्य करून भोजन झाल्यावर सायंकाळी देव मिरवणुकीने देवळात परत नेतात.
* आशादशमी
कार्तिक शु. दशमी रोजी हे व्रत करतात. अन्य कोणत्याही शु. दशमीस हे व्रत चालू करता येते. धनलाभ, राज्यलाभ, व्यापारात बरकत, पुत्रप्राप्ती, शेतीची भरभराट इ. आशार्थी लोक हे व्रत करतात. स्नानानंतर स्वच्छ व पवित्र जागी जवाच्या पिठाने सायुध व स्वस्वरूपयुक्त इंद्रादी दिक्पालांची नावे लिहून त्यांची पूजा करावी. गंधफूले वाहून त्या ऋतूतील फळे व तूपयुक्त अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवावा. दिवे प्रज्वलित करून
'आशा:खाशा: सदा सन्तु सिद्ध्यंतां मे मनोरथा: ।
भवतीनां प्रसादेन सदा कल्याणमस्तिवति ।'
अशी प्रार्थना करावी. संपूर्ण वर्षभर असे व्रत केल्यास इच्छित वासना फळास येतात.
* सार्वभौमव्रत
या शु. दशमीला प्रातस्नान करून नक्तव्रत करण्याची प्रतिज्ञा करावी. गंध-फूल इ. च्या साह्याने दिशांची पूजा करून दहीभाताचा शुद्ध बली द्यावा. त्यावेळी
'सर्वा भक्त्य: सिध्यन्तु मम जन्मनि जन्मनि ।'
अशी प्रार्थना करून मध्यरात्री दहीभात खावा. एक वर्षपर्यंत प्रत्येक शु. दशमीला असे व्रत केल्यास सर्वत्र यश लाभते.
* ब्रह्मप्राप्तिव्रत
कार्तिक शु. दशमी किंवा कोणत्याही शु. दशमी रोजी (१) आत्मा (२) आयू (३) मन (४) दक्ष ( ५) मद (६) प्राण (७) हविष्मान (८) गर्विष्ठ (स्वर्गस्थ) (९) दत्त व (१०) सत्य यांची आणि अंगिरस यांची यथाविधी पूजा करून उपवास केल्यास ब्रह्मपद मिळते.