|
अ.क्रि. ( ह्या क्रियापदाचा संलग्न , संयुक्त किंवा संबद्ध होणे , जुळणे , चिकटणे , जडणे असा मूळचा एकच अर्थ आहे . परंतु अनेक नामांशी आणि शब्दांशी उपयोग केल्यामुळे यांस अनेक भिन्न अर्थाच्या छटा आल्या आहेत . त्यांपैकी सर्वसामान्य व कांही विशेष खाली दिल्या आहेत ) स्पर्श करणे ; शिवणे . तूं त्याला लागूं नको . विटाळ होईल . परि सावध व्हा लागो शुचि व्हाया हृदयलोह या परिसा । - मोभीष्म ६ . ११ . लावणे ; आंत घालणे ; खुपसणे ( रोप , झाड इ० ); लागवड ; करणे ( जमीनीची ). वाफा , अळे , सरी लागली . मूळ धरणे ; रुजणे ; चांगले जीव धरणे ; एक जीव होणे ( लावलेली रोपे , कलमे ) मार बसणे ; आघात होणे ( शस्त्र इ० चा ). ( ल . ) मनाला बोंचणे ; परिणामकारक होणे ; अंतःकरणाला भिडणे ( रागे भरणे , शब्दांचा मार ). - दा १० . ८ . २७ . बंद होणे ; मिटणे ; गच्च बसणे . ( दरवाजा , खिडक्या , झांकण , पापण्या , डोळे ). योग्य प्रकारे जुळणे ; जोडले जाणे ( शब्दशः व ल . ) ( तुकडे विभाग , कविता , शब्द ). बरोबर होणे ; लागी बसणे ; नीट सामावणे . प्रचारांत असणे ; रुढ असणे ( तर्हा , पद्धति , रीत ). चिकटणे ; जडणे ; आंगवळणी पडणे ( दुर्गुण , खोड , रोग ). येणे ; उत्पन्न होणे ; आसक्ति होणे ( भूक , तहान , खोकला , कंप इ० ). निघणे व चालू होणे ; प्रारंभ होऊन सुरु असणे ( स्थल आणि काल यांतील पदार्थ आणि प्रसंग , विशिष्ट परिणाम किंवा प्रकार ). एथून मावळ संपले आणि देश लागला . या अध्यायापासून ग्रंथ कठीण लागला . तेव्हांपासून ह्याचा त्याचा कलह लागला . हे काय सोपे लागले आहे ? बरेवाईट कळणे ; विशिष्ट प्रकाराचे किंवा जातीचे म्हणून समजणे , वाटणे . आंबे खाऊन पहा , गोड लागले तर घ्या . त्याला बरी गोष्ट जरी सांगितली तरी वाईट लागते . प्राप्त होणे ; मिळणे ( नोकरी , चाकरी , नेमणूक ). इतकी खटपट करुन अखेर त्याला नोकरी लागली . नाते किंवा संबंध असणे ; नात्याच्या संबंधाने असणे . तुझा तो काय मेहुणा लागतो . आढळणे ; भेटणे ; रस्त्यांत मार्गांत येणे ; पुढे येणे . वाटेने चार नद्या लागतात , तुम्ही वाचीत जा आणि पुढे वृत्तश्लोक लागेल तेथे ठेवा . . फळ धरणे ; बहर येणे ; वृक्ष फलोप्तादनाच्या स्थितीस येणे . ह्या प्रांताचे माड लागूं लागले म्हणजे असे लागतात की एका एका माडास हजार हजार नारळ लागतात . करपणे ; बिघडणे ; बुडाशी जळणे . भात बुडाशी लागला . . कामांतून जाणे ; खराब , घाण होणे ; डागळणे ; कुजण्यास , सडण्यास आरंभ होणे ; बुरशीने व्याप्त होणे . लांकूड लागले . चिकटणे ; चिकटून राहाणे . उदंड उपाधी तरी थोडी , लागोच नेदी . - दा ९ . १० . ५ . बसणे जडणे ; बिलगणे ( मन ). चित्त ते लागले तुझे पायी । - दावि ५६ . चावणे ; दंश करणे ; झोंबणे ( साप , विंचू चिकट पदार्थ ). हल्ला , आघात होणे . त्याला विंचू लागला . मला ठेंच लागली - दगड लागला . पडणे ; धाड येणे ( मेकाड , मोवा इ०ची ); व्यापणे ; ग्रासणे ( मेकाड इ० नी झाड ). परिणाम करणे ; अनिष्ट व उपद्रव होईल असे करणे ; ( मादक पदार्थ , वाईट हवा , पाणी उपवास , शिव्याशाप इ० नी ). जनावर , माणूस इ० ची पाठ , पाय इ० गात्रांस ( खोगीर , जोडा , लगाम इ० च्या घर्षणाने ) इजा होणे ; घसटणे ; खरचटणे ; चोळवटणे ; सोलवटणे . जोडा लागला . नेहेमीच्या एखाद्या आजाराने पछाडले जाणे ( जनावर ). पूर्णपणे व योग्य रीतीने मिसळले जाणे ( साखर , तिखट , मीठ वगैरे अन्नांत एखादा पदार्थ ). घालविण्याची जरुरी पडणे ; खर्चिला जाणे ; व्यय होणे ( पैसा , पदार्थ , वेळ ). याच्या लग्नास पांचशे रुपये लागले . पाहिजे असणे ; गरज असणे ; सुस्थितीस पूर्णतेस जरुर असणे ; ( सामा . एखादी गोष्ट ) ( गरज , नड , उपयोगाचा प्रसंग ) उत्पन्न होणे . क्षत्रियासि लागल्या अनुपत्ती । पूर्वोक्त करावी वणिग वृत्ति । - एभा १७ . ४६२ . योग्य स्वरांत बसणे ; स्वरानुकूल असणे ( गळा , आवाज , वाद्य , सूर ). पेटणे ; दीप्तियुक्त होणे ( दिवा , विस्तव ); चेतणे ( आग ). प्रत्यक्ष आरंभ होणे ; मुख्य विधि , संस्कार याला सुरवात व्हावयाची वेळ येणे ( लग्न , मुंज इ० विधीची ). ( बोलतांना ) अडखळणे ( माणूस , जीभ , शब्द ). चालू होणे ; क्रिया सुरु होणे ; गति मिळणे , ( एंजिन , यंत्र इ० ). चालणे ; समर्थ , कार्यक्षम असणे ( आपल्या विशिष्ट कार्यात ); उपयोगास येणे . जंग चढला आहे म्हणून चाकू लागत नाही . तीक्ष्ण होणे ; धारेने युक्त होणे . दोन चाकू लागले आहेत , बाकीचे लागावयाचे आहेत . निश्चित किंवा ठरलेले असणे ; न सुटण्यासारखे जोडलेले किंवा पाठीमागे लागलेले असणे . उपजत्या प्राण्यास मरण हे लागलेच आहे . संसाराचे कृत्य हे रोज लागलेच आहे . सुरु होणे ; सतत चालू असणे ; एकसारखा असणे ; एकसारखा राहणे , धडणे ( पाउस , थंडी , उष्णता ). कालपासून पाऊस सारखा लागला आहे . मग्न , गुंतलेला असणे . मनांत योजिलेला किंवा स्वाभाविक परिणाम होणे ; यश येणे ; उपयोग होणे . जुगणे ; मैथुन चालणे , करणे ( पशु , पक्षी यांमध्ये नराने मादीशी ) ( निंदार्थी माणसालाही लावतात ). . योग्य स्थितीला येणे ; फलदायी होणे ( गाय , म्हैस इ० दूध देऊं लागणे , झाड फळाला येणे ). संबद्ध , मालकीचा असणे ; कार्यक्षेत्रांतील , कक्षेतील , अधिकारांतील असणे . विवक्षित स्थितीत असणे ; विवक्षित गुण , जात , धर्म असणे ; विशिष्ट परिस्थिती असणे . मी कां श्रीमंत लागलो आहे ? सर्वांस शालजोड्या द्या म्हणतो तो . हा काय मुसलमान लागला ! लावणे ; अंगी लागू करणे ( गुन्हाचे कृत्य ); करावयासाठी , पार पाडण्यासाठी एखाद्या व्यक्तीवर लादलेले असणे ; सोपविलेले असणे ( कर्तव्य , काम इ० ). हे काम मजकडे लागले . सक्तीचे , आवश्यक , जरुर असणे ; करणे - भोगणे भाग पडणे . ह्याचे हातून न झाले तर तुम्हास जावे लागेल . अडकणे ; गुंतणे . कोठे तुझा जाउनि हेतु लागे । - सारुह २ . ९४ . झपाटणे ; पछाडणे ; अंगात येणे ; बाधा होणे . चिंतूला चिंचेवरची हडळ लागली . ( शौच , मूत्रविसर्जन इ० ) क्रियेची इच्छा होणे . शौचास - मुतावयास लागली . ( क्रियापद ऊं , आवयास इ० प्रत्यय लागून त्यांचे पुढे लागणे हे क्रियापदातील आले असतां ) क्रिया सुरु करणे ; आरंभणे ; घडणे ; लागूं होणे . तो ए करुं किंवा करावयास लागला . ; तो मारुं लागला - देऊ घेऊ खाऊं - बोलू बसावयास करावयास लागला . क्रियापदांतील वे ह्या प्रत्ययापुढे लागणे क्रियापद आले तर आवश्यक होणे , अनिवार्य होणे असे अर्थ होतात . त्याला जावे लागले . बरोबर , बाजूला असणे ; मदत करणे . हा धोंडा मला उचलूं लाग ; हे काम मला करुं लाग नांगर टाकण्याच्या स्थितीत येणे ; कडेला येणे ; स्थिरावणे ; गति खुंटणे ( जहाज , होडी ). ( ल . ) अगतिक होणे ; हालचाल बंद पडणे . [ सं . लग लग्न ; प्रा . लग्ग ; हिं . गु . लागना ] म्ह० लागे बोट वाढे पोट = नुसते निमित्त होऊन एखादे वाईट काम होऊन जाणे . एखाद्यास लागला जाणे , एखाद्याला लागला जाणे - ऋणी होणे , असणे ; मिंधा असणे . त्वां मला दोन पैसे दिलेस म्हणून मी कां तुला लागला गेलो ? मी काय तुझे चार चवल लागतो ? जास्त परिचयाचा , आसक्त असणे . लागून असणे - ( स्नेह , लोभ , इ० मुळे ) अगदी चिकटला असणे ; तंत्राने किंवा मर्जीप्रमाणे वागणे . एखाद्या स्त्रीने एखाद्याशी व्यभिचारसक्त असणे . मग्न , गुंतलेले असणे . लागून जाणे - नवरा सोडून दुसर्यापाशी राहणे ( एखाद्या स्त्रीने ). कानास - कानी - लागणे - गुप्त गोष्टी बोलणे ; कुजबुजणे किती लागली परस्पर कानी । मधुर भाषणी । - रत्न १० . पाणी लागणे - एखाद्या ठिकाणच्या हवेचा , चालीरीतींचा मनावर , वागणुकीवर परिणाम होणे . विदेशी लागले पाणी । - दा ३ . ६ . २५ . एखाद्या ठिकाणची हवा बाधणे . ( पुसणे ) एखाद्याकडे येणे असलेली रक्कम बुडणे ; नाहीसे होणे . पायी लागणे - नम्र होणे ; नमस्कार , वंदन करणे . समर्थपायी राजराजेंद्र लागती । - सप्र . ३ . ६६ . लागत - न . ( गु . ) भाडे ; खर्च . अगाऊ लागत भरुन पावती मिळविली पाहिजे . -( बडोदे ) खानगी खाते , लागतीचे नियम ४ . लागत खेवो - क्रिवि . लागताच . लागतगुण - पु . संगतीचा परिणाम - गुण ; संबंध जडल्याने येणारा गुण . कोणाचा कोणास लागतगुण असतोच . लागता गुण - पु . ( बायकी ) माणूस , संपत्ति , उत्कर्ष , वस्तु जोडण्याचा गुण ; संपादन करण्याचा , मिळविण्याचा गुण . लागता जुगता - वि . मार्गावर आणलेला ; योग्य क्रमांत , रांगेत लावलेला ; पायावर उभा केलेला . [ लागणे + जुगणे ] लागता वगळता - वि . ( गु . ) संबंधी ; संबद्ध . जबाबदार इसमाने आपले ताब्यांतील व लागते वगळते नोकर लोकांस वरचेवर माहिती देत जावी . -( बडोदे ) आगी पासून बचाव ४ . लागते - न . संबंध . बुझवितां मते ।न फिटे आक्षेपाचे लागते । - ज्ञा १३ . ३२७ . लागन - क्रि . ( खा . ) मनाला वाटणे . लागरा - वि . मादक ; अंमली ; खाल्ली असतां लागणारी ( सुपारी , औषध , इ० ). खराब झालेला ; किडीने खाल्लेला ; किडका ( धान्य , फळ , लांकूड इ० ). लागीर - स्त्री . न . पिशाच ; भूत . पिशाच - भूत - संमंध - बाधा ; पछाडणी . ( क्रि० लागणे ; काढणे ; निघणे ). - वि . किडके ; सडके . किडण्यासारखे किडण्याजोगे ( लांकूड , धान्य ). नास - नुकसान - दुखापत पोंचेल असा . लागलेला . बाधा झालेला ; पछाडलेला . चिकटलेला ; चिकट . मादक ; माजगा ; अंमली . वाईट परिणाम करणारा ; अहितकारी . दुसर्याचे प्रेम , लोभ , दया , जडवून - लावून घेणारा ; लाडिक . लागीर होणे - बाधा होणे ; लागणे ( भूत , पिशाच्च ).
|