|
न. चित्त ; चितशक्ति ; बुद्धि , विचार , तर्क , स्मृति इ० चें अधिष्ठान ; अंतःकरणचतुष्टय आणि अंतःकरण पंचक पहा . अंतःकरण ; ह्रदय ; भाव , रस , विकार इ० चें अधिष्ठान ; सुखदु ; खादिकांचें ज्ञान करुन देणारें इंद्रिय . सदसद्विवेकबुद्धि ; बरेंवाईट समजण्याची शक्ति ; अंतर्याम . ज्याचें मन त्यास ग्वाही देतें . जाणीव ; आत्मबोध ; भान ; सावधपणा ; शुद्धि . संकल्पविकल्पात्मक अंतःकरणवृत्ति ; इच्छा ; निश्चयशक्ति . संकल्प विकल्प तेंचि मन । - दा १७ . ८ . ६ . आवड ; अंतःकरणाची ओढ , प्रवृत्ति ; खुषी ; मर्जी . माया . प्रेम ; लक्ष . [ सं . ] तुजवरिमन ईचें यापरी कां इयेला । - र ४२ . ध्यान . म्ह० मनीं वसे तें स्वप्नीं दिसे . मन राजा , मन प्रजा . मनांत एक , जनांत एक . मनांत मांडे , पदरांत धोंडे . मनीं नाहीं भाव , देवा मला पाव . मनीं वसे तें स्वप्नीं दिसे . मान जना , अपमान मना . मन जाणे पापा माय जाणे मुलाचे बापा . मनास मानेल तो सौदा . ( वाप्र . ) ०उठणें उडणें - आवडेनासा होणें ; कंटाळा , तिटकारा , वीट येणें . ह्या सखलादी अंगरख्यावरुन अलीकडे माझें मन उडालें आहे . ०कांपणें दुःख होणें ; भीति वाटणें . व्यूढोरस्कादिक नव मेले , मन कांपतें कथायाला । - मोभीष्म ९ . ६२ . ०खचणें कचरणें - हिंमत सुटणें ; हातपाय गळाठणें . ०खाणें आपण केलेल्या वाईट कृत्याबद्दल स्वतःलाच वाईट वाटणें ; टोंचणी लागणें ; पश्चात्ताप होणें . ०गडबडणें भीतीनें भरणें ; गांगरणें ; घाबरणें . गडबडतें मन वेडें , माणुस मीं मीं म्हणोनि बडबडतें । - मोशल्य ४ . ४९ . ०घालणें देणें लावणें - मन एकाग्र करणें ; लक्ष लावणें . ०जाणें इच्छा होणें . ०तुटणें मनांत कंटाळा , अप्रीति उत्पन्न होणें ; मन पराडमुख होणें . म्ह० तुटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाही . ०थोड्यासाठीं करणें - क्षुल्लक फायद्यासाठीं निश्चयापासून पराडमुख होणें . निसरडें करणें - क्षुल्लक फायद्यासाठीं निश्चयापासून पराडमुख होणें . ०दुग्ध्यांत - संशयांत पडणें ; गोंधळणें . आतां माझें मन दुग्ध्यांत पडलें . - बाळ २ . १९५ . पडणें - संशयांत पडणें ; गोंधळणें . आतां माझें मन दुग्ध्यांत पडलें . - बाळ २ . १९५ . ०धरणें एखाद्याच्या मनाप्रमाणें वागणें . हांजी हांजी करणें . आदर देखोनि मन धरी । कीर्तीविण स्तुती करी । - दा २ . १० . २५ . ०पाहणें मनाची परीक्षा करणें ; ( एखाद्याच्या ) मनाचा कल अजमावणें ; एखद्याचे विचार त्याचें भाषण , वागणूक इ० वरुन ठरविणें . ०बसणें लागणें - ( कांहीं गोष्ट करावयास ) अनुकूल होणें ; अतिशय आवडणें ; आसक्त होणें ; प्रिय वाटूं लागणें . नको कचा मज टाकुनि जाऊं , तुजवरि मन हें बसलें रे । ०मनाविणें मन वळविणें ; मर्जी संपादणें ; अनुकूल करुन घेणें . ०मानेल करणें - इच्छेस येईल तसें करणें ; स्वैर वर्तन करणें ; स्वच्छंदानें वागणें . तसें करणें - इच्छेस येईल तसें करणें ; स्वैर वर्तन करणें ; स्वच्छंदानें वागणें . ०मारणें इच्छा मारणें ; इच्छा दाबून ठेवणें . ०मिळणें उभयतांच्या आवडीनिवडी सारख्या असणें . स्त्रीपुरुषांचीं मनें मिळालीं नाहींत तर त्यांचा संसार सुखावह होऊं शकत नाहीं . ०मुंडणें इच्छा नाहींशी करणें . आधीं मन मुंडा व्यर्थ मुंडिता मुंडा । - मृ ६५ . ०मोठें - उदारपणा दाखविणें ; थोरपणानें वागणें . करणें - उदारपणा दाखविणें ; थोरपणानें वागणें . ०मोडणें एखाद्याची आशा विफल करणें ; एखाद्याच्या इच्छेविरुद्ध वागणें ; दुःख देणें . जयाचेनि शब्दें मन मोडे । तो एक पढतमूर्ख । - दा २ . १० . ६ . ०विटणें कंटाळा , वीट येणें . बहुवीरक्षय घडला , तेणें बहुजीवितासि मन विटलें । - मोभीष्म ११ . ७४ . मनांत आणणें संकल्प , निश्चय करणें ; मनावर घेणें . मनांत कढविणें , मनीं कढविणें मनांतल्या मनांत रागानें चूर करणें . जळफळावयास लावणें . निजतेजें भानुला मनीं कढवी । - मोविराट ३ . १२० . मनांत कालवणें , मनीं कालवणें अंतःकरणांत अतिशय कष्टी होणें ; अतिशय दुःख होणें . बहुत दुःख मनीं जरि कालवे । भिउनि ह्यास तयास न बोलवे । मनांत गांठ ठेवणें मनांत वैरभाव , द्वेषबुद्धि , सूड घेण्याची इच्छा जागृत ठेवणें ; अढी धरणें . मनांत गांठ बांधणें , घालणें नीट ध्यानांत धरुन ठेवणें ; मनात गोष्ट पक्की ठेवणें . मनांत चरचरणें मनास काळजी , भीति वाटणें ; दुःख होणें . मनांत ठेवणें एखादी गोष्ट गुप्त राखणें ; वाच्यता न करणें . मनांत नवमण जळणें मनांतल्या मनांत संतापणें ; मनांत द्वेष , सूड घेण्याची इच्छा जागृत ठेवणें . मनांत भरणें पसंत पडणें ; आवडणें . मनांत मांडे खाणें , मनीं मांडे खाणें व्यर्थ मनोरथ करणें ; मनोराज्य करणें . मनांत म्हणणें , मनीं म्हणणें स्वगत बोलणें ; स्वतःशीं पुटपुटणें . मनांतल्या मनांत जळणें आंतल्या आंत जळफळणें ; रागानें धुमसत राहणें . मनांतून उतरणें आवडेनासा होणें ; कंटाळा , वीट येणें . मनानें करणें ( कोणाची सल्ला न घेतां ) स्वतःच्या विचारानें करणें . मनानें घेणें मनाचा ग्रह होणें ; मत बनणें . मनाला द्रव येणें मनांत दया , प्रेम इ० कोमल भावना उत्पन्न होणें . मनाला लावून घेणें अतिशय दूःख वाटणें . कल्पनेला सुचतील त्या गोष्टी मनाला लावून घेत बसलं म्हणजे खाल्लेलं अन्न सुद्धां अंगीं लागायचं नाहीं . - एक ४३ . मनावर घेणें , धरणें एखादी गोष्ट पत्करणें ; तींत मन घालणें ; सिद्धीस नेण्यास झटणें . झटता तुझा सखा तरि होतें हित , परि न हा मनावरि घे । - मोभीष्म ३ . ३ . मनावर लिहून ठेवणें कायमची आठवण ठेवणें ; स्मृतिपटलावर कोरुन ठेवणें . मनास आणणें , मनां आणणें लक्ष देणें ; मानून घेणें . आम्ही वेडें बगडें गातों मनाशीं आणा । - ऐपो १४२ . समजून घेणें . म्हणे पैल ते कोण ललना । कां तप करिते आणीं मना । - ह २६ . २९ . मनावर घेणें ; महत्त्वाचें मानणें ; मी रागाच्या वेळीं बोललों तें मनास आणूं नका . मनास येणें , वाटणें - आवडणें ; पसंत पडणें . वारुबाई ! पाहिलीस कां भावजय ? येते का मनास ? - पकोघे . मनीं ठेवणें - गुप्त ठेवणें . चाल पुरा , हें मनींच ठेवून । - मोविराट ६ . ५२ . मनीं जाण होणें - ओळखणें ; जाणणें . मनीं धरणें , वागविणें - लक्ष्यांत असूं देणें . ह्यालागीं तुम्हाशीं बोधिलें । मनीं धराल म्हणोनिया । मनींमानसीं , मनोमानसीं , मनोमनीं नसणें - ( एखादी गोष्ट ) अगदीं मनांत देखील आलेली नसणें ; स्वप्नींहि नसणें . मनोमन साक्ष , मनोमय साक्ष - मन मनाची साक्ष देतें . ज्यांना परस्परांविषयीं तिटकारा किंवा प्रेम वाटतें अशा मनुष्यास उद्देशून योजतात ; एखाद्या गोष्टीबद्दल एकमेकांचे विचार एकमेकांना अंतर्मनानें कळतात या अर्थी . मन स्वतःसाक्षी आहे ; स्वतःच्या मनांतील अभिप्राय , उद्देश , भाव इच्छा इ० स्वतःस माहीत असतात . साधित शब्द .- मनाचा - वि . मनासंबंधीं ; अंतःकरणाचा . मनाची आशा , ओढ , धांव - स्त्री . मनाचा कल , रोंख , सामाशब्द - ०उथळा वि. मोकळ्या मनाचा ; साधा ; छक्केपंजे न जाणणारा . ०ओळख स्त्री. एखाद्याच्या मनाची परीक्षा ; स्वभावाविषयीं बनविलेलें मत . कोणाशीं वाईट बोलूं नये . कां ? तर मनओळख होते . ०कपटी वि. दुष्ट अंतःकरणाचा ; लबाड . मनःकल्पित वि . कल्पनेनें , तर्कानें केलेलें ; काल्पनिक . मनकवडा पु . दुसर्याचें मन वेधून घेण्याची शक्ति . मन माझें मोहिलेंस नकळे आहे तुझ्यापशीं मनकवडा । - प्रला १६१ . - वि . दुसर्याच्या मनांतील विचार ओळखणारा . ०कामना स्त्री. अंतःकरणांतील इच्छा . [ मन + कामना ] ०कुजका वि. हलक्या मनाचा ; दुष्ट ; विश्वासघातकी . मनःकृत वि . मनानें केलेलें ; मानसिक . ०कोवळा वि. प्रेमळ ; शुद्ध अंतःकरणाचा . मनखोडी स्त्री . मनोविकार . देवनाथ तुज हात जोडि मनखोडी सकळ सांडी । - देप ६३ . मनच्या मनीं क्रिवि . मनांतल्या मनांत ; आपलें म्हणणें काय आहे हें न सांगतां . ०गाडून क्रिवि . मन लावून ; अंतःकरणपूर्वक ; एकाग्रतेनें . ०देवता स्त्री. अंतःकरणांतील देवता . मन ; अंतःकरणांतील तर्क , आशा इ० ची प्रेरक शक्ति ( क्रि० लवणें ; वाहणें ). यंदा सस्ताई होईल कीं महागाई ? तुमची मनदेवता कशी लवते ? सदसद्विवेकबुद्धि ; न्यायबुद्धि . ०धरणी स्त्री. मर्जी संपादन करणें ; आर्जव ; खुशामत . ( क्रि० करणें ) ०धरणीचा वि. दुसर्याचीं आर्जवें , खुशामत करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा ; मर्जी संपादणारा . ०पाकुळका मनाची पाकुळका मनपिंगळा ळी - स्त्री . बर्यावाईट गोष्टी करण्याची प्रेरणा करणारी मनांतील देवता ; मनोदेवता . मनःपीडा - स्त्री . मानसिक त्रास ; दुःख , काळजी इ० . मनःपूत - क्रिवि . ( मनाला जें पवित्र , शुद्ध वाटतें त्याप्रमाणें ) मनास येईल तसें ; वाटेल तसें . कोणी वाटेल तें भलभलतें करुं लागला म्हणजे तो मनःपूत वागतो असें आपण म्हणतों . - गीर १२५ . म्ह० मनःपूतं समाचरेत । मनःपूर्वक - क्रिवि . मनापासून , जाणून बुजून ; मुद्दाम . मनःप्रिय - वि . मनाला आनंद देणारें ; समाधानकारक . मनभाव - पु . उत्सुकता ; श्रद्धा ; भक्ति ; मनोभाव . मनभाव असल्यावांचून कार्य सिद्धीस जात नाहीं . [ सं . मनोभाव ] ०भूक स्त्री. काल्पनिक , खोटी भूक ; नेहमीच्या सरावामुळें वाटणारी भूक . ०भोळा वि. साधा ; गरीब ; निष्कपटी . ०मन स्त्री. ( व . ) मनधरणी ; खुशामत ; आर्जव . ०मानेसें क्रिवि . मनास वाटेल तसें ; मनःपूत . वर्तति मनमानेसें सुरतपदा अपतिका स्त्रिया बटकी । - मोसभा ६ . २० . ०मान्य वि. स्वेच्छाचारी ; स्वच्छंदी ; बेताल . ०मिळाऊ वि. सर्वांशीं मिळून मिसळून राहणारा ; गोड स्वभावाचा . ०मुक्त क्रिवि . येथेच्छ ; अमर्यादपणें ; मनमुराद ; मनाची इच्छा पूर्ण होईपर्यंत . ०मुराद वि. मनोहर ; आल्हादकारक ; आनंददायक . विपुल ; यथेच्छ ; मनसोक्त ; मनाची तृप्ति होईल इतकें ( जेवणांतील पक्वान्न ). [ अर . मुराद = ईप्सित ] ०मेळ वि. आवडतें ; प्रिय ; मनोहर . शास्त्र इ० चा फारसा विचार न करतां दोन्ही पक्षांच्या संमतीनें झालेलें ( लग्न ). ०मोकळा वि. खुल्या दिलाचा ; सरळ ; निष्कपट . ०मोकळें - क्रिवि . खुल्या अंतःकरणानें ; संकोच , भीति , लाज इ० सोडून . करुन - क्रिवि . खुल्या अंतःकरणानें ; संकोच , भीति , लाज इ० सोडून . ०मोठा वि. उदार अंतःकरणाचा . उदार ; सढळ ; मोकळ्या हाताचा . ०मोड स्त्री. हिरमोड ; निराशा . नको करुं मनमोड । - पला २२ . ४ . ०मोहतिर न. मनाचा , मनानें ठरविलेला मुहूर्त ; ०मोहन वि. मनाला खुष करणारा ; रमणीय ; आवडता ; प्रिय . मनमोहन यादवराणा । कोणी जाउनि आणा । ०मौज स्त्री. गमतीचा विचार , कल्पना . लहर ; नाद ; छंद . ०मौजा करणें - स्वतःच्या ( रंगेल , अनिर्बंध ) इच्छा तृप्त करणें . ०मौजी ज्या - वि . लहरी ; छांदिष्ट ; चंचलबुद्धि . मिजासखोर ; दिमाखी . ०लज्जा स्त्री. स्वाभाविक , नैसर्गिक लाज ; मनोदेवतेची टोंचणी ; भीति ; शरम ; शिष्टाचार ; संभावितपणा . तुला मनलज्जा नाहीं जनलज्जा तर धर . ०वळख स्त्री. मनओळख पहा . मनश्शांति स्त्री . मनाची शांतता . मनःसंतोष पु . मनाचें समाधान ; मनास होणारा आनंद . मनसमजावणी , समजावणी स्त्री . रागावलेल्या , दुःखी , सचिंत माणसाचें सांत्वन , समाधान करणें . ०समजूत स्त्री. ग्रह ; मत ; समज ; भावना . सर्व मनुष्यांची मनसमजूत एकसारखी असत नाहीं . ०समर्पण न. ( काव्य ) मन अर्पण करणें . मनसाराम पु . ( विनोदानें ) मन . मनसारामाचे स्वाधीन सर्व इंद्रियें आहेत . ०सुटका स्त्री. मन एखाद्या गोष्टीपासून परावृत्त होणें . ०सूत्र न. इच्छानुरुप सत्ता चालविणारें , वागणारें , मन . ०सोक्त क्रिवि . यथेच्छ ; स्वैर ; स्वच्छंद . मनःपूत पहा . पशुपक्षी यांचा मनसोक्त व्यवहार आहे . ०सोद्दिष्ट वि. मनांत योजिलेलें , ठरविलेलें , निश्चित केलेलें . मनस्तप्त वि . दुःखदायक . अनुतापी ; दुःखपीडित . मनस्ताप - पु . ( मनाला होणारा त्रास ) दुःख , शोक ; पश्चाताप ; हुरहुर ; खिन्नता इ ०मनस्थिति मनःस्थिति - स्त्री . मनाची स्थिति ; मानसिक अवस्था , भावना . मन . माझी मनस्थिति चंचल आहे . ०हलका वि. दुर्बल ; क्षुद्र मनाचा . मनाकळित वि . मनानें आकलन केलेलें . मनाजीपंत पु . ( विनोदानें ) मन . मनाजोगा वि . जसा हवा तसा ; मनासारखा . मनापासून क्रिवि . खरोखरीं ; बेंबीच्या देंठापासून ; अतिशय ; फार . मनापून क्रिवि . खरोखरीं . मनायोग , ग्य वि . क्रिवि . ( अप . ) मनोयोग्य पहा . मनास येईल तसें क्रिवि . स्वेच्छेनें ; मर्जीप्रमाणें . मनासारखा वि . इच्छेसारखा ; आवडीचा ; जसा पाहिजे तसा . मनुबाई स्त्री . मन . मनेच्छ , च्छां क्रिवि . मनसोक्त ; यथेच्छ ; मनाचें समाधान होईपर्यंत नदी पुलिनी गंगातिरीं । क्रीडा करिती मनेच्छां । [ मन + इच्छा ] मनेच्छा स्त्री . मनाची इच्छा ; प्रवृत्ति , कल मनेप्सित न . मनोवांछा ; मनाची इच्छा . - वि . मनानें इच्छिलेलें ; मनोवांछित . [ मन + ईप्सित ] मनोगत न . मनीषा ; हेतु ; उद्देश ; विचार ; इच्छा . श्रीकृष्णवासातें वांछिती । जाणे श्रीपती मनोगत । - एरुस्व १५ १३८ . - वि . मनांत असलेलें ; ठरविलेलें . कुंभाराचा मनोगत जो आकार असतो तो घटावर उत्पन्न होत असतो . मनोगति स्त्री . मनाची वृत्ति , क्रिया , विचार . मनाचा , विचाराचा प्रवेश , पोंच ; मनाची धांव ; आकलन . इच्छेचा कल , प्रवृत्ति . हा आपल्या मनोगतीनें चालतो - वागतो - करतो . - वि . मनाप्रमाणें वागणारा , चालणारा ; विचाराप्रमाणें चंचल . - क्रिवि . मनाच्या गतीप्रमाणें ; अतिशय , कल्पनातीत वेगानें . आला गेला मनोगती । - मारुतिस्तोत्र . मनोगम्य - वि . मनाला जाणतां येण्यासारखें ; मनानें आकलन होण्यासारखें . मनोज - पु . मदन ; काम . मनोज मध्यस्थ करुं निघाला । - सारुह २ . ६० . मनोजय - पु मनाचा जय ; आत्मनिग्रह ; मनोनिग्रह . तैसा मनोजयें प्रचा । बुद्धींद्रियांचा । - ज्ञा १६ . १८४ . मनोजव - वि . मनाच्या गतीनें जाणारा ; फार त्वरेनें जाणारा . मनोत्साह - पु . मानसिक उत्साह ; आनंद ; आवड . ज्याचा जसा मनोत्साह तसें तो करितो . मनोदय - पु . हेतु ; विचार ; आशय . इच्छा ; कल ; प्रवृत्ति . मनोद्देश - पु . मनांतील योजना , हेतु , बेत , विचार . मनोधर्म - पु . ( प्रेम , द्वेष , काम , क्रोध , मत्सर इ० ) अंतःकरणाची भावना , विकार . न निघे मनोधर्मी । अरोचक । - ज्ञा १८ . ६५७ . मनाची शक्ति ( विचार , कल्पना , सदसदविवेकबुद्धि इ० ). ( सामा . ) चित्तवृत्ति ; मनोगुण . आहार मिळाल्या उत्तम । हरिखेजेना मनोधर्म । - एभा १८ . २३६ . मनाची चंचलता . तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची । - ज्ञा ६ . २११ . हेतु ; बेत ; विचार - वि . मनोगतीप्रमाणें वागणारा . सहचरु मनोधर्मु । देवाचा जो । - ज्ञा १७ . ३३ . मनोधारण , णा - नस्त्री . मन राखणें ; मनधरणी . मनोनिग्रह - पु . मनाला ताब्यांत ठेवणें ; मनोजय ; संयमन . मनोनीत - वि . मनानें पसंत केलेलें , स्वीकारिलेलें . मनोनुकूल - वि . एखाद्याच्या मनाप्रमाणें ; मनाला पसंत पडण्यासारखें . मनोनुभूत - वि . मनानें अनुभविलेलें , सहन केलेलें , उपभोगिलेलें . मनोभंग - पु . इच्छा बेत , आशा इ० फलद्रूप न होणें ; निराशा . मनोभव - पु . हेतु ; विचार . भक्ति ; श्रद्धा . प्रीति . मनोभावें , मनोभावें करुन , मनोभावापासून , मनोभावानें - क्रिवि . अंतःकरणपूर्वक मनापासून ; श्रद्धेनें . मनोभावें ईश्वराची सेवा करावी . मनोभिराम - वि . मनाला तुष्ट करणारा ; आनंददायक ; मोहक ; चित्ताकर्षक . तेव्हां तरी तारकशक्ति राम । देईल आम्हासि मनोभिराम । मनोमय - वि . मनःकल्पित ; काल्पनिक ; अंतःकरणांतील ; मानसिक . मनोमयकोश - पु चैतन्याच्या पांच ( अन्न - प्राण - मन - विज्ञान - आनंद ) कोशांपैकीं तिसरा . पंचकोश पहा . मनोमयसत्यवाद - पु . एकाच वस्तूविषयीं निरनिराळ्या लोकांच्या मनांत सारख्याच कल्पना असतात असें मत ; सादृश्यवाद . ( इं . ) कन्सेपच्युअॅलि म . - नीति ४०६ . मनोयोग - पु . मन लागणें ; लक्ष्य ; अवधान . मनोयोग्य - वि . मनपसंत ; समाधानकारक ; संतोषकारक . मनोरंजक - वि . मनाला रमविणारें ; करमणूक करणारें ; चिताकर्षक . मनोरंजन - न करमणूक ; गंमत ; मौज . मनास वाटणारा आनंद , उल्हास . मनोरथ - पु . इच्छा ; बेत ; हेतु ; उद्देश ; योजना . तोषूनियां वैकुंठनायक । मनोरथ पूर्ण करील । - व्यं ५ . मनोरथ , सृष्टि - स्त्री . मनोराज्य ; काल्पनिक सृष्टि . मनोरम - वि . मनाला रमविणारें ; मोहक . आनंददायक ; संतोषकारक ; मनोरमा - स्त्री सुंदर स्त्री . ( संकेतानें ) बायको ; पत्नी . मनोराज्य - न . भावी उत्कर्षाविषयींचे कल्पनातरंग ; हवेंतील मनोरे मनोविकार , मनोविकृति - पुस्त्री . मनांत उद्भवणारे कामक्रोधादि विकार प्रत्येकीं ; भावना ; मनोवृत्ति . मनोवृत्ति - स्त्री . मनाची स्थिति ; चित्तवृत्ति ; स्वभाव . मनाचा व्यापार ; विचार , भावना , विकार इ० ह्या मनोवृत्ति देवपरायण झाल्या . मनोवेग - पु मनाची गति ; अत्यंत जलद गति . मनोगति पहा . मनोवेगें तात्कालीं । पातले विश्वेश्वराजवळी । - गुच ४१ . १५७ मनोवेद्य - वि मनानें , अंतःकरणानें जाणतां येण्याजोगें . मनोव्यापार - पु . मानसिक संकल्पादि व्यवहार ; विकार , विचार इ ०मनोहत वि. निराश ; हताश . मनोहर पु . व्यंकोबाचा प्रसाद ( नैवेद्य ). - तीप्र २५२ . - वि . मोहक ; आल्हादकारक ; रमणीय ; सुंदर . मनोहारी , मनोज्ञ वि . चित्ताकर्षक ; रमणीय ; सुंदर ; मोहक . मनौनि क्रिवि . मनापासून ; मनांतून तैसें मनौनि धनवरी । विद्यमानें आल्या अवसरी । - ज्ञा १६ . ८७ . मनौरें , रा न . पु . मनाची इच्छा . कां जे लळेयाचे लळे सरती । मनोरथांचे मनौरे पुरती । - ज्ञा ९ . ३ . बरव्या मनानें क्रिवि . शुद्ध मनानें ; चांगल्या , प्रामाणिक हेतूनें . सीता स्वयंवर असें बरव्या मनानें अवलक्षुनि शास्त्र अवलोकिलें . मोकळ्या मनानें क्रिवि खुल्या दिलानें ; स्वतःचें मन , हेतु , भावना इ० स्पष्ट रीतीनें सांगून ; मन मोकळें करुन .
|