|
न. १ लोणी कढविले असतां त्याचे जे रुपांतर होते ते ; घृत . म्हणोनि तूप होऊनि माघौते । जेवी दुधपणा नयेचि निरुते । तेवी पावोनिया जयाते । पुनरावृत्ति नाही । - अ ८ . २ . २ ( ल . ) तत्सदृश नारळाचा रस , मांस इ० कांपासून निघणारा स्निग्ध पदार्थ . [ सं . ( तूप हिंसायां = मारलेल्या पशूची चरबी हा तूप या शब्दाचा मूलार्थ होय . नंतर हिंसा बंद झाल्यावर दुधातून घुसळून काढलेल्या पदार्थाला तूप म्हणू लागले . गाथासप्तशतीत तुप्प शब्द सांपडतो ); का . तुप्प ; प्रा . तुप्पइअ , तुप्पविअ ] म्ह ० १ अवशी खाई तूप सकाळी पाही रुप . २ ( गो . ) तूप खाऊन र्प येतां = तूप खाल्ले म्हणून ताबडतोब रुप येत नाही . सामाशब्द - ०कढणी स्त्री. लोण्याचे तूप करण्याकरिता केलेले पात्र . ०खिचडी स्त्री. १ सोंगट्या , नाट इ० खेळामध्ये दुसर्याची सोंगटी वगैरे मारली असता एकदा खेळण्याची पाळी झाली असूनहि आणखी एकवार खेळण्याचा प्रकार . ( क्रि० खाणे ; खेळणे ). २ ( बायकी ) मुली चकावयास लागल्यावर जी मुलगी प्रथम उतरते तिला शेवटी राहिलेल्या दोन मुलींबरोबर पुन्हा चकण्यास जावे लागते तो प्रकार . तूप खिचडीस जाणे असा रुढ प्रयोग . [ तूप + खिचडी ] तुपट , तुपगट वि . १ तुपाची चव , वास येणारे ( पदार्थ , भांडे , कपडा वगैरे ). २ तुपाचा वास लागलेले ; ज्यात अतिशय तूप झाले आहे असे ( अन्न , पक्वान्न ). ३ तुपाचा ; तुपासंबंधी ( वास , घाण ). ४ उंची व स्निग्ध ; उंची व भारी ( तांदूळ ). [ तूप ] तुपटाण साण ष्टाण स्त्री . खंवट , वाईट तुपाची घाण . [ तूप + घाण ] ०तसर न. समयविशेषी सरकारी कामाकरितां बळजोरीने घेतलेले तूप . ०शिस्त स्त्री. गांवकर्यांपासून बळजोरीने घेतलेले तूप अथवा तुपाबद्दलचे पैसे . तुपाचा शिंतोडा पु . अतिशय थोडे तूप . तुपाची धार स्त्री . हवे तितके अथवा भरपूर तूप . तुपाचे नख न . थेंबभर अथवाअ नखभर तूप . पातळ तूप पाण्यांत घालून थिजले असतां त्याचे गव्हल्यासारखे तुकडे करतात ते .
|