|
क्रि. शब्द उच्चारुन मनोगत कळविणें . ( पोपटानें ) कानीं पडलेले किंवा शिकविलेले शब्द उच्चारणें . ( वाद्यानें ) ध्वनि उत्पन्न करणें . म्हणणें ; नांव देणें . पोथीला संस्कृत भाषेंत पुस्तक बोलतात . रागें भरणें ; रागावणें ; दोष देणें ; बोल लावणें . मी येथून गेलो तर साहेब मला बोलतील . व्याख्यान देणें ; सांगणें ; म्हणणें ; कथन करणें . [ सं . ब्रू ?; प्रा . बोल्ल ; देश्य . बोल्लई ] म्ह० बोलेल तो करील काय , गर्जेल तो पडेल काय ! बोलणें फिरविणें - बोलतां बोलतां आशय किंवा अर्थ बदलणें ; बोलणें सावरणें . बोलून घेणें - दुसरा मनुष्य रागावेल असें वर्तन करणें ; लोकांच्या रागास पात्र होणें . मी अद्याप कधीं कोणाचें उणें उत्तर बोलून घेतलें नाहीं . बोलण्यावर जाणें - ( एखाद्याच्या ) बोलण्यावर विश्वास ठेवणें . बोलण्यावरुन बोलण येणें , वाढणें - एखादी गोष्ट बोलत असतां इतर गोष्टी सुचून अधिक बोलणें . विशिष्ट गोष्टीचा संदर्भ , उल्लेख यांमुळें बोलावें लागणें ; वादविवाद होणें . उत्तर बोलणें , उत्तर करणें - उत्तर देणें ; उत्तर द्यावयास लावणें . क्रोधें तुकयास बोले उत्तर । कैसें बुडविलें माझें घर । बोलून सुघड , भला , चांगला , मधुर - बोलणें , वर्तन इ० मध्यें चांगला ; सरळ , गोडबोल्या . भाजीपाला बोलणें - निरर्थक बडबड करणें ; भाषणांत अर्थ नसणें . बोलणेंचालणें - न . संभाषण ; व्यवहार ; दळणवळण ; लोकांशीं वागण्याची तर्हा . बोलूनचालून - क्रिवि . लोकांशीं वागण्याच्या बाबतींत ; व्यवहाराला अनुसरुन . उघडउघड ; स्पष्टपणें ; धडधडीत ; आडपडदा न ठेवतां ; उघडपणें ; सांगूनसवरुन . लागले असतां बोलून चालून दोन रुपये मागून घ्यावे परंतु चोरुन एक पैसाहि घेऊं नये . मुद्दाम . सर्वथैव ; कांहीं झालें तरी . बोलतखेवो - अ . बोलल्याबरोबर . ऐसें वाक्य जी बोलतखेवो । मागुता मनुष्य जाहला देवो । - ज्ञा ११ . ६४० . बोलता - वि . बोलणारा ; सांगणारा . म्ह० मारत्याचा हात धरवेल , बोलत्याचें तोंड धरवत नाहीं . बोलती - स्त्री . वाणी . - शर . - वि . बोंलावयाची . आतां बोलती ते नवाई । सांगिजेल । - ज्ञा १६ . २९२ .
|