मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ८४ वा

स्कंध १० वा - अध्याय ८४ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥९१४॥
निवेदिती शुक ऐकूनि तें वृत्त । सकल स्त्रियांस हर्ष वाटे ॥१॥
सुभद्रा, द्रौपदी, गोपीही ऐकूनि । आनंदल्या मनीं वृत्तांत्तें त्या ॥२॥
कुंती, गांधारीही करिती कौतुक । कंठ सद्गदित होती त्यांचे ॥३॥
दृढभक्ति सर्व स्त्रियांची यापरी । पाहूनि अंतरी तोष तयां ॥४॥
अष्टनाय़िकांच्या अंगावरी हस्त । फिरवूनि, व्यक्त केलें प्रेम ॥५॥
वासुदेव म्हणे पतिप्रेम ऐसें । लाभलें जयांतें त्यांचें भाग्य ॥६॥

॥९१५॥
कृष्णभेटीप्रति पुढती महर्षि । येती कुरुक्षेत्रीं अत्यादरें ॥१॥
व्यास, देवल, तैं च्यवन, नारद । परशुरामादिक सकल मुनि ॥२॥
पाहुनियां कृष्नादिक सर्व राजे । उत्थापन त्यांतें विनयें देती ॥३॥
पुजूनि तयांसी देती सुआसन । पुढती भाषण कृष्ण करी ॥४॥
अद्य या दर्शनें जाहलों कृतार्थ । दुर्लभ देवांस दर्शन हें ॥५॥
पूर्वपुण्येंचि या महात्म्यांची भेटी । दुर्लभ जगतीं तीर्थाहूनि ॥६॥
दीर्घ्काल सर्व साधनानुष्ठान । घडतांही, मन अनावर ॥७॥
वासुदेव म्हणे परी साधुभेटी । सर्वश्रेष्ठ ऐसी कृष्णवाणी ॥८॥

॥९१६॥
अग्नि-सूर्यादिकां सेवितां ममत्व । दीर्घकालें नष्ट होत असे ॥१॥
परी सत्संगानें सद्‍बोधप्रवाह । वाहूनि, अद्वैत सिध्द होई ॥२॥
सभ्यहो, त्रिदोशयुक्त देहावरी । कांत पुत्रांवरी ममत्व ज्यां ॥३॥
तेंवी मृत्तिकादि मूर्तीवरी निष्ठा । ठेविती जे बंधा छेदावया ॥४॥
जाणावें तयांनीं सत्संगावांचूनि । केवळ साधनीं रमतां श्रम ॥५॥
भारवाहक ते गर्दभ केवळ । अमोघचि बळ सत्संगाचें ॥६॥
वासुदेव म्हणे साधुदर्शनाची । श्रीहरि महति कथी ऐसी ॥७॥

॥९१७॥
ऐकूनि आश्चर्य वाटलें मुनीसी । आदर दाविसी इतुका देवा ॥१॥
असूनि प्रत्यक्ष ईश्वरस्वरुप । सन्मार्ग जनांस दावावया ॥२॥
गूढ त्वच्चरित्र देवा, करी स्तब्ध । मरीच्यादिकांस चिंतितांही ॥३॥
बाललीला तव पाहूनि तूं देवा । करितोसी सेवा असूनि स्वामी ॥४॥
विश्वरुप तव चितिंतां रहस्य । येतसे ध्यानांत चरित्राचें ॥५॥
पृथ्वी जेंवी एक असूनि घटादि । भासताती जगीं भिन्नरुपें ॥६॥
वासुदेव म्हणे तेंवी नाम-रुप । असूनि तूं एक भिन्न भासे ॥७॥

॥९१८॥
दुष्टनिर्दलन भक्तांचें पालन । करिसी घेऊन अवतार तूं ॥१॥
श्रुतीचें चिंतन करावें ज्ञात्यानें । तप-अध्ययनें बोध घडे ॥२॥
कार्यकारणासी लंघिल्यावांचूनि । अव्यक्त न ध्यानीं येई कदा ॥३॥
ब्रह्मनिदिध्यासाबांचूनि ह्र्दय । कळणार काय तुझे देवा ॥४॥
विप्रांसीच निदिध्यासअधिकार । यास्तव सत्कार करिसी त्यांचा ॥५॥
पाहूनि हें आह्मां परमानंद होई । विद्या, तप होई ज्ञान, सार्थ ॥६॥
वासुदेव म्हणे कृतार्थता ऐसी । वाटली मुनीसी कृष्णोक्तीनें ॥७॥

॥९१९॥
मायाच्छादित तें देवा, तव रुप । न कळे जनांस अज्ञानानें ॥१॥
सर्वदा सन्निध असती जे तेंही । जाणती न पाही तुजलागी ॥२॥
निद्रिस्थासमचि अज्ञ स्वप्नासम । जग हें संपूर्ण सत्य मानी ॥३॥
अनंत जन्मींच्या पुण्यें त्वदर्शन । होऊनियां धन्य अद्य आह्मीं ॥४॥
अनुग्रह करीं आह्मांवरी आतां । अखंड भक्तीचा लाभ घडो ॥५॥
वासुदेव म्हणे कथिताती मुनि । भक्तीनें तरुनि गेले बहु ॥६॥

॥९२०॥
निवेदिती शुक कृष्णाचा निरोप । मागताती श्रेष्ठ करुनि स्तव ॥१॥  
वसुदेव तदा वंदूनि मुनीसी । म्हणे उध्दाराची वाट दावा ॥२॥
विस्मय मुनीसी वाटला त्या वेळी । असूनि वनमाळी सन्निध हा ॥३॥
मार्ग पुशी आह्मां, तदा ब्रह्मसुत । म्हणे न आश्चर्य वाटो तुम्हां ॥४॥
ठसलें न यातें परमात्मा कृष्ण । अज्ञान कारण हेंचि असे ॥५॥
सहवासासम होतसे वर्तन । लाभती सद्‍गुण सान्निध्यानें ॥६॥
गंगातीरवासी गोदावरीख्याति । गाई, सान्निध्यचि मर्म त्याचें ॥७॥
वासुदेव म्हणे दुरस्थाची हांव । धरीतसे जीव त्यजूनि प्राप्त ॥८॥

॥९२१॥
नारदवचन ऐकूनि मुनींद्र । करिताती बोध वसुदेवातें ॥१॥
सश्रध्द होऊनि करीं यज्ञयाग । साधन वरिष्ठ हेंचि तव ॥२॥
चित्तशुध्दीस्तव कथी हेंचि श्रुति । जोडावें धनासी सद्धर्मानें ॥३॥
पुण्यधन ऐसें वेंचावें यज्ञांत । मार्ग गृहस्थास नसे अन्य ॥४॥
वासनाक्षयेचि कर्मक्षय होई । यास्तव धरावी तेचि इच्छा ॥५॥
स्वर्गदि सुखही इच्छूं नये कदा । स्मरे त्याचि बोधा वासुदेव ॥६॥

॥९२२॥
देव ऋषी, तेंवी पितरांचे ऋण । फेडूनियां धन्य जगीं व्हावें ॥१॥
यज्ञ, अध्ययन , पुत्रप्राप्ति, ऐसे । मार्ग त्या ऋणांतें फेडावया ॥२॥
वसुदेवा, देवऋण अवशिष्ट । राहियेलें तव ध्यानी घेई ॥३॥
फेडूनि तें होई सर्वसंगमुक्त । वसुदेवा पुत्र. कृष्ण तुझा ॥४॥
उभयही तुह्मीं कृतार्थ भक्तीने । अनासक्तयज्ञें उध्दराल ॥५॥
वासुदेव म्हणी वसुदेव तदा । तत्काळ यज्ञाचा मार्ग वरी ॥६॥

॥९२३॥
त्याच मुनींलागीं योजूनि ऋत्विज । आरंभी तेथेंच यज्ञकर्म ॥१॥
अष्टादश स्त्रियांसह वसुदेव । जाहला दीक्षित अत्यानंदे ॥२॥
यज्ञसिध्दि तदा जाहली संपूर्ण । अवभृथस्नान करिती मोदें. ॥३॥
मग घेऊनियां निरोप सकल । गांठिती स्वस्थळ भरल्या कंठें ॥४॥
गोपांसवें नंद सद्गदित होई । वसुदेव पाही तयालागी ॥५॥
तदा त्याचा हस्त धरुनि करांत । वसुदेव त्यास वदला प्रेमें ॥६॥
वासुदेव म्हणे प्रेमळ जनांचा । सहवास ऐसा कठिण अंती ॥७॥

॥९२४॥
वसुदेव म्हणे नंदा, स्नेहपाश । बाबाम ईशकृत परम दृढ ॥१॥
शूर, तपस्वीही बंधनें त्या बध्द । उपकार श्रेष्ठ नंदा, तव ॥२॥
ऋणांतूनि तुझ्या मुक्त केंवी व्हावें । कळेना हें पाहें मजसी कांही ॥३॥
कारागृही पूर्वी होतों मी यास्तव । जाहलें अशक्य साह्य मज ॥४॥
आतां वैभवानें उन्मत्त होऊनि । गेलों विसरुनि तुजसी नंदा ॥५॥
कल्याण न होई कदा संपत्तीनें । आप्त-मित्र नेणे द्रव्यधुंद ॥६॥
वासुदेव म्हणे वसुदेव ऐसें । कथूनि नंदातें ह्र्दयी घरी ॥७॥

॥९२५॥
अंती वसुदेवें रुदन मांडिलें । नाहीं आंवरलें चित्त तया ॥१॥
नंदाचाही शब्द उमटे न तदा । अंती वास्तव्याचा ठरला बेत ॥२॥
प्रतिदिनी प्रात:काळीं जावयाचा । निश्चय तयाचा स्थिर होई ॥३॥
परी प्रात:काळीं कांही निमित्तानें । दोन प्रहरीं ते पुढती जाई ॥४॥
दोन प्रहरीचें जाणें सायंकाळी । पुढती प्रात:काळी ठरे जाणें ॥५॥
मासत्रय ऐसे निघुनियां जाती । निरोप पुढती घेई दु:खें ॥६॥
वासुदेव म्हणे प्रेम हे कठिण । अंतरी दारुण कष्ट देई ॥७॥

॥९२६॥
कृष्णपादपद्मी नंद-यशोदेचें । मन गुंतलें ते भृंगासम ॥१॥
गोकुळीं तयांसी जाववे न अंती । वास मथुरेसी केला कष्टें ॥२॥
वर्षाकल येतां कृष्ण द्वारावती । नाइलाजें गांठी त्यजूनि क्षेत्र ॥३॥
स्यमंतपंचक क्षेत्रींचा वृत्तांत । द्वारकापुरीत कथिती जनां ॥४॥
ऐकूनि तो मोद वाटे सकलांसी । वासुदेव चिंती तेंचि वृत्त ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP