मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ५७ वा

स्कंध १० वा - अध्याय ५७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥६८६॥
निवेदिती शुक एकदां पुढती । वृत्त द्वारकेसी येई घोर ॥१॥
लाक्षागृही कुंती पांडवांसमेत । होऊनियां दग्ध नष्ट झाली ॥२॥
विवरांतूनि ती पडली बाहेरी । जाणुनिही हरी वेड घेई ॥३॥
बळिरामासवें समाचाराप्रति । हस्तिनापुरासी जाई दु:खें ॥४॥
कृप, विदुर तैं गांधारीआदिक । करिताती दु:ख प्रसंगें त्या ॥५॥
रामकृष्णही त्या दु:खें होती खिन्न । वासुदेवमन खेद पावे ॥६॥

॥६८७॥
द्वारकेंत कृष्न नसे हे पाहूनि । चिंतिताती मनी अक्रूरादि ॥१॥
शतधन्व्याप्रति कथी कृतवर्मा । हरुनियां आणा स्वमंतक ॥२॥
वचन देऊनि दिधली न कन्या । सर्वथा तत्प्राणा हरणें योग्य ॥३॥
दुष्ट शतधन्वा ऐकूनि तो बोध । सत्राजितवध करी क्रूर ॥४॥
निद्रिस्थासी तेणे कापिलें क्रौर्यानें । घेऊनि मण्यातें दुष्ट गेला ॥५॥
वासुदेव म्हणे स्त्रिया आक्रंदन । करिती, पाहून घोर कृत्य ॥६॥

॥६८८॥
कन्या सत्यभामा माहेरीच होती । पितृबंधें दु:खी जाहली ते ॥१॥
अंतीं ते जाऊनि हस्तिनापुरासी । दु:खें निवेदिली वार्ता कृष्णा ॥२॥
भामेसवें कृष्ण येई द्वारकेसी । धरी शासनाची इच्छा मनीं ॥३॥
जाणुनि कृष्णाचा हेतु शतधन्वा । संरक्षणकार्या सिध्द होई ॥४॥
कृतवर्म्याप्रति निवेदूनि वृत्त । याचना साह्यार्थ करी त्याची ॥५॥
वासुदेव म्हणे संकटांत नर । अन्याचा विचार न करी कदा ॥६॥

॥६८९॥
शरधन्व्यापति बोले कृतवर्मा । बलराम-कृष्णा उभयातेहीं ॥१॥
मानितों विक्रमें प्रत्यक्ष ईश्वर । वदला अक्रूर तेंचि त्यासी ॥२॥
अंती शतधन्वा मणि अक्रूरासी । अर्पूनियां करी पलायन ॥३॥
राम-कृष्ण त्याच्या मागोमाग जाती । मिथिलापुरीची धरुनि वाट ॥४॥
श्रेष्ठ अश्व श्रांत होऊनि पडला । शतधन्वा गेला त्यजूनि अश्व ॥५॥
पलायन त्याचें पाहूनियां कृष्ण । स्वयेंही उतरुन रथाखाली ॥६॥
वासुदेव म्हणे सुदर्शनें प्राण । घेई त्याचा कृष्ण मण्यास्तव ॥७॥

॥६९०॥
पाहतां शोधूनि सांपडे न मणि । तदा चक्रपाणी खेद पावे ॥१॥
राम म्हणे मणि द्वारकापुरीच । असेल कोणास दिला तेणें ॥२॥
शोधीं तूं तेथेंचि, जनकाची भेटी । घेऊनियां मीही येतों, जाई ॥३॥
कथूनियां ऐसें जनकसभेंत । जाई बळिभद्र मित्रभावें ॥४॥
पाहूनि तयासी तोषला जनक । करुनि स्वागत पूजी तया ॥५॥
संवत्सर कांही राहिला तो तेथें । दुर्योधन शिके गदायुध्द ॥६॥
वासुदेव म्हणे द्वारकेचें वृत्त । पुढती ध्यानांत घ्यावें आतां ॥७॥

॥६९१॥
शतधन्वावधवृत्त भामेप्रति । येऊनियां कथी स्वयें कृष्ण ॥१॥
सन्निध तयाच्या नसे स्यमंतक । कथियेलें वृत्त तेंही तिज ॥२॥
पुढती उत्तरक्रिया करवूनि । शोधावया मणि सिध्द होई ॥३॥
कृतवर्मा, अक्रूर हे वीर दोघे । कारण या ऐसें कळलें कृष्णा ॥४॥
कृष्नाची संमति घेऊनि अक्रूर । त्यागूनि नगर निघूनि गेला ॥५॥
कृतवर्म्यातेंही दुर्लक्षूनि हरि । दूर जाऊं देई त्यजूनि पुर ॥६॥
अक्रूर राहिला वाराणसी क्षेत्री । दानधर्म करी तेथें बहु ॥७॥
स्यमंतकयोगें लाभे त्या सुवर्ण । तेंचि करी दान अत्यानंदें ॥८॥
वासुदेव म्हणे दानपति ऐसी । संज्ञा अक्रूरासी लाभे तेणें ॥९॥

॥६९२॥
शब्ददोष येई कृष्णावरी तदा । लपवी स्यम्तका हाचि ऐसा ॥१॥
स्वयंचि अक्रूरा धाडिलें बाहेरी । वारानसी क्षेत्री सहेतुक ॥२॥
अपवाद हाचि भामेसवें राम । सत्यचि मानून रुष्ट होती ॥३॥
तदा अक्रूरासी पाचारुनि कृष्णें । सुस्पष्ट वचनें कथिले तया ॥४॥
स्यमंतक मणि असे तुजपाशी । निश्चयें मजसी ज्ञात असे ॥५॥
परी सदाचार पाहूनिया तव । वाटे तेंचि इष्ट मजलागीं ॥६॥
माझ्याचि जवळी मानिती हे मणि । भामेसवें मनीं बळिरामादि ॥७॥
यास्तव दाखवी मनी तयांप्रति । कनकाच्या वेदी घालिसी तूं ॥८॥
सिध्द तेणें होई सान्निध्य मण्याचें । म्हणे अक्रूरातें चक्रपाणी ॥९॥
वासुदेव म्हणे ऐकूनि अक्रूर । दाखवी तत्काळ मणि तयां ॥१०॥

॥६९३॥
पाहुनियां मणि बलरामआदि । शंकाहीन होती निज मनीं ॥१॥
कृष्ण स्यमंतक अर्पी अक्रूरातें । पाहूनि तयाचें पुण्यकर्म ॥२॥
निवेदिती मुनि कृष्णाची हे कथा । ऐकतां, स्मरतां, पापनाश ॥३॥
दुष्कीर्ति तयाची पावते विनाश । अंती परमपद पावतसे ॥४॥
वासुदेव म्हणे संसारी हरीही । अपवादें होई दोषी ऐसा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 11, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP