मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ५१ वा

स्कंध १० वा - अध्याय ५१ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


६१४
निवेदिती शुक नगराबाहेरी । जातसे श्रीहरी यवना दिसे ॥१॥
पाहुनि ते मूर्ति अंतरी तोषला । आठवे खळाला नारदोक्ति ॥२॥
वनमाला पीतांबरही पाहूनि । ओळखिलें मनीं हाचि कृष्ण ॥३॥
पादचारी तया पाहुनी नि:शस्त्र । यवन तैसाच धांवे मागें ॥४॥
योगीयांसीही जो दुर्लभ तयासी । धरीन मी ऐसी यवनइच्छा ॥५॥
गवसला ऐसें मानी जो यवन । तोंच निसटून जाई हरी ॥६॥
ऐसें चकवीत एका गुहेमाजी । नेई यवनासी दूर वनीं ॥७॥
वासुदेव म्हणे पळूं नको ऐसा । यवन अच्युता वदला तदा ॥८॥
६१५
नव्हतेंचि झालें कर्म त्याचें क्षीण । यास्तव पळून जाई प्रभु ॥१॥
अंती गुहेमाजी शिरला जाऊनि । धांवला पाहुनि यवन मागें ॥२॥
गुहेमाजी त्या निद्रिस्थ पुरुष । दिसला कोणी एक साधुवेषें ॥३॥
होऊनियां श्रांत साधुवेशें हाचि । निदेलासे ढोंगी यवन मानी ॥४॥
मग लत्ता तया हाणिली क्रोधानें । गवसला म्हणे बरा आतां ॥५॥
जागृत तो होई निद्रिस्थ तो वीर । चोळीतचि नेत्र पाहूं लागे ॥६॥
वासुदेव म्हणे निद्राभंगे क्रोध । आला होता त्यास अंतरांत ॥७॥
६१६
उभा तों यवन पाहिला पुढती । पाडतांचि दृष्टी नवल तेथें ॥१॥
भस्मरुप होई यवन क्षणांत । विराचे त्या वृत कथिती शुक ॥२॥
इक्ष्वाकुवंशज मांधात्याचा पुत्र । नामें ’ मुचकुंद ’ विख्यात तो ॥३॥
ब्रह्मण्य, ज्ञाताही धर्म युध्दप्रिय । लौकिक अपूर्व ऐसा त्याचा ॥४॥
देव-दानवांच्या संगरी तयासी । इंद्राने साह्यासी पाचारिलें ॥५॥
विनम्र पार्थना ऐकुनि तो जाई । रक्षियेलें पाही देवांप्रति ॥६॥
वासुदेव म्हणे पुढती तयासी । घ्यावया विश्रांति कथिती देव ॥७॥
६१७
मुचकुंदाप्रति बोलले अमर । त्यागूनियां पुत्र, दारा, धन ॥१॥
येऊनियां स्वर्गी रक्षिले आह्मांसी । संतोष मानसी तेणें आम्हां ॥२॥
मोक्षावीण अन्य इच्छि जें कांहीं मागुनियां घेई म्हणती नृपा ॥३॥
मोक्ष मात्र एक विष्णूचि अर्पीले । आह्मांलागी बल तितुकें नसे ॥४॥
दीर्घकाल एथें गेला तव राजा । राहिलें न आतां कोणी तव ॥५॥
पालटली सर्व पृथ्वी ही कालानें तयाचींच जाणें सकल सूत्रें ॥६॥
वासुदेव म्हणे असो त्वत्कल्याण । बोलले वचन देव ऐसें ॥७॥
६१८
वंदूनि देवांसी तदा मुचकुंद । म्हणे द्यावी मज गाढ निद्रा ॥१॥
बहुदिन झालों श्रांत मी म्हणूनि । करुं नये कोणी निद्राभंग ॥२॥
जागृत जो मज करील तो भस्म । होवो, नच क्षण लागतांचि ॥३॥
बोललें तैं देव तुज न जाणतां । त्वन्निद्राभंगिता भस्म होवो ॥४॥
लाभतां तो वर राया, मुचकुंद । करी गुहाश्रय निद्रा घेण्या ॥५॥
ऐसा तो निद्रिस्थ असतां जें झालें । राया, तें कथिलें कृष्णवृत्त ॥६॥
वासुदेव म्हणे पुढती कृष्णानें । दर्शन तयातें दिधलें स्वयें ॥७॥
६१९॥
चतुर्भुज पीतांबर मालाधारी । पाहिला श्रीहरी मुचकुंदानें ॥१॥
ओळख तयाची नव्हती म्हणोनि । प्रश्न त्यालागुनि करी राव ॥२॥
म्हणे हे सुंदरा, कोण तूं सौख्यद । पातलासी एथ कासयासी ॥३॥
वायुतेंही स्थळ दुर्गम हें वाटे । पसरले कांटे सभोंवतीं ॥४॥
सुकुमार तव चरणकमळें । कासया घेतले श्रम ऐसे ॥५॥
तेजस्वी तूं अग्नी भाससी मजसी । अथवा विष्णूचि अससी सांगें ॥६॥
वासुदेव म्हणे जन्म, कर्म, नाम क। पुशीतसे जाण मुचकुंद त्या ॥७॥
॥६२०॥
सर्व वृत्त माझे ऐकूनि पुढती । बोलावें म्हणसी तरी ऐकें ॥१॥
बोलुनि स्ववृत्त कथी मुचकुंद । म्हणे आतां सांग नाम तुझे ॥२॥
असह्य हें तव तेज नयनांसी । सेवा मजप्रैत घडो तव ॥३॥
वासुदेव म्हणे सस्मित तै कृष्ण । बोलला वचन ऐका काय ॥४॥
॥६२१॥
मुचकुंदा, माझे अचिंत्य वर्णन । शेषही श्रमून मूक होई ॥१॥
रज:कण कोणी गणीळ पृथ्वीचे । गणवें न माझें कर्म परी ॥२॥
मम नामेंही ती जाणावी असंख्य । मुनींतेही अंत नसे त्यांचा ॥३॥
प्रार्थितां विरंची धर्मरक्षणार्थ । जन्मलों सांप्रत यदुवंशी ॥४॥
पिता वसुदेव तेणे वासुदेव । जाणें मम नांव मुचकुंदा ॥५॥
कालनेमि दैत्य आला कंसरुपें । वधिलें तयातें देवांस्तव ॥६॥
कालयवन हा त्वन्निमित्तें दुग्ध । केला राया, अद्य भक्तांस्तव ॥७॥
आराधना तव पाहूनियां थोर । गांठिलें हें स्थळ अत्यानंदें ॥८॥
वासुदेव म्हणे भक्तानुग्रहार्थ । प्रगटे अच्युत समय येतां ॥९॥
॥६२२॥
प्रसन्न मी तुज मागें जें इच्छिसी । अर्पीन तुजसी सर्व ही तें ॥१॥
अन्यदत्त वर पावती विनाश । आराधका शोक होई तेणें ॥२॥
परी मुचकुंदा, अर्पितों मी जें जें । अक्षय्यता त्यातें प्राप्त होई ॥३॥
अष्टाविंशति त्या युगामाजी कृष्ण । जन्मेल वचन गर्गांचें हे ॥४॥
आठवलें तदा मुचकुंदाप्रति । नारायण हाचि म्हणे साक्षात ॥५॥
वासुदेव म्हणे पुढती वंदन । करुनि स्तवन करी राजा ॥६॥
॥६२३॥
नरनारी देवा, मायेनें मोहित । होऊनियां नित्य विषयमग्न ॥१॥
त्यागूनियां सत्य परब्रह्मरुप । संसारचि सत्य मानिताती ॥२॥
पवित्र भारतीं पावूनिही जन्म । विषयनिमग्न होती मूढ ॥३॥
तृणलोभें पशु कूपमग्न होती । तैसी लंपटांची स्थिति होई ॥४॥
आजवरी मीही झालों देहासक्त । नृपाळ हा देह मानियेला ॥५॥
अद्य हें, उद्या तें मिळवीन ऐसें । चिंतूनि मूढत्वें गेला काळ ॥६॥
देवा, तूंचि ऐशा मूढांलागीं त्राता । विलस्थ मूषका भक्षी सर्प ॥७॥
वासुदेव म्हणे तेंवी मुचकुंद । कथी देहा काळ भक्षीतसे ॥८॥
॥६२४॥
भक्षितां त्या, श्वानें होई विष्ठारुप । पुरितां भूमीत कृमि होती ॥१॥
दहन तयाचें करितांचि भस्म । ऐसा परिणाम या देहाचा ॥२॥
त्रैलोक्याधिपही मैथुनसुखार्थ । ललनांचा दास होई जनीं ॥३॥
मर्कटासम त्या खेळविती त्यासी । परी आनंदचि मानी त्यांत ॥४॥
जन्मोजन्मी वृध्दी ऐशा त्या सुखाची । इच्छूनि तपाची कांस धरी ॥५॥
कृपेनेंचि अंती लाभतो सत्संग । जेणें भवभंग् निश्चयानें ॥६॥
वासुदेव म्हणे परी मुचकुंद । म्हणे अनुग्रह सहजचि हा ॥७॥
॥६२५॥
अंती वर मागे नम्रभावें राजा । भवभंग माझा त्वरित होवो ॥१॥
ऐकूनि श्रीहरि मुचकुंदाप्रति । म्हणे न आसक्ति विषयीं तव ॥२॥
यास्तव ऐसीचि राखुनियां बुध्दि । विचरावें जगीं, आसतां राव ॥३॥
मृगयादि कर्मे केलेसी जें पाप । भोगूनि तें दोषमुक्त होई ॥४॥
पुढती लाभेल विप्रदेह तुज । सर्वांचें सौहृद्‍ पावसील ॥५॥
अंती मजप्रति पावसील मोदें । वर ऐसा त्यातें देई हरि ॥६॥
वासुदेव म्हणे भोगिल्यावांचून । न चुकेचि कर्म सिध्द येणें ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP