मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ६४ वा

स्कंध १० वा - अध्याय ६४ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥७५३॥

शुकमहामुनि निवेदिती राजा । सांबादि एकदां क्रीडामग्न ॥१॥
तृषाक्रांत होती उपवनीं एका । पाहूनियां कूपा जवळी जाती ॥२॥
कृकलास एक तेथ गिरीसम । कूप जलहीन असतां त्यांत ॥३॥
विस्मित यादव पाहुनि जाहले । काढाया त्या केले यत्न बहु ॥४॥
पाशबध्द तया करुनि ओढिती । यश न तयांसी परी येई ॥५॥
वासुदेव म्हणे घेऊनि निर्णय । निवेदिती सर्व वृत्त कृष्णा ॥६॥

॥७५४॥
येऊनि तैं कृष्ण स्वयें त्या स्थळासी । वामकरें काढी सहज तया ॥१॥
दिव्य देहधारी जाहला तो तदा । करस्पर्श होतां श्रीकृष्णाचा ॥२॥
आश्चर्य त्यावेळीं वाटलें सर्वांसी । वृत्त श्रीकृष्णासी ज्ञात होतें ॥३॥
परी न दावितां तैसें, कृष्ण । कृपलासा, कोण निवेदीं तूं ॥४॥
सुंदर स्वरुप पावलासी केंवी । साद्यंत कथावी वार्ता आम्हां ॥५॥
वासुदेव म्हणे वंदूनि प्रभूसी । कूकलास कथी वृत्त ऐका ॥६॥

॥७५५॥
प्रभो, इक्ष्वाकूचा पुत्र जाणें मज । नाम माझें ’ नृग ’ दानशूर ॥१॥
सर्वज्ञ तूं सर्व जाणूनि मजसी । वृत्तांत पुशिसी कथितों ऐकें ॥२॥
भूमिकण किंवा तारकांची संख्या । अथवा पर्जन्याच्या जितुक्या धारा ॥३॥
तितुक्याच नवनीताच्या दुधाळ । अर्पिल्या कपिलधेनू विप्रां ॥४॥
सालंकृत योग्यमार्गे संपादित । विप्रही सत्पात्र शांत होते ॥५॥
भूमि, सुवर्ण तैं अश्व, गज, दासी । अर्पिल्या, यज्ञादि केले बहु ॥६॥
वासुदेव म्हणे नृप कथी विघ्न । अकल्पित जाण आलें प्रभो ॥७॥

॥७५६॥
धेनू एक कोण्या विप्राची सवत्स । माझ्या खिल्लारांत प्राप्त झाली ॥१॥
ऐसें कांही दिन लोट्तां मी दान । करितां ती जाण दिधली धेनु ॥२॥
विप्र तो घेऊनि धेनुसी त्या जाई । तदा विप्र पाही स्वामी तिचा ॥३॥
माझी हे, माझि हे, ऐसा होई वाद । पातले सभेंत अंती माझ्या ॥४॥
तदा बहु दु:ख वाटलें मजसी । लक्ष धेनू त्यांसी देऊं केल्या ॥५॥
परी कोणीही न ऐके मम वाणी । एकचि घेऊनि बसले न्याय ॥६॥
वासुदेव म्हणे भवितव्य घोर । कळेन साचार मानवासी ॥७॥

॥७५७॥
राव म्हणे देवा, वंदूनियां अंतीं । प्रार्थिलें विप्रांसी परी व्यर्थ ॥१॥
धनि म्हणे लक्ष धेनूही घेऊनि । स्वामित्व देऊनि पाप मज ॥२॥
’ विक्रय धेनूचा करवे न ऐसा ’ । बोलूनियां मार्गा आपुल्या लक्षी ॥३॥
अन्यही म्हणे जो दिधलीस दान ।  नृपा, तेचि जाण धेनु माझी ॥४॥
बोलुनियां तोही निघूनियां गेला । प्रकार जाहला विपरीत हा ॥५॥
पुढती पातला काळ मजलागीं । यम मजप्रति पुशी तदा ॥६॥
राया, तुझें पुण्य -पापही अपार । भोगितोसी काय प्रथम, वदें ॥७॥
देवा, भोगितों मी पाप, हें कथितां । पापदेह ऐसा प्राप्त झाला ॥८॥
वासुदेव म्हणे राव कथी अद्य । जाहलों मी मुक्त दर्शनें या ॥९॥

॥७५८॥
देवा, पूर्वस्मृति कृपाचि हे तव । थोर माझे भाग्य उदया आलें ॥१॥
योग्याही दुर्लभ पावलों दर्शन । पातकें दारुण भस्म झालीं ॥२॥
आतां मजा आज्ञा असो स्वर्गी जाण्या । घाली प्रदक्षिणा म्हणूनि राव ॥३॥
स्मरण या घडो चरणांचे नित्य । हाचि अर्पी वर देवा, मज ॥४॥
ऐसें घडे तोंचि पातलें विमान । त्यामाजी बैसून राव जाई ॥५॥
वासुदेव म्हणे यादवांसी कृष्ण । बोलला वचन ऐका काय ॥६॥

॥७५९॥
ब्रह्मण्य श्रीहरी बोलो यादवांसी । कथा हे नृगाची ध्यानी असो ॥१॥
नृगासम पुण्यवंत नृपातेंही । विप्रधन नाहीं पचलें अल्प ॥२॥
सामर्थ्याभिमान जयांप्रति वृथा । पाड त्या नृपांचा काय मग ॥३॥
ब्राह्मणांचे धन हालाहल विष । उपायही तेथ नसे कांहीं ।\४॥
एकासीस विष बाधेल प्राशितां । विप्रधन वंशा नष्ट करी ॥५॥
विप्राच्या ठेवीचा करितां अपहार । अंध:पात घोर तीन पिढया ॥६॥
बलात्कारें कोणी हरितां ब्रह्मस्व । पिढया सप्त त्रय नरकीं जाती ॥७॥
वासुदेव म्हणें राजमदधुंदी । येतां हें मूढांसी न कळे मर्म ॥८॥

॥७६०॥
कुटुंबवत्सल विप्रासी लुटितां । अश्रु त्याच्या नेत्रां येतील जे ॥१॥
तयांनीं जे कण भिजती भूमीचे । कुंभीपाक वर्षे तितुकीं खलां ॥२॥
विप्रवृत्ति कोणी हरील जो त्यासी । लाभे विष्ठेमाजी कीटयोनि ॥३॥
षष्ठयब्द सहस्त्र वास तया स्थानीं । निरंतर ध्यानीं असोद्यावें ॥४॥
ब्रह्मस्वहरणें अल्पायुषि होई । राज्यभ्रष्ट पाही असतां नृप ॥५॥
सर्पयोनि अंती लाभते तयासी । यादवहो, चितीं धरा नित्य ॥६॥
वासुदेव म्हणे आपुल्य़ा बाळांसी । प्रत्यक्ष हें कथी कृष्ण स्वयें ॥७॥

॥७६१॥
अपराध कांही करितांही विप्र । अथवा जरी शाप देतील ते ॥१॥
ताडितांही त्यांचा न करावा द्रोह । नमनचि योग्य तयांप्रति ॥२॥
त्रिकाळ मी जेंवी पूजितों विप्रांसी । तुम्हीही तैसेंचि पूजा तयां ॥३॥
घडेल न ऐसें तरी मी शासीन । मिथ्या हे वचन मानूं नका ॥४॥
विप्रांचे महत्व कथिलें यर्थार्थ । नृगाचें हें वृत्त नित्य स्मरा ॥५॥
चुकीनेंही शिक्षा जाहली नृगासी । मग कां दुष्टांसी क्षमा होई ॥६॥
वासुदेव म्हणे कथूनि रहस्य । येई मंदिरांत सर्वेश्वर ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP