मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५८३१ ते ५८४०

जनांस शिक्षा अभंग - ५८३१ ते ५८४०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५८३१॥
आचरे दोष न धरी धाक । परीपाक दु:खाचा ॥१॥
चांडाळ तो दुराचारी । अंगीकारी कोण त्या ॥२॥
नव्हे संतान वोस घर । अंधकार कुळासी ॥३॥
तुका म्हणे त्याचें दान । घेतां पतन दु:खासी ॥४॥

॥५८३२॥
कींविलवाणा झाला आतां । दोष करितां न विचारी ॥१॥
अभिलाषी नारी धन । झकवी जन लटिकें चि ॥२॥
विश्वासिया करी घात । न धरी चित्त कांटाळा ॥३॥
तुका म्हणे नाहीं आला । वृथा गेला जन्मासी ॥४॥

॥५८३३॥
घेउं नये तैसें दान । ज्याचें धन अभिलाषी ॥१॥
तो ही येथें कामा नये । नर्का जाय म्हणोनि ॥२॥
विकी स्नानसंध्या जप । करी तप पुढिलांचें ॥३॥
तुका म्हणे दांभिक तो । नर्का जातो स्वइच्छा ॥४॥

॥५८३४॥
माकडासी सोंग अलंकार बुद्धि । देऊनी फजिती फळ त्याचें ॥१॥
आपुले ते गुण दाखवी शेवटीं । भाव दावी पोटीं जाती ऐसे ॥२॥
शिकविलें तैसें दाखवितें भाव । अंतरीं तो आव बुद्धि नाहीं ॥३॥
तुका ह्मणे नाहीं लागत उशीर । अंतरींचें वर उमते तें ॥४॥

॥५८३५॥
माकडासी सेज उपचार भोज । विलास सहज नानापरी ॥१॥
आपुले स्वभाव दावी जातीपरी । क्षणांत विदारी नासुनियां ॥२॥
जातीचा स्वभाव करील तें काय । केलें नासे कार्य काय जाणे ॥३॥
तुका ह्मणे तया शिकवितां पुढें । मागील तें रुढ न संडीच ॥४॥

॥५८३६॥
शिबिका उत्तम आलंकार चांगले । अंग शृंगारिलें माकडाचें ॥१॥
बैसविलें तेथें न बैसे उगलें । करुनी सांडिले नाश सर्व ॥२॥
तेणें हित सुख वरिष्ट हें होय । स्वभावासी काय करुं शके ॥३॥
तुका ह्मणे तेथें स्वाभाविक कर्म । दाखवितें श्रम लाभ नेणे ॥४॥

॥५८३७॥
ह्मणे म्यां केली काशी । देह ओढाळ जैसी तैसी ॥१॥
तीर्था गेले तीर्थ न झालें । केश बोडून घरा आले ॥२॥
वरी वरी बोडीतो करंटा । अंतरीं वासनेच्या जटा ॥३॥
तुका ह्मणे लंड । तीर्था जाताती उदंड ॥४॥

॥५८३८॥
सरळ नामाचा । घोष न करी कांरे वाचा ॥१॥
तारुण्याचा ताठा । अंगीं श्रेष्ठपण भोगिता ॥२॥
चालतो उताणा । पुंसेविण बांडा सुणा ॥३॥
तुका ह्मणे फुगे । मान ताठली सर्वागें ॥४॥

॥५८३९॥
राउळासी जातां लाजसी गव्हारा । दासीच्या मंदिरा पुष्पें नेसी ॥१॥
दांत करी काळे मिशा भरी पिळ । फिरवितो डोळे हाल्या जैसा ॥२॥
वांकडी पगडी पयपुसा गोंडे । दासीमागें हिंडे सर्वकाळ ॥३॥
तुका ह्मणे जे कां ऐसे आहेत लंड । हाणुनी फोडी तोंड यम त्याचें ॥४॥

॥५८४०॥
जे कां संताची करिती निंदा । तया दंडावें गोविंदा ॥१॥
निंदक दंडावे दंडावे । नेउनी अघोरी सोडावें ॥२॥
संतांसी करिती पाखांड । त्याचें करावें निखंड ॥३॥
तुका ह्मणे सांगेन एक । निंदक श्वानाचे ते लेंक ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP