मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५५८१ ते ५५९०

जनांस शिक्षा अभंग - ५५८१ ते ५५९०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५५८१॥
शाहाणियां पुरे एकचि वचन । विशारती खुण तेचि त्यासी ॥१॥
उपदेश असे बहुतांकारणें । घेतला तो मनें पाहिजे हा ॥२॥
फांसावेना तरीं दु:ख घेतें वाव । मग होतो जीव कासावीस ॥३॥
तुका ह्मणे नको राग धरुं झोंडा । नुघडितां पीडा होईल डोळे ॥४॥

॥५५८२॥
जातिविजातीची व्हावयासि भेटी । संकल्प तो पोटीं वाहों नये ॥१॥
होणार तें घडो होणाराच्या गुणें । होईल नारायणें निर्मिले तें ॥२॥
व्याघ्राचिये भुके वधावी ते गाय । याचें नांव काय पुण्य असे ॥३॥
तुका ह्मणे नकरी विचार पुरता । गरज्याची माता पिता खर ॥४॥

॥५५८३॥
परस्त्रीतें ह्मणतां माता । चित्त लाजवितें चित्ता ॥१॥
काय बोलोनियां तोंडें । मनामाजी कानकोंडें ॥२॥
धर्मधारिष्टगोष्टी सांगे । उष्टया हातें नुडवी काग ॥३॥
जें जें कर्म वसे अंगीं । तें तें आठवे प्रसंगीं ॥४॥
बोले तैसा चाले । तुका ह्मणे तो अमोल ॥५॥

॥५५८४॥
तोंडें खाये फार । पादे बोचा करी मार ॥१॥
एक ऐसे ते शाहाणे । आपुले अधीन तें नेणे ॥२॥
कुले घालूनी उघडे । रागें पाहे लोकांकडे ॥३॥
खेळे द्युतकर्म । मग बोंबली जुलूम ॥४॥
निजतां आला मोहो । वीतां ह्मणे मेला गोहो ॥५॥
तुका ह्मणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी ॥६॥

॥५५८५॥
संतनिंदा ज्याचे घरीं । नव्हे घर ते यमपुरी ॥१॥
त्याच्या पापा नाहीं जोडा । संगें जना होय पीडा ॥२॥
संतनिंदा आवडे ज्यासी । तो जिताची नर्कवासी ॥३॥
तुका ह्मणे तो नष्ट । जाणा गाढव तो स्पष्ट ॥४॥

॥५५८६॥
सुखें न मनी अवगुण । दु:ख भोगी त्याचें कोण ॥१॥
हें कां ठायींचें न कळे । राती करा झांकुनि डोळे ॥२॥
चालोनि आड वाटे । पायीं मोडविले कांटे ॥३॥
तुका ह्मणे कोणा । बोल ठेवितो शाहाणा ॥४॥

॥५५८७॥
काय ढोरापुढें घालूनि मिष्टान्न । खरा विलेपन चंदनाचें ॥१॥
नको नको देवा खळाची संगति । रस ज्या पंगती नाहीं कथे ॥२॥
काय सेज बाज माकडा विलास । अळंकारा नास करुनि टाकी ॥३॥
तुका ह्मणे काय पाजूनि नवनीत । सर्पा विष थीत अमृताचें ॥४॥

॥५५८८॥
अति झालें उत्तम वेश्येचे लावण्य । परि ते सवासीण न म्हणावी ॥१॥
उचित अनुचित केले ठाया ठाव । गुणां मोल वाव थोरपण ॥२॥
शूरत्वावांचूनि शूरांमाजि ठाव । नाहीं आविर्भाव आणिलिया ॥३॥
तुका म्हणे सोंग पोटाचे उपाय । कारण कमाईविण नाहीं ॥४॥

॥५५८९॥
शूरां साजती हतियारें । गांढयां हांसतील पोरें ॥१॥
काय केली विटंबण । मोतीं नासिकावांचून ॥२॥
पतिव्रते रुप साजे । सिंदळ काजळ लेतां लाजे ॥३॥
दासी पत्नी सुता । नव्हे सरी एक पिता ॥४॥
मान बुद्धिमंतां । थोर न मनिती पिता ॥५॥
तुका म्हणे तरी । आंत शुद्ध दंडे वरी ॥६॥

॥५५९०॥
काय केलें जळचरीं । ढीवर त्यांच्या घातावरी ॥१॥
हा तों ठायींचा विचार । आहे यातिवैराकार ॥२॥
श्वापदातें वधी । निरपराधें पारधी ॥३॥
तुका म्हणे खळ । संतां पीडिती चांडाळ ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP