मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५९०१ ते ५९१०

जनांस शिक्षा अभंग - ५९०१ ते ५९१०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५९०१॥
उतावेळ आधीं । हीन अविचारी बुद्धी ॥१॥
पाप सांचिलेंसे खोटया । भृत्य फुका साठीं भेटया ॥२॥
न देतां ही मोल । झाला बेगारिया बैल ॥३॥
एका गुणें घेतां । पुढें शिव्या मार देतां ॥४॥
तुका ह्मणे तें कर्मणा । कधीं करुं नये मना ॥५॥

॥५९०२॥
धरुनी अखंड पराविची आशा । सांडी सावकाशा प्रेमसुख ॥१॥
घरांत विवेक सर्वासी उमज । सभेमाजि लाज धरीतसे ॥२॥
तुका ह्मणे शब्द बोलतां निर्बुजे । स्वहिताचें गुज नेणे मुर्ख ॥३॥

॥५९०३॥
दृष्टी सुरळीत । वाचा बोलूं अप्रभीत ॥१॥
कांरे नघेसी समर्थ । हेंचि नाम श्रीअनंत ॥२॥
कांरे सकुमार होसी । काय यमा जाब देसी ॥३॥
तुका म्हणे हरीजन । त्यासी नव्हेचि नमन ॥४॥

॥५९०४॥
लाभे नरदेह नाम नेघे ओठीं । टांचराचे साठीं अर्धबाट ॥१॥
चांडाळाचे वंशीं जन्मला कुर्‍हाडी । परद्वारें धाडी कुळा नर्का ॥२॥
नका कोणी करुं रांडेची संगती । घाली अध:पातीं यमदूत ॥३॥
तुका ह्मणे जया नाहीं देवा चाड । ह्मणोनी थोबाड फोडी काळ ॥४॥

॥५९०५॥
दोष न धरी ते धाक । परिपाक दु:खाचे ॥१॥
चांडाळ तो दुराचारी । अंगिकारी कोण त्या ॥२॥
नव्हे संतान ओस घर । अंध:कार कुळासी ॥३॥
तुका ह्मणे त्याचें दान । घेतां पतन दु:खासी ॥४॥

॥५९०६॥
बोलाव्याचा त्यासी । नको संबंध मानसीं ॥१॥
जया घडे संतनिंदा । तुज विस्मीत गोविंदा ॥२॥
जळो त्याचें तोंड । नको दृष्टी पुढें भांड ॥३॥
तुका ह्मणे देवा । तयादूरी मज ठेवा ॥४॥

॥५९०७॥
माय बाप करी चिंत्ता । पोर नायके सांगतां ॥१॥
नको जाऊं देऊळासी । नेतो बागुल लोकांसी ॥२॥
कर्णद्वारें पुराणिकें । शब्द लावोनियां भीक ॥३॥
वैष्णवां संगती । हानी पडे सांगों किती ॥४॥
आह्मा कैंचा मग । करी उघडयाचा संग ॥५॥
तुका ह्मणे नर्का । त्याचा उपदेश ऐका ॥६॥

॥५९०८॥
भरी हेंदर्‍याचे कान । हाले नाम घेईना ॥१॥
नाहीं येथें सांगों स्पष्ट । भावें नष्ट करीना ॥२॥
वाटे अवगुणीं चित्त । तया हीत दुर्लभ ॥३॥
तुका ह्मणे भांडखोरा । उगी बरा राहता ॥४॥

॥५९०९॥
काय ही अकीर्ति । आइकोनियां फजिती ॥१॥
जरी दावी वदन । थुंका थुंका तो देखोन ॥२॥
काळिमेचें जिणें । राहे जेऊनियां सुनें ॥३॥
तुका ह्मणे गुण । त्याचें त्यजावें दर्शन ॥४॥

॥५९१०॥
काळावरी दृष्टि देती अभागिये । न विचारी काय करी वस्तु ॥१॥
घात आहे पुढें नेणती हें मूढ । कठिण हा द्वाड मुढ आहे ॥२॥
न पुसतां जाती कंटकाच्या राना । चुकलिया कोणा पंथ पुसे ॥३॥
आडवाटे जातां कैंची लागे सोय । तुका ह्मणे होय जिणी याची ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP