आज्ञापत्र - पत्र २७

ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.


प्रधान म्हणजे सरकारकून, त्याची भीद सकळांपेक्षां अधिकोत्तर वागवावी. आपलें शासनाप्रमाणें त्याचें शासन सकलांवरीं चालवावें. लहान-थोर राज्यकृत्य त्याचेंच विचारें करावें. सकलांमध्ये त्याचे थोरपण वाढले पाहिजे. याकरितां समयविशेषें आपला आग्रह सोडून त्याचा शब्द चालविलासा करावा. स्वल्प गोष्टीनिमित्त त्यास दिलगीर न करावें. पाच टक्क्याच्या प्याद्यापासोन सरकारकुनापर्यंत भिडेचा शिरोभाग तो सरकारकून. हे भीड येकायेकीच वाढते यैसें नाहीं. पर्याये चढत चढत बहुताश्रमें हे भीडा वाढली असते. ते स्वल्पकार्यास्तव प्रमाद करुन सर्वसाधारण लोकांमध्ये अवाच्य संभाषण अथवा चालत आले बहुमान अंतरे तोडिली त‍र्‍ही पुन्हा ते पाणी चढतें यैसे नाही; तेव्हा यथोचित राज्यकारभार कसा चालतो ? इतर साधारण अप्रसिद्ध मनुष्य या महत्कार्यात घातलिया त्याची भीड वाढावया बहुत दिवस लागतील. तो कित्येक वर्षे नाश होणार. याकरितां आधीं सरकारकुनी देणें ते बहुत विचारुन, मनुष्यपरीक्षा करुन, केलें कार्यामध्यें फिरोन आपणांस संकट न पदे यैसें बरे शोधून, लाक्षणिक मनुष्य वाढवीत कार्यधुरंधर पाहून, मग सरकारकुनी सांगावी.
सरकारकुन पदवी सामान्य नव्हे. नृपपदवीउपरीं सरकारकुनाची पदवी. तदनुरुपच यथोक्त नृपतुल्य गुण सरकारकुनाचे गुण असावें. सरकारकुन म्हणजे कुलीन, कृतकर्मे, कार्याकार्यविचक्षण, शास्त्रज्ञ, राजधर्मविशारद, पापभीरु, स्वामीसेवकभाव जाणोन वर्तते. दैवतैकनिष्ठ, दर्शनीय, सदयपूर, सधैर्य, समंजस, स्फुटवक्ते, निरालस्य, निराग्रही, निर्व्यसनी, निष्पाप, पुणशील, उद्योगशील, अतीत-अनागत, कार्यकर्ते,अलालुची, अहिंसक,सामदाम, दंडभेद, संधिविग्रह, मित्रभेद मित्रसंधानादि अनेक उपायें शत्रुसाधनीं चतुर इत्यादि उत्तमगुनसंपन्न यैसे पाहून त्यासी सरकारकुनी सांगावी. या गुणांस विपरीत अंगहीन, चोरी करणार, यैशास इतर मामले न सांगावे. तेथें तर सरकारकुनी तरी महत्पद, तें नच सांगणें. यदर्थी संशय काय आहे ?
कुलीन, सामान्य अथवा थोर परंतु बहुत दिवसांचा सेवक ज्याचे वडिलहि सेवा बहुत केल्या आहेत यैशास नवाजावें हें उचित आहे. परंतु तो जर दुराग्रही , म्ह्टली गोष्ट सोडावयाचा नव्हे, अथवा व्यसनी, येकाचे बहुमाने दु:ख पावणार, ईर्ष्या करणार, यैसा असला तरी कंतकपुष्पवृक्षांचीं पुष्पें मात्र घेऊन कंटकांचा परित्याग करिजेतो या न्यायें त्याचा परित्याग करावा. त्यास परिच्छिन्न घरीं बसऊन त्याचे भावाबंदांत जो योग्य सुबुद्ध असेल त्यास हाती धरावें. सर्वगुणसंपन्न मनुष्य आणि साधारण हुद्धा करिते त्यांस गुणविशिष्टतेकरितां येकायेकी सरकारकुनी सांगो नये. गुणविशिष्ट असलिया त्यासी कर्मे करुन वाढवित सरकारकुनी सांगावी.

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP