मंदार मंजिरी - शंकातंक

भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये.


[विश्वाची रचना व व्यवस्था पाहून कवीच्या मनांत ज्या शंका किंवा प्रश्न उद्भवले, त्यांपैकी काहींचे दिग्दर्शन पुढील काव्यांत केलें आहे.]
विश्वोत्पति प्रगुण न कळे, नाकळे विश्वरुप,
आतप्रोत स्फुटतर जयीं भेदसाम्यें अमूप ।
होई विश्वाकलनविषयी कुण्ठिता घी नराची,
जिज्ञासा ती परि नचि शमे मोघ होतांहि त्याची ॥१॥
कोणासाठी अतुल कवणें मांडिला हा पसारा?
केव्हां कैसा श्रमजनक तो वाहतो व्याप सारा?
हें जाणाया सतत झटले आजवरी न थोडे,
विश्वाचें हें परि उकलेलें थोर कोणा न कोडें! ॥२॥
कां धात्यानें प्रथम जगडब्याळ हें विश्व केले?
काम ते केल्यावरि न तदवस्थानि तश्चित्त ठेलें?
कोठें गेला? दडुनि बसला कोणत्या स्थानिं धाता?
त्या स्थानीं तो बसुनि करितो काय तो कार्य आतां?
कां धात्यानें भुवन रचिलें हें असें दोषयुक्त?
त्याचे हेतू शुचि अशुचि वा कां असावे अनुक्त?
लाखोम वर्षं नर झटतसे हेतु ते आकळाया,
त्याचे सारे परि अजवरी जाहले यत्न वाया ॥४॥
ज्यांच्या चित्तीं अघ अवकारी जेविं मूत्रास्थिविष्ठा
त्यातें लोकीं धन मिळतसे ऋध्दि, सिध्दि, प्रतिष्ठ ।
ज्यांच्या चित्तीं दुरित लवही थोरले आढळेना
त्यांना चिन्ता छळिति, विपदा गांजिती कां कळेना ॥५॥
पुत्राभावे विपुल धन तें जाय नाशा नराचें,
यद्विस्तारें धनदहृदयी घोर मास्तर्य डाचे ।
पोरें त्याला विपुल असती ज्यास ठावा न पैसा,
सांगा मातें अदय विधिचा वक्र हा मार्ग कैसा ॥६॥
भक्ति प्राज्या ह्रदयि वसते त्यांस दु:खे अपार,
जे पाखण्ड स्खलितनय ते पावती सौख्य फार ।
ही भोगाची विषम सरणी कां दिसावी जगांत,
ही मच्छंका लवभरि विचारान्तिं नाहीच जात ॥७॥
कोठें कान्ता निजपतिचिया अप्रिते बाहु कंठी,
कोठें बाला रडुनि विधवा आपुलें आयु कंठी ।
संसारी कां न अनुभविती सर्व नारी सुखातें,
ह्या भेदाचा नर उलगडा कोण सांगेल मातें? ॥८॥
कोठें वीणा सुखवित असे श्रोतियांतें स्वरांनी,
हा! हा! ऐसे रुदन पडतें घोर अन्यत्र कानीं ।
ऐकायला ध्वनि मधुर कां येत सर्वत्र नाही?
हें सांगावे मजसि गहन ज्ञान सुज्ञां नगहीं ॥९॥
नारी एका सुमधुरतनू मोहवी सर्व लोक,
अन्या नारी पतिहि न बघे कीं तिला थोर पोक ।
रम्या सार्‍या त्रिभुवनि अहो! कां स्त्रिया जन्मती न?
हे जाणाया परिमितिमती ही समर्था मती न ॥१०॥
निंदा कोणी परिशिती नर क्षीणलज्ज स्व कानें,
निंदा कोणी करिति नर हो! स्वें मुखें कौतुकाने ।
पाहों येथें नर बधिर जे, मूक जे भाग्यहीन,
देवस्तोत्रश्रवण जे करों जाणती न ॥११॥
एका नारी मुदितह्रुदया पाह्ते पुत्रकेली,
अन्या वन्ध्या सुतमुखसमालोकसौख्या भुकेली ।
सार्‍या नारी तनयतनयालब्धिनें कां न तुष्ट?
काहीं नारींवरि भुवनिं या दैव कां हाइ रुष्ट? ॥१२॥
देखों लोकीं सुखरहित ती स्त्री जिला पुत्र एक,
तीही शोका करित बसते पुत्र जीला अनेक ।
बोला साम्य स्थीतींत नसतां कार्य कां एक तें हो?
आहे जी ती स्थिति असुखदा कां जनाला गमे हो? ॥१३॥
कोठें नाचे जनक भवनीं पुत्रजन्मप्रहर्षे,
कोठें देखो तनयमृतिनें तात शोकाश्रु वर्षे ।
ताताआघीं तनय मरती का कळेना मला हें,
दीर्घायुष्यें सहित न सुतां कां पिता सर्व लाहे? ॥१४॥
कोठें ऊर्णावसन करितें सह्य हेमन्तकाल,
कोठें काष्ठावसन पुरुष क्लेश भोगी कराल ।
सर्वांना कां पट न मिळती शैत्य वारावयाला?
ह्या भेदा कां स्थल भुवि मिळे ठाऊक हें कुणाला? ॥१५॥
पक्वानांचा विपुल दिसतो एकगेहांत राशी,
अन्नभावें शतमित नर प्रेक्षितो कीं उपाशी ।
सर्वांना कां अनुपरिमिती अन्न लाघे न खाया?
ह्या प्रश्नाचा क्षम उलगडा कोण आहे कराया? ॥१६॥
देखों दृष्ट द्रविण दुरितद्रोणिकादाय दावी,
भोगी भाग्यें भवनि, भविकां भोग्यभांडार भावी ।
नि:स्वां नानानिकृतिनिहतां नीतिमन्तां नरांते;
ह्या भेदाचा नर उलगडा कोण सांगेल मातें? ॥१७॥
देखों झाकी मलिन सरणी आपुली वावदूक,
निंदा ऐके अमलिनही तो जो समभीतिमूक ।
जिव्हा त्याची गळुनि न पडे जो अघा पुण्य दावी,
हे कां व्हावे? अनघरसना कां सभामूक व्हावी? ॥१८॥
जे शक्तीला नय करिति वाक्पाटवें ते स्वतन्त्र,
पाहों लोकीं जन परवश न्याय दे ज्यास मंत्र ।
लोक न्याया अनुसरुनि कां पारतंत्र्यास लाहे?
अन्यायें कां अपरवशता? कोण सांगे मला हें? ॥१९॥
कोणी विष्णू, शिव कुणि भजे, लिंग कोणी शिवाचे,
दत्तात्रेय स्त्रिगुण, यदुप, ब्रम्ह अव्यक्त वाचें ।
कां हे भेद? स्फुटगुण न कां जो जगाचा नियन्ता?
भेदाभावें भुवनि न दिसे देव कां साधुसंता? ॥२०॥
भूकम्पादि प्रतिभय अशा क्रांति होतात कां हो!
लाखों प्राणी मिळविति जयीं मृत्यु हा घोर लाहो? ।
ज्याचें आवश्यक न जनु तो प्राणि कां जन्म पावे?
जन्मा यावे अगतिकतया कां तयानें मरावे? ॥२१॥
नेत्रा भासे उपरि बघतां मानवी देह रम्य,
गूढाकूंतें हृदय परि तें कां असावें अगम्य? ।
बाह्यात्कारें पुरुष शपथा वाहुनी प्रेम दावी,
त्याच्या चित्तीं परि कुटिलतां कां निगूढा रहावी? ॥२२॥
न्यायें, कष्टे, पुरुष मिळवी दानभोगा धनास,
त्यातें चौर्य हरुनि करितो स्तेन नानाविलास ।
ज्याचें त्याच्याजवळ धन कां दानभोगा न राहे?
पाहों एक श्रम करि, फलास्वाद घे अन्य; कां हें? ॥२३॥
भोगेच्छेने खल परनरस्त्रीमुखातें विलोकी,
नेत्राभावें दिवस ढकली आपुले अंध शोकीं ।
ह्याला नेत्रें नसति म्हणुनी पाहिना देवमूर्ति,
तो कां नेत्रे वळवित असे व्हावया कामपूर्ति ॥२४॥
देखों कीं जो स्तनगपतय:पानवर्धिष्णु बाल
त्याची माता मरुनि चिर तो क्लेश भोगी कराल ।
त्या बालाला जनन तरि कां क्लेशस्भोगा मिळावें?
कीं मातेला तरि मरण तें कां न आधीच यावें? ॥२५॥
राजे लोभव्यथित करिती एकमेकांत संख्य,
ज्यांच्यायोगें मिळविति सदा मृत्यु देही असंख्य ।
सांगा जन्मे अनुचित तृषा राजचित्तीं कशास,
जी लोकां दे पितृपतिचिया व्यर्थ धामी निवास? ॥२६॥
एका खाणीमधील असती सर्व धोंडे समान,
देखों लोकी नचि मिळतसे सारखा त्यांस मान ।
काहीं धोंडे शिव शिव! ! कसे लागती शौचकूपा?
काहीं धोंडे मिळवति कसे पूज्य देवत्वरूपा? ॥२७॥
जे ज्ञानाने उचित सकलां मार्ग दावावयाला
त्यातें नेई यम असमयीं ओढुनी स्वा गृहाला ।
ते दीर्घायू भुवनिं बघतो जे समाजास भार,
सांगा ऐसा विधि करितसें कां विचित्र प्रकार ॥२८॥
देशद्रोह प्रखर करिती ते घना लाहतात,
त्यांते कारागृह मिळतसे देश जे पूजितात ।
हे पुण्यात्मे विधि ढकलि कां व्यर्थ कारागृहांत?
त्या पापात्म्यांवरी विधि करी कां कृपादृष्टिपात? ॥२९॥
ज्याच्या चित्तीं मल लव नसे, जो सदाचारशाली,
जो साहाय्य प्रतिपदिं करी प्राणियां सर्वकाली ।
जो लोकांत प्रिय, समजती लोक ज्या देवकल्प,
त्याला देई शमन मरणीं क्लेश कां हो! अनल्प? ॥३०॥
नीचाचे कां मरणसमयीं प्राण जाती सुखानें
विद्युत्पातें, सलिलनिचयीं मज्जनें, वा ज्वरानें? ।
विष्ठामूत्रप्रभवकृमिंहीं जी न कोणास साहे
ती कां शय्या मरणसमयीं साधु लाहे? वदा हें ॥३१॥
पोटासाठीं वध करुनि जो मेळवी नि:स्व हेम
त्याला राजा लटकवि वधस्तंभि हा लोकिं नेम ।
राजा मारी अगणित नरां राज्यतृष्णामदानें
तेव्हां त्यातें शमन सदना तो न कां आपुल्या ने? ॥३२॥
देखों लोकीं श्रम करुनि जो पोषि पत्नीसुतांस
त्यातें धाडी अचुक पटकी अंतकाच्या गृहास ।
तेव्हां पत्नी सुत अगणितां भोगिनी यातनातें,
मातें सांगा मरण तरि कां येतसे पोषकातें? ॥३३॥
एका गावीं वसति जन जे, नित्य एकाच गेही,
एका अन्नें अनवरत ये ज्यांचिया पुष्टि देहीं ।
देखों त्यांच्या मधुनि पटकी नेइ एकास मात्र,
सांगा होती जन इतर कां तत्कृपादॄष्टिपात्र ॥३४॥
पापात्म्याला स्तवि पुरुष तो पावतो द्रव्यरास
उच्चस्थानी स्थिरतम बसे, भीति नाहीं तयास ।
पापात्म्याच्या प्रकट करि जो साधुपातार्थ गर्ता
त्याला भीती सतत; सहतो हें कसें विश्वकर्ता? ॥३५॥
जो विद्येने समुचित असे कोणत्याही पदाला
त्याला खालीं ढकलुनि अती हर्ष होतो खलाला ।
विद्वानाचा शिव! शिव! अध:पात साधावयास
योजी क्लृपत्या खल; बघवतें हें कसें ईश्वरास? ॥३६॥
पापात्म्याला बुधजनयशी छिद्र पाडोनि तैसा-
होई हर्ष क्षति ढकलुनी चंचु काकास जैसा ।
धात्यानें हा अनुचित असा निर्मिला हर्ष कां हो?
कैसा धाता अविकृत शके नीच हा हर्ष पाहों? ॥३७॥
जो साधूला तुडवुनि विनाकारणें त्यास सांगे
“मी त्वद्भव्यास्तवचि झटतों कष्ट सोसूनि आंगे” ।
त्यातें स्थापी अधिकृतिपदी देव का हें कळेना,
तत्साहाय्या प्रचुरतम कां धाडि तो दुष्टसेना? ॥३८॥
वापीतोयीं, ज्वलनिं पडुनी, सेवुनी वा विषातें,
खड्गाघाता करुनि अथवा आणवे मृत्यु हातें ।
आयुर्दीर्घीकरण करणें मानवा हो न कां गा?
साध्यासाध्य स्थिति लय न कां तो करी देव सांगा ॥३९॥
धाता विश्वातुनि हरपला? कीं भयानें पळाला?
कीं वार्द्धक्यें गलितमति तो जाहला? कीं निमाला?
धाता विश्वाविषयि लवही काळजी कां न वाहे?
औदासीन्य प्रकटुनि असें तो कसा कोठ राह? ॥४०॥
धात्यानें कां षडरि मनुजा द्यावया दु:ख केले?
पापाचेंही मनुजह्रदयी बीज कां निर्मियेले? ।
धाता मातें स्फुट न म्हणवे मूर्ख वा शहाणा वा,
विश्वीं दोष प्रचुर दिसती, नित्य देखों पुरावा ॥४१॥
न्याय्यान्याय्या, सरलकुटिला, सौख्य दु:खा, विलोकी,
सत्यासत्या, सुकृतदुरिता, नीत्यनीतीहि लोकीं ।
धाता पावे परि न लवही चित्ति उद्वेग कैसा?
केलें त्याणें जग मग बसे कां उदासिन ऐसा? ॥४२॥
विश्वीं देखों विषम रचना, सज्जनांचा विनाश,
पादात्म्याचा चिर जय, जगद्धेतुही अप्रकाश ।
तेणें शंका बहुविध अहो! नित्य घेरी मनास,
शंकातक प्रखर सहवे हा न विद्याधरास ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP