मंदार मंजिरी - प्रसूपय

भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये.


जन्म देणार्‍या मातेचेंच दूध अर्भकाचें निसर्गनिर्मित अन्न असून तेंच पुष्टि आणि शक्ति देणारें असतें, असा ह्या काव्याचा विषय आहे. [प्रसू म्हणजे प्रसवणारी आई, आणि पय म्हणजे दूध]

वृत्त वंशस्थ.
निज प्रसूचें पय पुष्टिकारक, तदन्य केव्हांहि पिओ न अर्भक ।
प्रसूपयें अर्भकतेज वाढतें, न वाढतें अन्य पयें कधींच तें ॥१॥
जया वयीं पेय जया प्रकारचें निसर्गरीत्या शिशुला गुणें पचे ।
तया वयीं दूध तया प्रकारचें स्तनीं प्रसूच्या शिशूपोषणा रचे ॥२॥
अवश्य जे जे रस बालवर्धना वसा, जल, क्षार निसर्गबंधना ।
प्रसूतिया ते मिळती स्तनीं तसे, प्रसूपय श्रेष्ठ नसे वदा कैसें? ॥३॥
पय प्रसूचेंच अवश्य बालका, गुणा तयाच्या विसरूं कधीं नका ।
स्वबालका पाजिल न प्रसू तरी स्वतास ती त्यासहि दु:खदा खरी ॥४॥
प्रसूपय:पान असे हितावह तिलाहि, त्यालाहि; अवर्ण्य तन्मह ।
हितावहा ईश्वरयोजना अशी रुजेसि उल्लंघियलि न दे कशी? ॥५॥
अनेकरोगाकुल बाल होइल प्रसू न ज्याला निज दुग्ध पाजिल ।
स्वताहि ती रोगरुजेस भोगिल, असेंच आहे वचन स्मृतींतिल ॥६॥
असेंच धन्वन्तरिचें असें मत, असेंच सृष्टिप्रगतीस संमत ।
जिणें दिला जन्म सुयोग्य तत्पय, तदन्य जें तें न करी अनामय ॥७॥
यदर्थ उत्पन्न करी निसर्ग जें तदर्थ तें नेतर, योजिलें सजे ।
शिशूस प्याया जननीस्तनीं पय, तयेंच ये पुष्टि तया, न संशय ॥८॥
न पाळि जो रीति निसर्गनिर्मित कराल तो भोगिल दु:ख निश्चित ।
क्षमील राजा निजशास्तिभंजन, क्षमा निसर्गात मिळे कधीच न ॥९॥
निसर्ग कोणासहि न क्षमा करी, समान तो क्षुद्र नरीं महेश्वरी ।
बघों नृपाला फसवूं शके नर, निसर्ग कोणा न फसे खरोखर ॥१०॥
असे अतिक्रूर निसर्ग शासनीं, निसर्ग आणी न दया क्षमा मनीं ।
निसर्ग जो लंघिल तो असो नृप क्षमा न पावेल; निसर्ग निष्कृपे ॥११॥
निसर्ग लंघून न दंण्ड्य होय तो न मर्त्य कोणी भुवनांत पाहतो ।
ठसो असें तत्व जनाचिया मनीं, न टाळवे दण्ड निसर्गलंघनीं ॥१२॥
प्रसूपय:पानमहत्व संतत न नीतिशास्त्रानुसरें न संमत ।
कृतज्ञता मान न पुत्र दाविल प्रसूस जो तत्पय नैव सेविल ॥१३॥
निजार्भका पाजि न जी प्रसू पय तिच्याहि हो चित्ति ममत्वसंक्षय ।
ममत्वहीना असली प्रसू खरी न ती नरी; ती म्हणिजे निशाचरी ॥१४॥
मरोनि दैवें जननी स्तनंधय अनाथ लाधेल न जो तिचें पय ।
परस्त्रियेचेंच अवश्य त्या पय, न टाळावें तें जर दैव निर्दय ॥१५॥
निज प्रसूचें पय शान्तिदायक, निज प्रसूचें पय पुष्टिकारक ।
निज प्रसूचें पय तुष्टिदायक, निज प्रसूचे पय तापहारक ॥१६॥
परस्त्रियेचें पय रोगकारक, परस्त्रियेचें पय शोकदायक ।
परस्त्रियेचें पय नीतिभंजक, परस्त्रियेचें पय भक्तिहारक ॥१७॥
जन विसरति हो प्रसूच्या पयाची अशी थोरवी,
स्तुवुनि अजि तया न विद्याधर श्रान्त गातां कवी ।
सकल परिशिली जनाच्या ठसो थोरवी ही मनीं,
निजहितपर जो रतो सृष्टीच्या तो न उल्लघनीं ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP