मंदार मंजिरी - स्पृश्यास्पृनिरूपण.

भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये.


[रोटीबेटी ह्या व्यवहारामध्यें स्पृश्य आणि अस्पृश्य हा विचार करावा; परंतु सार्वजनिक कामांत विटाळ मानूं नये असे विचार ह्या काव्यांत कवीनें ग्राथत केले आहेत.]
वृत्त आर्या
संहितेने देशाची जीं कार्यें देशभक्त करितात ।
तीं करितां ते स्पृश्यास्पृश्यत्वविचार नाणिति मनांत ॥१॥
रोटी बेटी देतां घेता निर्बंध जातिचे पाळी ।
परि मूल्य तयां इतर व्यवहाराच्या न साधु दे काळीं ॥२॥
मी ब्राम्हण तो अंत्यज, त्याचा स्पर्शहि नको मुळीच मला ।
हें आजवरि कधींहि ब्राम्हण न म्हणावया दिसे सजला ॥३॥
देशाची करितांना कार्यें धरि देशभक्त न विटाळ ।
हिंदू सारे एकचि, सारे ते हिंदभूमीचे बाळ ॥४॥
अस्पॄश्यां वगळुनि जो देशाच्या भावुकी झटेल नर ।
तो अन्नातें पचवूं पाहेल असोनि रुग्णही जठरा ॥५॥
सगळ्याही जातीच्या ऐक्यानी देशकार्य साधेल ।
नसतां पुरोहितादिक यजमान न मखफलास पावेल ॥६॥
अत्यंजपथकें होतीं शिवबाच्या वाहिनीमधि अनेक ।
शिवला कधी तयाच्या मूर्खपणाचा मनास न विवेक ॥७॥
अत्यंज सैनिक घेउनि लढला यवनांविरुध्द शिवराया ।
स्पृश्यस्पृश्याविचारा अवसर न दिला तयें मनिं शिराया ॥८॥
सामान्य शत्रु आला चाल करुनि त्यास दूर साराया ।
शिवबानें कास कसुनि सार्‍या हिंदूस जुळविलें याया ॥९॥
मूर्खपणाचा केला त्यानें न विवेक, सर्व सम त्याला ।
सर्वों जुळवुनि नेलें देशाचें नष्टचर्य विलयाला ॥१०॥
हा अत्यंत मी ब्राम्हण देशहित बुडो, शिवेन मी न तया ।
हें न म्हणेल ब्राम्हण देशहिती काळजी पवित्र जया ॥११॥
देशाचें हित करितां ब्राम्हण अत्यंज असा नुरे भेद ।
हा भेद केलियानें देशहिताचाच होइ विच्छेद ॥१२॥
समरीं ब्राम्हण अत्यंज दंडाला दंड लावुनी प्रेमें ।
लढले, लढती, लढतील, देश अशानेंच भरतसें क्षेमें ॥१३॥
सार्वजनीन सभास्थलि समरीं संकटि समान सगळेच ।
समजून शिवाजीनें देशाचा दूर सारिला पेचे ॥१४॥
हिंदूहिंदूमध्ये शिवबाने भेद आणिला न मनीं ।
सर्वा समान समजुनि झाला तो आदरास पात्र जनीं ॥१५॥
दास्यभुजंगास्यक्षुरभुज वंद्य तुम्हास शिव असेल जर ।
तर तत्पथानुसरणी वाटावी कां बरें तुम्हा कचर? ॥१६॥
या जवळि अत्यंजनो, कचरूंप नका, तुम्हि अम्ही एक ।
साधूं देशहितातें, सत्प्रेमाचा न शक्य अतिरेक ॥१७॥
प्रेमानें एकवटुनि सहवीर्य करोनि देशहित साधूं ।
देशहिताच्या कामीं न विटाळा स्थान वितरती साधूं ॥१८॥
स्पृश्यास्पृश्य, शिवाशिव, वर्ण अधम उच्चतम, असा भेद ।
देशहितीं नुरतो हें तत्व शिकवितात आपणा वेद ॥१९॥
स्पृश्य गणा अत्यंज, ह्या स्पृश्यत्वांतुनि निघेल सहवास ।
प्रेमेहि सहवासातुनि, त्यांतून निघेल गौढ विश्वास ॥२०॥
विश्वासातुंनि ऐक्य स्थिर, साहाय्यस्पृहा तयांतून ।
तींतूनि देशकार्यप्रगति विभवमार्गिं होइल अनून ॥२१॥
धिक त्यां नरां करिति जे उच्चावचैवर्णभेद देशहितीं ।
धिक त्यां नरां शिवाशिव देशहितीं जे मनांत दृढ धरिती ॥२२॥
ह्या स्पृश्यास्पृश्यत्वा भूता प्रेमें नृसिंहमंत्रेच ।
सहवीर्य करुनि पळवूं, देशाचा दूर सारुं या पेच ॥२३॥
जो मांगाला भाऊ, धेडाला बाप, वैदुला मुलगा ।
समजे देशहिताच्या कामीं तो देशभक्त, तद्यश गा ॥२४॥
स्पृश्यास्पृश्यविचारांचे निरुपण करी कवी- ।
वामनात्मज, तें लोकां मार्गदर्शक हो भवीं ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP