मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री कबीर चरित्र ४

श्री कबीर चरित्र ४

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


भाग दुसरा
॥ आर्या ॥
तूं जरठ तुझ्या हस्तें हीं नच होतील वाटतीं कामें ।
भरिताच्या गाड्याला जुंपावें काय करित जें में में ॥३५॥

॥ दिंडी ॥
पीकपात्रा घासून स्वच्छ ठेवीं ।
धुवट लुगड्याची आणून घडो द्यावी ॥
मदिय रमणाचे पाय धूत जावे ।
कबीरा, त्वां यापरी चेट व्हावें ॥३६॥

॥ ओवी ॥
ऐसें गणिकेचें ऐकुन वचन । कबिराचें साशंक झालें मन ।
ते कमालें पाहुन । बोलता झाला तयासी ॥३७॥

॥ लावणी ॥ ( भला जन्म हा )
सूर्यवंशिचा भूप धुरंधर तारमतिचा पती ।
जयाला हरिश्चंद्र बोलती ॥
त्यांनीं आपणा विकुन घेतलें डोंबागृहिं धीवरा ।
उतरला तोच कसासी खरा ॥
( चाल ) हे सर्व तुम्ही हो, तात मनीं जाणतां ।
संतार्थ विकुन घ्या तुम्हि गणिकेसी आतां ।
नच करा विचारा होय म्हणा सर्वथा ।
साधू सदनीं आहेत उपोषित हें आणावें चित्तीं ।
संत ते केवळ कमलापती ॥३८॥
कबीर म्हणाले,

॥ श्लोक ( इंद्रवज्रा ) ॥
सेवा कराया नच लाज वाटे ।
तोटा हिचा होइल हेंच मोठें ॥
पुत्र मला वाटत दु:ख पाहीं ।
मी राहिल्या या स्थलिं कोण येई ? ॥३९॥

॥ ओवी ॥
तेंची आलें प्रत्ययाप्रत । जार निघून गेला त्वरित ।
तयीं गणिका क्रोधयुक्त । होऊन बोलली कविरासी ॥४०॥
तें पाहून गणिका क्रोधानें म्हणते.

॥ पद ॥ ( हा काय तुमचा )
पाय पांढरे तुझे, नको तूं मेल्या या आगरीं ।
वन्हि गृहाला आपुल्या हस्तें लाविल का कोणी ?
( चाल ) जा जा जा, येथुनि जा, झडकर जा, मम काजा ।
योग्य न, सारी देशिल मजला । उलटी अंबारी ॥४१॥

॥ आर्या ॥
कर धरुनी कबिराचा गणिका त्या घालवीत बाहेर ।
नरकांतिल जंतूसी होय कसें मान्य गौतमी - नीर ? ॥४२॥

॥ अभंग ॥
ऐशा करुन खटपटी । आले बाजारीं शेवटीं ।
म्हणे कबीर पोराप्रत । फ़ोडूं वाणियाची भिंत ॥
जरी आणिसी ऐसें चित्तीं । कोण करी ही अनीती ।
परी यांत पाप नाहीं । सांगु तुला वर्म कांई ? ॥४३॥

॥ ओवी ॥
संतापुरतें सामान । घेऊन कमाल करी गमन ।
बोलला ऐसें गजानें । शेटी, सांभाळ गृहातें ॥४४॥

॥ साकी ॥
गृह फ़ोडुनि तस्करा कुठें तूं, सांग पळुनि या जासी ।
ऐसें बोलुन वाणिकें धरिला, कमाल तो पायासी ॥४५॥

॥ दिंडी ॥
खूप केली बापास कमालानें ।
मदिय कापुनिया मान तुम्ही जाणें ॥
तरिच साधूच्या अन्न मुखामाजीं ।
पडेल, राहिल तो राम यांत राजी ॥४६॥

॥ आर्या ॥
शस्त्र करें घेउनिया भक्तवरें बाळ चरचरा चिरिला ।
चिरला म्हणणें खोंटें रामासन्नीध पुत्र पाठविला ॥४७॥

॥ पद ॥ ( हो प्रगट झणीं )
“ कहीं छोड आये तुम कहो मुझे बच्चेकू ? । ”
“ क्या कहूऍ बिबी ‘ बचेका हाल मैं तुजकू ?
रास्तसे मिला दुनियेका बादशहा हमसे ।
वो लेके गया है साथ तेरे बच्चेसे ॥
है लिया हुजुरने उसे बिबी, मुतबन्ना ”
गनु कहे कबिरका नहीं गलत है कहना ॥४८॥

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
कांहीं रक्त तनू तदा उधळिलें यांनीं गुलालाप्रती ।
ओले कां भिजले तदीय रमणी हर्षाश्रुनें निश्चितीं ॥
त्या थाटा नच वर्णवें खचित गे झालें मुलाचें बरें ।
यासाठीं अपुल्या मना तिळभरी होऊं न दे बावरें ॥४९॥

॥ लावणी ॥ ( गेलिं मायपिता तीं )
त्याची हि खूण दीधली कमालें खरी ।
बोलून असे अर्पीत शिरा तत्करीं ॥
सुटला तो कंप हस्तसि घ्यावया शिरा ।
म्हणे माय मुला, झालास कसा निष्ठुर ?
( चाल ) आम्हि मायबाप कीं तुझें त्यजुन आम्हांला । वृद्धांला ॥
गेलास कसा अविनाशपदीं वद बाळा । स्नेहाळा ॥
संतार्थ होउन कुर्बान जगाभीतरीं ।
मिळविला धवलकीर्तिनें सखा श्रीहरी ॥

॥ ओवी ॥ जात्यावरील ॥
आम्हि पिकलीं पानें तुझीं । अम्हां सोडुनिया पाडसा ! ।
शुद्ध भक्तीचिया ताटीं । मुक्तिलाडू जेविसि कसा ? ॥
अशी निव्वळ पोटावरी । नको दृष्टी देऊंस मुला ।
बुध म्हणतिल ऐशामुळें । जगिं अप्पलपोट्या तुला ॥५१॥
कबीर म्हणतात -

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
गेला कमाल नच वैभव साच गेलें ।
गेला न तो शिशु खचीत निधान गेलें ॥
गेला न तो सगुनभक्ति - पताक गेली ।
गेला असू तनु अतां शवरूप झाली ॥५२॥
तो आपला उभयतांचा प्राण होता. असो. पण आतां तूं साधू जेवून जाईपर्यंत शोक करूं नकोस. कारण -

॥ आर्या ॥
माहे तुझा नच बरवा हा सर्वस्वावरीच घालील ।
घाला, तुज मज वेडे वैकुंठीं तो कमाल हांसेल ॥५३॥

॥ पद ॥ ( नृपममता )
जन्मासि मुळिं न जो आला । त्या म्हणसि कसा तूं मेला ॥सुंदरी॥
सोडिल्या तुवां साडीला । मानावें, मेलि कां तुजला ॥सुंदरी॥
( चाल ) तैसेंच कमालें खरे, शरिर तें बरें, वसन साजिरें ।
दिलें संताला । तो शुद्ध, मरण नच त्याला ॥सुंदरी॥५४॥
हें ऐकून कबिराचें कुटुंब म्हणाले,

॥ लावणी ॥ ( धावल्या दोघि कामिनी )
पतिराज ! कृपा तुम्हि करुनि मला या मोहरूप भवर्‍यात ।
बहातां हो काढिलें झणिं बुडतिला वरतिं देउनी हाता ॥
संतार्थ खर्चिली तनू मुलानें त्याचि केवढी छाती ।
शोकाचि लोटुं मोहानें कशाला व्यर्थ तयावर माती ॥
वैकुंठि लाविला दीप काय मी जाउन विझवूं तया ।
तद्धैर्यरूप पायसीं कालवूं वीष तरी कासया ? ॥
नऊ महिने तुला वाहिलें जठरिं मी सार्थक त्याचें तुवां ।
केलेंस कमाला खरें, प्रिय झालास जानकीधवा ॥
प्रल्हादें आपुली माय कयाधू साध्वीच्या पंक्तीस ।
बसविली, तसें दुबळिला मला केलेंस कमाला इथं ॥५५॥

॥ आर्या ॥
ऐकुनि स्त्रीपुरुषाचें वच सीतापति मनांत गहिंवरला ।
तद्भक्तिशशिदर्शन होतां तो चंद्रकांत पाझरला ॥५६॥
बैरागी भजन करीत होते; तें असें,

॥ पद ॥
देवेगा निजधाम । बाबू वही करेगा काम ॥
यहि दुनियामें राम भरा है, जहॉं देखो वहॉं रामहि राम ।
वही खुदा है करिमरहिम वो सब संतनका धाम ।
आत्माराम, जप ले राम, राजाराम, रामही राम ॥देवेगा०॥
माया रंडी नाच बतावत तर्‍हेंतर्‍होंका भाई ।
नाच उसीका है बेकामा ख्याल करो तुम कोई ॥आत्माराम०॥
गंगाजलके फ़ेस मुवाफ़क है जमाना तेरा ।
नहीं किसीका कोई खाली मत कहे मेरा मेरा ॥आत्माराम०॥
छे - चारोंकी होलि बनाकर बहोत सफ़ा दिल रखना ।
खुदा करिमपर यकिन रखो तुम यहि गनूका कहना ॥आत्माराम०॥
या भजनानें कबीर, त्यांचें कुटुंब व सर्व बैरागी मंडळी नागासारखी डोलूं लागलीं. भजन झाल्यावर कबिरानें त्या संतमंडळींपुढें शिधा हजर केला आणि हात जोडून सांगितलें कीं,

॥ श्लोक ( भुजंगप्रयात ) ॥
शिधा सिद्ध घ्या हा करा पाक येथ ।
असे मी विधर्मी अणा हें मनांत ॥
जगीं पाहतां भेद कोठेंच नाहीं ।
परी वाम नी सव्य एक्याच देहीं ॥५८॥

॥ ओवी ॥
झाली पाक - निष्पत्ती । संत म्हणती कबिराप्रती ।
मुलासह सत्त्वरगती । यावें आपण प्रसादा ॥५९॥
त्यावर कबीर म्हणतात,

॥ दिंडी ॥
पुत्र माझा नुकताच आजोळाला ।
निघुन गेला विश्रांति घ्यावयाला ॥
करित प्रेमा त्यावरति अजा - आजी ।
म्हणुन संगत ना रुचत त्यास माझी ॥६०॥
त्यावर बैरागी म्हणाले,

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
गेला कसा जननि टाकुनि तो अम्हांला ।
होता अम्हांमुळें जया बहु हर्ष झाला ॥
आश्चर्य यांत न मुळीं वदली सती ती ।
खाऊस पाहुन मुलें त्यजिती क्रिडा ती ॥६१॥

॥ आर्या ॥
कांतारूप केतकिच्या वचरूपी त्या परीमलेंकरुनी ।
डोलवि निज ग्रीवेला भक्ताशिरोमणि कबीर हाच फ़णी ॥६२॥
बैराग्यांच्या तांड्यांत भगवान् श्रीरामचंद्रप्रभू व लक्ष्मण असे दोघेहि होते. लक्ष्मण रामाला म्हणतात,

॥ कटिबंध ॥
सौमित्र म्हणें राघवा, जानकीधवा, प्रभो केशवा, काळिमा आली ॥
ब्रीदास आपुल्या अशी कृती कशि केली ॥
मांजरी, पिलाला खरी, भक्षि साजिरी, तसें श्रीहरी; तुम्हीं आज केलें ।
भक्षुनी कमाला वत्सलत्व तें त्यजिलें ॥
खाटीक मेष पाळून, कापितो मान, तसे भगवान, तुम्हीं हें केलें ॥
जठरार्थ आपुल्या शिशू चराचरां चिरिलें ॥
गातातीं पुराणें व्यर्थ, आपुली कीर्त, त्यांत ना अर्थ; आज हें कळलें ।
सद्भक्त कबीराप्रती बरें फ़ळ दिधलें ॥६३॥
राम म्हणाले, “ लक्ष्मणा ! -

॥ लावणी ॥ ( भला जन्म हा )
मी नच झालों मांजर अथवा खाटिकही साजिरा ।
ऐके, ममानुजा मम गिरा ॥
ज्या संतांचें पूजन करि मी ठेवुन हृदयांतरीं ।
त्यावरी चालवूं का रे सुरी ?
( चाल ) वाटलें तुला जें कबिरें शिशु मारिला ।
तें खरें न त्यानें भक्तिध्वज रोविला ।
ज्या ध्वजें तयाचा दुर्ग बहुत शोभला ।
त्या किल्ल्यामध्यें कोंडुनि मजला भक्तिरूप जंजिरा ।
खिळिला पायिं माझिया खरा ॥६४॥

॥ आर्या ॥
संतगृहीचा मी बा सौमित्रा हीनदीनसा श्वान ।
भक्तिरूप तुकड्यास्तव यांपुढती लाळ घोटितों जाण ॥६५॥

॥ ओवी ॥
अहेतुक भक्ति - धन । जयापशीं परिपूर्ण ।
तो अधिकारी मत्समान । हें उद्यांच पाहशील तूं ॥६६॥

॥ दिंडी ॥
विठ्ठलाच्या भजनांत रात्र गेली । दिशा प्राची ती ताम्रवर्ण झाली ॥
कुक्कुटाचे गंभीर शब्द होती । जणुं वाटे भास्करा बाहताती ॥६७॥

॥ ओवी ॥
इकडे राजाज्ञेनें सुळावर । चढविलें कमालाचें शरीर ।
गजबजलें जान्हवीतीर । स्त्रीपुरुषांनीं तेधवां ॥६८॥

॥ अभंग ॥
निष्काम करावें रामाचें भजन । तेणें नारायण व्हाल तुम्ही ॥
अहेतुक प्रेमा आहे जया ठायीं । त्याचा शेषशायी, पाठिराखा ॥
सर्वां ठायीं झाला ज्याचा भगवद्भाव । जगामाजीं देव जाणा तोची ।
गणु म्हणे ऐशा पायरीचे प्राणी । पाहतां न कोनी संतावीण ॥६९॥
इकडे बैरागी लोक भागीरथीच्या घाटावर तें सुळावर चढलेलें प्रेत पाहून थांबले व नुसतें धडच कां सुळावर दिलें याचा विचार करों लागले. तोंडानें रामाच्या निष्काम भजनाचें महत्त्व किती आहे याचें वर्णन चाललें होतें.

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
करें पिटुन टाळिया धड कसें नमस्कारितें ।
असें बघुन संत ते थबकलेच सारे तिथें ॥
तयीं कमलजापति म्हणत लक्ष्मणा, हें पहा ।
शिशू मदिय श्रेष्ठ तें मजहुनी जगीं या महा ॥७०॥

॥ पद ( हा काय तुमचा ) ॥
वायु वरुण यम वन्हि पुरंदर बैसुनिया यानीं ।
आले असती अवलोकाया हा सोहळा गगनीं ॥
( चाल ) आतां ते, कबिरातें, अर्पण ते, करण्यातें ।
इच्छिल सांगा दाशरथीचें काय चित्त कोणी ॥७१॥

॥ लावणी ( भला जन्म हा ) ॥
नगसम केलें मन कबिराचें धड सुळिंचें पाहुनी ।
कांता ढाळि असूं लोचनीं ॥
बाळ म्हणाया मज ये लज्जा तुजलागीं धीवरा ।
गुरू तुं जगत्त्रयाचा खरा ॥
माती तुझि ही भजना करित्ये असुं नसतां राजसा ।
झाल भक्त कुणी ना असा ॥
( चाल ) तूं वंद्य अम्हांला सर्वथैव सन्मती ।
भेटीव अम्हांला शीघ्र जानकीपती ॥
पदिं नत झालें देऊं नको तूं मजला दुर लोटुनी ।
मुला, तूं रामकंठिंचा मणीं ॥७२॥

॥ झंपा ॥( सबळ पुण्य ज्याचें )
प्रगटला किं तेथें जो श्रीकमलेचा कांत तो ।
अशिव हरुनि भक्तालागीं जो किं सौख्य देतो ।
कंठनाल भूषवि ज्याचा माळ वैजयंती ।
शंख चक्र आयुधें प्रभुच्या वाम सव्य हातीं ॥
मदनतुल्य शोभे ज्याची वदनचंद्रकांती ।
पंधरींत बसुनी भक्ता जो किं सौख्य देतो ॥७३॥
बैरागी मंडळींत असलेले श्रीरामचंद्रप्रभू लक्ष्मणांसह प्रगट झाले. चतुर्भुज शामसुंदर मूर्ति पाहून सर्वांना मोठा आनंद झाला.

॥ ओवी ॥
धडावरी ठेवितां शिर । सजीव झालें कबीर - पोर ।
मुखीं जय जय रघुवीर । वदुन पायीं लागलें ॥७४॥

॥ भरतवाक्य ॥ ( भूप - भूपाळी )
रमावरा सजलजलदसमश्याम कमलनयना ॥
धीरा वीरा रघुकुमरा ।
दशकंधर रिपु वायु तनयपति, कलिमथना ॥
( चाल ) वारा सारा ताप खरा ।
पंढरिनाथा, अनंतशक्ते ।
दाव गणुस चरणा ॥७५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP