मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीजालंदरनाथ चरित्र २

श्रीजालंदरनाथ चरित्र २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


( भाग दुसरा )

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
जयीं अमर जाहली गुरूकृपेंच मैनावती ।
तयीं त्यजुन वैभवा सदय सेवि एकांत ती ॥
सुधा - कलश लाधला जगिं जयास तो का पुन्हां ।
कधीं तरि विषाचिया करिल काय हो सेवन ? ॥१॥

॥ दिंडी ॥
आला भूपति जयिं मातृदर्शनास ।
तयीं माता बोलली असे त्यास ॥
कधीं पुत्रा, येणार सांग मातें ।
सद्गुरूच्या त्या चरणदर्शनातें ॥२॥
हें ऐकून राजा म्हणाला कीं, “ आई ! ”

॥ पद ॥ ( नृपममता )
भोगुं दे विविध भोगांला । कांहीं दिन जननी, मजला ।
अनुकुल कालही आला । तारुण्य तसें शरिराला ॥
( चाल ) रतितुल्य सदनीं अंगना, मशीं नृपपणा, अशा साधना ॥
त्यजुन परमार्था । सेवावें वाटेना चित्ता ॥ माई गे ॥३॥

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
मुळीं न उपभोगिले विविध भोग हे म्यां जरी ।
तरी मी अवमानिली त्वदिय साच आज्ञा खरी ॥
म्हणून घडवूं नको मम करें अशा पातका ।
खुले न दिधल्या बळें जरठवेष गे बालकर ॥४॥

॥ ठुंबरी ॥ ( कोणा भजती )
नाहिं भरंवसा एक पळाचा । जलबुद्बुद् त्या आयुष्याचा ॥ध्रु०॥
ऐहिक सुखें तीं सुखद न साचीं । भ्रांति मुला रे, तेथ सुखाची ॥
मृगजल पाहुन जशि हरणाची । फ़सगत होते काननीं साची ॥
तशि तव होइल म्हणून गुरुची । कांस धरी ही गोष्ट हिताची ॥५॥

॥ आर्या ॥
गुरूपुष्य योग आहे, गुरुवारीं तिथि त्रयोदशीला या ।
ते दिनिं मोहा सांडून, शरण रिघावे तुवाम गुरुराया ॥‍६॥

॥ ओवी ॥
‘ फ़ार बरें ’ म्हणुन । भूपति गेला निघून ॥
हें गुप्तपणें भाषण । ऐकिलें लुमावंतीनें ॥
राजा महालाकडे येत असतांना लुमावंती म्हणाली,

॥ पद ॥ ( हो प्रगट क्षणीं )
ही खचित नव्हे कीं माय हाय ! आहे विवशी ।
ही पात्र भिकेचें देउं पाहे भूपतीसी ॥
इजहून कैकया बरी, वनीं पाठविला ।
श्रीराम, परी ना जोग तयासी दिधला ॥
हें तिचें बोलणें गोपीचंदानें ऐकिलें आणि आंत येऊन लुमावंतीस म्हणाली

॥ श्लोक ( इंद्रवज्रा ) ॥
आहे अशी कैकयी कोण येथ ।
सांगे प्रिये, ना झुरणें मनांत ॥
इच्छा तुझी मी पुरवीन साची ।
लावीन त्या वाट किं कैकयेची ॥
हें ऐकून लुमावंती म्हणाली,

॥ पद ॥ ( तूं चारुतनू )
अस्थानिं होइल आपुली प्रतिज्ञा खरी ।
जिथें राम तिथें रहाणार । कैकया राजमंदिरीं ॥
जिथें ऊंस तिथें आवश्य शेरसाबरी ।
धार्मीक कुलवधू जेथें तेथेंच वारसुंदरी ॥
( चाल ) लक्ष्मी जया सागरीं, तिथेंच दुसरी, जन्मली खरी ॥
अवदसा नाथा । गणु म्हणे सांगुं किति कथा ॥१०॥
राजा म्हणाला,

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
निसर्गघटना अशी परि तिला व्यव्हारामधीं ।
बुधें न उपयोग तो करिति जाण भार्ये कधीं ॥
जिथें मधुर तेथची कडु म्हणून चाले कसें ? ।
सुधा करुन प्राशना जहर तें त्यजाचें जसें ॥११॥
लुमावंती म्हणाली,

॥ पद ॥
जरि मी तिचें नांव तुम्हां कथियेलें ।
तरि मजवरचें प्रेम किं तुमचें । आज दिनीं सरलें ॥
चोरुनि ठिवतां अनर्थ नाथा । होय गणू बोले ॥१२॥
असें म्हणून आपल्या डोळ्याला तिनें बळेंच पदर लावला. तें पाहून राजा म्हणाला, “ अग ! हें काय ? असें वाईट वाटून घेऊं नकोस. ”

॥ पद ॥ ( कधिं तिला )
प्रेम हें तुझ्यावरचें । कमि नच होईल कधिं साचें ॥
( चाल ) देतों, घे वचना, अनुमाना, कधिं करिं ना ॥
नांव तें वदे वाचें ॥१३॥
लुमावंती म्हणते,

॥ पद ॥ ( शब्द शिलेच्या वरचे )
जननी मैनावतीची । चालरीत ना बरवी साची ॥
( चाल ) स्वकीय काम तो शमवायाला ॥
योगी जालंदर ठेवियला ॥
तोच गुरु योजून तुम्हांला ॥
केलि तयारी पुढची । करिं करवंटी कीं द्यायाची ॥१४॥
हें लुमावंतीचें भाषण ऐकून राजानें आपल्या कानांवर हात ठेवले व तो तिला म्हणतो,

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
छे छे ! अशी न भलती करिं कल्पनाही ।
मन्माय ती शुचि, सती जगतांत पाही ॥
येतील त्या बघ उण्या तुळितां तियेला ।
गार्गी, अरुंधति, सिता, नगराज - बाला ॥१५॥
तें ऐकून लुमावंती म्हणाली, “ पतिराज । - ”

॥ पद ॥ ( नृपममता )
विश्वासुनि वचनावरतीं । तें नांव तुम्हां म्यां कथिलें ॥
परि दैवयोग विपरित हा । शेवटिं मी खोटी ठरलें ॥
( चाल ) कारलें प्रीय कीं जया, सांगुं नये तया, कडू म्हणुनिया ॥
तत्त्व हें ठरलें । तें कीं मी विसरुनि गेलें ॥१६॥

॥ पद ॥ ( रजनिनाथ हा )
सतत वदावें साच असे तें ।
भीड न धरितां शास्त्र सांगतें ॥ध्रु०॥
( चाल ) परी कितिकदां या तत्त्वाला ।
फ़ल ये उलटें; त्या विदुराला ॥
लाभ सुखाचा किमपि न झाला ॥
अप्रिय ठरला कौरवपतितें ॥१७॥

॥ पद ( जाके मथुरा ) ॥
अप्रिय होउन जगुं कशाला तुम्हांस मी नाथा ।
घेतें खंजिर मारून हा मी निजहृदयीं आतां ॥
सुखें असूं दे जारिण कुलटा जगिं तुमची माता ।
गणु म्हणे ऐसें बोलुन झालीं खंजिर सावरिता ॥१८॥

॥ आर्या ॥
खंजिरधृत कर धरिला भूपतिनें रुष्ट होउनी चित्तीं ।
आणी म्हणे मुखानें अधमाधम, दुष्ट, कुटिल स्त्रीजाती ॥१९॥

॥ पद ॥ ( शिवदर्शन )
ह्या कोण म्हणति तरि अबला ॥ध्रु०॥
नेत्रशरानें हावभावानें । लुब्ध करिती पुरुषाला ॥
( चाल ) अबला नच या, प्रबल खरोखर ॥
मधु जिव्हाग्रीं व्यापित अंतर ॥
कालकुटानें करिति भयंकर ॥
जखम दिसे न कवणाला ॥२०॥
राजा रागानें लुमावंतीस म्हणाला,

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
कशावरुनि पापिणी ठरवलीस मैनावती ।
असे असति सांग हें, करुं नको वृथा वेळ ती ॥
खरें न ठरल्यास तें जितपणीं तुझें कातडें ।
निघेल समजें मनीं मदिय बोल हे रोकडे ॥२१॥
तें ऐकून लुमावंती म्हणाली, “ नाथ ”

॥ पद ॥ ( नमुं तुजला ईश्वरी )
मी मरणा भीत ना ॥
( चाल ) शतशा तुकडे करा तनूचे ॥
धनी अधिच तुम्हि या देहाचे ॥
परि नच कधिंही करीन वाचें । त्या खोट्या भाषणा ॥२२॥

॥ आर्या ॥
रयतेच्या अपराधा पाहुनिया भूप शासना करिती ।
तेची स्वगृहिं झाल्या, बघति न न्याया, मुगाप्रती गिळती ॥२३॥

॥ दिंडी ॥
चला दाविन मी आज निशी होतां ।
स्वैर वर्तन जननिचें तुम्हां नाथा ! ॥
परि तेथें ना प्रगट तुम्हीं व्हावें ।
काय होतें तें नयनिं विलोकावें ॥२४॥

॥ ओवी ॥
इकडे नित्याप्रमाणें मैनावती । गेली भेटण्या सद्गुरुप्रती ॥
जेथें श्रीजालंदर गुरूमूर्ति । पहुडले होते काननांत ॥२५॥

॥ लावणी ॥ ( तूं चारुतनू )
नेसली निशा तमरूप शालु भरजरी ।
तारका याच जणुं कांहीं । काढली खडी त्यावरी ॥
दोनप्रहर हेंच तारुण्य तिसी पातलें ।
निज नाथदर्शनासाठीं । चित्त तें आतुर जाहलें ।
( चाल ) परि नाहिं मुळीं उगवला, चंद्रमा भला, म्हणुनी काढिला ।
शोकरव ऐसा । गणुदास म्हणे कीर्रसा ॥२६॥

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
आहे मेदिनि हाच जया बाहू उशी ती खरी ।
शोभे चादर ती मृगाजिन पहा शांती गदेल्यावरी ॥
देहा भूषण भस्म मस्तकिं जटा सिंदूर भालीं बरा ।
वायू वाहुन मंदमंद रिझवी ज्या योगयोगेश्वरा ॥२७॥

॥ ओवी ॥
मैनावती करितां नमन । महाराज बसले उठोन ॥
करिते झाले मधुर भाषण । येणें रीतीं तियेसी ॥२८॥

॥ सवाल ॥
मैनावती, तूं वचन हमारा क्यौं नहीं मानत बच्ची ॥
हरदम हरघडी यहॉं तेरा आना बात न होएगी अच्छी ॥
जग का रवय्या ज्ञानी न छोडे उसके मुवाफ़िक चलता ॥
रातके मिलने खातर देखो दीन कबू नहीं जाता ॥
अपने महालमें बैठकें देखो दुनियाकू ज्ञान - आखोंसे ॥
गनु कहे ऐसा बाबा जालंदर कह रहे मैनावतीसे ॥२९॥
मैनावती म्हणाली,

॥ पद ॥ ( उगिच नेत्रिं कां )
ऐकण्याप्रती बोध आपुला ।
जननिच्या कुशीं जन्म घेतला ॥
( चाल ) हरलेम द्वैत, सरलें जगत्, उरलें मात्र,
एक तत्त्व । शुद्धसें तळा ॥३०॥
नाथ म्हणाले, “ मैनावती ! तूं येथेंच चुकतेस, ”

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
ज्ञानी खरा जगतिं सेवित मार्ग दोन्ही ।
तत्त्वज्ञ एक शिव तो बसला स्मशानीं ॥
तत्त्वासहीत व्यवहर जया कळाला ।
तो विष्णू वंद्य जगताप्रति साच झाला ॥३१॥

॥ दिंडी ॥
तुला त्यांतुन आहे जरुर व्यवहाराची ।
इतर लोकांच्याहून अधिक साची ॥
हिरे गारा हे भेद प्रस्तराचे ।
गार उघडी, हिरे आंत संदुकीचे ॥३२॥

॥ लावणी ॥ ( तूं चारू तनू )
व्यवहार फ़ोल नि:सार परि पाहिजे ।
नारळा जशी करवंटी । त्यापरी सकल जाणिजे ॥
बाह्यांग ओळख पटवून भ्रमा वारिते ।
बाह्यांग ओळख पटवून भ्रमा वारिते ।
बाह्यांग खरें धरल्यास । मानवा भ्रमीं पाडितें ॥
( चाल ) भांगार शुद्ध साचार, मोल ये फ़ार, म्हणुनि व्यापार ।
सुरू कीं झाला । झिलइचा सांगुं किति तुला ॥३३॥

॥ लावणी ( भ्यावेंस काय ) ॥
झिलइच्यावरुन पितळेला । सोनेंच मानिलें जरी ।
होणार हानि ती आहे । जगतांत सर्वतोपरी ॥
( चाल ) बाह्यांग खोटे म्हणुं नये, खरें गणुं नये, तया भुलुं नये ।
तसें व्यवहारीं । सावध रहा भूवरी ॥३४॥
तें ऐकून मैनावती म्हणाली,

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
रात्रीं नये फ़िरूं पथीं म्हणती व्यवहारीं ।
मानील हे जगतिं जो किं नसें तमारी ॥
ना यामिनी -- दिवस भेद जसे रवीला ।
तेवीं नसे जगतिं बंधन ज्ञानियला ॥३५॥
हें ऐकून श्रीजालंदरनाथ म्हणाले,

॥ आर्या ॥
दिवस -- निशा हे जोंवरि तोंवरि आहे महत्त्व सूर्याला ।
सूर्यचि झाल्या सारें, मग भेदाचा प्रकार नच उरला ॥३६॥

॥ ओवी ॥
जडासंगें चैतन्य । तैसें व्यवहारासंगें शुद्ध ज्ञान ॥
येणार आहे कळून । म्हणुनी व्यवहारा न फ़ांटा दे ॥३७॥
श्रीजालंदरनाथ धोंडा उशाला घेऊन हरणाच्या कातड्यावर निजले. मैनावती महाराजांचे पाय चुरूं लागली. हें दृश्य लुमावंतीनें राजाला दुरून दाखविलें व म्हणाली, “ पहा पतिराज ! तुमची मातोश्री कशी साध्वी आहे ती ! ” तें पाहून,

पद चुरितां मैनावंती । नृपक्रोधा आली भरती ॥
( चाल ) आरक्त जाहले नेत्र, स्फ़ुरति कीं गात्र, करकरां दांत ।
धडाडे छाती । म्हणे शीला पडली माती ॥३८॥
असें म्हणून तलवार घेऊन जाऊं लागला. तो लुमावंतीनें कमरेला मिठी मारून म्हटलें कीं, “ प्राननाथ ! थांबा, ”

॥ श्लोक ॥ ( मंदाक्रांता )
हा हा नाथा ! आवरुन धरा क्रोध चित्तांतरींचा ।
साधा गेहीं बसुन अपुल्या घात त्या जोगड्याचा ॥
जाणें वेळीं उचित न अशा त्याचिया सन्निधाना ।
जिंका यातें कपट करूनी यामधें पाप तें ना ॥३९॥

॥ साकी ॥
शस्त्र विटाळेल या मेल्याच्या अशुद्ध रक्तें करुनी ।
म्हणुनी लोटा गरदाडामध्यें जिवंत टाका पुरुनी ॥
जननी मारुं नका ! मात्र तिच्याशीं बोलुं नका ॥४०॥
अरुणोदयींच्या सुमाराला ती राजवाड्यांत परत आली. इकडे गोपीचंदानें हत्तीपागेंत मोठा तीनचार पुरुष खड्डा खोदण्याचा हुकूम दिला आणि त्यांत जालंदराला पुरून टाकण्याविषयीं ताकीद केली.
झालेली आज्ञा ऐकून कोतवालास अतिशय वाईट वाटूं लागलें. कारण हा कोतवाल श्रीजालंदरांचा नि:सीम भक्त होता. तो तसाच श्रीजालंदरनाथांकडे गेला आणि म्हणाला, “ महाराज ! ”

॥ पद ॥ ( येतों मी लोभ )
महाराज, इथुनि तुम्हि जा जा ।
खल कपटी नृप - भाजा ॥ध्रु०॥
( चाल ) नानापरीचे आरोप तुम्हांवर ।
करुनि दुषविलें नृपती - अंतर ॥
म्हणुनि विनवितों जोडुनिया कर ।
हा हेत पुरविणें माझा ॥४१॥
कोतवालाकडे वळून श्रीजालंदरनाथ म्हणाले,

॥ सवाल ॥
मुझे कहनेकी जरुर नहीं है, सब कुछ मैने वो जाना ।
तामिल हुकुमकी करनेके खातर लेकर हमसे अब चलना ॥
अविनाश आत्मा, तन मट्टीके खड्डेमें बैठा हुवा है ।
दोष किसीसे न देनाजी, भाई ! जो कुछ दुनियामें होता ।
वो सब करनेआला हरि है कुयि नहीं आता, न जाता ॥४२॥

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
केलेंस हें बहुत उत्तम तूं नृपा रे ! ।
दे दे विपुल आयु त्या जगदीश्वरा रे ! ॥
लोकीं मनुष्यपण हें टिकतें व्यव्हारें ।
त्याचा अभाव असल्यास असार सारें ॥४३॥

॥ ओवी ॥
टाकिले पुरुन जालंदर । लीद घोड्याची घालून वर
सत्ता अवघ्यांत बलवत्तर । काय न करी साम्गा हो ॥४४॥

॥ दिंडी ॥
ग्रामिं गोरख त्या फ़िरत फ़िरत आला ।
जेथ जालंदर पुरले त्या स्थलाला ॥
अति आदरें साष्टांग नमन केलें ।
दावीन हो गुरुवरा, अपुल्या कृपेनें
भ्यावें कसें बघुन मांजर केसरीनें ? ॥४६॥

॥ ओवी ॥
आंतून बोलले साक्षात्करी । “ गोरखा थोडा दम धरी ।
मात्र कानिफ़ाच्या कानावरी । वृत्त हें बेटा घलावें ” ॥४७॥
कानिफ़नाथांचा थाट कसा होता त्याचें वर्णन पुढील कटावांत नमूद आहे.

॥ कटाव ॥
अल्प सिद्धिनें सिद्ध जाहला । नाथ कानिफ़ा महंत बनला ॥
बसुन पालखिंत फ़िरूं लागला । देशोदेशीं लौकिक झाला ॥
शिष्यसंघ तो भव्य जमविला । डिमड्या, किनर्‍या वाजति घंटा ॥
स्तुतीपाठकां किमपि न तोटा । पुढें गजावर भव्य बाहुटा ॥
शिष्य हजारों सवें चालतीं । ज्याच्या त्याच्या तनूस विभुती ॥
कर्णामाजीं मुद्रा रुळती । जटाभार तो शिरीं वाहती ॥
दंडामाजीं घुंगरें वाजतीं । कोर सिंदुरी भालिं चमकती ॥
प्रत्येकाच्या त्रिशूळ हातीं । मलयचंदनी पायिं खडावा ॥
थाट ज्यांचा किति वानावा । झोळी, चिलीम, चिमटाअ बरवा ॥
कृष्णागरूची पालखि सुंदर । दांडिस गोंडे रुळति मनोहर ॥
दों बाजूला चौरीचामर । आंत कानिफ़नाथ गुरूवर ॥
कटीस कौपिन ती जरतारी । हेमकुंडलें कर्णाभीतरीं ॥
अंगीं विभुती वासित सारी । असे ज्यामधें मिश्र कस्तुरी ॥
भालाभागा गंध केशरी । पोटापाठिला रेशमि नाडे ॥
कृष्णवर्णसे बहूं फ़ाकडे । दासगणु म्हणे वानुं जेवढें ॥
तितुकें होइल त्याची थोडें ॥४८॥

॥ लावणी ॥ ( मला जन्म )
सधन शीतशा अमराईमधें नाथ - कानिफ़ा आले ।
दर्शना लोक बहुत धावले ॥
निज अंगिंचें बळ दावाया मंत्रित विभुतीबळें ।
तरूंचीं खालिं आणविलीं फ़ळें ॥
( चाल ) हा चमत्कार जयीं लोकांनीं पाहिला ॥
म्हणति हा नाथ नव्हे साक्षात् ईश्वर आला ॥
तिथें आम्ररसाचा भंडारा जाहला ॥
दासगणू म्हणे वरवरल्या कीं, झांकीला जन भुले ।
खरे तें वर्म राहि वेगळें ॥४९॥

॥ आर्या ॥
मच्छेंद्रशिष्य गोरख त्याच दिनीं सहज पातला तेथ ।
किमपि न जवळि उपाधी नाथ खरा शांत, दांत, धीमंत ॥५०॥
कानिफ़नाथांच्या शिष्यांनीं त्या आंब्याच्या झाडाखालीं शांत बसलेल्या गोरखनाथाला पाहून हा कोणीतरी नाथसंप्रदायी गोसावी आहे तेव्हां त्यासहि आपल्या गुरूच्या भंडार्‍यांत जेवावयास सांगावें असें म्हणून त्याचेंजवळ गेले आणि म्हणले, “ गोसावीबुवा ! आज ब्रह्मनिष्ठ सच्चिदानंदस्वरूप श्रीकानिफ़नाथ महाराजांचा भंडारा आहे; तेव्हां त्या ठिकाणीं आपण जेवाववयास येऊन कृतार्थता संपादन करा. ” हें ऐकल्यावर गोरखनाथ म्हणाले,

॥ दिंडी ॥
कोण सेवी या अन्न दांभिकाचें ।
आम्र तेही आहेत हरामाचे ॥
मंत्रविद्येनें आणुन तेच खालीं ।
प्रौढि अपुली लोकांत मिरवियेली ॥१॥

॥ अभंग ॥
करुन लोहाची आकडी । खालिं आंबे माळी पाडी ॥
तेंच काम करण्यासाठीं । सिद्धिच्या हा लागे पाठीं ॥
जळो याचें सिद्धपण ! । क्रिया गारुड्यासमान ॥
गणु म्हणे कुरुप नार । मुरके मारी वरच्यावर ॥५२॥

॥ श्लोक ॥
अशी परिसुनी गिरा विपिनिं कानिफ़ा कोपला ।
म्हणे मजपुढें नको करुंस वल्गना ही खला ॥
त्यावर गोरखनाथ म्हणाले,

न मी करीत वल्गना मदिय गोष्ट ही रोकडी ।
न भीत कधिं केसरी बघुन बेकडाची उडी ॥५३॥

॥ सवाल ॥
करनेवाला तुम खाली तमासा नाथ न जोगी बे साचा ॥
विभुती लगाके बाल बढाये आखर कच्चा बे कच्चा ॥
अपने बदनकु हरदम हरघडीं गद्धाची बभूत लगाता ॥
तेरि जटेमें हासिल नहिं है मेंढावी बाल बढाता ॥
नाथ वही जो करके बतावे, बेढंगा फ़ंद मचाता ॥
गनु कहे गोदा चलती धीरे धीरे ओहोळ खलखळ बहेता ॥५४॥

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
हे सर्व आम्र पहिल्यासम त्वां करावे ।
झाडास लावुन पुन्हा मज दाखवावे ॥
मानींन मी तरि तुला जगतीं महंत ।
केलेंस ना जरि असें तरि साच जंत ॥५५॥
हें ऐकून कानिफ़नाथ म्हणाले,

॥ पद ॥ ( सारे छंद सोड )
तूंच हें किं करुनी आतां । दाविं मुढा, करि ना बाता ।
( चाल ) शूर अरी समरीं मारी । तो न होई त्यासी त्राता ॥
आम्र जयीं तरुपुन सुटले । तयिंच त्यांचें आयु सरलें ।
सजिव पुन्हां करणें उरलें । एक हरिचे हातां ॥५६॥
हें ऐकून गोरखनाथ म्हणाले,

॥ पद ॥ ( तिलक कामोद )
जगतिं य अहरि तरि कुठें निराळा ।
व्यष्टि - समष्टीच्या ठायीं भरुनि राहिला ॥
( चाल ) ईश शोधितां ईशची होतो ।
निज सामर्थें जग चालवितो ॥
अवघ्यापासुन अलिप्त रहातो ।
गणु म्हणे अध्यात्माचा अजब सोहळा ॥५७॥
हें ऐकून कानिफ़नाथ म्हणाले,

॥ श्लोक ॥ ( शिखरिणी )
नको बोलूं वाया करुनि झणिं ते दाव सगळे ।
दिल्यानें व्याख्याना समज रवि तो ना कधिं कळे ॥
प्रभा त्याची त्याला करित बघ बा स्पष्ट गगनीं ।
तसें त्वत्सामर्थ्या अघटित कृती दाव करुनी ॥५८॥
असें कानिफ़नाथानें म्हटल्यावर गोरखनाथांनीं,

॥ आर्या ॥
संजिवनी मंत्रानें, अभिमंत्रित त्या करूनि भस्माला ।
प्रेरुन फ़ळांवरी कीं, नेउन लाविलिं क्षणांत झाडाला ॥५९॥
॥ पद ॥
बघुन कृत्य अघटित ऐसें लाज कानिफ़ाला ।
बहुत मनीं वाटुनिया तो तेजहीन ज्ञाला ॥धृ०॥
सूर्यतेज हिणवायाला शशिस नव्हे छाती ॥
इतर गंध पुढतिं न येऊं देत कस्तुरी ती ॥
खालिं बघत पंडितसभेला मूर्ख बैसताती ॥
म्हणत गणो गजकौतुक ना होय केसरीला ॥६०॥
कानिफ़नाथ लाजला. त्यानें आपली मान खालीं घातली. इकडे जमलेल्या भव्य समुदायानें गोरखनाथाचा जयजयकार केला.

॥ दिंडी ॥
असें पाहुन तयीं सर्व पारैवासी ।
शरण आले स्तविताति गोरखासी ॥
बहुत जन्माचें पुण्य फ़ळा आलें ॥
म्हणुनी नयनीं हें चरण देखियेले ॥६१॥
लोक म्हणूं लागले, “ महाराज ! आमच्या किती जन्माचें पुण्य फ़लाला आलें म्हणून आपले पाय आम्हांस पहाण्यास मिळाले. ”

॥ पद ( गुन्हेगारी धन्याची ) ॥
ऐसा योगी आम्ही नाहीं कधीं पाहिला ॥धृ०॥
साली - कोया मिळवुनि त्याचीं केलिं पुनरपि सरस फ़ळें ।
जेथलिं तेथें लाविलीं झाडा निजांगेंच्या अतुल बळें
स्वामी गोरख मनुज नव्हे हो मूर्ती भूवर श्रीहरिची ।
दासगणु म्हणे किती पहा ही अगाध शक्ती संताची ॥६२॥

॥ ओवी ॥
अवमानाया गोरखासी । कानिफ़ा इच्छी मानसी ॥
म्हणे तूं मुळींच पापराशी । शिष्य रंडीबाजाचा ॥६३॥

॥ पद ॥ ( इच्छिसी जरी )
ठाऊका तुझा तो गुरु अम्हां व्यभिचारी ।
म्हणवुनी नाथ भोगितो पराची नारी ॥
त्याचा तूं शिष्य, करुं नको वृथा बडिजावा ।
कोठून गाढवी - पोटीं अश्व तो यावा ॥
जशि खाण तशी ती साच निपजते माती ।
म्हणे दासगणु शेरास द्राक्षें ना येती ॥६४॥
हें ऐकून गोरखनाथ म्हणाले,

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
हें राहुंदे तव गुरू पुरला लिदींत ।
त्या काढ अर्थ लव ना फ़ळ पाडण्यांत ॥
मच्छेंद्रनाथ मुळिं मुक्त स्थितींत गेले ॥
ना कर्मबंधन तयांप्रति राहियेलें ॥६५॥

॥ ओवी ॥
ऐसें एकमेकां बोलुन । दोघेही गेले निघून ॥
पाहिलें हेलापट्टण । त्वरें कानिफ़ानाथानें ॥६६॥

॥ दिंडी ॥
कानिफ़ानें तयिं कृत्य असें केलें ।
सर्व लोकांचे श्वास रोखियेले ॥
फ़ुगलिं पोटें मरणाचि वेळ आली ।
त्याचि बाधा मातेस परि न झाली ॥६७॥

॥ ओवी ॥
तें पाहून कानिफ़ास । आश्चर्य वाटलें विशेष ॥
म्हणे राजमातेस । उपदेश आहे कवणाचा ? ॥६८॥
राजमाता कानिफ़ास म्हणाली,

॥ पद ( नृपममता ) ॥
भगिनी मी तुझी भगवंता । करिं कृपा कानिफ़ानाथा । मजवरी ॥
अपराध मदिय पुत्राचे । त्वां क्षमा करावे साचे । येधवां ॥
( चाल ) जे खरे मनाचे थोर । त्यांस तिळभर । राग साचार ।
येत कीं नाहीं । असें म्हणुन लागली पायीं ॥ त्याचिया ॥६९॥

॥ श्लोक ॥ ( वसंत तिलक )
ओवाळणी मजसि एवढि आज झालीं ।
नाहीं कुणी तुजविणे भगिनीस वाली ॥
जालंदरास झणिं तूं वरती अणावें ।
या पौरवासिय जनां सुखि कीं करावें ॥७०॥
कानिफ़नाथ म्हणाले,

॥ पद ॥ ( जाके मथुरा )
युक्ती कांहीं करुनी तुझिया पुत्रा वांचवितों ।
मम अंगीच्या सामर्थ्यासी जगास दाखवितों ॥
तव पुत्रानें आपुल्यासमान पुतळें करवावे ।
पंच धातुचे पाच हुबेहुब हें नच विसरावें ॥७१॥

॥ श्लोक ( स्रग्धरा ) ॥
खड्ड्यासी खोदितां त्या नवल बुध पहा या रितीं तेथ झालें ।
ज्वाळा त्या इंधनाच्याविरहित उठती पाहुनी लोक भ्याले ॥
जो तो मागें सरे कीं, लपवित आपुला जीअ तो फ़ार प्यारा ।
धैर्याला भूपतीच्या किमपि न मिळला चित्तशैलास थारा ॥७२॥

॥ आर्या ॥
सोनें, चांदी, तांबें, पितळेचे तेविं शुद्ध लोहाचे ।
पुतळे पांच करविले, भूपतिनें आपुल्या आकाराचे ॥७३॥

॥ ओवी ॥
सुवर्णपुरळा नृपनाथ । टाकितां त्या गर्तेत ।
ध्वनी भयप्रद अत्यंत । ऐसा निघाला तिच्यामधुनी ॥७४॥

॥ झंपा ॥
अनल जाळो तुझी पाप तनु ती ।
भोगीत जी विषयसौख्यास होती ॥
अरे गोपिचंदा ! खला रे मदांधा ! ।
मानिली कीं तुवां माय असती ॥७५॥

॥ आर्या ॥
सुवर्णपुतळ्याची त्या पडतां झाली क्षणांत रांगोळी ।
यापरि यांची सरतां घातिला भूपें मुखांत अंगोळी ॥७६॥
याप्रमाणें पांची पुतळे एकामागून एक भस्म होऊन गेले. मग तर राजा फ़ार घाबरला व कानिफ़नाथांस म्हणूं लागला कीं,

॥ लावणी ॥ ( भला जन्म )
या अवघ्यांचें मूळ मीच कीं वांचुं कशाला वृथा ? ।
द्याहो गर्तेंत लोटुनी आतां ।
सारे सद्गुण ज्या साध्वीच्या ठायिं आश्रया आलें ॥
तिला मीं दूषण पहा लाविलें ॥
संत सिद्ध सम्राट नाथ हा जो ताराया आला ।
तोच म्यां लिदीमध्यें गाडिला ॥
( चाल ) मातेस अव्हेरुन कांतेचें ऐकिलें ॥
त्याचेंच फ़ळ हें आज मला लाधलें ॥
दूषण कुणावर नाहीं आतां राहिलों ॥
रयत माझि ही तरी वांचवा हे नाथा कानिफ़ा ।
गणु म्हणे खर्चुन अपुल्या तपा ॥७७॥

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
प्रवेश महिपाल तो जयिं करीत ज्वाळेमधीं ।
अशिर्वचन बोलले तयिं तया कृपेचे निधी ॥
तुला मरण ना नृपा रविशशी नभीं जोंवर ।
असें म्हणुनी ते आले वरति नाथ जालंदर ॥७८॥

॥ लावणी ( तूं चारुतनू ) ॥
अंगींची टिकविण्या शांति पुरुन घेतलें ।
निज वचें कानिफ़ा कोणा । ना शिव्याशाप दीधले ॥
इंधनावीन अग्नीस पहा प्रगटिलें ।
त्यायोगें जगाच्या सार्‍या । संशयाप्रती छेदिलें ॥
( चाल ) विद्या ति बहू अल्पशी, दिली तूजसी, तिनेंच तूं भूसीं ।
सिद्ध झालास । आसंख्य शिष्य केलेस ॥
माजवूं नको तान्हुल्या ! उपाधी वृथा ।
यानेंच दोष कीं लागें । जगतांत पहा सत्पथा ॥
पदनता द्यावें विभवास आपण त्याप्रती ।
नये कधीं स्विकारों बाळा । ही असे साधुची रिती ॥
( चाल ) वैराग्य रक्षणासाठीं, बरी लंगोटी जरीची छाटी ।
योग्य होईना । गणु म्हणे विचारी मना ॥७९॥

॥ पद ॥ ( शिवदर्शन )
तव जन्म कानिफ़ा झाला ॥धृ०॥
मत्त अशा गजकर्णामधिं । विसर काय हा पडला ? ।
सत्त्वगुणाविण संजीवनी ती । शिकवूं नये कवणाला ॥
खङ्ग खेळण्या देणें निर्भय । कधिं न होय बघ बाला ॥
दासगणु म्हणे इष्ट भोगणें । कष्ट प्रथम जो चुकला ॥८०॥

॥ ओवीं ॥
गोमय जें सत्त्वगुनप्रधान । तेथें गोरखा झालेम जनन ।
म्हणून संजीवनी त्याकारण । शिकविली मच्छेंद्रनाथानें ॥८१॥

॥ पद ॥ ( हा हिंद देश माझा )
टाकून दे उपाधी । हे कानिफ़ा तूं आधीं ।
तमोगूण वाढवी ती । विलयास नेत नीति ॥
यासाठीं ठेव साधी । रहाणी तूं हें मी बोधी ॥८२॥
“ हें सर्व ढोंग सोडून दे. त्याशिवाय तूं सत्त्वगुणी होणार नाहीस. ”

N/A

References : N/A
Last Updated : August 13, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP