मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
हरण ३

वत्सला - हरण ३

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


रुक्मिणी म्हणाली,

॥ श्लोक ॥ ( चामरवृत्त )
पूतना अघासुरादि थोर थोर दंडिले ।
चंड कालिया फ़णीवरीच नृत्य मांडिलें ॥
तोच काय सर्वशक्ति बोलतो अशी गिरा ।
पाहुनी भुतास काय कंप सुटत शंकरा ? ॥४६॥
कृष्ण म्हणाले ! “ माझें वचन मी कधींच खोटें करणार नाहीं. वत्सला ही अभिमन्यूलाच द्यावयाची आहे. ”
इकडे घटोत्कच मायावी वेष धारण करून रेवतीबाई व रुक्मिणीकडे येऊन म्हणाला, “ बाईसाहेब ! मी दुर्योधन महाराजांकडून आलों आहें. येण्याचें कारण असें कीं; सोनार तेथें बसला आहे. मुलीस पाहून तिच्या अंगचे दागिने तयार करावयाचे आहेत. तें काम होतांच मुलीस आणून घालूं. तेव्हां वत्सलेस आमच्याबरोबर पाठवावें. ” दागिन्यांचें नांव ऐकून दोघींनाहि फ़ार आनंद झाला; व तिला वेषांतर केलेल्या जांगीलमामाच्या स्वाधीन केली. त्या वेळी रुक्मिणीनें वत्सलेच्या कानांत हळूंच सांगितलें कीं, “ वत्सले ! जा तेथें सुभद्राआत्याबाई भेटतील बरं. ” वत्सलेनें मान डोलावली.

॥ आर्या ॥
जांगिलमामानें मग वेषांतर करुनि वत्सला आणिली ।
अभिमन्यूच्या पुढती नेउनि उभि बोहल्यावर केली ॥४७॥
अशा रीतीनें जांगीलमामानें अभिमन्यूच्या समोर वत्सलेला बोहल्यावर आणून उभी केली. अभिमन्यु मागें पाहूं लागला. तें पाहून सुभद्रा म्हणूं लागली कीं,

॥ लावणी ॥ ( दुष्काळ मुलुख तो )
नको मागें पाहूंस मुला । कुठें तव आला, उभा राह्याला ।
मातूल घन:सांवळा ॥
ना इथें आजा ना आजी, मामि तशि तुझी, भिमकि वेल्हाळा ।
वाटतें विसरली तुला ॥
( चाल ) तव लग्न असें कां व्हावें या वनीं ।
चोरटें, मंडपाच्या रे ! वांचुनी ।
अवघेच धटिंगण, नाहीं, स्त्री कुणी ।
गणुदास म्हणे माहेरा, विसरति न जरा, थोर जरी झाल्या ।
कामिनी कदा आपल्या ॥४८॥
सुभद्रेनें देवाचा धांवा करून म्हटलें -

॥ लावणी ॥ ( भ्यावेंस काय )
अक्षदा येई टाकाया । घननीळा! भाच्यावरी ।
मी भणंग दुबळी झाल्यें । नको सारुंस मजला दुरी ॥
( चाल ) मारिली गजेद्रें तुला, हांक विठ्ठला, तदा त्याजला ।
कसा कैवारी । झालास मुकुंदा हरी ॥४९॥

॥ आर्या ॥
ऐसें सती सुभद्रा वदतां तो नंदतनय त्या ठायां ।
झाला प्रगट विबुधहो ! भाच्याची पाठ साच रक्षाया ॥५०॥
अभिमन्यूच्या मागें षङगुणैश्वर्य द्वारकाधीश परमात्मा प्रगट झाला. पाहून सुभद्रेला फ़ार आनंद झाला. देवांनीं भाच्यावर अक्षदा टाकल्या.

॥ कामदा ॥ ( श्लोक )
देवकापुढें वधुवरें तदा । नेलिं त्याचिया वंदण्या पदा ।
कोणकोणते देव मांडिले । पाहिजे आतां तेंच ऐकिलें ॥५१॥

॥ आर्या ॥
नंद - यशोदेसह तें गोकुल त्या देवकांत मांडियलें ।
तें पाहुनि कृष्णाला होउनि संतोष, नी हंसूं आलें ॥५२॥
कृष्णांनीं सुभद्रेला सांगितलें कीं, “ सुभद्रे ! मी आतां दुसरें म्हणजें फ़जीतीचें लग्न लावण्यास जातो. ” इकडे परमेश्वरांनीं कौरवांच्या वाड्याभोंवतीं चहुंबाजारांत चार प्रकारचा म्हणजे दागिने, किराणा, कापड, भाजी, जनावरें, घोडे, हत्ती, वगैरे मालाचा बाजार भरविला होता.

॥ कटाव ॥
कौरवांच्या वाड्याभोवतीं । हाट भरविला अभिनवपंथी ।
श्रीकृष्णाची अमोल युक्ति । जांगिलमामा करीत साथी ।
जिकडे तिकडे राक्षसि माया । असे पसरली, ती उमगाया ।
कोणि न समर्थ बुध त्या ठायां । भव्य दुकानें राक्षस झाले ।
आंत माल तें होउनि बसले । स्वरुप आपुलें पार झांकिलें ।
सराफ़्याचा चौक पहिला । हिरेहिरकण्या यांनीं भरला ।
सोनेंरुप्याला पूर आला । तोटा मुळीं न त्या मोत्याला ।
वाळ्यबुगड्या आयत्या मिळती । जशी जयाला आवडे धतीं ।
वेल हिर्‍याचे शोभा देती । बुलाख, लवंग, नथ या रीतीं ।
नानापरिचे नग मोत्याचे । हिरे, हिरकण्या आणि पांचुचे ।
सरी, गोठ, पाटल्या मनोहर । कंगण्या, तोडे, वाक्या, सुंदर ।
कंबरपट्टे जवे नि बिलवर । बिंदलि, बिजवरा, जडित मनोहर ।
नानापरिचे नग डोईचे । मूद, राखडी, फ़ूल फ़िरकिचें ।
बाजुबंद तन्मणी गळ्याचा । घाट निराळा टिकाठुशांचा ।
माळांचे ते बहुत प्रकार । वर्णितां न ये कधींच पार ।
कंठें, कंठ्या आणि चंद्रहार । बोटामधल्या मुद्या मनोहर ।
पदीं जोडवीं आणि सांखळ्या । वाजे, तोरड्या मिळूं लागल्या ।
जुनें देउनी नव्यास भुलल्या । द्वितिय चौक तो किनखापाचा ।
शाल, दुशाले, पितांबराचा । जरजरतारी सामानाचा ।
धोतरजोडे, पट्टु, धावळ्या । पैठणि, साड्या, तशाच चोळ्या ।
चंद्रकळा त्या अभिनव काळ्या । कशीद्यानें भूषित केल्या ।
चौक तिसरा किराण्याचा । सुकाळ तेथें गुळ तुपाचा ।
साखर, गोडंबी, चारोळी । बदाम, पिस्ते आणि सुकेळीं ।
जायफ़ळ, विलायची, लवंग, केशर । खिसमिस मनुका नी खडिसाखर ।
खारिक खोबरें आणी अवांतर । मालांचे जणुं पर्वत पडले ।
पैशावांचुनि मिळूं लागले । चौथ्या चौकीं भाजीपाला ।
पेरू, गाजर, मुळा, भोंपळा । सुकाळ झाला तेथ रताळा ।
वांगीं, मेथी आणि कारलीं । आळो, बटाटे, डिंगरी, चवळी ।
सर्व तर्‍हेच्या भाज्या मिळती । द्राक्षें, अननस, तीं डाळिंबें ।
अंबे, अंजिर, फ़णस, जांभळें । ऊंस, मुसंबीं, चिक्कू, खिरण्या ।
खिरा, खरबुजे यांनीं गोण्या । भरून गेल्या; कलिंगडाचा ।
बाजारीं त्या आल्या विकाया । पाहूं जातां अवघेच वायां ।
अत्तर घेउनि अत्तरवाले । आळीआळीनें फ़िरूं लागले ।
बळेंच लोकां देऊं लागले । गुरें, ढोरें मैदानावर ।
गाई, म्हशी नी घोडे सुंदर । उंट, खेचरें, हत्ति मनोहर ।
राघू, मैना, कुत्रीं, रोहा । ससे, काळविट, मयूर तेही ।
आरसे, भांडीं, हंड्या, झंबर । वानूं तरि मी आतां कुठवर ।
अमूक वस्तू नच त्या ठायां । असें कोणि न धजे म्हणाया ।
अगाध ऐसी राक्षसमाया । ती वर्णाया, शक्ति खचित ना - गणुचे ठायां ॥५३॥

॥ ओवी ॥
जुनें देऊन नवे घेती । चित्तीं आनंद मानिती ।
तें पाहुनी रूक्मिनीपती । हंसूं लागे क्षणक्षणां ॥५४॥

॥ दिंडी ॥
घटोत्कच तो वत्सला असे झाला ।
तें न कळलें बलराम - रेवतीला ॥
टिळे माळा पाहून पताकासी ।
गणिति भोळे जणुं साधु त्या खलासी ॥५५॥

॥ ओवी ॥
लाडवाचे पर्वत । ही वत्सला भक्षीं क्षणांत ।
तोंडीं लावण्या टाकित । मुखीं आचारीपाणक्याला ॥५६॥
गौरीहराची वेळ आली, तेव्हां या मायावी वत्सलेला आपण प्रगट व्हावें अशी इच्छा झाली. ती रेवती - बलरामाला म्हणाली, “ मला भूक फ़ार लागली आहे. ” त्यावर रेवती म्हणाली, “ अग मग जा कीं स्वयंपाकघरांत अन् तुला हवें तें खा. ” ही मायावी वत्सला आंत गेली व जातांना दारें लावीत चालली. मोठमोठें लाडवाचे पर्वत होते ते नाहींसे केले. आचारीपाणेरी पळूं लागले. तो त्यांच्या तंगड्या धरून भक्षूं लागली. कोणालाहि बाहेर जाऊं दिलें नाहीं. स्वयंपाकघर सर्व साफ़ करून ठेवलें व पुन्हां वत्सला आपण होऊन घाबर्‍या घाबर्‍या बाहेर आली ! मायावी वत्सला घाबरली असें पाहून बलराम म्हणाले, “ बाळ ! तुला काय झालं ? अशी कां घाबरलीस ? ” त्यावर मायावी वत्सला म्हणाली कीं, “ स्वयंपाकघरांत राक्षसांनीं धुमाकुळ मांडला आहे. ते राक्षस वा भुतें आहेत हें मला कांहीं समजत नाहीं. ” तें ऐकून बलराम घाबरून कृष्णाला म्हणाले,

॥ पद ॥ ( हा काय तुमचा )
गर्गगुरुला बाहुनि आणी झडकर श्रीकृष्णा ! ।
यक्ष, भुतें, वेताळ, कोपले, मांडिलि बहु दैना ॥
( चाल ) तच्छांति, सत्वर ती करूं परती, त्याहातीं ।
सांगतील तो विधी करोनी देऊं बलि त्यांना ॥५७॥

॥ पद ॥ ( भूपती खरे )
वत्सला बघुनि त्या पहा घाबरी झाली ।
फ़ोडून थोर किंकाळि पळूनिया आली ॥
( चाल ) थरथरां तनू ही कांपे पोरिची ।
भिजलींत वस्त्रें घामानें अंगिंचीं ।
धडधडा उडत बघ छाती किति हिची ।
ऐकतां वचन दादाचें हंसे वनमाळी ।
म्हणे, ‘ ममाग्रजाची मूर्ति खचित ही भोळी! ’ ॥५८॥
कृष्ण घटोत्कचाच्या कानाशीं कुजबुजला कीं, ‘ अरे ! थोडा थांब. इतक्यांत प्रगट होऊं नकोस. ’ इकडे लग्नमंडपात नवरामुलगा बोहल्यावर आणून उभा केला.

॥ आर्या ॥
केली असे उभी जी मायावी वत्सला पटाआड ।
तैं तीहि लक्ष्मणाला भिववी पसरून हळूंच दाभाड ॥५९॥
घटोत्कचाला वाटलें कीं, आता कृष्णाचें ऐकून उपयोगाचे नाहीं. कारण या गर्गाचार्यासारख्या पवित्र भताच्या अक्षदा जर माझ्या डोक्यावर पडल्या तर मी खरंच स्त्री होईन. म्हणून त्यानें मध्यंतरीं धरलेला पट हातानें फ़ाडून नवरमुलाला दाभाड वासून दाखविलें. त्याच्या पायाला आपल्या पायाच्या नखानें बोचकारलें, तेव्हां एकच गडबड उडून गेली !

॥ साकी ॥
धांवा ! धांवा! घात असे हो ! ही न वधू राक्षस हा ।
त्या काळ्याच्या कपटकृतीला वीर तुम्ही हो लव न सहा ॥
धनुला सजवुनियां । झोडा यादव या ठायां ॥६०॥
असा हुकूम झाल्यावर कौरवसेना उठूं लागली तों -

॥ ओवी ॥
उठाया जों जाती वीर । तों राक्षस एकेक उरावर ।
कटीचें नेसतें धोतर । तेंही असूर जाहलें ॥६१॥
प्रत्येकाच्या उरावर एकेक राक्षस बसला ! तें पाहून कौरवांकडील मंडळी घाबरली. स्त्रियांचीहि याचप्रमाणें स्थिति झाली.

॥ श्लोक - वसंत तिलक ॥
चोळ्या, दुशाल, नग, पैठणि सर्व कांहीं ।
झाले क्षणांत मग राक्षस त्याच ठायीं ॥
तेणें दिगंबर वधू जइं कौरवांच्या - ।
झाल्या, बघून हंसती वधु यादवांच्या ॥६२॥
स्त्रियांनीं जो जुनें देऊन नवा माल घेतला तो यच्चावत् राक्षस होते. घटोत्कच प्रगट झाल्याबरोबर हेहि राक्षस प्रगट झाले. त्यामुळें कौरवांचे स्त्रीपुरुष नग्न फ़िरूं लागले !

॥ दिंडी ॥
अशा कृतिनें भीष्मास कोप आला ।
बाण धनुसी योजून उभा ठेला
ज्यास बघतां ते वीर - हृदय फ़ाटे ।
प्रलयाकालींचा रुद्र दुजा वाटे ॥६३॥

॥ आर्या ॥
झाला कृष्ण पुढें तैं भीष्माचा कोप सकला शमवाया ।
नत होउनि चरणिं म्हणे घडला अन्याय मुळिं न गांगेया ॥६४॥

॥ लावणी ॥ ( भ्यावेंस काय )
आपल्याच अम्ही पणतूला । वत्सला आजोबा ! दिली ।
हंसाचे कंठिंची माला । ना कावळ्यास घातिली ॥
( चाल ) आपुली स्नुषा; सद्गुणी, कुंति ज्या स्थानिं, दिली मागुनी ।
सुभद्रा बाळी । मी बाजु तीच रक्षिली ॥६५॥
तें ऐकून आचार्य गहिंवरले आणि म्हणाले,

॥ श्लोक - पृथ्वी ॥
अगा प्रनतवत्सला ! यदुकुलावतंसा ! हरी ।
अयोग्य घडणार का तव करें मुकुंदा ! तरी ? ॥
बरी दिलिस वत्सला रणधुरंधराच्या सुता ।
अली कळुन यामुळें प्रभु मला तुझी योग्यता ॥६६॥
बलरामाकडे पाहून भीष्माचार्य म्हणाले, “ बलरामा ! तूंहि सुज्ञ आहेस. वत्सलेला अभिमन्यूच योग्य होता. म्हणून तुझी बाजू कृष्णानें सांवरून धरली. शिवाय कोण देतो आणि कोण घेतो ? ”

॥ साकी ॥
विधिघटनेचा खेळ असे हा नच कारण या कोणी ।
जें झाले तें बरेंच झालें पाहिं मनीं शोधोनी ।
वीरा बलरामा ! । साधूंच्याची ये कामा ॥६७॥
“ ब्रह्मलिखित हें कांहीं निराळेंच असतें. जा आतां. वत्सला व अभिमन्यूला इकडे घेऊन ये. त्याप्रमाणें दोघांनीं नमस्कार केल्यावर भीष्माचार्यांनीं आशीर्वाद दिला. ”

॥ समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP