मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री परशुरामावतार

श्री परशुरामावतार

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ आर्या ॥
राजश्री द्रव्यमदें क्षत्रिय ते मत्त जाहले फ़ार ।
तन्नाशास्तव धरि हरि जमदग्नीच्या कुलांत अवतात ॥१॥

॥ दिंडी ॥
सोमवंशी हयहाय कूळ एक ।
कुळाचा ज्या सर्वांस असे धाक ॥
सहस्रार्जुन तो भूप होय त्यांचा ।
प्रबल योद्धा परि कोष अहंतेचा ॥२॥
या सहस्रार्जुनाच्या वंशांतील क्षत्रिय राजकुमार मृगयेसाठीं नर्मदेच्या तीरावरील अरण्यामध्यें आले.

॥ ओवी ॥
एके दिनीं नर्मदा तीरीं । गोष्ट घडली ऐशापरी ।
क्षत्रिय - कुमार अत्यादरीं । आले सहल करावया ॥३॥

॥ कटिबंध ॥
समवयी मुलेम तीं सारी नर्मदातिरीं जयांच्या करीं ।
धनुष्यें असती । झळकती वाण - भाते ते पाठिच्यावरती ॥
मस्तकीं मुकुट घातिले तेज फ़ांकलें चमकुं लागलें । कंठे कंठांत ॥
तारुण्य - भराच्यामुळें अवघे धुंदींत ॥
( चाल ) अवघ्यास छंद मृगयेचा लावला ।
प्रत्येक वाण धनुलागीं जोडिला ।
इर्षेस पूर अनिवार लोटला ।
तारुण्यभराच्यामधी विबुधहो कधीं नीति नाठवते ।
गणू म्हणे आग काडीचि माडिला जाते ॥४॥
त्यांच्या त्या मृगयेच्या गडबडीमध्यें त्या अरण्यांत असलेल्या जमदग्नी ऋषींच्या आश्रमास उपसर्ग होऊं लागला म्हणून तेथील ऋषिकुमारांनीं राजपुत्रास सांगितलें कीं,

॥ श्लोक ॥
येथें तुम्ही मुळीं न हो मृगया करावी ।
ही गोष्ट नित्य आपुल्या मनिं वागवावी ॥
धेनूस बाण तुमचा वनिं लागल्यास ।
कोपेल व्यर्थ जमदग्नि मुनी विशेष ॥५॥
राजपुत्र उर्मटपणें म्हणाले,

॥ साकी ॥
दावुं नका आम्हास किमपिही भय त्या जमदग्नीचें ।
राजपुत्र आम्ही सत्ताधारी मालक या भूमीचे ॥
व्याघ्रालागि ससा । जिंकिल सांगा तरि कैसा ? ॥६॥
या अहंकारी बोलण्यावर ऋषिकुमारांनीं त्यांना बजाविलें.

॥ दिंडी ॥
तुम्ही अवघे धनमदें मत्त झाला ।
नाश तुमचा हो खचित जवळ आला ॥
दीप जाते समयास थोर होतो ।
धांव बुडता भंवर्‍यांत बळें घेतो ॥७॥
परंतु त्या सूचनेचा उपयोग झाला नाहीं. राजपुत्रांनीं उन्मत्तपणें आश्रमास उध्वस्त केलें; पशुपक्ष्यांना जखमी केलें; झाडें तोडून टाकलीं. ध्यानस्थ जमदग्नीच्या गळ्यांत मृतसर्प अडकविला. ध्यान उतरल्यानंतर उन्मत्त क्षत्रियांनीं केलेली आश्रमाची ती दशा पाहून,

॥ ओवी ॥
जमदग्नी मुनी कोपला । खडतर तपा बैसला ।
कोपानल तो पेटला । क्षत्रियाविषीं मानसीं ॥८॥
तपानें प्रसन्न झालेल्या विष्णूस जमदग्नी म्हणाले,

॥ दिंडी ॥
जगन्नाथा ! क्षत्रिय मत्त झाले ।
ब्राह्मणांचे त्यापुढें काय चाले ॥
नाश त्यांचा करण्यास तुझ्यावीण ।
नसे कोणा सामर्थ्य विभो जाण ॥९॥
विष्णूंनीं आश्वासन दिलें कीं -

॥ श्लोक ॥
होईन मी त्वदिय पुत्र तृतीय साचा ।
अंशे करून करण्या वध क्षत्रियांचा ॥
स्कंधावरी धरिन तीव्र कुठार देख ।
रक्षावया सकल विप्र नि संत लोक ॥१०॥
या आश्वासनाप्रमाणें जमदग्नीची पत्नी रेणुका गर्भवती झाली व योग्य वेळीं,

॥ आर्या ॥
वैशाख शुद्ध पक्षीं तृतियेला सुप्रदोष समयाला
उदरास रेणुकेच्या आले श्रीपरशुराम जन्माला ॥११॥

समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : August 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP