मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - रामदासी अभंगसुधा

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


॥ अभंग ॥
टाळ धरूं कथा करूं ॥ रामालागीं हाका मारूं ॥१॥
ये रे रामा ये रे रामा ॥ तुझी आवड लागो आम्हां ॥धृ०॥
तुजविण गाईल कोण ॥ उठ सांडी मीतूंपण ॥
रामदास पाहे वास ॥ भेट द्यावी सावकाश ॥३॥

रामभक्तीवीण आन नाहीं सार ॥ साराचेंही सार राम एक ॥१॥
कल्पनाविस्तारु होतसे संहारु ॥ आम्हां कल्पतरु चाड नाहीं ॥२॥
कामनेलागून विटलेंसें मन ॥ तेथें चाड कोण कामधेनु ॥३॥
चिंता नाहीं मनीं राम गातां गुणी ॥ तेथें चिंतामणी ॥ कोण पुसे ॥४॥
कदा नाहीं नाश स्वरूप सुंदर ॥ तेथें आम्हां हिरे चाड नाहीं ॥५॥
रामदास म्हणे रामभक्तीविणें ॥ जाणावें तें उणें सर्व कांहीं ॥६॥


दासाची संपत्ती राम सीतापती ॥ जिवींचा सांगाती राम एक ॥१॥
राम एक माता राम एक पिता ॥ राम एक भ्राता सहोदर ॥२॥
सहोदर विद्या वैभव कांचन ॥ सर्वही स्वजन राम एक ॥३॥
राम एक स्वामी रामचि कैवारी ॥ लाभ ये संसारीं राम एक ॥४॥
राम एक ज्ञान राम एक ध्यान ॥ राम समाधान रामदासी ॥५॥


अंतरीं गुरुवचन ॥ बाहय नापितवपन ॥१॥
आंतर्बाहय शुद्ध जाहलों ॥  रामदर्शनें निवालों ॥धृ०॥
मन मुंडील्या ॥ जन्मन जाहलें ॥ शिर मुंडोनी काय केलें ॥२॥
रामदासें तीर्थविधी केला ॥ रामीं पिंड समर्पिला ॥३॥

सीतापती राम पतीतपावन ॥ गाती भक्तजन आवडीनें ॥१॥
राघवाच्या गुणा न दिसे तुळणा ॥ कैलासीचा राणा लाचावला ॥२॥
देवाचें मंडण भक्तांचें भूषण ॥ धर्मसंरक्षण राम एक ॥३॥
रामदास म्हणे धन्य त्याचें जिणें ॥ कथा निरूपणें  जन्म गेला ॥४॥

काय गावें काय गावें ॥ श्रोतीं सावधान व्हावें ॥धृ०॥
टाळ द्वैताचा तुटला ॥ बोधमृदंग फुटला ॥१॥
दास वेडे आणि बागडे ॥ ताल जातो भलतीकडे ॥२॥
रामभेटीचा समय ॥ रामदासा गातां नये ॥३॥

जाणावा तो नर ॥ देवचि साचार ॥ वाचें निरंतर रामनाम ॥१॥
सगुणी सद्बाव नाहीं ज्ञान गर्व ॥ तयालागीं सर्व सारिखेची ॥२॥
निंदका वंदका संकष्टीं सांभाळी ॥ मन सर्वकाळीं पालटेना ॥३॥
पालटेना मन परस्त्री - कांचनीं ॥ निववी वचनीं पुढीलांसी ॥४॥
पुढिलांसी नाना सुख देत आहे ॥ उपकारीं देह लावीतसे ॥५॥
लावितसे देह रामभजनासी ॥ रामीरामदासीं हरीभक्ती ॥६॥


वाणी शुद्ध करी नामें ॥ चित्तशुद्ध होय प्रेमें ॥१॥
नित्यशुद्ध होय नामीं ॥ वसतांही कामीं धामीं ॥२॥
कर्ण शुद्ध करी कीर्तन ॥ मन शुद्ध करी ध्यान ॥ प्राण शुद्ध करी नमन ॥३॥
कर शुद्धी राम पूजितां ॥ पादशुद्धी देउळीं जातां ॥४॥
त्वचा शुद्ध करिजे रज ॥ मस्तक जमितां पादांबुज ॥५॥
नेमें लिंग करिजे शुद्ध ॥ अतर निर्मळपणें गुद ॥६॥
राम - पायीं राहतां बुद्धी ॥ रामदासास कळली शुद्धी ॥७॥


प्रात: काळ झाल्या राम आठवावा ॥ ह्रदयीं धरावा क्षण एक ॥१॥
क्षण एक जीवीं रामासी धरीजे ॥ संसार तरीजे हेळामात्रें ॥२॥
हेळामात्रें रामनामें होय गति ॥ भाग्यवंत घेती सर्वकाळ ॥३॥
सर्वकाळ राम मानसीं धरावा ॥ वाचें उच्चारावा नामघोष ॥४॥
नामघोष वाचें श्रवणीं कीर्तन ॥ चरणीं गमन देवालया ॥५॥
देवालया जातां सार्थक तें जाहलें ॥ कारणीं लागलें कलेवर ॥६॥
कलेवर त्वचा जोडोनि हस्तक ॥ ठेवावा मस्तक राम पायीं ॥७॥
रामपायीं शिळा झाली दिव्य बाळा ॥ तैसाची सोहळा मानवासी ॥८॥
मानवासी अंतीं रामनामें गती ॥ सांगें उमापती महादेव ॥९॥
महादेव जप सांगे पार्वतीसी ॥ तोचि तो विश्वासी दास म्हणे ॥१०॥


सकळ साधनांचें फळ ॥ रामनामचि केवळ ॥१॥
जपतप अनुष्ठान अंतीं ॥ नामचि प्रमाण ॥२॥
नाना मंत्रयंत्रावळी ॥ सोडविना अंतकाळीं ॥३॥
महा पातकी पतित ॥ नामें तरले अनंत ॥४॥


जीवन्मुक्त प्राणी होऊनिया गेले ॥ तेणें पंथें चाले तोचि धन्य ॥१॥
जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी ॥ नि:संदेह मनीं सर्वकाळ ॥२॥
मिथ्या देहभान प्रारब्धा आधीन ॥ राहे पूर्णपणें समाधानीं ॥३॥
आवडीनें करी कर्म - उपासना ॥ सर्वकाळ ध्यानारूढ मन ॥४॥
पदार्थाची हानी होतां नये कानीं ॥ जयाची करणी बोला ऐसी ॥५॥
धन्य ते पैं दास संसारीं उदास ॥ तयां रामदास नमस्कारी ॥६॥


तुजविण देवा मज कोणी नाहीं ॥ माझी चिंता कांहीं असो ॥२॥
विवेकें सांडीलें ज्ञानें वोसंडीलें ॥ चित्त हें लागलें तुझें पायीं ॥३॥
तुझें नाम वाचें उच्चारित असे ॥ अंतरीं विश्वास धरियेला ॥४॥
रामदास म्हणे मी तुझें अज्ञान ॥ माझें समाधान करी देवा ॥५॥


उतावेळ चित्त भेटीचे आर्त ॥ पुरवी मनोरथ मायबापा ॥१॥
रात्रंदिस मज लागलासे सोस ॥ भेटी द्यावी ऐसे उच्चाट हा ॥२॥
पराधीन जिणें नको करूं रामा ॥ नेईं निजधामा आपुलीया ॥३॥
तुजविण रामा मज कोण आहे ॥ विचारूनि पाहे मायबापा ॥४॥
रामीरामदास बहु निर्बुजला ॥ मीतूंपणा ठेविला ओंवाळोनी ॥५॥


माझा देह तुज देखतां पडावा ॥ आवडी हे जीवा फार होती ॥१॥
फार होती परी परला पाहातां ॥ चारी देह आता हारपले ॥२॥
हारपले माझे सत्य चारी देह ॥ आतां नि:संदेह देहातीत ॥३॥
नि:संदेह झाला देवा देखतांची ॥ चिंतिलें आतांची सिद्ध झालें ॥४॥
सिद्ध झालें माझें मनीचें कल्पिलें ॥ दास म्हणे आलें प्रत्ययासी ॥५॥


जन्मोनिया तुज भजलों याचि बुद्धीं ॥ प्राणत्याग - संधी सांभाळीसी ॥१॥
उचितां न चुके अंतींच्या श्रीरामा ॥ आपुल्यारूपीं आम्हां ठाव देई ॥२॥
जन्मावरी तुज धरिलें ह्रदयीं ॥ आतां ये समयीं पावावें त्वां ॥३॥
निष्कामता तूज सेवियाचि आशा ॥ अंतीं रामदासा सांभाळावें ॥४॥

हिरभक्ती करी धन्य तो संसारीं ॥ तयाचा कैवारी देवराणा ॥१॥
देवराणा सदा सर्वदा मस्तकीं ॥ तयासी लौकीकीं चाड नाहीं ॥२॥
चाड नाहीं जरी राघवाच्या दासा ॥ सार्थक वयसा दास म्हणें ॥३॥

सार्थकाचें जीणें कथा निरूपणें ॥ श्रवण मननें काळ गेला ॥१॥
हरिभक्तीवीण जाऊं नेदी क्षण ॥ या नांव लक्षण सार्थकाचें ॥२॥
काळ गेला हरीभक्तीचेनि योगें ॥ साधूचेनि संगें दास म्हणे ॥३॥

रामाविणें देश  तो जाणावा विदेश ॥ विदेशा स्वदेश राम करी ॥१॥
राम भेटी ज्यासी तो नव्हे विदेशी ॥ सर्व देश त्यासी आपुलेची ॥२॥
आपुलेचि देश या रामाकरितां ॥ होय सार्थकता जेथें तेथें ॥३॥
जेथें तेथें राम देखतां विश्राम ॥ संसारींचा भ्रम आठवेना ॥४॥
आठवेना तेथें आठव विसर ॥ दास निरंतर जैसा तैसा ॥५॥

योगियांचा देव मज सांपडला ॥ थोर लाभ झाला एकाएकीं ॥१॥
एकाएकीं एक त्रैलोक्य नायक ॥ देखिला सन्मुख चहूंकडे ॥२॥
चहूंकडे देव नित्य निरंतर ॥ व्यापोनी अंतर समागमें ॥३॥
समागम मज रामाचा जोडला ॥ वियोगही केला देशोधडी ॥४॥
देशोधडी केला विवेक वियोग ॥ रामदासी योग सर्व काळ ॥५॥

जेथें जावें तेथें रमा समागमी ॥ आतां कासया मी खंती करूं ॥१॥
खंती करूं जा (ज्या) ची तो समागमेंचि ॥ पाहतां सुखाची घडी होय ॥२॥
होय देव खरा भूमंडळवासी ॥ जातां दिगंतासी सारिखाची ॥३॥
सारिखाची असे जनीं वनांतरीं ॥ तो गिरिकंदरीं सारिखाची ॥४॥
सारिखाची कडे कपाटीं पाहतां ॥ राम आठविता रामदास ॥५॥


मातापिता जाण स्वजन कांचन ॥ प्रियापुत्रीं मन गोवूं नको ॥१॥
गोंवूं नको मन राघवावांचोनी ॥ लोकलाज जनीं लागलीसे ॥२॥
लागलीसे परी तुवां न धरावी ॥ स्वहिता करावी राम भक्ती ॥३॥
राम - भक्तीवीण होसील हिंपुटी ॥ एकलें शेवटीं जाणें लागे ॥४॥
जाणें लागे अंतीं बाळा सुलक्षणा ॥ ध्याईं नारायणा दास म्हणे ॥५॥


माझे मनीं सर्व सुख व्हावें तुज ॥ म्हणोनिया गूज सांगतसें ॥१॥
सांगतसें हित त्वां जीवीं धरावें ॥ भजन करावें राघोबाचें ॥२॥
राघवाचें प्रेम तें करी विश्राम ॥ येर सर्व श्रम जाण बापा ॥३॥
जाण बापा वचन हें माझें प्रमाण ॥ वाहतसें आण राघवाची ॥४॥
राघवाची भक्ति ते माझी विश्रांती ॥ असों द्यावी चित्तीं दास म्हणें ॥५॥


मुक्तपणें रामनामाचा अव्हेर ॥ करी तो गव्हार मुक्त नव्हे ॥१॥
मुक्त नव्हे काय स्वयें शूलपाणी ॥ रामनाम वाणीं उच्चारितां ॥२॥
राम म्हणे शिव तेथें किती जीव ॥ बापुडे मानवदेहघारी ॥३॥
देहधारी नर धन्य ते संसारीं ॥ वाचे निरंतरीं रामनाम ॥४॥
रामनाम वाचें स्वरूप अंतरीं ॥ धन्य तो संसारीं दास म्हणे ॥५॥


॥ श्लोक ॥ भजनरहितज्ञानें मोक्ष होणार नाहीं ॥ सकळहि निगमाचें सार शोधूनि पाही ॥
सगुणभजनमार्गें रक्षिलें थोरथोरीं ॥ अधम नर अयाचें ज्ञान संदेहकारी ॥१॥
स्मरण स्मररिपूचें वीषहर्ते वपूचें ॥ निजबिज निगमांचें सार सर्वागमांचें ॥
मथन त्रिभुवनींचें गूज योगीजनांचें ॥ जिवन जडजिवांचें नाम या राघवाचें ॥२॥
भजन रघुविराचें पाहतां सार आहे ॥ अगणित तुळणाही तूळितां ते न साहे ॥
भुषण हरिजनांचें ध्यान योगीजनांचें ॥ स्वहित मुनि जनांचें गूज हें सज्जनांचें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP