मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - प्रकरण ११ वें

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
दाहीं प्रकरणीं, सांगितलें ॥ अनुभवावें तें, निर्धारबलें ॥
तेंच स्वरूपीं, अभ्यासिलें ॥ तरचि कार्य, होतसे ॥१॥
बसण्यासाठीं, एकान्त स्थान ॥ जेथें चंचल, न होय मन ॥
सकल वृत्तीतें, आवरून ॥ बैसे निश्चल, मृद्वासनीं ॥२॥
करी निवृत्ती, विषयाची ॥ मनैकाग्रता, चित्ताची ॥
द्दश्य मात्रीं, विरक्तीची ॥ तरीच लाभे, कर्मफल ॥३॥
देहबुद्धीतें, सोडुनी ॥ जीवबुद्धीतें, त्यागुनी ॥
आत्मबुद्धीतें, सोडुनी ॥ जीवबुद्धीतें, त्यागुनी ॥
आत्मबुद्धीतें, धारण करोनी ॥ अंतरामाजीं, प्रवेश करी ॥४॥
मनेंद्रियांना, आवरुनि ॥ स्थूलाभिमान, सोडुनी ।
शुद्ध भावातें, धरोनी ॥ आकाश पाही, अंतरींचें ॥५॥
स्थूल इंद्रिया, मधून ॥ युक्तीनें एक, वटी मन ॥
तें अंतरा, काशीं नेऊन ॥ तेथेंचि स्थीर, करावें ॥६॥
जेव्हां मन - वृत्ती, चपल धावे ॥ तेव्हां त्यांना, पर्तवावें ॥
ऐशा यत्नें करूनि स्थिरावें ॥ अभ्यासें, समर्थ होईजे ॥७॥
जिकडे मन हें, लाळ घोटी ॥ मारावी झडकर, त्याशी काठी ॥
मग, न, लागे, तयाच्या तें पाठी ॥ निर्लजत्वं, वर्ततसे ॥८॥
ज्या ज्या विषयांतें, मन धरी ॥ जें जें मूर्खत्वें, आचरी ॥
मूर्ख म्हणवुनी, घेई जरी ॥ कल्पना त्यागी, सत्वर तें ॥९॥
ह्रदयाकाशीं, जातां, सत्वरी ॥ जीवाशि मीपणा, अंतरीं ॥
स्फुर्ति स्फुरे ती, झटकरी ॥ अनुभवज्ञानें, कळेल कीं ॥१०॥
जीव हा अंत: करणाधीन ॥ अंत:करणी, होतें स्फुरण ॥
पुनरपि तेथेंचि, त्याचें मरण ॥ स्फुर्तीच नष्ट, होतसे ॥११॥
जीवबुद्धीच्या, कल्पना ॥ नास्तिकत्व येतें, झटकर मना ॥
तेणेंच वेड लागे, सर्वा जना ॥ म्हणोनि संत, उमजाविती ॥१२॥
नदीउगमीचें, नीर वाहे ॥ तेंचि होतसे, सिंधु पाहे ॥
तैसा जिव ब्रम्हीं, लवलाहे ॥ पावतो यत्नें सिद्धीनें ॥१३॥
ऐसा सिद्धान्तें, अभ्यंतरीं ॥ निश्चय होतो, ऐशापरी ॥
कल्पना नुरती, त्या अवसरीं ॥ ब्रम्हीं समरस, होतसे ॥१४॥
जेथें जें जें, द्दश्यत्वें स्फुरे ॥ तें तें त्यागोनी, माघारे ॥
यावें आत्मखरूषीं, निर्धारें ॥ आपुले आपण, व्हावया ॥१५॥
बाहय देखणें, तेचि आंत ॥ एक दिसे, दुजे कल्पित ॥
न ठेवावें, तेथेंचि चित्त ॥ ऐसा मार्ग, सहजच कीं ॥१६॥
साकारादिक, अवघें शून्य ॥ न होय देहबुध्द्यां, तें न्यून ॥
तरी आपण कोण पहातां, जाण ॥ आत्मरूप, प्रगटतें ॥१७॥
जैसा वाढतं, अंधार ॥ माथ्यावरी, नीर पूर ॥
न भासे दुजा, आकार ॥ चित्त - ऐक्य व्हावें तसें ॥१८॥
जैसें कुर्में, आकुंचिलें ॥ करचरणशीर, आंत नेलें ॥
आपणचि, आपणत्व, उरलें ॥ तैसें व्हावें, एकाग्र ॥१९॥
नाभीपासूनी, श्वास उठत ॥ मन आणावें, त्यासमवेत ॥
सोहं शब्दें, होतसे मात ॥ ऐशी एकाग्रता, अनुभवी ॥२०॥
जागृतींत ज्ञान, प्रकाशतां ॥ आपण, एकलाची, तत्वता ॥
ब्रम्हास्थितीतें आणितां, आणितां, ॥ ब्रम्हामयीच, होतसे ॥२१॥
ज्याचा तोचि, एकाकी ॥ नसे आप्त, मामा, काकी ॥
वृथा मोहे गुंतु, नको कीं ॥ प्रपंच ऐसा, निरसावा ॥२२॥
आत्म्याहूनी, देह पृथक ॥ ऐसा होतां, पूर्ण विवेक ॥
स्वदेहींच, होई तुटक ॥ आपणचि, एक ब्रम्हा मानी ॥२३॥
जोंवरि मी, एकटा न मानी ॥ तोंवरी व्यर्थचि, अभ्यासणी ॥
घुटमळतो जाण, प्रपंच मनीं ॥ आसक्तिनें, सर्वदा ॥२४॥
देहावर येतां, प्रपंच भरी । होवोनि राहे, सदाचारी ॥
परमार्थसाधनीं, देहचि विसरी ॥ तोचि साधील, दोन्ही अर्थ ॥२५॥



इति श्रीपरमामृते मुकुंदराजविरचिते अभ्यासनिदिध्यासनिरूपणं नाम एकादंश प्रकरणं संपूर्णम् ॥ श्रीब्रम्हार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP