पंचक - होळीपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
अवघेचि बोंबलती ।
होळीभोंवतें भोंवतीं ॥१॥
माया होळी प्रज्जवळली ।
सृष्टि वेढारें लविली ॥२॥
ज्याकारणें गुंडाळती ।
तेंचि वाचें उच्चारिती ॥३॥
होळीमध्यें खोजें आहे ।
तें तूं विचारूनि पाहे ॥४॥
खाजें खातां सुख होये ।
परी कठीण हाता नये ॥५॥
खोल दृष्टीनें पाहिलें ।
खाजें त्याच्या हाता आलें ॥६॥
एक उडी घालूं जाती ।
लंडी चुकोनी पडती ॥७॥
एक देहाचे पांगले ।
तेचि आगीं हुर्पळले ॥८॥
उडी अवध्यांचीच पडे ।
परि तें हातास न चढे ॥९॥
एकें थोर धीर केला ।
खाजें घेऊनि पळाला ॥१०॥
एक आपणची खाती ।
एक सकळांतें वाटिती ॥११॥
एक घेउनी पळाले ।
तंव त्यावरि पडे जाळें ॥१२॥
रामीं रामदास होळी ।
केली संसाराची धुळी ॥१३॥
॥२॥
अझुनी कायरे दुश्चिता ।
सावधान होईं आतां ॥१॥
नागविलें योनिद्वारें ।
म्हणूनि बोंबलती पोरें ॥२॥
सकळ नाडीयेलें वोजें ।
अवघी एक बोंब गाजे ॥३॥
धुळी टाकिली मस्तकीं ।
कोणी दाद देईना कीं ॥४॥
राडी ऐसे नर्क होती ।
म्हणोनि प्रत्यक्ष दाविती ॥५॥
झोबी लोंबी हो घेउनी ।
जाती टाकिती नेउनी ॥६॥
नेघे नेघे म्हणती बळी ।
बळें घालिती पाताळीं ॥७॥
धरुनी अकस्मात नेती ।
अवघीं कौतुकें पहाती ॥८॥
तेथें असेना मर्यादा ।
थोर करिती आपदा ॥९॥
घरोघरीं फेरे करिती ।
तैशा होती पुनरावृत्ति ॥१०॥

॥ अभंगसंख्या ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP