पंचक - सुंदरपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
म्हणे मी एक चांगला ।
शब्द ठेवी पुढिल्याला ॥१॥
नाक नाहीं कान नाहीं ।
जिव्हा नाहीं डोळे नाहीं ॥२॥
हात लुले पाय लुले ।
अवघे दांत उन्भळले ॥३॥
अवगुणी कुलक्षणी ।
दास म्हणे केली हानि ॥४॥
॥२॥
ज्ञानाविण निर्नासिक ।
नये संतांचे सन्मुख ॥१॥
असो इंद्रियें सकळ ।
काय करावी निर्फळ ॥२॥
नाहीं कथानिरूपण ।
हेची बधिर श्रवण ॥३॥
नाहीं देवाचें वर्णन ।
तगे तेंचि मुकेपण ॥४॥
नाहीं पाहिलें देवासी ।
अंध म्हणावें तयासी ॥५॥
नाहीं उपकारीं लविले ।
अहो तेचि हात लुले ॥६॥
नाहीं केलें तीर्थाटण ।
व्यर्थ गेले ते चरण ॥७॥
नाहीं काया झिजविली ।
प्रेतरूपची उरली ॥८॥
नाहीं देवाचें चिंतन ।
मन हिंडे जैसें श्र्वान ॥९॥
नाहीं परमार्थ बोलणें ।
जिव्हा नाहीं तेणें गुणें ॥१०॥
दास म्हणे भक्तीविण ।
अवघें देहीं कुलक्षण ॥११॥
॥३॥
अवघा डोंगर जळाला ।
आहाळोनी काळा झाला ॥१॥
तरी तेथें बहू रंग ।
तैसें अवघें हें जग ॥२॥
दुर्जनासी बरें केलें ।
नाना प्रकारें रक्षिलें ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
जिणें वोवाळिलें सुणें ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP