श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय ४०

श्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.


चरपटीनाथानें इंद्राची दुर्दशा करुन टाकली म्हणुन इंद्रास फारच खिन्नता वाटली व झालेला अपमान त्याच्या मनास लागुन राहिला. त्यानें चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करुन बृहस्पतीजवळ गोष्ट काढली कीं, तो अल्पवयीं असून तेजस्वी आहे हें खरें ! परंतु प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर आणुन बेतविली आणि आपली करामत दाखविली. इतकें सामर्थ्य दुसर्‍या कोणाचें नाहीं. एक वाताकर्षणविद्या ही देव विद्या कशी फैलावली कळत नाहीं; परंतु ती विद्या आपणांस साध्य होईल.अशी कांहीं तरी युक्ती काढावी. नाहीं पेक्षा त्यांच्या घरीं जाऊन त्यांचें दास्यत्व स्वीकारुन त्यांस आनंदीत करावें. अशा भावार्थाचें इंद्राचें भाषण ऐकून बृहस्पतीनें सांगितलें कीं, नाथांस येथें आणावें हें फार चांगलें, सोमयाग करावा म्हणजे त्या निमित्ताने नाथास येथें आणावयास ठीक पडेल. ते तेथें आल्यनंतर तूं त्यांच्या खुशामतीमध्यें तत्पर रहा आणि त्यांच्या मर्जीनुरुप वागूंन त्यास प्रसन्न करुन घेऊन आपला मतलब साधुन घे, हाच एक मार्ग सुलभ व साध्य दिसतो.

ही बृहस्पतीची युक्ति इंद्रास मान्य झाली व त्यास आनंदहि झाला. परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावें हा विचार पडला. बृहस्पति म्हणाला, अष्टवसुपैकीं उपरिक्षवसु हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय; तो जाऊन त्यास घेऊन येईल. पूर्वी मच्छिंद्रनाथ येथें आला. होता तेव्हां त्याचा चांगला आदरसत्कार झालेला आहे. तो नऊ नाथांस घेऊन येऊन तुझा हेतु सफल करील, हें ऐकून इंद्रानें उपरिक्षवसुस बोलावुन त्यास आपला हेतु सांगितला व विमान देऊन नाथांस आणावयास पाठविलें.

मग तो बदरिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला. गोरक्ष, धर्मनाथ, चौरंगी, कानिफा, गोपिचंद्र चालंदर अडबंगी आदि नाथमडळीहि तेथेंच होती. उपरिक्षवसु येतांच मच्छिंद्रनाथानें उठून त्याच्या पायांवर मस्तक ठेविलें त्यानें सर्वासमक्ष इंद्राचा निरोप कळविला आणि बोध करुन नवनाथांस अमरपुरीस घेऊन येण्यासाठीं फारच आग्रह केला व त्याजकडून येण्याचें कबूल करुन घेतलें. मग जालंदर , कानिफा, चौरंगी, मच्छिंद्र, गोरक्ष , अंडबंगी, गोपीचंद्र आदिकरुन जोगी विमानांत बसले. गौडबंगाल्यास हेळापट्टणास येऊन गोपीचंदानें आपल्या आईस घेतलें. मग तेथून वडवाळ गांवीं जाऊन वटसिद्धनाथास बोध करुन बरोबर घेतलें. तसेंच गोमतीच्या तीरीं. जाऊन भर्तृहरीस घेतलें. ताम्रपर्णीचें कांठीं जाऊन चरपटीनाथास घेतलें. पूणें प्रांतांत विटगांवाहून रेवणनाथास घेतलें असो; याप्रमाणें चौर्‍यांयशीं सिद्धासंह नवनाथ विमानांत बसुन सोमयागाकरितां अमरावतीस गेले.

त्याचें विमान आलेलें पाहिल्यबरोबर, इंद्र नाथांस सामोरा गेला आणि नम्रपणानें बोलून त्यांच्या पायां पडला. मग त्यानें सर्वांस घरीं नेऊन आसनावर बसविलें व त्यांची षोडशोपचांरानीं पूजा केली. सर्व देव आनंदानें त्यांच्यापूढें उभे राहिलें. नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतु इंद्रानें सर्वास सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हें कळविण्यासाठी प्रार्थना केली. मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पति यांनीं आपसांत विचार करून सिंहलद्विपामध्यें जें अटव्य अरण्य आहे, तेथें शीतल छाया असुन उदकाचा सुकाळ असल्यानें तें ठिकाण यज्ञान तयारी केली व स्त्रीसह स्वतः यज्ञान बसण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडांत आहुती देण्याच्या कामाची त्यानें योजना केली.

हें वन किलोतलेच्या सीमेंत होतें म्हणुन तेथें असलेल्या मीननाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली. म्हणुन मच्छिंद्रनाथानें उपरिक्षवसुस त्या दोघांस घेऊन येण्यास सांगितलें . त्याप्रामाणें किलोतलेसहि मी येथें घेऊन येतो असें सांगुन उपरिक्षवसु गेला व ते सर्व आल्यावर मच्छिंद्रनाथानें त्यांना राहवुन घेतलें. मच्छिंद्रनाथानें मीननाथास विद्याभ्यास शिकविला. पुढें बृहस्पतीनें इंद्रास सांगितलें कीं, आपण यज्ञास न बसतां उपरिक्षासुस बसवावें. मग बृहस्पतीच्या शिफारशीवरून उपरिक्षवसुच्या हातांत इंद्रानें यज्ञकंकण बांधिलें व आपण देखरेख ठेवूं लागला. जो पदार्थ लागेल तो इंद्र स्वतः देत होता; त्यानें सेवा करण्यांत कसुर ठेवली नाहीं. ता वेळेची इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाले.

मीननाथास मच्छिंद्रनाथ विद्या शिकवीत असतां, इंद्रानें मयुराच्या रूपानें गुप्तपणें झाडावर राहुन वाताकर्षणमंत्रविद्या साधून घेतली. ती प्राप्त होतांच इंद्रास परमसंतोष झाला. एक वर्ष यज्ञ चालला होता. तोंपर्यंत मच्छिंद्रनाथ विद्या शिकवीत होता. यज्ञसांगतां होतांच मच्छिंद्रनाथ अग्रपूजेस बसला मग यथासांग पूजा झाल्यावर इंद्रानें दुसर्‍या नाथांची पूजा केली व वस्त्रेंभूषणें देऊन सर्वांस गौरविलें. मग सर्व नाथ कनकासनांवर बसल्यावर इंद्र हात जोडून विनंति करुं लागला कीं, माझ्याकडुन एक अन्याय घडला आहे, त्यची मला क्षमा करावी. तो अन्याय हा कीं, मीननाथास विद्या पढवीत असतां ती सर्व मी चोरून शिकलों आहें.यास्तव आपण वर देऊन ती फलद्रूप करावी. इंद्राचें हें चौर्यकृत्य ऐकून सर्व नाथांनी रागानें शाप दिला कीं तुं कपटाने आम्हांस आणुन विद्या साधुन घेतली आहेस; पण ती निष्फळ होईल. तो शाप ऐकून उपरिक्षवसु व बृहस्पति यांनीं पुष्कळ प्रकारांनीं विनवून त्यास संतुष्ट केलें. नंतर इंद्रानें एवढ्या दीर्घ प्रयत्‍नानें व अति श्रमानें साधलेली विद्या फलद्रुप होण्यासाठीं काहीं तरी तोड काढावी अशी देवदिकांनीम विनंति करून रदबदली केली मग नाथ म्हणाले, इंद्रानें बारा वर्षे तपश्चर्यें करावी व नाथपंथाचा छळ करूं नये, म्हणजे त्यास ती फलद्र्प होईल. असा उःशाप देऊन विमानारुढ होऊन सर्व नाथ पृथ्वीवर आले व तीर्थयात्रा करूं लागले. या वेळीं मच्छिंद्रनाथानें किलोतलेस विचारुन मीननाथासहि समागमें घेतलें होतें. मैनावतीस हेळापट्टाणास पोंचविलें मीननाथाचें सिद्ध शिष्य तीन झाले. त्या सर्व नाथांची फटाफूट होऊन ते तीर्थयात्रा करीत फिरूं लागले.

इंद्रानें सह्याद्री पर्वतावर बारा वर्षें तपश्चर्या केली. मंत्रयोगाच्या वेळेस तो जें पाणी सोडी त्या उदकांचा प्रवाह वाहं लागून तो भीमरथीस मिळाला. त्या ओघास इंद्रायणी असें नाव पडलें . या प्रमाणें तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला.

नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करित होते. शके सत्राशें दहापर्यंत ते प्रकटरूपानें फिरत होते. नंतर गुप्त झाले. एका मठीमध्यें कानिफा राहिला. त्याच्याजवळ पण वरच्या बाजुनें मच्छिंद्रनाथ ज्याच्या बायबा असें म्हणतात तो राहिला. जालंदनाथास जानपीर म्हणतात, तो गर्भगिरोवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ त्यासच गैरीपीर म्हणतात. वडवाळेस नागनाथ व रेवणनाथ वीटगांवीं राहिला चरपटीनाथ, चौरंगीनाथ व अंडबंगी नाथ गुप्तरुपानें अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत. भर्तरी ( भर्तृहरि ) पाताळीं राहिला. मीननाथानें स्वर्गास जाऊन वास केला. गिरिनारपर्वतीं श्रीदत्तात्रेयाच्या आश्रमांत गोरक्षनाथ राहिला. गोपीचंद्र व धर्मनाथ हे वैकुंठास गेले. मग विष्णुनें विमान पाठवुन मैनावतीस वैकुंठास नेलें. चौर्‍यांयशीं सिद्धांपासुन नाथपंथ भरभराटीस आला.

आतां नवनाथानें चरित्र संपलें असें सांगुन मालुकवि म्हणतात. गोरक्षनाथाचा या ग्रंथाविषयीं असा अभिप्राय आहे कीं, यास जो कोणी असल्या मानील किंवा त्याची निंदा करील तो विघ्नसंतोषी इहपरलोकीं सुखी न राहतां त्याचा निर्वश होऊन तो शेवटी नरकांत पडेल. हा श्रीवनाथभक्ति कथासागर ग्रंथ शके सत्राशें एकेचाळीस, प्रमाथीनामसंवत्सरीं ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस मालुकवीनें श्रोत्यांस सुखरुप ठेवण्यासाठीं व त्यांचे हेतु परिपूर्ण होण्यासाठीं श्रीदत्तात्रेयाची व नवनाथांची प्रार्थना करून संपविला.

N/A

References : N/A
Last Updated : February 24, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP