श्रीगणेशाय नमः
जयजयाजी रघूत्तमा ॥ आराध्य होसी प्लवंगमां ॥ जटायूनामी विहंगमा ॥ मुक्तिदाता रक्षक तूं ॥१॥
तरी आतां कथाप्रसंगा ॥ पुढें बोलवी नवरस प्रसंगा ॥ जेणें ऐकूनि श्रोतये अंगा ॥ अनुभवतील महाराजा ॥२॥
मागिले अध्यायीं करविलें बोलणें ॥ मच्छिंद्राचें भूमंडळीं शरीर आणून ॥ वीरभद्र मारुनि केला भस्म ॥ दानवांसह रणांगणीं ॥३॥
तरी आतां पुढें कथा ॥ वीरभद्र निमाल्या उमाकांता ॥ सहज गुण आठवोनि चित्ता ॥ पुत्रमोहें वेष्टिला ॥४॥
मुख वाळूनि झालें म्लान ॥ अश्रु लोटले दोन्ही नयनीं ॥ परी न बोले कांहीं जटा वेष्टूनी ॥ पुत्र मोहें स्फुंदतसे ॥५॥
मनांत म्हणे हा हा पुत्रा ॥ परता धैर्या लावण्यगात्रा ॥ विद्यासंपन्न सर्वअस्त्रा ॥ जाणता एक होतास कीं ॥६॥
अहा कैसा दैवहीन हातींचें गेलें पुत्रनिधान ॥ काय असोनि अपार गण ॥ तया सरसी न पवती ॥७॥
एक इंदु खगीं नसतां ॥ अपार उडुगण असोनि वृथा ॥ तेवीं वीरभद्राविण सर्वथा ॥ हीन तेजें वाटती ॥८॥
कीं मयूरा सर्वागीं डोळे ॥ परी देखण्याचे मंदावले बुबुळे ॥ तेवीं वीरभद्राविण गण विकळे ॥ सर्व मातें भासती पैं ॥९॥
कीं गात्रें सकळ चांगुलपणीं ॥ अंगी मिरविला लावण्यखाणी ॥ परी एक घ्राण गेलें सांडोनी ॥ सकळ विकळ ती होती ॥१०॥
तैसें माझ्या वीरभद्राविण ॥ सकळ विकळ दिसती गण ॥ अहा वीरभद्र माझा प्राण ॥ परत्र कैसा गेला सोडोनी ॥११॥
ऐसें म्हणूनि मनींच्या मनांत ॥ पंचानन आरंबळत ॥ तीं चिन्हें जाणूनि गोरक्षनाथ ॥ चित्तामाजी कळवळला ॥१२॥
मनांत म्हणे बद्रिकाश्रमातें ॥ मातें बैसविलें तया गुरुनाथें ॥ तै रात्रंदिवस उमाकांत ॥ मजसाठीं श्रम पावे ॥१३॥
मायेसमान पाळूनि लळा ॥ माता रक्षी जेवीं बाळा ॥ तरी ऐसा स्वामी चित्तकोंवळा ॥ पुत्रमोहें वेष्टिला असे ॥१४॥
अहा तरी म्यां उपकार ॥ काय हो केला अनिवार ॥ ऐसा स्वामी शिणविला हर ॥ दुःख तुंबळ देऊनियां ॥१५॥
ऐसें म्हणून स्वचित्तांत ॥ पायां लागे गोरक्षनाथ ॥ म्हणे पुत्रदुःखावरी मोहवेष्टित ॥ चित्त तुमचे झालें कीं ॥१६॥
तरी वीरभद्रातें आतां उठवीन ॥ परी अस्थि आणाव्या ओळखून ॥ येथें राक्षसांचें झालें कंदन ॥ राक्षसअस्थी मिरविती ॥१७॥
त्यांत वीरभद्राच्या अस्थी ॥ मिसळल्या कृपामूर्ती ॥ म्हणूनि संशय वाटें चित्तीं ॥ वीरभद्रातें उठवावया ॥१८॥
जरी ऐसिया मिसळल्या नाथा ॥ संजीवनीप्रयोग जपतां ॥ सकळ राक्षस उठतील मागुतां ॥ म्हणोनि चिंता व्यापिली ॥१९॥
ऐसें बोलतां गोरक्षजती ॥ नीलग्रीव म्हणे कृपामूर्ती ॥ वीरभद्राच्या सकळ अस्थी ॥ ओळखून काढीन मी ॥२०॥
माझे गण आहेत जितुले ॥ ते आसनीं भोजनीं भले ॥ मम नामीं रत झाले ॥ कायावाचाबुद्धीनें ॥२१॥
तरी चित्तबुद्धिअंतःकरणीं ॥ वीरभद्र नामीं गेला वेष्टोनी ॥ जागृत सुषुप्त स्वप्नीं ॥ वेष्टिला असे मम नामीं ॥२२॥
ऐसें बोलूनि शंकर ॥ रणभूमीत करी संचार ॥ मग तेथें अस्थि उचलूनि सत्वर ॥ कर्णी आपुल्या लावीतसे ॥२३॥
ऐशियेपरी शोध करितां ॥ वीरभद्र जेथें पडला होता ॥ तेथे जाऊनि अवचट हस्ता ॥ अस्थी उचली तयाच्या ॥२४॥
अस्थी उचलोनि कर्णी लावीत ॥ तंव त्या अस्थी मंद शब्द करीत ॥ शिव शिव म्हणोनि शब्द येत ॥ शिवकर्णी तत्त्वतां ॥२५॥
मग त्या अस्थी पंचानने ॥ गोळा केल्या परीक्षेनें ॥ जेथें होता गोरक्षनंदन ॥ तेथें आणूनि ठेविल्या ॥२६॥
मग तो विद्यार्णवकेसरी ॥ भस्मचिमुटी कवळूनि करीं ॥ वीरभद्रनामीं साचोकारीं ॥ संजीवनी स्मरला असे ॥२७॥
होतां संजीवनीचा प्रयोग पूर्ण ॥ वीरभद्र उठला देह धरुन ॥ म्हणे माजें धनुष्यबाण ॥ कोठें आहे सांग कीं ॥२८॥
व्यापले अपार राक्षस कोटी ॥ तितुके मारीन आतां जेठी ॥ उपरी गोरक्षा यमपुरी शेवटीं ॥ प्रतापानें दावीन कीं ॥२९॥
ऐसें वीरभद्र बोले वचन ॥ करीं धरीं पंचानन ॥ म्हणे बापा आतां शीण ॥ व्यर्थ बोलाचा न करी ॥३०॥
मग हदयी कवळूनि त्यातें ॥ सांगितला सकळ वृत्तांत ॥ उपरी म्हणे उमाकांत ॥ स्नेह नाथीं धरावा ॥३१॥
मग गोरक्ष आणि वीरभद्रजेठी ॥ उभयतांची करविली भेटी ॥ उपरी म्हणे स्नेह पोटीं ॥ उभयतांनीं रक्षावा ॥३२॥
उपरी बहात्तर कोटी चौर्यांयशीं लक्ष ॥ शिवगण प्रतापी महादक्ष ॥ ते वायुचक्रीं असतां प्रत्यक्ष ॥ उतरी गोरक्षक तयांसी ॥३३॥
मग सकळ समुदाय एक करुन ॥ जाते झाले गोरक्ष नमून ॥ येरीकडे राव त्रिविक्रम ॥ राज्यवैभवीं गुंतला ॥३४॥
गोरक्ष सकळ शवमांदुस ॥ रक्षन करी शिवालयास ॥ तों त्रिविक्रमराव दर्शनास ॥ अकस्मात पातला ॥३५॥
राव देखतां गोरक्षासी ॥ प्रेमें मिठी घाली ग्रीवेसी ॥ निकट बैसवोनि त्यासी ॥ सर्व वृत्तांत विचारी ॥३६॥
मग शवाचा जो झाला वृत्तांत ॥ तो सकळ त्यातें केला श्रुत ॥ होतांचि तळमळ चित्तांत ॥ मच्छिंद्राच्या लागली ॥३७॥
मग गोरक्षासी बोले वचन ॥ धैर्य धरावें कांहीं दिन ॥ धर्मनाथातें राज्यासन ॥ देऊनि येतो लगबगें ॥३८॥
ऐसें बोलूनि प्रजानाथ ॥ स्वगृहीं आला त्वरितात्वरित ॥ बोला वोनि मत्रिकांतें ॥ विचारातें घडविलें ॥३९॥
मग पाहूनि उत्तम दिन ॥ महीचे राव घेतले बोलावून ॥ राज्यपदीं स्वहस्तें अभिषेक करवून ॥ धर्मराज स्थापिला ॥४०॥
याचकांसी देऊनि अपार धनें ॥ आणि भूपांलागीं दिधली भूषणें ॥ परम स्नेहें बोळवून ॥ बंदिजन सोडविले ॥४१॥
यासही लोटला एक मास ॥ राव त्रिविक्रम आपुल्या मंदिरीं खास ॥ देह सांडूनि शिवालयास ॥ तत्क्षणीं पातला ॥४२॥
येरीकडे रेवती सती ॥ सहज गेली राजसदनाप्रती ॥ म्हणे महाराजा हे नृपती ॥ अजूनि कां हो निजलांत ॥४३॥
परी तीतें न बोले कांहीं ॥ मग हालवोनि पाहे स्वहस्तप्रवाहीं ॥ तंव तें प्रेत मिरवले देहीं ॥ पाहोनि शोका वहिवाटे ॥४४॥
रेवती शोक करितां तुंबळ ॥ ऐकूनि धांवला धर्मनाथ बाळ ॥ मंत्री प्रजा सेवक सकळ ॥ हंबरडा बहु ऊठला ॥४५॥
तो वृत्तांत शिवालयासी ॥ जनमुखें आला गोरक्षापाशीं ॥ मग सिद्ध करुनि भस्मचिमुटीसी ॥ संजीवनी प्रयोजी ॥४६॥
अस्थी मांस प्रयोजितां ॥ देह संगीन झाला त्वरित ॥ संगीन होतां मच्छिंद्रनाथा ॥ समय पावला रिघावया ॥४७॥
मच्छिंद्र देहीं संचार होतां ॥ उठूनि बैसला क्षण न लागतां ॥ येरीकडे रावप्रेत ॥ स्मशानवाटिके आणिलें ॥४८॥
प्रेत आणिलें स्मशानी ॥ त्रिवर्ग पहावया निघाले मुनी ॥ तो रेवतीनें दृष्टीं पाहोनी ॥ शोध आणविला तयाचा ॥४९॥
करुनि रायाचें दहन ॥ स्नाना गेले सकळ जन ॥ परी धर्मराज दारुण ॥ शोक करी अदभुत पैं ॥५०॥
शोक करी तरी कैसा ॥ सोडूनि प्राणाचा भरंवसा ॥ लोक बोधितां न ये भासा ॥ आरंबळत असे आक्रोशें ॥५१॥
उत्तरक्रिया झालिया उपरी ॥ न राहे रुदन तयाचे परी ॥ अन्नपाणी वर्जोनि शरीरी ॥ प्रान देऊं म्हणतसे ॥५२॥
मग मायेचा मोह अत्यंत ॥ त्यातें नेऊनि परम एकांतात ॥ म्हणे बाळा शोक कां व्यर्थ ॥ पितयाकरितां करितोसी ॥५३॥
तरी आतां बाळ तुझा पितां ॥ चिरंजीव आहे महीवरुता ॥ प्रत्यक्ष जाऊनि शिवालयीं आतां ॥ निजदृष्टी विलोकी ॥५४॥
तव पित्याचें मच्छिंद्र नाम ॥ चिरंजीव आहे उत्तमोत्तम ॥ ऐसे ऐकतां राजोत्तम ॥ पिसा कैसा म्हणतसे ॥५५॥
मग प्रवेशादि सकळ वार्ता ॥ सांगती झाली निजसुत ॥ धर्मराया ऐकूनि तत्त्वतां ॥ तुष्ट झाला शरीरातें ॥५६॥
मग शीघ्र घेऊनि कटकभार ॥ शिवालयीं आला अति सत्वर ॥ भावें नमुनि नाथ मच्छिंद्र ॥ शिबिकासनीं वाहिला ॥५७॥
नेऊनि आपले राजभवनी ॥ सेवा करीतसे प्रीतीकरुनी ॥ मग तो एक संवत्सर येथें राहुनी ॥ पुढें तीर्था चालिला ॥५८॥
चालिला परी धर्मनाथ ॥ परम झाला शोकाकुलित ॥ म्हणें ताता तव सागातें ॥ मीही तीर्था येतो कीं ॥५९॥
याउपरी बोले मच्छिंद्रनाथ ॥ बाळा द्वादश वर्षी येऊं येथें ॥ मग जोग देऊ गोरक्षहातें ॥ तूतें सवें नेईन मी ॥६०॥
आतां रेवतीची सेवा करुन ॥ भोगीं आपुलें राज्यासन जेथें रेवती तेथें प्राण ॥ माझा असे हो बाळका ॥६१॥
तिची सेवा केलियानें ॥ संतुष्ट आहे माझें मन ॥ ऐसें करुनि समाधान ॥ त्रिवर्ग तेथूनि निधाले ॥६२॥
मग तीर्थाटनी भ्रमण करिती ॥ येऊनि पोहोंचले गोदातटीं ॥ धामनगर काननपुटीं ॥ येऊनियां पोहोंचले ॥६३॥
ग्रामनाम ऐकूनि कानीं ॥ गोरक्षाचे अंतःकरणीं ॥ स्मरण झालें कृषीधर्मी ॥ माणिकनामी कृषांचे ॥६४॥
मम मच्छिंद्रातें सांगे समस्त ॥ अडबंग भेटला एक तेथें ॥ मी प्रसन्न होतां आपुल्या चित्तें ॥ कांही वर न वे तो ॥६५॥
मग मुळापासूनि तयाचें कथन ॥ मच्छिंद्रा केलें निवेदन ॥ मच्छिंद्रें ऐकूनि वर्तमान ॥ म्हणें पुनः आतां पाहावा ॥६६॥
मग शेतसुमार धरुनि चाली ॥ चालत आले त्रिवर्ग पाउलीं ॥ तों माणीकनामें निश्चयबळी ॥ काष्ठासमान देखिला ॥६७॥
मौळीं विराजे वेष्टन ॥ बाबर्या रुळती महीकारण ॥ नखें जुळमट गेलीं होऊन ॥ मांस दिसेना तिळभरी ॥६८॥
अस्थी त्वचा झालीं एक ॥ पोट झालें पृष्ठीं स्थायिक ॥ दृष्टी लावूनियां देख ॥ मंत्रजप करीतसे ॥६९॥
ऐसी पाहतां तपाकृती ॥ गोरक्ष धन्य म्हणे चित्तीं ॥ मग नमूनि मच्छिंद्राप्रती ॥ अडबंग हाचि म्हणतसे ॥७०॥
मग निकट येऊनि त्रिवर्ग जण ॥ बोलते झाले तयाकारण ॥ म्हणती आतां तपोधन ॥ पूर्ण तप करी कां रे ॥७१॥
येरु वचन त्या देत ॥ तुमचें यांत काय जात ॥ धरुनि आपला शुद्ध पंथ ॥ गमन करावें येथूनियां ॥७२॥
जें जें बोले मच्छिंद्रनाथ ॥ तया वांकडेपणें उत्तर देत ॥ मग गोरक्ष म्हणे मच्छिंद्रातें ॥ हा अडबंग असे महाराजा ॥७३॥
तरी याचें आतां हित ॥ युक्तीनें करितो बैसा स्वस्थ ॥ मग तरुच्छायेनिकट तेथ ॥ मच्छिंद्र जाऊनि बैसला ॥७४॥
चौरंगा आणि मच्छिंद्रनाथ ॥ गोरक्षाची मौज पाहत ॥ गोरक्ष जाऊनि पैं तेथ ॥ अहा अहा म्हणतसे ॥७५॥
अहा म्हणोनि वाणी ॥ म्हणे ऐसा महीतें दुजा स्वामी ॥ आम्हीं देखिला नाहीं नयनीं ॥ तपोनिधि आगळा हो ॥७६॥
समुद्रवलयांकित ॥ पृथिवी पाहिली आहे समस्त ॥ परी ऐसा तपोनाथ ॥ देखिला नाहीं निजदृष्टीं ॥७७॥
तरी ऐसा स्वामी योगमुनी ॥ याचा अनुग्रह घ्यावा कोणीं ॥ गुरु झालिया ऐसा प्राणी ॥ दैव अपार मिरवतसे ॥७८॥
तरी आतां असो कैसें ॥ गुरु करावा आपणास ॥ ऐसें बोले त्यास ॥ प्रज्ञावंत महाराजा ॥७९॥
म्हणे स्वामी कृपा करुन ॥ मज अनुग्रही गुरु होऊन ॥ येरु बोलणें ऐकोन ॥ अडबंग म्हणे तयासी ॥८०॥
बेटा येवढा थोर झाला ॥ अद्यापि अक्कल नाहीं त्याला ॥ गुरु करुं म्हणतो आम्हांला ॥ मूर्खपणीं आगळा हा ॥८१॥
मग मजला गुरु करुं पाहशी ॥ तरी तूंचि कां बेट्या होईनासी मजसी ॥ ऐसें म्हणोनि स्वमुखासी ॥ तया कर्णी लावीतसे ॥८२॥
कर्ण लागतां गोरक्षाननीं ॥ सज्ञानमंत्र ब्रह्मखाणी ॥ परम कृपें कर्णी फुंकूनी ॥ सनाथ केला क्षणार्धे ॥८३॥
मंत्र पडतां कर्णपुटीं ॥ त्रैलोक्याची आली दृष्टी ॥ स्थावरजंगम एकथाटीं ॥ ब्रह्मरुप भासलें ॥८४॥
मग अर्थाअर्थी सकल ज्ञान ॥ झाला बृहस्पतिसमान ॥ मग सांडूनि आपुलें तपःसाधन ॥ गोरक्षचरणीं लागला ॥८५॥
मग गोरक्ष भस्मशक्तिप्रयोग ॥ प्रयोगूनि भाळीं चर्ची सांग ॥ तेणेंकरुनि सर्वाग ॥ शक्तिवान मिरवलें ॥८६॥
मग धरुनि शीघ्र तयाचा हस्त ॥ वृक्षाखालीं आणी नाथ ॥ म्हणे महाराजा कृपावंत ॥ अडबंग हाचि ओळखावा ॥८७॥
हंसूनि बोले मच्छिंद्रमुनी ॥ या अडबंगातें अडभंग नामीं ॥ पाचारावें सर्व येथोनी ॥ साजूकपणी या वाटतसे ॥८८॥
मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यास ॥ नाथदीक्षा दीधली खास ॥ मग शीघ्र घेऊनि व्यासंगास ॥ तीर्थालागीं जातसे ॥८९॥
मार्गी जातां सद्विद्येसी ॥ सकळ तेव्हां पूर्ण अभ्यासी ॥ आपुल्या समान शस्त्रअस्त्रेंसीं ॥ अडभंग तो मिरवला ॥९०॥
असो ऐसे चारी जण ॥ द्वादश वर्षे तीर्थाटन ॥ करुनि पुनः प्रयागकारण ॥ चारी सूर्य पातले ॥९१॥
येरीकडे धर्मरायासी ॥ पुत्र झाला सतेजराशी ॥ वडिलांचें नांव ठेविलें त्यासी ॥ त्रिविक्रम म्हणोनियां ॥९२॥
चौघे प्राज्ञिक ग्रामीं येतां ॥ श्रुत झालें धर्मनाथा ॥ मग कटकभारेसीं शिबिके तत्त्वतां ॥ बैसवोनि आणिलें सदनासी ॥९३॥
मग धृति वृत्ति भक्ति सघन ॥ करुनि तोषविलें मच्छिंद्रमन ॥ मग त्रिविक्रमसुता राज्यीं स्थापून ॥ दीक्षा घेतली योगाची ॥९४॥
माघमासीं पुण्यतिथी ॥ द्वितीयेसी धर्मराजाची बीज म्हणती ॥ तें दिवशीं गोरक्ष जती ॥ अनुग्रह देत तयातें ॥९५॥
या उपरी देव मिळवूनि स्वर्गीचे ॥ आणि प्रजालोक त्या ग्रामीचे ॥ मेळवूनि चोज अनुग्रहाचें ॥ मोहळें रचिलीं अपार ॥९६॥
अनुग्रह झाल्यावरती ॥ सकळ बैसोनि एकपंक्तीं ॥ गोरक्ष कवळ घेऊनि हातीं ॥ सर्वामुखीं ओपीतसे ॥९७॥
मग तो आनंद परम जेठी ॥ पाहूनि धांवले सुरवर थाटीं ॥ तेही प्रसाद पावोनि शेवटीं ॥ तुष्ट चित्तीं मिरवले ॥९८॥
मिरवले परी करिती भाषण ॥ ऐसाचि प्रसाद जन्मोजन्म ॥ प्रतिसंवत्सरीं असावा पूर्ण ॥ इच्छेलागीं वाटतसे ॥९९॥
ऐसें बोलतां सुरवर सकळ ॥ ऐकोनि बोले तपोबळ ॥ माझें नाम घेऊनि केवळ ॥ अर्पा जगा प्रतिवर्षी ॥१००॥
धर्मराजाची बीज म्हणवूनी ॥ उत्सव करावा तुम्ही सघन ॥ याचि नीती कुमारा सांगोनि ॥ कवळों पाहे जगासी ॥१॥
मंत्र स्फुरला म्हणूनि स्फुरमाण ॥ सकळ तुम्ही बोला वचन ॥ अंबलिपणें शक्तीसमान ॥ सदैव करा उत्सवो ॥२॥
ऐसें महाराजा गोरक्ष बोलतां ॥ मानवलें सुरवरांच्या चित्ता ॥ मग प्रतिवर्षी आनंदभरिता ॥ महाउत्सव करीत ॥३॥
तैंपासूनि सहजासहज ॥ जगीं मिरवतसे धर्मनाथाची बीज ॥ हें वृत्त आचरल्या महाराजा ॥ तुष्ट होतसे गोरक्ष ॥४॥
पूर्वी किमयागार ग्रंथांत ॥ स्वयें बोलिला गोरक्षनाथ ॥ कीं बीजेचें जो आचरील व्रत ॥ शक्तीमान आपुल्या ॥५॥
तयाचे गृहीं दोषदरिद्र ॥ रोगभोगादि विघ्नेंद्र ॥ स्वप्नामाजीं संसार अभद्र ॥ पाहणार नाहीं निजदृष्टीं ॥६॥
प्रत्यक्ष रमा सुखें सुरगणीं ॥ त्या गृहीं होईल गृहवासिनी ॥ मग दोषदरिद्र तया अवनी ॥ स्पर्शावया येईना ॥७॥
असो महात्म्य वदावें किती ॥ ते प्राज्ञिक पावले सुखसंपत्ती ॥ जैसी कामना वेधेल चित्तीं ॥ तोचि अर्थ पावेल ॥८॥
ऐसा गोरक्ष तयाकारण ॥ बोलिला आहे मूळग्रंथीं वचन ॥ तैसें येथें केलें लेखन ॥ विश्वासातें वरा कीं ॥९॥
असो तेथें महोत्साह करुन ॥ धर्मनाथा नाथदीक्षा देऊन ॥ तेथोनि निघाले पांच जण ॥ नरशार्दूळ ते ऐका ॥११०॥
नाना तीर्थे करितां महीसी ॥ अभ्यासिलें सद्विद्येसी ॥ शाबरी सहस्त्र अस्त्रासीं ॥ प्रवीण केला महाराजा ॥११॥
मग शेवटीं बद्रिकाश्रमीं जाऊन ॥ दृश्य केला उमारमण ॥ धर्मराज तया स्वाधीन ॥ तपालागीं बैसविला ॥१२॥
द्वादश वर्षाचा केला नेम ॥ तपा बैसला नाथ धर्म ॥ येरु तेथूनि चौघे जण ॥ तीर्थालागीं चालिले ॥१३॥
द्वादश संवत्सर तीर्थे करुन ॥ पुनः पाहिला बद्रिकाश्रम ॥ मग तेथें मावंदे अति दुर्गम ॥ बद्रिकाश्रमीं मांडिलें ॥१४॥
सकळ देव सुरवरांसहित ॥ पाचारुनि घेतले तेथ ॥ मावंदें झाल्या पूर्ण वरातें ॥ देऊनि देव गेले पैं ॥१५॥
मग तो धर्मराज सवें घेऊन ॥ फेरी करिती तीर्थाटन ॥ आतां पुढें ऐंका कथन ॥ रेवणसिद्धनाथाचें ॥१६॥
पूर्वी अठ्ठयायशीं सहस्त्र ऋषी ॥ झाले आहेत विधिवीर्यासी ॥ त्याचि समयीं रेत महीसी ॥ रेवातीरी पडियेलें ॥१७॥
रेवातीरी तेंही रेवेंत ॥ रेत पडिलें अकस्मात ॥ चमस नारायण संचार करुनि त्यांत ॥ देहद्वारीं मिरवला ॥१८॥
बाळतनू अति सुकुमार ॥ बालार्ककिरणीं मनोहर ॥ उकरडां लोळे महीवर ॥ ठेहेंठेंहें म्हणोनियां ॥१९॥
तों त्या काननीं कृषी एक ॥ उत्तम नाम सहनसारुक ॥ तो घट घेऊनि न्यायवा उदक ॥ रेवातीरा पातला ॥१२०॥
पातला परी अकस्मात ॥ येता झाला बाळ जेथ ॥ सहज चालीं पुढें चालत ॥ बाळ दृष्टीं देखिलें ॥२१॥
बाळ परम अति सुकुमार ॥ कांति कर्दळीगाभाभर ॥ पाहूनि तयाचें अंतर ॥ विव्हळ मोहें झाला असे ॥२२॥
मग घट ठेवूनि महीलागीं ॥ धांवोनि तांतडीं उचली वेगीं ॥ मोहें कवळूनि हदयभागीं ॥ अति स्नेहें धरिलेसें ॥२३॥
आधींच सहनसारुक नामानें ॥ तेथें दयेसी काय उणें ॥ आवडीनें करुनि मुखचुंबन ॥ कुर्वाळीत प्रीतीनें ॥२४॥
मग रिक्तपट भरुनि आडीं ॥ ग्रामांत आला हरुषापाडी ॥ सदनीं प्रवेशूनि आवडीं ॥ कांतेलागीं बोलतसे ॥२५॥
म्हणे जिवलगे आजिचा दिन ॥ मातें झाला धातुहेस ॥ तरी शिवलतेलागीं द्रुम ॥ कुंभापरी मिरवला ॥२६॥
सहज गेलों उदकातें ॥ रेवातीरीं वाळवंटींत ॥ आपणा ईश्वरें दिधला सुत ॥ वंशावळी मिरवावया ॥२७॥
ऐसी ऐकतां कांता गोष्टी ॥ म्हणे कोठें मज दाव दृष्टीं ॥ तंव तो काढूनि वस्त्रपुटीं ॥ करसंपुटीं देतसे ॥२८॥
तंव ती कांता उत्तमनामी ॥ धार्मिकबुद्धी संसारधामीं ॥ देखतां देहदर्मी ॥ हर्शसिंधु लोटला ॥२९॥
जैसा पूर्ण चंद्र दृष्टीं ॥ दृश्य होतां उदधिपोटीं आनंद भरुनि तोयदाटीं ॥ उचंबळा दाटतसे ॥१३०॥
कीं दरिद्रियासी मांदुस होय दर्शन ॥ मग तयाचा आनंद वर्णील कोण ॥ तेवीं उत्तम मनोधर्म ॥ आनंददरीं मिरवितसे ॥३१॥
बाळ धरुनि हदयसंपुटीं ॥ चुंबन घेत स्नेहाचे पोटीं ॥ मग तैलउदकीं न्हाणूनि शेवटीं ॥ पालखातें घातले ॥३२॥
तियेचें तान्हुलें होतें घरीं ॥ निजविला योगी तयाशेजारीं ॥ स्तनपान केलियाउपरी ॥ बाळ निजे पालखीं ॥३३॥
असो ऐसे नित्यानित्य ॥ बाळ संगोपी ममतें ॥ रेवणनाम ठेवोनि त्यातें ॥ मोहेंकरुनि सांभाळी ॥३४॥
रेवातीरीं बाळ रेवेंत ॥ सांपडलें म्हणूनि त्यातें ॥ रेवणनाम साजुकवंत ॥ सहनसारुक ठेवोनियां ॥३५॥
असो रेवणनामियाचें संगोपन ॥ करिता उभयतां पालन ॥ ऐसे लोटतां बहुत दिन ॥ प्रपंचरहाटी करितसे ॥३६॥
द्वादशसंवत्सर प्रपंचराहटी ॥ कृषिकर्मविद्यापाठीं ॥ पूर्ण झाला आवुता जेठी ॥ पित्याहूनि आगळा ॥३७॥
नांगर वरखरली पेरण ॥ काकपक्ष्यादि करी रक्षण ॥ ऐसा कृषिकर्मी निपुण ॥ रेवणनाथ झाला असे ॥३८॥
तो कोणे एके दिवशीं ॥ उठुनि मागिले प्रहरनिशीं ॥ वृषभ सोडून काननासी ॥ चारावयासी चालिला ॥३९॥
चांदणें पडलें असें सुदृढ ॥ दृश्य होतसें महीची वाट ॥ सुदृढपणें गोचर वात ॥ निजचक्षूतें होतसे ॥१४०॥
दादा म्हणूनि वृषभापाठीं ॥ हांकीत चालिला आहे जेठी ॥ तों अनुसूयाशक्तिकारत्न वाटीं ॥ पुढें झालें अकस्मात ॥४१॥
परी तो महाराजा अत्रिनंदन ॥ पवनवेगें तयाचें गमन ॥ नेमिलें ठायीं करुनि स्नान ॥ गिरनार पर्वती जातसे ॥४२॥
पायीं खडावा सुशोभित ॥ एक अंचल अंगीं शोभत ॥ शुभ्र कौपीन विराजित ॥ कंठतटा वेष्टूनी ॥४३॥
मौळी वेष्टिल्या असती जटा ॥ दाही मिशा रंग पिंगटा ॥ सकळ ज्ञानियांचा वरिष्ठा ॥ कनककांति शोभतसे ॥४४॥
ऐसा महाराजा अत्रिनंदन ॥ जो त्रितयदेवांचा अवतार पूर्ण ॥ अति लगबगें करीत गमन ॥ पुढील नेम मानुनियां ॥४५॥
तों मार्गावरी अकस्मात ॥ वृषभगमन देखत ॥ वृषभाआड रेवणनाथ ॥ दृष्टी नाहीं आतळला ॥४६॥
मानवगती तेणे देखोन ॥ पुढें आला अत्रिनंदन ॥ सहजस्थिती वृषभामागून ॥ पाऊलें ठेवी चालावया ॥४७॥
तों सर्वांमागील वृषभ पूर्ण ॥ शरीरें मिरवे शीथलपण ॥ तयाआड नाथ रेवण ॥ बाळतनू चालतसे ॥४८॥
तों वृषभामागें येत दत्त ॥ वृषभ बुजोनि पुढें पळत ॥ मागें अंतरतां रेवणनाथ ॥ त्यावरी दत्त आदळला ॥४९॥
उभयदेहीं कामपणी ॥ ऐक्य झाली देहधरणी ॥ परी स्पर्श होतां अंतःकरणी ॥ ज्ञानदीप उजळला ॥१५०॥
विमूढपणीं कृषिकर्मात ॥ अज्ञान सर्वापरी वर्तत ॥ सदा बैसणें अरण्यांत ॥ अबुद्धीपणें वर्ततसे ॥५१॥
परी दत्तात्रेयाचा स्पर्श होतां ॥ पूर्वजन्मातें झाला देखता ॥ चित्तीं म्हणे मी महीवर असतां ॥ कवण स्थिती पावलों ॥५२॥
आहे मी पूर्वीचा नारायण प्रकाम ॥ परम प्राज्ञिक चमसनाम ॥ ऐसे असूनि कृषिकर्म ॥ येथें करीत बैसलों ॥५३॥
वंद्य असतां तिही लोकांत ॥ आतां कोणी ओळखीना मातें ॥ सदा काननीं झालों रत ॥ अहितकामीं प्रपंच ॥५४॥
ऐसें देहीं झालिया ज्ञान ॥ मग स्तब्ध धरुनि राहे मौन ॥ परी धडक बैसतां अत्रिनंदन ॥ कोण तूं ऐसा पुसतसे ॥५५॥
कोण तूं ऐसें पुसतां दत्त ॥ करिता झाला प्रणिपात ॥ म्हणे महाराजा या देहांत ॥ अंश असे तुझा कीं ॥५६॥
तुमचे देहीं त्रिदेवांचे अंश ॥ परी सत्यगुणी जो महापुरुष ॥ तो मी येथें प्रपंचदेहास ॥ परम कष्टें कष्टलों ॥५७॥
तरी आतां क्षेमोदयास ॥ उदित करा जी महापुरुष ॥ सनाथ करुनियां या देहास ॥ महीलागी मिरवावें ॥५८॥
ऐसें म्हणोनि दृढोत्तर चरणीं ॥ मौळी अर्पी प्रेमेंकरुनी ॥ म्हणे मज सनाथ केल्यावांचुनी ॥ कदा न सोडीं तुम्हांतें ॥५९॥
ऐसें वदूनि वाग्वटीं ॥ सदृढपणी देत मिठी ॥ परी आदरें प्रेमपोटीं ॥ दत्तजेठी मिरवला ॥१६०॥
तयाचा पाहूनि भक्तिआदर ॥ सदृढपणीं निश्चयपर ॥ मग कमंडलु ठेवूनि महीवर ॥ मौळी कर स्थापीतसे ॥६१॥
भाळाखालीं घालूनि हात ॥ उठविला रेवणनाथ ॥ मनांत म्हणे हा सनाथ ॥ पूर्वीचाची असे कीं ॥६२॥
हा नावामाजी असे एक ॥ नाथपंथी अवतार दोंदिक ॥ चमसनारायण प्रतापार्क ॥ महीवर विराजला ॥६३॥
तरी आतां यातें सनाथ ॥ करुनि वाढवावा नाथपंथ ॥ कृपें ठेवोनि मौळीं हस्त ॥ केला अंकित आपुला ॥६४॥
कृपें मौळीं ठेविला कर ॥ परी अनुग्रहाचें केलें अंतर ॥ म्हणाल कासयासाठीं उदार ॥ झाला नाहीं अनुग्रहा ॥६५॥
तरी चित्ती योजिता झाला दत्त ॥ भक्तिश्रम यासी घडले नाहींत ॥ तरी कांही देहीं प्रायश्वित्त ॥ घडोनि यावें ययातें ॥६६॥
तरी भक्तिश्रम घडतां सांग ॥ उपदेश मग द्यावा अव्यंग ॥ मग ज्ञानवैराग्याचा मार्ग ॥ ब्रह्मस्थितीं मिरवेल हा ॥६७॥
ऐसें म्हणूनि अनुग्रहारहित ॥ कृपा मौळीं ठेविला हस्त ॥ परी भक्तीलागीं रेवणनाथ ॥ काय करी महाराजा ॥६८॥
एक सिद्धीची कळा त्यातें ॥ सांगता झाला कृपावंत ॥ असतां बीज रोपूनि किंचित् ॥ दृष्टी ठेवील पुढारां ॥६९॥
जैसें अर्भका देऊनि धन ॥ पिता मिरवी व्यवसायाकारण ॥ मग तयाचें पुढें चांगुलपण ॥ निजदृष्टीं पाहतसे ॥१७०॥
किंवा महींत मेळवण ॥ घालूनि पाहती दुग्धाकारण ॥ कीं पत पहातसे देऊनि धन ॥ सावकार कुळातें ॥७१॥
तेवीं सहस्त्रांशेंकरुन ॥ महीमान सिद्धीचें सांगून ॥ तुष्ट केले तयाचें मन ॥ प्रज्ञावंतें महाराजें ॥७२॥
परी ती कळा होतांचि प्राप्त ॥ रेवण झाला आनंदभरित ॥ मग प्रेमें नमूनि अनुसूयासुत ॥ बोळविले तत्क्षणीं ॥७३॥
परी विरह मानूनि चित्तीं ॥ चालता झाला काननाप्रती ॥ परी अंतरला आपुल्या हितीं ॥ निजपदातें पहावया ॥७४॥
जैसें कोंडवळ्य़ा कांजी ॥ देतां भूत होतसे राजी ॥ तैसा अल्पसिद्धीमाजी ॥ तुष्ट झाला तो पुरुष ॥७५॥
परम लाधली होती धणी ॥ परंतु दवडिली अज्ञानपणीं ॥ खापरासाठीं चिंतामणी ॥ सोडूनि दिधला हातींचा ॥७६॥
कीं सुरा लागूनि परम गोड ॥ सोडिली अमृतरसाची चाड ॥ कीं निर्मळपणीं पाहूनि दगड ॥ परिस हातींचा सोडिला ॥७७॥
तेवीं प्रत्यक्ष नाथ रेवण ॥ भुलला सिद्धिप्रकरणेंकरुन ॥ सिद्धिबुद्धि अत्रिनंदन ॥ हातींचा सोडिला नायकें ॥७८॥
असो ऐशी संप्रदाययुक्ती ॥ निःस्पृह पातला आपुल्या शेती ॥ तेथील कथा होईल श्रोतीं ॥ पुढिले अध्यायीं ऐकावी ॥७९॥
धुंडीसुत नरहरिवंशीं ॥ सांगेल तुम्हां श्रोतियांसी ॥ संतकृपें नाम देहासी ॥ मालू ऐसें म्हणती तया ॥१८०॥
स्वति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ चतुस्त्रिंशति अध्याय गोड हा ॥१८१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ३४॥ ओंव्या ॥१८१॥
॥ नवनाथभक्तिसार चतुस्त्रिंशतिअध्याय समाप्त ॥