अर्क (रुई), कण्हेर, बिल्व व बक या चार जातीच्या पुष्पांचा सुगंध शंकरास प्रिय आहे. पांढर्या रुईच्या फुलाने शंकराची पूजा केली असता १० सुवर्णाच्या दानाचे फळ मिळते; अर्क पुष्पापेक्षा बकपुष्प सहस्त्रपट प्रिय आहे. याचप्रमाणे धोत्रा, शमीपुष्प, द्रोणपुष्प व निळे कमळ ही उत्तरोत्तर एकापेक्षा एक सहस्त्रपटीने प्रिय आहेत. "हे वरानने पार्वति, बिल्वपत्रावाचून हिरे, मोत्ये, पोवळी व रत्ने यांनी माझी पूजा केली तरी ती मी ग्रहण करणार नाही." असे शंकराचे वचन आहे. बिल्वपत्र हे दारिद्र्याचा नाश करून सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे. सहस्त्र निळ्या कमळांची माला शिवास अर्पण केली असता कल्पकोटिसहस्त्रवर्षेपर्यंत शिवपुरात वास घडतो. धत्तूरपुष्पे व बृहतीपुष्पे यांनी पूजा केली असता एक लक्ष गोदानाचे फळ मिळते. पाटला, मंदार, आघाडा, जाई, चाफा, वाळा, तगर, नागकेशर, पुन्नाग, जास्वंद, मोगरी, आंबा, व कर्डईचे फूल ही शिवास प्रिय आहेत. धोत्रा व कदंब यांची पुष्पे शिवास रात्री अर्पण करावीत. मदनरत्न ग्रंथात केतक व कदंब असा पाठ आहे. पुष्पे व पत्रे न मिळाल्यास अन्नादिकाने पूजा करावी. साळीचे तांदूळ, गहू अथवा यव यांनी शंकराची पूजा करावी.