रामभद्र मातृहत्या दोषापासून मुक्त होऊन श्री गजाननाच्या सेवेने परशु अस्त्र व श्री शंकरापासून परशुराम असे नाव प्राप्त करून घेऊन आला ती कथा

सूत - शौनकादि मुनि हो ! रामभद्र पित्याला नमस्कार करून म्हणाला, "मुनिवर्या, मातृहत्या दोषापासून मुक्त होण्याचा मार्ग आपण मला दाखवावा." त्यावर जमदग्नी त्यास म्हणाले. "वत्सा तू गंगा-भगिरथी इत्यादि तीर्थामध्ये स्नान कर व शिवलिंग प्रतिष्ठा करून श्रीशंकराची आराधना कर म्हणजे तुला तुझे इच्छित साध्य होईल." असे म्हणून त्यांनी त्यास शिवमंत्रोपदेश करून आशिर्वाद दिला. पित्याच्या उपदेशाप्रमाणे वागून रामभद्राने श्रीशंकराला प्रसन्न करून घेतले व तो श्रीशंकराबरोबर कैलासास गेला. रामभद्र श्रीशंकराच्या आज्ञेने षण्मुख स्वामीजवळ वेद-वेदांगादि शास्त्रांचे अध्ययन करून, धनुर्वेद-मंत्रयोगादि चौसष्ट कलामध्ये पारंगत झाला व श्री गजाननाची सेवा करून त्याजकडून असाध्य असे परशु शास्त्र संपादन करून घेऊन श्री पार्वती-परमेश्वराकडे आला व त्याने त्यांना नमस्कार केला. रामभद्राच्या भक्तीने श्री परमेश्वर त्यांचेवर प्रसन्न झाले व त्यांनी त्याला "परशुराम" असे नाव ठेवले आणि तुझ्या पराक्रमाची किर्ति सगळीकडे पसरू दे असा त्यास आशिर्वाद देऊन तू तुझ्या माता-पित्यांना भेटून पुनः लवकर इकडे परत ये असे त्यास सांगितले. परशुराम रामाश्रृंग पर्वतावर आला व त्याने आपल्या माता-पित्यांना नमस्कार करून आपण षण्मुख स्वामीकडून धनुर्विद्या, श्री गजाननाकडून इतरास अप्राप्य असे परशु अस्त्र, परमेश्वराकडून "परशुराम" असे नामाभिधान कसे मिळविले हे त्यांना सांगितले. जमदग्नी ऋषि त्याच्या सद्‌भावावर प्रसन्न झाले व त्यांनी त्यास आपल्याजवळ बसवून घेऊन तेथील समस्त ऋषींना श्री परशुरामाने परशु अस्त्र संपादन केल्याची हकिकत सांगून आता त्यांनी निर्भयपणाने आपापली यज्ञयागादि नित्य नैमित्तिक कर्मे करावी असे सांगितले. परशुराम काही दिवस येथे राहिला व परमेश्वरच्या आज्ञेप्रमाणे पुनः परत कैलासास जाऊन पार्वति-परमेश्वराच्या सन्निध राहिला. इकडे लोकैकवीर कार्तवीर्यार्जुन परशुरामाच्या महिम्याने संत्रस्त होऊन कामधेनु कशी वश करून घ्यावी याचा विचार करू लागला.

जमदग्नी-रेणुकादेवीकडून सत्कार करून घेतलेल्या नारदांनी त्यांचा महिमा गात गात कैलास पर्वतावर प्रवेश केला ती कथा

ब्रह्मर्षि नारद भूलोक संचारी होऊन रामश्रृंग पर्वतावर आले व त्यांनी तेथे सतत चाललेल्या यज्ञ-यागादि कर्मात फिरत असलेल्या साधु-सत्पुरुषाचे व योगानुगम्य अशा तपस्याचे दर्शन घेतले. कार्तवीर्यार्जुनाच्या त्रासामुळे येथे यऊन सुखाने राहिलेल्या मुनिजनाचेही क्षेमकुशल स्वतः पाहुन त्या सर्वांचे आश्रयदाते जे जमदग्नी व रेणुकादेवी यांचे आदरातिथ्य स्वीकारून व त्यांचा महिमा गात स्थानाचे महात्म्य पार्वती परमेश्वरांना कळविण्याच्या हेतूने नारद कैलासावर गेले. नारदानी पार्वती परमेश्वरांना त्याचप्रमाणे तेथे विश्रांति घेत असलेल्या परशुरामाला नमस्कार केला आणि ते एकीकडे जाऊन बसले. नारदाचे प्रसन्नमुख अवलोकन करून श्रीशंकरांनी त्यांना विचारले की, "हे त्रिलोक संचारी नारद ऋषि, आपण कोठुन आलात? आपल्या संचारामध्ये आपण एखादी महत्त्वाची गोष्ट पाहिली असल्यास आम्हास सांगावी." त्यावर नारद ऋषि म्हणाले, "हे मृत्युंजया, काय सांगू ? भूलोकावर आश्रम कामधेनु-कल्पवृक्ष त्याचप्रमाणे अनेक तपस्व्यांच्या आश्रमानी, तसेच फळभारांनी समृद्ध अशा अनेक वृक्षांनी, सुगंध देणार्‍या जाईजुई-मल्लिदि पुष्पांनी वहात असलेल्या स्वच्छ अशा जलप्रवाहानी, वेळोवेळी झालेल्या पर्जन्याने आलेल्या कंद-मूलादिनी व धान्याने शोभणार्‍या भू-भागांनी आणि तेथे संतोषाने चरत असणार६या गो-समूहानी प्रति कैलासाप्रमाणे शोभतो आहे त्या रामश्रृंग पर्वताचा महिमा मी कसा वर्णन करू ! येथे रहात असलेल्या सर्व साधु-सत्पुरुषांचे आश्रयदाते जमदग्नी-रेणुकादेवी यांचा सत्कीर्तीचा प्रकाश तर सर्वत्र पसरला आहेच हे तर राहू द्या गुरुवचनभ्रष्ट अशा कार्तवीर्यार्जुनाच्या उपद्रवाने पीडित झालेले कितीतरी मुनिपुंगव आपले प्राण रक्षण व्हावे यासाठी जमदग्नी-रेणुकादेवी यांच्या आश्रयाला येऊन राहिलेले मी प्रत्यक्ष पाहिले आहे. हे शंकरा, पुण्यमार्ग टाकून राज धर्माविरुद्ध साधु-सत्पुरुषांना त्रास देऊन त्यांच्या शापास धनी झालेला कार्तवीर्यार्जुनाचा विनाश काल समीप आला आहे काय असा संदेह माझ्या मनात उद्‌भवला आहे. आणि याचे मर्म हे देवाधिदेवा आपणाशिवाय इतर कोणास अवगत आहे?" असे नारदाचे मार्मिक वचन ऐकून श्री शंकर किंचित हसून म्हणाले, "हे त्रिकालज्ञ ब्रहर्षि, तुमचे मनातील विचार योग्य आहेत यात संदेह नाही हे पहा, येथे कोण बसले आहे तुम्हास माहीत आहे काय ? हा श्री नारायणाचा अवतारी रामभद्र जमदग्नी ऋषींच्या प्रसादाने रेणुकादेवीचा पुत्र म्हणून जन्मास येऊन माझ्या आज्ञेने श्री गजाननाची सेवा करून त्याजपासून परशु अस्त्र संपादन केलेला व आमच्या परशुराम असे नाव मिळवून वीरश्रेष्ठ झालेला हाच त्या दुष्ट कार्तवीर्यार्जुनाचा नाश करून भू-भार हलका करण्यास समर्थ आहे." असे म्हणून मी शंकरानी नारदांना पुढील शुभ सूचना दिली. नारदांनी शंकराचे वचन ऐकून "जगदीशा, दुष्टांचे शासन आणि सुष्टांचे परिपालन करण्यास तूच एकटा समर्थ आहेस म्हणून सर्व लोक तुझे नाम संकीर्तन करतात ते योग्यच आहे." असे म्हणून श्री शंकरास त्यांनी नमस्कार केला व नारायण अवतारी परशुरामाच्या महात्म्याची तारीफ केली. तेव्हा परशुराम नारदांना म्हणाला, "हे नारद महर्षि आपणाकडून स्तुति करून घेण्यास मी योग्य नाही" त्यावर नारद म्हणाले, "परशुरामा, मी जास्त काय सांगू ? तुझा महिमा श्री जगदीशालाच ठाऊक आहे." नंतर नारदांनी शिवपार्वतीस हात जोडून "तुमची विचित्र लीला मला समजली" असे म्हणत अत्यानंदाने हस्त करून व त्यांच्यापुढे गाऊन त्यांना संतुष्ट केले आणि आता माझे कार्य साधण्यासाठी मी कार्तवीर्यार्जुनाकडे जाऊन येतो असे सांगत परमेश्वराचा निरोप घेऊन नारद संचारास निघाले.

नारदांनी महिष्वती नगरीस येऊन कार्तवीर्यार्जुनास कामधेनु आणणेस सांगितली ती कथा

इकडे भूलोक संचार करीत नारद कार्तवीर्यार्जुनाच्या महिष्वती नगरीत आले व त्यांनी कार्तवीर्यार्जुनाची भेट घेतली. कार्तवीर्यार्जुनाने नारदांना उच्चासनावर बसवून त्यांची पाद्यपूजा केली आणि त्रिलोकी-संचारी आपण माझ्याकडे बरेच दिवसांनी आलात असे म्हणाला. आज आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. आपल्या संचारमध्ये आपणा काही दिसून आले असल्यास आपण मला सांगावे अशी त्याने नारदांना विनंती केली. त्यावर नारद म्हणाले, "हे अत्यंत पराक्रमी राजा, तुझी बरोबरी करणारा मी कोणीच कोठे पाहिला नाही. पण या तुझ्या ऐश्वर्यामध्ये एकाच वस्तुची उणीव आहे. ती तू मिळविलीस म्हणजे मात्र या त्रैलोक्यात तुझ्या समान कोणीही होणार नाही. ती वस्तु म्हणजे रामश्रृंग पर्वतावर जमदग्नी ऋषीपाशी असलेली कामधेनु ती प्राप्ती करून घेणे तुझ्यासारख्या वीराला असाध्य आहे काय ? त्यावर अर्जुन म्हणाला, "ते सर्व ठीक आहे. ती कामधेनु वश करून घेण्यासाठी मी कितीही प्रयत्न केले तरी अत्यूग्र अशा जमदग्नी पुढे माझा काहीच उपाय चालेना. तेव्हा ती प्राप्त करून घेण्याचा काही उपाय आपण मला सुचविल्यास आपली तशीच माझीही मनीषा पूर्ण होईल. नारद म्हणाले, "हे अर्जुनी तू सांगतोस ती हकीकत मागची आहे."आता जमदग्नी ऋषी आपल्याजवळील क्रोध देवतेला घालवून देऊन शांत झाला आहे व हे मी प्रत्यक्ष पाहून तुला गुप्तरीतीने कळविणेस आलो आहे. तू बिलकूल भिऊ नकोस निर्भयपणाने तू शिकारीच्या निमित्ताने जा. तेथे गेल्यावर मी सांगितलेल्या हकीकतीची तुला प्रचिती येईल. तू मात्र आता विलंब न करता जा. मी माझ्या संचारास निघतो असे सांगून व आपले कार्य झाले या आनंदात शिवध्यान करीत नारदांनी तेथून प्रयाण केले.

अर्जुनी कामधेनु आणणेस आला पण ते साध्य न झाल्यामुळे त्याने जमदग्नी ऋषींची प्राणहत्या केली ती कथा.

अर्जुनी आपल्याबरोबर बरेचसे धीट शिकारी घेऊन रामशृंग पर्वतावर आला. त्यांच्या कोलाहलाने सर्व पशुपक्षी भयभीत होऊन मृत्यु मृत्यु म्हणत जमदग्नी ऋषींच्या आश्रमात येऊन शिरले. तेथे असलेला ऋषींनी ही भयानक परिस्थिती पाहिली व घाबरे होऊन त्यांनी जमदग्नींना सारे काही सांगितले. त्याबरोबर ऋषींनी त्यांना ’तुम्ही काही घाबरू नका. कोणी एक राजा आपल्या राजधर्माप्रमाणे शिकारीकरिता या वनात आला असावा असे दिसते. थोडे शांत व्हा. सध्यासमय होत आला आहे त्यामुळे तो राजाही बहुतेक इकडे येईल." असे सांगून त्यांनी त्यांची चिंता दूर केली. नंतर थोडावेळ जातो न जातो इतक्यात ऋषींनी म्हटल्याप्रमाणे अर्जुनीचे सेनानायक जमदग्नी ऋषींच्या दर्शनास आले. मुनींनी त्यांची सर्व हकीकत विचारून घेतली व ते त्यास म्हणाले. ’हे नायकहो ! तुम्ही तसाच तुमचा राजाही शिकारीच्या श्रमामुळे क्षुधेने व तृषेने व्याकुळ झालेले असावेत असे दिसते. आम्ही अतिथी सत्कार करणारे आहोत. तुम्ही अनायासे येथवर आल्यामुळे तुमचे आदरातिथ्य करणे हे आमचे मुख्य कर्तव्य आहे म्हणून तुम्ही तुमच्या राजाला कळवून सत्वर येथे येऊन आमचे आदरातिथ्य स्वीकारावे हे ऋषींचे शांतपणाचे बोलणे सेनानायकाने आपल्या राजास कळविले. तेव्हा अर्जुनीस नारदांच्या बोलण्याचा प्रत्यय आला व तो आपल्या नायकास म्हणाला, "बरे आहे. तसेच आपण करू." असे म्हणून राजा व मंत्री वगैरेनी जमदग्नीस नमस्कार केला व तेथे जवळच बसले. जमदग्नी ऋषींनी त्या सर्वांना रेणुकादेवीनि तयार केलेल्या पंचपक्वान्नांचे भोजन घेतले व त्यांना अमूल्य अशी वस्त्राभरणे देऊन त्यांचा यथोचित सत्कारही केला. अर्जुनीने जमदग्नी ऋषींचा महिमा प्रत्यक्षच पाहिला व एवढे वैभव यास कोणापासून प्राप्त झाले असावे याचा मनातल्या मनात विचार करून त्याने जमदग्नींना त्याबद्दल विचारले. जमदग्नी म्हणाले, "महाराज हे पहा या धेनुपासून मला इच्छित वर प्राप्ती होते. ही धेनु मला इंद्राने दान म्हणून दिली आहे, हिच्या प्रसादानेच माझ्या आश्रमास येणार्‍या आपल्यासारख्या राजाधिराजाचे, इतर अतिथीचे व आश्रमातील लोकांचे सर्व मनोरथ सिद्धीस जातात" असे सांगितले. हे ऐकून अर्जुनीने आपले डोळे मिटून नारदांनी यासंबधी सांगितलेले सर्व काही लक्षात घेतले व काहीही करून ही कामधेनु हरण करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे असे ठरवून डोळे उघडले व धिटाईने त्या कामधेनुकडे पाहून "मुनिवर्या, ही कामधेनु आपण मला देऊन टाका आणि याजबद्दल मी माझ्या जवळील उत्तम अशा सहस्त्र गाई आपणास देतो" असे जमदग्नी जा म्हटले. त्यावर जमदग्नी किंचित हसून राजास म्हणाले. हे राजा "तुझ्या हजार गाईचे मला काय प्रयोजन आहे ? हे पहा माझ्या आश्रमामध्ये असंख्य गाई आहेत तेव्हा मला आणखी जास्ती गाईची गरज नाही. या निर्बल अशा सुरनंदिनीचा तुला काय उपयोग आहे ? याचा नीट विचार कर. तू पृथ्वीपति आहेत म्हणुन तुला असाध्य असे काय आहे ? तू माझ्याकडे धेनुचे दान मागावेस हे तुझ्या राजधर्मास शोभते का ? सूज्ञ अशा महाराजा आणखी काहीतरी मागून घे ते मी उला संतोषाने देईन." यास अर्जुनी कबूल न होता तो ऋषीस म्हणाला, "हे मुनिश्रेष्ठा, मला या धेनुशिवाय आणखी काहीच आपणाकडुन नको. माझ्या राज्याचा शांततामय असा अर्धा भागही मी आपणास देतो. तेव्हा ही म्हातारी धेनु तेवढी मला देऊन टाका. ही माझी विनंती आपण मान्य केली नाहीत तर मी जबरीने ह्या धेनुचे हरण करण्याचा प्रसंग येणार आहे. पहा, नीट विचार करा" असे राजा म्हणाला. क्रोधदेवतेचा त्याग केलेले शांत जमदग्नी निरुपाय होऊन उसासे सोडीत स्वस्थ बसले. अर्जुनीचे हे धाष्टर्याचे बोलणे सहन न होऊन तेथे असलेल्या दुर्वास-गालव पातंग-शांडिल्य तृप्ति-लिंगपरशु-गुप्त सिद्ध-साध्य वगैरे मुनींनी पुढे येऊन राजास म्हटले की, "हे राजश्रेष्ठ अर्जुनी, जमदग्नी मुनीनी तुला कामधेनु देत नाही असे नानापरीने सांगितले असताही ते तू लक्षात न आणता हट्टाने व जबरीने धेनु नेणारच असे म्हणत आहेस हे बरे नव्हे, पहा, यापासून तुझे कल्याण होणार नाही." वगैरे उपदेश त्यांनी केला. रेणुकादेवीनीही राजास उपदेश केला. पण कशाचा काहीच उपयोग न होता राजा क्रुद्ध होऊन त्यांना म्हणाला. "हे याचकवृत्तीने जगणार्‍या यतीनी हे तुमचे धर्मशास्त्र निर्बल अशा राजास शिकवा. माझ्यापुढे तुमचे कपट चालणार नाही मागे सरा, मी ही धेनु नेल्याशिवाय सोडणार नाही." असे म्हणून तो दांडगाईने त्या गाईजवळ आला. तेव्हा ती सुरनंदिनी ऋषींच्या आश्रयास जाऊन उभी राहिली आणि त्यास म्हणाली. "हे मुनिश्रेष्ठा या लोक कंटकापासून मला होणार्‍या पीडेचे निवारण करा." तेव्हा मुनि म्हणाले, "हे प्रिय माते, आमच्या आश्रमात सत्कार पावलेल्या या बलिष्ठ राजास आणखी काय सांगू ? तुम्ही दोघेही आपले हिताहित पहा" असे डोळ्यात अश्रु आणून ते म्हणाले. अर्जुनीस यामुळे जास्तीच राग आला व त्याने ती गाय बाहेर आणवून तिच्या गळ्यास दोरी बांधली. तेव्हा ती दोरी तोडून घेऊन त्या सुरनंदिनीने एक हुंकार केला व आपले चारही पाय तिने भूमिवर आपटले. त्याबरोबर असंख्य गायी उत्पन्न झाल्या व त्यांनी आपल्या शिंगांनी आणि पायांनी अर्जुनीच्या बलिष्ठ सेनेचा समूळ नाश केला. नंतर ती सुरधेनु ऋषींजवळ येऊन म्हणाली की, "मुनिराज. मी अर्जुनीच्या समग्र दुष्टाचा नाश का करू नये?" असे म्हणून व अश्रु ढाळीत ती धेनु तेथेच राहिली. रेणुकादेवी सुरनंदिनीस म्हणाली, "हे माते, तुझे म्हणणे खरे आहे. पण काय करणार ? आम्ही आदरातिथ्य करून सत्कार केलेल्याला कष्ट देणे हा आमचा धर्म नव्हे. पुढे काय होते ते पाहू" असे म्हणून रेणुकादेवीने त्या सुरनंदीनीचे पाठीवर आपला हात फिरविला व दुःखाने दुसरीकडे निघून गेली. इकडे आपल्या समग्र परिवाराचा नाश झाल्याचे पाहुन अर्जुनी भ्रमिष्टासारखा झाला व जमदग्नी ऋषींचे सन्निध येऊन म्हणाला, "हे कपटी मुनि तुझी मौनवृत्ती आता तुला कऊन आली या दुष्ट धेनूने माझ्या बलाढ्य सेनेचा नाश केला. तेव्हा तुझे प्राण घेऊन या धेनूचे जर मी हरण केले नाही तर ते माझ्या क्षत्रिय कुलास अपमानस्पद होईल" असे ओरडत ती पुढे आली, तेव्हा ते सुरनंदिनी पर्वताकार रूप धारण करून ऋषी दिसू नयेत अशी उभी राहिली जमदग्नी ऋषींनी सुरनंदिनीचा पराक्रम प्रत्यक्षच पाहिला आणि ते तिला म्हणाले, "हे माते सुरनंदीनी मला सोडून तू एकीकडे रहा व राजास त्याची, इच्छा पूर्ण करून घेऊ दे." त्यावर सुरनंदिनी म्हणाली, "मुनिवर्य उपाय नाही, आपल्या आज्ञेविरुद्ध वागणे हा माझा धर्म नव्हे" असे म्हणून दुःख करीत ती एकीकडे उभी राहिली. तेव्हा कोपिष्ट अशा अर्जुनीने जमदग्नीचा वध केला व ती कामधेनु धरणेसाठी तो पुढे गेला. हे पाहून ती धेनू त्याच्या हातातून सुटून दुसरीकडे गेली. व अदृश्य झाली अर्जुनीने हे प्रत्यक्षच पाहिले व तो भयभीत झाला. आणि अशा दुर्घट प्रसंगातसुद्धा केवळ पुण्याईनेच आपला प्राण वाचला असे समजून व निराश होऊन तो आपल्या उरलेल्या परिवारासह गुप्त मार्गाने राजधानीस येऊन पोहोचला आणि आपला कोणीतरी प्राणघात करील या भीतीने त्याने आपल्याभोवती सशस्त्र असा कडक पहारा ठेविला.

मंत्रोदकाने रुचिकमुनींनी जमदग्नींचा प्राण परत आणला.

मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी, कृतिका नक्षत्र रात्रीच्या पहिल्या प्रहरात जमदग्नींच्या प्राणहत्येची दुःखद वार्ता सर्वत्र पसरली. रेणुकादेवी जमदग्नींच्या देहावर पडून गडबडा लोळू लागली व कांकणे आणि मंगळसूत्र काढून कैलासाकडे हात करून "परशुरामा, परशुरामा लवकर निघून ये" असे दुःखाने ओरडू लागली. तेव्हा परशुराम गडबडीने आपल्या मृत पित्याजवळ आला व दुःख करीत असलेल्या आपल्या मातेस म्हणाला, "आई शोक आवर, सूर्योदय तर होऊ दे, म्हणजे तितक्यात परमेश्वर आमचे दुःख निवारण करील हे सत्य समज. "त्यावर देवी उठून बसली व आपले अश्रु पुसून पुत्राकडे पाहू लागली इतक्यात नारदाकडून यापूर्वीच ही दुःखद घटना कळलेले रुचिक, अगस्त्य, वसिष्ठ, विठोबा, शिरश्रृंग वगैरे ऋषी तेथे आले व त्यांनी जमदग्नींच्या प्राणहत्येने दुःखात बुडून गेलेल्या रेणुकादेवीस तिच्या दुःखशांतीचा तत्वोपदेश केला. अशा रीतीने काही काल गेल्यावर सूर्योदयाचा समय प्राप्त झाला. हे पाहून अगस्ति ऋषींनी वसिष्ठ ऋषींच्या कमंडलुतील जल मृत संजीवनी मंत्राने अभिमंत्रून रुचिकमुनींच्याकडे दिले त्यांनि ते मंत्रित जल जमदग्नी ऋषींच्या मृतदेहावर शिंपडताच जमदग्नी मुनी "शिव शिवा शंकरा," असे परमेश्वराचे नाव घेत उठून बसले व जवळ असलेल्या सर्व ऋषींना त्यांनी वंदन केले. देवतांनी आनंदसूचक पुष्पवृष्टी केली व देवदुंदुभीचा निनाद सर्वत्र व्यापून राहिला. अशा या संतोषप्रद समयि सर्वांनी आनंदाने जयजयकार केला.

रुचिकमुनींनी जमदग्नीना आपल्या ह्रदयाशी धरले व त्यांना आपल्याजवळ बसवून घेतले. तसेच सत्यवतीनेही रेणुकादेवीस आपल्याजवळ बसवून घेतले. तेव्हा अगस्ति ऋषि परशुरामास आपल्याजवळ बोलावून त्याला म्हणाले, ’पार्वती-परमेश्वराच्या अनुग्रहास पात्र झालेल्या व श्री गजाननाकडून सर्व सिद्धिदायक असे परशु अस्त्र मिळविलेल्या महिमाशाली परशुरामा हा सुयोगानिमित्त सर्व देवताप्रीत्यर्थ शांतिहोम करून सर्वांची तृप्ति कर.’ त्यांच्या आज्ञेप्रमाणे परशुरामाने यज्ञकार्य करून सर्व देवतांना क्षेत्रपाल भरवादीता तृप्त करून सोडले ही संतोषजनक वार्ता चोहीकडे प्रसृत करणेकरिता पौर्णिमेच्या चंद्राचे पूर्व दिशेस आगमन झाले. सर्व ऋषिसमूह एका ठिकाणी जमल्यावर रुचिकमुनींनी परशुरामास आपल्याजवळ बोलावले व "परशुरामा, आता उशीर का?" क्रूर कंटक अशा सार्‍या क्षत्रियांचा समूळ संहार करून भूभार हलका कर व तुझ्या माता-पित्यांना कष्ट दिलेल्या कार्तवीर्यार्जुनाचे कातडे जमदग्नी-रेणुकादेवीना आसनाकरिता आणुन दे आणि त्याच्या रक्ताने त्यांचे पाय धू" असे म्हणून त्याचे मस्तकावर आपल्या हात ठेवून त्यास आशिर्वाद दिला. परशुराम म्हणाला, ’आजोबा बरे आहे. आपल्या सांगण्याप्रमाणे करतो" असे म्हणून व सर्वांना व सर्वांना नमस्कार करून परशुराम आपल्या शस्त्रास्त्राची जुळवाजुळव करू लागला अशी ही कथा सूत मुनींनी शौनकादि ऋषींना सांगितली.

परशुरामाने सर्व क्षत्रियांचा संहार करून भूभार हलका केला ती कथा.

सूत - शौनकादि ऋषीहो ! परशुराम त्या पौर्णिमेच्या रात्री आकाशमार्गाने संचार करून दुसरे दिवशी अरूणोदयाचे सुमारास अर्जुनीच्या राजधानीच्या दिंडी दरवाजाजवळ येऊन उभा राहिला व "हे मदोन्मत्त हत्तीसारख्या उन्मत्त झालेल्या अर्जुनी, मी ऋषिकुमार तुझ्याकडे युद्धाची भिक्षा मागणेस आलो आहे तरी लवकरच माझी इच्छा पूर्ण कर" असे म्हणून त्याने सिंहगर्जना केली ही भयंकर गर्जना ऐकलेल्या अर्जुनीने हा परशुरामच असावा अशी अटकळ बांधली व पूर्वीच सज्ज ठेवलेल्या अज्ज ठेवलेल्या शुर सैन्यानिशी तो बाहेर आला व सभोवार पाहतो तो काय जिकडे पहावे तिकडे अनेक रुपधारी परशुरामच परशुराम. त्यांना पाहून अर्जुनीने त्यांच्याशी घनघोर रणसंग्राम सुरु केला. परशुरामाने पार्वती-परमेश्वराकडून मिळविलेल्या अंबिकास्त्र-उरगास्त्र-सर्पास्त्र इत्यादि अस्त्रांनी सर्व क्षत्रियांचा संहार करून त्यांना तुडवून टाकले. भूदेवी दुष्ट क्षत्रियांच्या रक्ताने न्हाऊन हर्षित झाली. आणि भूत-प्रेत-पिशाचादि डकिनी, शाकिनी यांनीही रक्ताचे शिंपणे सुरु केले व आम्हास एक चांगलि संधि मिळाली असे म्हणून नाचून त्या सर्व परशुरामाचा जयजयकार करू लागल्या व त्याच्या पाया पडून त्यांनी आपला संतोष व्यक्त केला. परशुरामानेही त्याना तुम्ही सुखी असा अभयवचन दिले. हे सर्व दुरुन पाहिलेल्या अर्जुनीने तेथे न राहता पलायन केले परशुरामाने त्याचा पाठलाग केला व "हे लोककंटका, कुठे पळून चाललास ? तू स्वर्ग-पाताळ लोकात जाऊन दडून राहिलास तरी तुला सोडतो काय? थांब चांडाळ ! दुष्टा ! हे तुझ्या राजधर्मास शोभते काय?" असे म्हणून परशुरामाने त्याच्यावर शस्त्रास्त्रांचा मारा सुरु केला व अंबिकास्त्राने याचे सहस्त्र बाहु छेदून टाकले. त्याबरोबर दशसहस्त्र बाहू तेथे उत्पन्न होऊन अर्जुनी व परशुराम या दोघांमध्ये अत्यंत घनघोर युद्ध सुरू जाले परशुराम अर्जुनीचे बाहू छेदून छेदून कंटाळला व त्याने त्याजवर मंत्रास्त्राचा प्रयोग केला तेव्हा अर्जुनीस मूर्च्छा आली व तो भूमीवर निश्चेष्ट पडला. याचवेळी "परशुरामा, या दुष्टाचे बाहू छेदण्याचे कष्ट घेऊ नकोस. याने कोणत्याही देवदेवतांकडून शस्त्रास्त्राने नाश न होण्याचा वर श्रीगुरुदत्तात्रेयांकडून मिळविला आहे. तरीही पापी लोककंटक अशा अर्जुनीने साधुसत्पुरूषाना विनाकारण छळून तुझ्या पित्याचा प्राण घेतला आहे व अशा रीतीने हा गुरुवचनभ्रष्ट झाला असल्यामुळे याचा विनाशकाल समीप आला आहे. आता तू इतर कोणत्याही उपायाची योजना न करिता श्री गजाननाच्या प्रसादाने मिळालेल्या परशुने त्याचे पोट फाडून तेथे असलेले अमृत काढून घे. म्हणजे तुझी कार्यसिद्धी होईल. अशी आकाशवाणी झाली ती ऐकून वीर-गंभीर अशा परशुरामाने भूमीवर निश्चेष्ट पडलेल्या अर्जुनीस उठविले व त्याने डोळे उघडण्याच्या आतच परशु शस्त्राने त्याचे पोट फाडून त्यातील अमृत काढून घेऊन आणि त्याचे मांस भूतांना बलि म्हणुन देऊन टाकून रक्त आणि चर्म घेऊन परशुराम रुचिकमुनींजवळ आला आणि त्या रक्ताने त्याने जमदग्नी-रेणुकादेवीचे पाय धुतले. व नंतर त्यांना अमृताने न्हाऊन घालून व दुष्ट क्षत्रियांचे निर्मूलन करून भू-भार हलका केल्याचे त्यांना सांगितले ते ऐकून जमदग्नी-रेणुकादेवीनी "परशुराम! तू धन्य आहेस." असे आनंदाचे उद्‌गार काढले. नंतर परशुरामाने आपण बरोबर आणलेल्या अर्जुनीच्या चर्माचे आपल्या मातापित्यांना आसन करून दिले व त्यावर त्यांना बसवून टाळी वाजवीत आनंदाने नाचत नाचत दीर्घदंड नमस्कार केला. तेथे जमलेल्या सर्वांनी ही परशुरामाची कृती पाहून या नारायणावतारा परशुरामाच्या पराक्रमाची तारीफ केली. त्यावर अगस्ति ऋषि उठून उभे राहिले व म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी परशुरामाची स्तुति केली हे ठीक आहे; पण दुष्टांचे निर्दालन व्हावे व सुष्टाचे परिपालन व्हावे यासाठी अत्यंत उग्र तपाचरण करून परमेश्वरास प्रसन्न करून घेतलेली देवमाता अदिति भूमीवर अयोजित अशी जन्मून, दुष्ट क्षत्रियांचा संहार करून भू-भार हलका केलेल्या परशुरामाचा पराक्रमाला जी कारणीभूत झाली त्या जगदंबा-एकवीरा-रेणुकादेवीला मात्र तुम्ही अजिबात विसरल्यासारखे दिसते म्हणून त्यांनी आपले हात वर करून देवीची स्तुती केली व ते खाली बसले. वसिष्ठऋषींनी अगस्ति ऋषींच्या बोलण्यास अनुमोदन दिले. नंतर सर्वांनी जगदंबा-रेणुका-महामाता की जय असा जयजयकार केला. यावर रुचिकमुनी म्हणाले, "ऋषिपुंगवहो, महा महिमाशाली असे आपण सर्व नारदमूनींच्या सूचनेने येथे आलात व जमदग्नीचे प्राण परत आणून कीर्ती मिळविली याजबद्दल मी आपले उपकार स्मरतो" असे सांगुन या रेणुकादेवीस चार दिवस वैधव्य भोगावे लागून आज पाचवा दिवस लागला तरी आजच्या या शुभ-मुहूर्तावर हिला कांकणे व मंगलसूत्रादि बांधून सुवासिनी करावे अशी त्यांनी व सत्यव्रतीने सर्वांचे प्रार्थना केली. त्यावर त्यांच्या इच्छेप्रमाणे वसिष्ठ-आगस्ति-दुर्वास-शिरश्रृंग-विठोलादि मुनीनी श्री मल्लिकार्जुनास दुग्धाभिषेक करून सुवासिनीच्याकडून तैलतीर्थात जमदग्नी-रेणुकादेवींना तैलाभ्यंगस्नान घातले व शुभ लग्न शुभ तिथीवर कंकण-मंगलसूत्रादि बांधले. सुवासिनी स्त्रियांनी रेणुकादेवीस पंचारती ओवाळितो देवतांनी आनंदसूचक अशी रेणुकादेवी-जमदग्नीवर पुष्पवृष्टि केली, त्यामुळे सर्व लोक आनंदित झाले.

वाचकहो ! कृतयुगाचे ४ दिवस रेणुकादेवीस आलेले वैधव्य कलियुगामध्ये ४ महिने होऊन मार्गशीर्ष शु॥ १४ पासून पुढे चैत्र शु ॥ १५ स कंकण-मंगलसूत्रादि धारण होत असलेले आजही सर्वांना माहीत आहे. मंगल कार्य शेवटास गेल्यावर या कार्याकरिता जमलेले राजाधिराज, साधुसत्पुरुष इतर अतिथी-अभ्यागत पंचामृत भोजनाने तृप्त होऊन रेणुकादेवीचे अनन्य भावाने स्तवन करीत आपापल्या स्थानास परत गेले. वसिष्ठ-अगस्ति-वठोल शिरश्रृंग-दुर्वास आदि मुनिश्रेष्ठानी सुरनंदिनिस आपणाजवळ बोलावले व "हे माते. तुला बलात्काराने हरण करून नेण्यात आलेला गुरुवचन भ्रष्ट असा अर्जुनी आपण नाश पावला इतकेच नव्हे तर सार्‍या क्षत्रिय कुलाचा विध्वंस करून अपकीर्तीस पात्र झाला.

तू आता या आश्रमात सुखाने रहा असा तिला आशिर्वाद दिला व तिचे पाठीवर हात फिरविला व तिचे समाधान केले. नंतर सर्वांनी जमदग्नी-रेणुकादेवीची भेट घेतली व रुचिकमुनी -सत्यवतीदेवी यांचा निरोप घेऊन ते सर्व ऋषि आपापल्या स्थानी गेले. या मंगलकार्यासाठी आलेल्या एकनाथ-जोगिनाथानी रेणुकादेवीच्या इच्छेप्रमाणे एकदोन दिवस येथे राहून रेणुकादेवीचा भक्तीचा पाहुणाचार स्वीकारला या महाशिवयोगिनी पतीच्या क्रोधामुळे आपणास झालेल्या तापाचे निवारण करून प्रसादाचा अनुग्रह केला वगैरेची हकीकत रेणुकादेवीनी आपल्या सासू-सासर्‍यांना निवेदन केली. ती ऐकून ते, त्याचप्रमाणे जमदग्नी मुनि, परशुराम वगैरे संतोष पावले. नंतर एकनाथ जोगिनाथ यांनी त्या सर्वांचा निरोप घेतला व आपल्या शिष्यांसमवेत ते आपल्या आश्रमास येऊन पोचले.

भेटासूर नावाच्या क्रूर दैत्याचा परशुरामाने संहार केला ती कथा

लोककंटक झालेल्या क्षत्रिय कुलाचा नाश करून परशुरामाने भू-भार हलका केला व भूदेवीस शांत केले आणि आपल्या माता-पित्यांचे जवळ येऊन तो बसला. एक शत्रु गेला तरी दुसरा पुनः तयार आहेच याप्रमाणे भेटासुर नावाचा दैत्य ऋषींच्या यज्ञ-यागादि कर्मास त्याचप्रमाणे ते देवताप्रीत्यर्थ करीत असलेल्या शांति होम व जपतपादि, शिवलिंगार्चनादि पुण्य कृत्यास कंटकप्राय होऊन त्यांच्या व्रतामध्ये अडथळे आणीत होता. या दुष्टाच्या त्रासास भिऊन तेथे असलेले -सत्पुरुष जमदग्नी रेणुकादेवींच्या जवळ आले व आपले कष्ट निवारण करण्याबद्दल त्यांनी त्यांना हात जोडून विनंती केली. परशुरामाने हे सर्व ऐकले आणि तो वीरावेशाने उभा राहिला व त्या दुष्टाचा क्षणात संहार करतो असे म्हणून त्याने जमदग्नी रेणुकादेवीचा आशिर्वाद मागितला आणि क्षत्रिय कुलाचा संहार केलेला रक्तलांछित परशु हातात घेऊन सिंह गर्जना करीत दशरूपे धारण करून त्या भेटासूरास सहाय्य देणार्‍या शूर किराताची शिरे त्याने क्षणार्धात उडवून दिली. नीला मेधरूपी असा भेटासूर सिंह गर्जना करीत परशूरामासमोर आला. तोच परशूच्या एकाच प्रहाराने त्याचे डोके उडवून त्यास भूमीवर पाडले. परशुरामाचे भयंकर रूप पाहून निरपराधी स्त्री-पुरुष आमचे रक्षण करा, आमचे रक्षण करा असा आक्रोश करीत परशुरामास शरण आले. परशुरामाने त्या सर्वांचे सांत्वन केले व भेटासुराचे डोके घेऊन त्यास ब्रह्मरंध्रापर्यंत छिद्र पाडले आणि त्याचे स्नायु त्यात ओवून ती चवकडी करून वाजवा असे शरण आलेल्यांस सांगून ते त्याच्या हातात दिले. त्यांनी ते त्यांच्या हाती दिले. त्यांनी ते हातात घेऊन वाजविताच त्यातून "त्रि नृणां, त्रि नृणा" असा ध्वनि निघू लागला. या शद्बाच्या ध्वनीने आनंद पावून सर्वजण टाळ्या वाजवीत नाचू लागले. व परशुरामाच्या आज्ञेने, समोर असलेल्या रेणुकादेवीस सांगितले व निरपराधी अशा शरणागत स्त्री-पुरुषांच्यावर कृपा करण्याबद्दल विनवून आपण तेथिल एका पुष्करणीत स्नान करून शांत झाला तेव्हापासून त्या पुष्करणीस रामतीर्थ असे नाव पडले आहे. रेणुकादेवीने निरपराधी अशा शरणागत स्त्री-पुरुषावर कृपा करून त्यांचा उद्धार केला.

जिवंत राहिलेल्या क्षत्रिय राजांच्या स्त्रिया व इतर स्त्री-पुरुष परशुरामास शरण आले

सर्व क्षत्रियांचा नाश केल्यानंतर परशुरामाच्या दृष्टीस न पडलेल्या राजस्त्रिया त्याचप्रमाणे इतर स्त्री-पुरुष दिंड मूढ होऊन अंगावरील वस्त्राचीही पर्वा न करता "परशुरामा, परशुरामा" असे ओरडत शरण आले. तेव्हा परशुरामाने कडूनिंबाच्या डाहाळ्या मोडून त्यांच्या अंगावर टाकल्या, त्याबरोबर त्या स्मृति घेऊन ते "परशुरामा आमचे रक्षण कर" असे म्हणू लागले. हे ऐकून परशुरामाने, त्यांना जवळच असलेल्या जोगिनाथ तीर्थात स्नान करून कडूनिंबाची पाने पांघरा व डाहाळ्या तोंडात धरून हात जोडून रेणुकादेवीस शरण जा आणि तिच्या सांगण्याप्रमाणे वागा म्हणजे तुमचे पाप नाश होतील असे यांना सांगितले. परशुरामाच्या सांगण्याप्रमाणे ते देवीस शरण आले व "महामाते, आम्ही दीन आहोत, आमचे रक्षण कर" असे म्हणाले. त्यांचा दीन भाव पाहून रेणुकादेवीने त्यांच्यावर कृपादृष्टी केली व त्यांना म्हणाली, "तुम्ही येथील तीर्थामध्ये स्नान करा व पांढरे वस्त्र नेसून तसलीच चोळी घाला व कपाळास हळदीची पूड लावून मी देत असलेला पांढरा मणि व कवड्या यांची माळ करून गळ्यात घाला व ही मेसीची बुट्टी हातात घेऊन ’एकनाथ-जोगेश उद्‌भवतो’ असा माझ्या गुरुचा नामोच्चार करीत भिक्षा मागा. भिक्षेत आलेल्या धान्यातील अर्धे धान्य गोरगरिबांना देऊन बाकीचे तुम्ही अन्न करून का" असे सांगितले. देवीच्या या उपदेशाप्रमाणे वागून त्यांनी आपली पापे नाहीशी करून घेतली. या देवीचे हे माहात्म्य जाणुन आजही या देवीचे भक्त त्याचप्रमाणे वागून आपली पापे नाहिशी करून घेऊन आपले इष्टार्थ सिद्ध करून घेतात व देवीस तन-मन-धन देऊन शरण येतात हे सर्वविश्रुत आहे यात काही शंका नाही.

परशुरामाने संपादन केलेली भूमि कश्यप ब्रम्ह्याला दान देऊन टाकलि व तो विरक्त झाला ती कथा

रुचिकमुनि-सत्यवती, जमदग्नी-रेणुकादेवी, परशुराम, इतर ऋषि व ऋषिपत्‍न्या संतोषाने रहात असता आजा रुचिकमुनि परशुरामास म्हणाला, "हे परशुरामा. भूदेवी आता शांत झाली ना? आता तू क्षात्रवृत्तीचा त्याग करून भुत्रदयादि शांतिगुण तसेच अहिंसात्मक साधुवृत्ती स्वीकारून गंगा-भागिरथी इत्यादि तीर्थामध्ये स्नान कर व पापापासून मुक्त हो अविबुक्त वारणासी (काशी) क्षेत्रामध्ये तुझ्या नावाने रामेश्वरलिंग स्थापन करून त्या शिवलिंगाच्या व इतर सर्व देवतांच्या तृप्तिसाठी शांतियज्ञ कर व त्या यज्ञाच्या मुखाने तू संपादन केलेली सर्व भूमि कश्यप ब्रह्मर्षीस अर्पण करून जपतपवादि योगनिरत होऊन षण्मुख स्वामीनी तुला उपदेश केल्याप्रमाणे तू परम विरक्त हो आम्ही आता आमच्या आदिमोहरा स्नानास जातो असे सांगून परशुरामास बोध केला आणि जमदग्नी-रेणुकादेवीचे समाधान करून त्यांना सुखाने रहा व चिरंजीव व्हा असा आशिर्वाद देऊन सत्यवतीसह रुचिकमुनि आपल्या आश्रमास गेले.

परशुरामाने आपला आज रुचिकमुनि याच्या सांगण्याप्रमाणे भागिरथी, गंगा इत्यादि नदी-तीर्थामध्ये स्नान करून काशी क्षेत्रामध्ये रामेश्वरलिंगाची प्रतिष्ठापना केली व विश्वनाथाचे दर्शन घेऊन तो त्रिवेणी संगमास आले. तेथे सर्व ऋषिसमवेत शांतिहोमादि यज्ञकार्य करून आपण संपादन केलेली सर्व भूमि, शिवसाक्ष त्याने कश्यप मुनींना अर्पण केली व "हे मुनिवर्या, आपणच ही भूमि स्वीकारून राज्य करावे" असे त्यास सांगून त्याचा निरोप घेऊन येथे आला व कित्येक नदी-तीर्थामध्ये आपली रक्तरंजित परशु त्याने धुतला तरी तो स्वच्छ झाला नाही तो या नदीत धुतल्याने स्वच्छ झाला तेव्हापासून या नदीचे पाणी तांबूस रंगाचे झाले असून या नदीत कुलीश नदी असे नाव पडले आहे. पुढे परशुरामाने या नदीमध्ये स्नान केले व पुढील आपल्या यात्रेचा कार्यक्रम संपवून महामेरु पर्वताजवळ असलेल्या पुण्यस्थानी श्री शंकराच्या आराधनेकरिता तपाचरण करू लागला. अशाप्रकारे काही दिवस गेल्यावर पृथ्वीपती झालेले ऋषिवंशातील ब्राह्मण परशुरामाकडे आले व त्यास म्हणाले "परशुरामा तू मिळविलेली सर्व भूमि सर्व लोकांना विदित होण्यासारख्या ऋषींना दान देऊन टाकुन तू येथे येऊन राहिला आहेस त्यामुळे दिलेले दान परत घेतल्याच्या दोषास तू पात्र होत नाहीस का?" याचा विचार कर. तुजसारख्या ज्ञानी व महिमाशाली पुरुषास आम्ही जास्त काय सांगावयाचे आहे?" हे ऐकून परशुराम त्याना म्हणाला, "हे ब्राह्मणहो, आपले बोलणे यथार्थ आहे तुम्ही माझ्या चुकीची मला माफी करावी अशी माझी आपणास विनंती आहे" असे सांगून तो दुसरीकडे जाणेस निघाला. इतक्यात ही बातमी श्रवण केलेल्या सिंधुराजाने परशुरामाजवळ येऊन त्यास साष्टांग नमस्कार केला व आपले स्नान जे पश्चिम घाट तेथे त्यास बोलावून नेले व ते स्थान परशुरामास देऊन टाकले. सिंधुराजाच्या भक्तीस प्रसन्न होऊन परशुरामाने तेथेच राहून तपाचरणास सुरुवात केली हे ऐकून कश्यप मुनींना राग आला व त्यांनी ऋषिपुत्र ब्राह्मणांना आपल्याजवळ बोलावून घेतले व ते त्यांना म्हणाले, "अरे ! माझ्याप्रमाणेच संन्यस्त वृत्ती स्वीकारलेल्या परम विरक्त व सर्व विषय त्यागी अशा परशुरामाला तुम्ही बाहेर घालविलेत. धिःकार असो तुम्हाला ! तुमच्या राज्यकारभाराला आग लागो ! ही तुमची कपट वृत्ति राज्यधिकारास योग्य नाही ’राजा प्रत्यक्ष देवता’ या श्रुतिवाक्याविरूद्ध तुमची वागणूक झाली. जो राजा शांत राहून सर्व प्राणि मात्र आपल्यासारखेच, सर्व प्राणिमात्रांचे सुख ते आपले सुख समजून परोपकार वृत्तीने प्रजारक्षण करीत नाही असा राजा महापातकी होय. तो राज्यभ्रष्ट होऊन अधोगतीस जातो हे तुम्हास ज्ञात आहेच. तुम्ही या राज्याधिकारापासून दूर रहावे हेच योग्य आहे." याप्रमाणे उपदेश करून व सूर्य-चंद्र वंशाकडे राज्याधिकार सोपवून कश्यप मुनि शांत जाले.

श्रीजमदग्नी-रेणुका-परशुराम यांचा सुखानंद समागम

सूत - शौनकादि मुनिगणहो, परशुराम पश्चिम घाटात तपश्चर्येला बसला व सर्वांना शुभमंगल आशिर्वाद देऊन त्यांच्या प्रेमास पात्र झाला असल्याची हकीकत ऐकून श्री रेणुकादेवी त्याजकडे आली. परशुराम अत्यंत प्रेमाने आपल्या मातेच्या पाया पडला, आनंदाश्रुंनी त्याचे तिचे पाय भिजविले व भक्तिरूपी पुष्प तिला अर्पण करून "मातृदेवोभव" असा जयजयकार करीत त्याने प्रेमाने आपल्या आईस आलिंगन दिले (मिठी मारली). तेथे असलेल्या सिंधुराजाने व त्याच्या परिवारातील लोकांनी हे सर्व प्रत्यक्ष पाहिले आणि परशुरामाच्या मातृ-भक्तीची तारीफ केली व श्रीरेणुकादेवीची विविध प्रकारे पूजा-अर्चा करून तिचा आशीर्वाद घेतला. श्री रेणुकादेवी परशुरामाच्या वैराग्याने प्रसन्न होऊन तिने त्यास "तू आता रामश्रृंग पर्वतावर तपश्चर्या कर" असा आदेश दिला. त्यास परशुराम म्हणाला, "माते तुझ्या आज्ञेप्रमाणे मी रामश्रृंग पर्वतावर तपश्चर्या करणेस जावे हे युक्त होय, पण तपाचरणास अगदी एकांत व निःशब्द अशी जागा पाहिजे व तू जाणतेसच तुझे भक्त नाना प्रकारच्या आपल्या नवसांच्या फेडीसाठी वाद्यवैभवाने तुझी पूजा-अर्चा करणार आणि त्या वाद्यांनी रामश्रृंग दुमदुमून राहणार. तर मी तेथे कसे बरे तपाचरण करू?" असे हात जोडून विनयपूर्वक व किंचित्‌ हास्यमुखाने आपल्या आईस विचारले. यावर रेणुकादेवी परशुरामास म्हणाली, "बाळा, मी तुला काय सांगू? तुझे म्हणणे योग्य आहे. तेव्हा मी यापुढे माझ्याजवळ लावलेल्या कोणत्याही वाद्याचा ध्वनि कितीही मोठा झाला तरी तो तुझ्या कानावर येऊन पडू नये अशी व्यवस्था करते. तू याबद्दल किंचितही काळजी करू नकोस." असे बोलून रेणुकादेवीने त्याचे समाधान केले. परशुराम मग रामश्रृंग पर्वतावर आला व जमदग्नी रेणुकादेवीच्या जवळ योगानिष्ठतत्पर असा राहून त्याने त्यांची इच्छा पूर्ण केली. अशी ही हकीकत सूत ऋषींनी शौनकादिमुनींना सांगितली व पुधे गरुड रामश्रृंग पर्वतावर येऊन त्याने सर्पांची हिंसा करण्याचे सोडून अहिंसातत्पर झाल्याच रेणुकादेवीच्या वरप्रदानाचे महात्म्य सांगणेस प्रारंभ केला.

सर्पाचा संहार करावा म्हणून रामश्रृंग पर्वतावर आलेल्या गरुडाने प्रायश्चित्त घेतले

सूत -शौनकादि ऋषिगणहो ! पंडुपुत्र अर्जूनाने खांडववन दग्ध केल्यावर त्या ज्वालेस घाबरून तेथे असलेले सारे सर्पकुल रामश्रृंग पर्वतावर जमदग्नी-रेणुकादेवीच्या आश्रयास येऊन राहिले. हे पाहून गरुडहि या सर्पाचा संहार करण्याच्या उद्देशाने रामश्रृंग पर्वतावर येऊन त्यांचा शोध करू लागला.

संध्याकाळ झाली तरी या गरुडाच्या नजरेला एकही साप पडला नाही तो पुष्कळ शोध करून कंटाळला व म्हणाला, "अहो, काय आश्चर्य ! आतापर्यंत एकही साप माझ्या दृष्टीस पडला नाही यावरून ही एक फारच महत्त्वाची गोष्ट आहे हे माझ्या प्रत्ययास आले" असे म्हणून तो जमदग्नी-रेणुकादेवीच्या आश्रयास आला व त्याने त्यांना नमस्कार करून आपल्या परिश्रमाची सारी हकीकत सांगितली. त्यावर जमदग्नी-रेणुकादेवी त्यास हसत म्हणले, "हे गरुडा! सर्व साप तुझ्या भयाने आमच्या आश्रमात येऊन अदृश्य जाले आहेत. या आमच्या जप-तप-यज्ञ-यागादि, शिवलिंगादि देवतांची पूजा-अर्चा करून राहणार्‍या साधूसत्पुरुषांनी, मनु-मुनि वगैरेंनी आपापसातील वैरवृत्तीचा त्याग करून व हिंसादि दुर्गूणांना दूर सारून सात्विकवृत्तीने राहणे हेच त्याचे आद्य कर्तव्य आहे आणि हे त्यानी सोडले तर त्याचा एका क्षणात नाश होणार हे निश्चित ! निश्चित !!

तिकडे पाहा; या ठिकाणी सिंह-गज, व्याघ्र-गाई, हरिण-कुत्री बकरी-लांडगी, मांजर-उंदीर इत्यादि आपले वैरे विसरुन कशी प्रेमाने रहात आहेत. म्हणून तूसुद्धा येथे सर्पाचा संहार न करिता त्याच्याबरोबर प्रेमाने रहावे हे तुझे मुख्य कर्तव्य आहे तू भूक-तहानेने व्याकुळ झाला आहेस असे दिसते, तेव्हा लवकरच पुष्करणीमध्ये स्नान करून आम्ही देत असलेल्या फल पंचामृताचा प्रसाद सेवन करून तू येथेच काही दिवस रहा असे जमदग्नी-रेणुकादेवी गरुडास म्हणाले. हे त्यांचे सद्‌भक्ति-पक्वान्नांचा प्रसाद स्वीकारला व त्यायोगे समाधान पावून गरुड काही दिवस तेथेच जमदग्नी-रेणुकादेवीच्या सेवेत राहिला. गरुडाने स्नान केलेल्या या पुष्करणीस पुढे गरुड-तीर्थ असे नाव प्राप्त झाले. या तीर्थामद्ये स्नान केलेले लोक पावन होतात, असे सूत मुनींनी शौनकादि ऋषीस सांगितले व पुढे रामश्रृंग पर्वताच्या वरप्रदानाचे महात्म्य सांगणेस प्रारंभ केला.

श्री रेणुका (यल्लमा) देवीच्या वरप्रदानाचे महात्म्य

सूत - शौनकादि मुनिजनहो ! रेणुकादेवीचे महात्म्य मार्कंडेय मुनीनी (युधिष्ठिर) धर्मराजास सांगितले ते मी तुम्हाला सांगतो. चित्त देऊन ऐका. मुनिजनहो ! रेणुकादेवी मानवकोटीतील नव्हे ही महादेवी आधी देवमाता अदितिदेवी म्हणूनच घेऊन आदिशक्ति अवतारी होऊन उपमन्यु मुनिकडून १४ प्रकारची योगिनी व अष्टप्रकारची लक्ष्मी असे अवतार धारण करून तिने आपले महात्म्य गुप्त रीतीने दाखविले इतकेच नव्हे तर कृतयुगामध्ये आपले पुत्र झालेल्या देवतांना दुष्ट क्षत्रियांकडून फार त्रास होऊ लागल्यावेळी त्या दुष्टांचा नाश करून देवतांना सुख प्राप्त करुन द्यावे म्हणून उग्र तपश्चर्येने तिने श्री शंकरास प्रसन्न करून घेतले त्याच्या वरप्रसादाने पृथ्वीवर जेष्ठ शु ॥ २ मंगळवार रोजी रेणुकराजाने निर्मिलेल्या त्रिवेणी-संगमाच्या पुण्यस्थानी यज्ञकुंडामध्ये उत्पन्न होऊन रेणुकादेवी हे नाव धारण करुन अग्निरुद्राकडून उत्पन्न झालेल्या चरुप्रसादाने ऋषींची ती धर्मपत्‍नी झाली व तिने श्री नारायण अवतारी, अत्यंत पराक्रमी अशा परशुराम पुत्रास वैशाख शु॥ अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ-मुहुर्तावर जन्म दिला. या पुत्रामध्ये आपल्या तपाच्या प्रभावाचा प्रवेश करून त्यांजकडून कार्तवीर्यार्जुनादि दुष्ट क्षत्रियांचा तसाच भेटासूर नावाच्या लोककंटक अशा राक्षसाचाही संहार करविला आणि ब्रह्मनिष्ठ अशा मुनिश्रेष्ठीचे त्याचप्रमाणे धर्मनिष्ठ राजाधिराजाचे संरक्षण करविले व जगद्‌द्धार केला आणि शंकराच्या आज्ञेने तीन निमिषांचे वैधव्य भोगून पुनः सुमंगला झाली. अशा या देवीचे महात्म्य मी तुम्हाला आतापर्यंत सांगितले.

शौनकादि मुनिजनहो, पुढे जगामध्ये पाप वाढून सदाचार, सद्‌भक्ति, सद्धर्म, सत्संग, सुनीति अहिंसादि पुण्य कर्माचा नाश होऊन अनीति-अन्याय, अनाचार- परनिंदा, निर्दयता, अधर्म, परहिंसादि पंचपातकांचा प्रभाव जास्त होऊन हा दुष्ट मार्गच सौख्य संपत्तीचे साधन होय अशा समजुतीनी लोक त्याचे आचरण करू लागले आयुष्य क्षीण करणार्‍या कलि महाराजांच्या कारकीर्दीचा अंमल सुरू झाल्यावेळी

"कलौ पंच सहस्त्राते सर्व धर्म विवर्जिते"

कलौ पंच सहस्त्रांते ॥ महापाप विशेषतः

अशाप्रकारे अनेक ऋषि महर्षींनी सांगितलेल्या वाक्याप्रमाणे या कालात जगन्माता रेणुकादेवीचे महात्म्य दशदिशांतरी पसरून देवी आपल्या वर-प्रदानलीलेने लोकांमध्ये भक्तिमार्गाचा प्रसार करू लागली, यामुळे या देवीच्या पूजोपचाराची श्रेष्ठता वाढून सर्व लोक आपापल्या इच्छेनुसार-राजस-तामस या सात्विक या तीन प्रकारांनी हिची पूजा करून आणि आपले मनोभिष्ट साध्य करून घेऊन सुखी होऊ लागले.

या देवीस मंगळवार व शुक्रवार, पौर्णिमा-ग्रहण संक्रमण इत्यादि पर्वकाल प्रिय आहेत व दर वर्षास आश्विन शु. १ पासून विजयादशमीपर्यंत येणार्‍या महानवमीच्या तिथी तर हिच्या अत्यंत शुभ व मंगलकर जागृतीच्या वेळा आहेत. या नवमी तिथीमध्ये जे कोणी स्त्री-पुरुष रोज आपली स्नानादी नित्यकर्मे आटपून शुद्ध भावनेने या देवीचे भजन-अर्चन-नामस्मरण व किर्तन करतात ते अथवा जे या देव्चे महात्म्य वाचून सांगतात ते तसेच भक्तीने ऐकणारे सर्व लोक या माहामातेच्या प्रीतीस प्राप्त होतात व आपले इच्छित फल मिळवून पुण्यवान होतात.

जे लोक २१ मंगळवार अथवा शुक्रवार, पौर्णिमेच्या तिथीस येथे असलेल्या, तीर्थामध्ये स्नान करतात व देवीचे दर्शन घेऊन भक्तीने पूजोपचार व स्तोत्रादीनी इचे भजन करतात व ध्यानासक्त होतात ते स्त्री वा पुरुष असतात, जर शाकिनी, डाकिनी, भूत-प्रेत-पिशाचादिनी ग्रस्त असतील तर ती त्यांची पीडा दूर होईल. गरीब असोत, ज्ञानी असोत, राजे असोत, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास या चतुराश्रमातील शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, सौर इत्यादि मतानुयायी असोत या सर्वांनी काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सरादि षड्रिपुंचा त्याग करून भक्तिप्रभेने आपले ज्ञान-नेत्र उघडून जर ते या देवीचे निजस्वरूप जाणुन आनंद परवश होऊन एकचित्त होतील तर त्यांचेवर देवीची पुर्ण कृपा होवून ते परमश्रेयस प्राप्त करून जगद्वय होतील. जे अनेक क्रूर कंटकांनी व्याप्त असून कष्ट व नाशाप्रत पोचले असतील त्यांनी या देवीस नवस करून तिचे ध्यान करीत आपणास अनुकूल होईल त्यावेळी या स्थानाजवळ असलेल्या मलापहारी नदीच्या उत्तरवाहिनीमध्ये अथवा जोगेश्वरी तीर्थामध्ये सचैल स्नान करावे व कडूलिंबाच्या डाहाळ्या अंगावर घेऊन मौनव्रताने या देवीचे देवळास येऊन प्रदक्षिणा करावी व नमस्कार घालावेत आणि अंगावरील कडूलिंबाच्या डहाळ्या टाकून देवून पांढरे वस्त्र पांघरून देवीची पूजा-अर्चा करावी व आपल्या शक्यतेनुसार अतिथींना अन्नोदक देऊन आतले नवस फेडावेत ते सर्व संकटापासून मुक्त होतील. याशिवाय जे भक्त भेटासूर नावाच्या राक्षसाचा संहार करून त्याच्या कवटीची परशुरामाने करून दिलेली चौकडी वाजवीत, देवीचे स्तोत्र व तिच्या महात्म्याची पदे गात आणि नामस्मरण करीत श्री रेणुका-यल्लम्मा देवी उद्‌भवो (उधो) असा जयघोष करीत नाचीत आपली भक्ति अर्पण करून दर्शन घेतात त्यांचेवर देवीची पूर्ण कृपा होते.

संततीची अपेक्षा असणार्‍या स्त्री-पुरुषांनी या देवीच्या नावाने मंगळवार अथवा शुक्रवारचे दिवशी उपोषण करून प्रदोष समयी या देवीच्या चित्राची (मूर्तीची) अष्टविधानोक्त पूजा करावी व त्या मूर्तीत नैवेद्य दाखविलेले गाईचे दूध अथवा इतर कोणतेही फल सेवन करावे आणि सर्व चिंता सोडून याप्रमाणे २१ वार शुद्धातःकरणाने देवीचे दर्शन घेऊन सति-पतिनी पूजा करावी व तिचे पादतीर्थ सेवन करावे म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण होईल. स्त्रियांनी अथवा पुरुषांनी ब्रह्मचर्य व्रताने या देवीची मूर्ति जपतपादि नामस्मरणांनी भजावी तिची स्तुति करावी व तिच्या कपाळावर लावलेले गंध, पादतीर्थ, प्रसाद वगैरे सेवन केल्यास कुष्ठरोग, अपस्मार इत्यादि दुष्ट रोग नाहीसे होऊन आयुरारोग्य अभिवृद्धि होईल.

शौनकादि मुनिजन हो ! मुख्य गोष्ट म्हणजे श्रीगुरु दत्तात्रेय आपल्या शिष्य परिवारासमवेत या रामश्रृंग पर्वतावर येऊन राहिले व त्यांनी तपःसिद्धीही केली. याशिवाय गौतम ऋषींचे शिष्य गंभीरराज, शांडिल्य मुनींचे शिष्य वीर्यवर्मा, वसिष्ठाचे शिष्य हरिश्चंद्र, त्यांचे वडील त्रिशंकु, सगर, ययाती, धर्मवर्धनादि अनेक प्रबल राजाधिराज व तपोबलसंपन्न मुनिवर्य या सर्वांनी या देवीचे स्थानास येऊन येथील तीर्थामध्ये स्नाने आणि आपली जपतपादि कर्मे, शिवलिंगार्चन. शांतिहोम वगैरे केली आणि जमदग्नी-रेणुकादेवीच्या दर्शनाने ते धन्य होऊन जगप्रसिद्ध झाले, मीही पुष्कळवेळा या देवीचे दर्शन घेतले आहे. अशाप्रकारे मार्कंडेयांनी धर्मराजास जगदंबा देवीचे महात्म्य वर्णन करून सांगितल्यावर राजा संतुष्ट पावला व त्याने कुलिश नदीत स्नान करून मार्कंडेय मुनींच्या आज्ञेने तेथे करावयाची शिवलिंगपूजादि कर्मे केली. तसेच मुनींची पादपूजा करून आपण परिवारसमवेत पादतीर्थ सेवन केले व मुनींना त्याचप्रमाणे अतिथिअभ्यागतांना पंचपक्वान्नामे भोजन देवून व वस्त्रे सुवर्णादि अर्पण करून त्यांना संतुष्ट केले व तीर्थ क्षेत्रांचा सर्व निधाने संपवून महामेरु पर्वताजवळील पुण्य क्षेत्रात त्याने प्रवेश केला आणि तो शिवालिंगार्चन तत्पर झाला. अशा तर्‍हेचे हे रेणुका-महात्म्य सविस्तरपणे सूत ऋषीनी शौनकादि मुनीनी सांगितले. ते ऐकून शौनकादि मुनि परमानंद. भरित झाले व रामश्रृंग पर्वतावर येऊन काही दिवस राहिले, आणि मलापहारि नदीच्या उतवाहिनीत. जोगेश्वरी-राम-वरुण-भैरव-संगमेश्वर-तैलतीर्थ इत्यादि तीर्थामध्ये त्यांनी स्नान केले व मल्लिकार्जुन लिंगाची विधानोक्त पूजा करून, रेणुका-जमदग्नी-परशुराम-एकनाथ इत्यादीचे दर्शन घेऊन लखनौपासून उत्तरेस ३०-३५ मैलांवर आपल्या नैमिष्यारण्यातील आश्रमात प्रवेश करून त्यांनी रेणुकादेवीचे चरित्र शिष्यवृंदास सांगितले. श्रीरेणुकादेवी (यल्लम्मा) चे महात्म्य जे सांगतात व जे ऐकून भक्तिपूर्वक या देवीची अनन्यभावाने पूजा करतात व नामस्मरण, स्तोत्र वगैरेनी इच्छा ध्यानात तल्लीन होतात ते सर्व या महादेवीच्या आशिर्वाद पात्र होऊन या लोकी सर्व संपतिमान व परलोकी पवित्र असे होऊन जातात यात संदेह नाही अशाप्रकारचे रेणुकामहात्म्य सूत मुनीनी शौनकादी ऋषीस सांगितले.

सुज्ञानी व सुशिल असे आस्तिक महाशयहो, रेणुकादेवी संतति, संपतिसौ भाग्य, दीर्घायुष्य देऊन त्यांचे मंगल करो अशी इच्छा व्यक्त करून हे जगन्मातेचे महिमायुक्त चरित्र आपणास सादर केले आहे. आपण या देवीचे हे चरित्र पठण करून याचा सर्व लोकांमध्ये प्रसार करून आमच्या परिश्रमाचे सार्थक करील अशी आशा आहे.

पाचवा अध्याय समाप्त


References : N/A
Last Updated : January 23, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP