मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|हरिविजय| अध्याय ४ हरिविजय प्रस्तावना अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ हरिविजय - अध्याय ४ श्रीधरांसारखा भगवंताच्या भक्तिप्रेमात न्हाऊन गेलेला अजोड कवी, गोपालकृष्णाच्या अति गोड लीलांचे वर्णन करतो, तेव्हा काय बहार येते. Tags : harivijayshreedharश्रीधरहरिविजय अध्याय ४ Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः ॥ जय जय श्रीकृष्णचंडांशा ॥ गोपीनयनसरोजविकाशा ॥ सत्यज्ञानचित्प्रकाशा ॥ गोकुळवासा गोविंदा ॥१॥जय जय श्रीकृष्ण उदारा ॥ निजजनमानसचकोरचंद्रा ॥ ब्रह्मानंदा ज्ञानसमुद्रा ॥ मायातीता अनंता ॥२॥जय भवहृदयानंदकंदा ॥ प्रेमळभक्तचातकजलदा ॥ पूर्णानंदा पूर्णसुखदा ॥ भेदभेदातीत तूं ॥३॥जय जय मायाविपिनदहना ॥ मधुकैटभारे मुरमर्दना ॥ धर्मपाळका सद्गुणवर्धना ॥ सच्चिदानंदा परेशा ॥४॥जय जय कमळनाभा कमळपत्राक्षा ॥ मनमोहना निर्विकल्पवृक्षा ॥ मायाचक्रचाळका सर्वसाक्षा ॥ दानवशिक्षाकारणा ॥५॥षड्गुणैश्वर्यसंपन्ना ॥ यशःश्रीकीर्तिऔदार्यविज्ञाना ॥ जय अरिषडवर्गमदभंजना ॥ निरंजना निरुपाधिका ॥६॥हरे अनंतशायी अनंता ॥ पुढें बोलें हरिविजयग्रंथा ॥ तुझी लीला जगन्नाथा ॥ तूंच बोलें सर्वही ॥७॥तिसरे अध्यायीं निरुपण ॥ गोकुळीं गेला मनमोहन ॥ वसुदेवास आडवें विघ्न ॥ मायाजाळ पैं आलें ॥८॥धरितां स्वरुपानुसंधान ॥ आडवें येत मायाविघ्न ॥ तैसा हरि उदरा येऊन ॥ वसुदेव बांधिला मायेनें ॥९॥साधकां जों स्वरुपप्राप्ति होत ॥ तंव सिद्धि पुढें आडवी येत ॥ सिद्धिसंगें परमार्थ ॥ सर्व जातो हातींचा ॥१०॥सिद्धिपाठीं जो लागला ॥ तो दिवसाच चोरीं नागविला ॥ आत्मप्राप्ति तयाला ॥ कल्पांतींही नव्हेचि ॥११॥देवाच्या बापाच्या पायीं वहिली ॥ मायेनें बेडी ठोकिली ॥ मायिक जीव सकळी ॥ मुक्त कैसे होती पां ॥१२॥ऐसी दुर्धर हरीची माया ॥ तीस कंस गेला आपटावया ॥ तंव ते गेली निसटोनियां ॥ न ये ते आया सुरासुरांच्या ॥१३॥ब्रह्मादिकां पडली माया अटक ॥ तेथें कंस काय मशक ॥ लागला कंसासी परम धाक ॥निशिदिवस विसरेना ॥१४॥जवळी प्रधान कारभारीं ॥ कंस धांवे तयांवरी ॥ अरे तुम्ही माझे सर्व अरी ॥ मज मारुं पाहतां ॥१५॥भोंवते सेवकांचे भार ॥ तों हांक फोडी कंसासुर ॥ म्हणे अवघेचि दावेदार ॥ मजभोंवते मिळाले ॥१६॥असो आतां गोकुळीं चक्रपाणी ॥ पहुडला यशोदेचे शयनीं ॥ जागी जाहली नंदराणी ॥ निजनयनीं अवलोकी ॥१७॥यशोदा केवळ ज्ञानकळा ॥ हरिप्राप्ति जाहली तिजला ॥ सायास न करितां आला ॥ घरा आपण गोविंद ॥१८॥यशोदेचें भाग्य विशेष ॥ कवडी देऊनि घेतला परिस ॥ कोंडा देऊनि कल्पवृक्ष ॥ हाता आला निजभाग्यें ॥१९॥धुवण देऊनि घेतलें अमृत ॥ कीं अजापालटें ऐरावत ॥ जंबुक देऊनि यथार्थ ॥ सिंह घरा आणिला ॥२०॥एकें चिंतामणि गोफणिला ॥ तो येऊनि अंगणांत पडिला ॥ तैसा यशोदेसी लाभ जाहला ॥ घरा आला श्रीहरी ॥२१॥यशोदा बैसली उठोन ॥ तों सेजे देखिलें निधान ॥ अमलदलराजीवनयन ॥ मोहिलें मन यशोदेचें ॥२२॥हांसे वरी मुख करोनी ॥ आपुले चरणींचा अंगुष्ठ धरोनी ॥ घाली आपुलें वदनीं ॥ तेज सदनीं न समाये ॥२३॥यशोदेसी पुत्र जाहला म्हणोनी ॥ धांवती रोहिणी आणि गौळिणी॥ आनंद न समाये त्रिभुवनीं ॥ धन्य राणी नंदाची ॥२४॥द्वारीं उभे मंडप केले ॥ समस्त ब्राह्मण जवळी आले ॥ कुळींचा उपाध्याय ते वेळे ॥ गर्गमुनि धांविन्नला ॥२५॥गोकुळीं अवतरला श्रीहरी ॥ वाद्यें वाजती अतिगजरीं ॥ दाटी झाली नंदद्वारीं ॥ देव अंबरीं पाहती ॥२६॥नंदें करुनि मंगलस्नान ॥ पाहों चालिला पुत्रवदन ॥ गर्ग आदिकरुन ब्राह्मण ॥ त्रिकाळज्ञानी पातले ॥२७॥करुनियां पुण्याहवाचन ॥ मग पाहे कृष्णवदन ॥ मधुबिंदु मुखीं घालोन ॥ मधुसूदन तोषविला ॥२८॥श्रीवासुदेवाचें वदन ॥ पाहतां नंद आनंदघन ॥ म्हणे अनंत जन्मींचें पुण्य ॥ एकदांचि फळा आलें ॥२९॥दोन लक्ष गोधनें ॥ नानापरींचीं दिव्य रत्नें ॥ विचित्र अलंकार भूषणें ॥ वाटितां जाहला नंद तो ॥३०॥अक्षय वाणें घेऊनी ॥ धांवती नगरींच्या गौळिणी ॥ अहेर अलंकारें ते क्षणीं ॥ गौळी पूजिती नंदातें ॥३१॥मंडित सर्व अलंकारें ॥ गौळिणी नेसल्या कनकांबरें ॥ पायीं पैंजण वाजती गजरें ॥ यशोदेच्या गृहीं जातां ॥३२॥हळदीकुंकुमांची ताटे भरोनी ॥ धांवताती नितंबिनी ॥ म्हणती धन्य त्रिभुवनीं ॥ यशोदा देखिली समर्थ ॥३३॥एक म्हणती हें बाळ ॥ सखे दिसतें बहु विशाळ ॥ एक म्हणती त्रिभुवनास ॥ घालील पालाण हा पुरुषार्थें ॥३४॥एक म्हणती होईल महावीर ॥ एक म्हणती दिसतो उदार ॥ एक म्हणती सहस्त्रकर ॥ उणा तेजासी याचिया ॥३५॥एक म्हणती नखावरोनी ॥ काम सांडावा कुर्वंडी करोनी ॥ एक म्हणती ओंवाळूनी ॥ जाऊं तुजवरोनि बाळका ॥३६॥एक म्हणती बोलूं नका गोष्टी ॥ बाळास लागेल गे दृष्टी ॥ यशोदेनें जगजेठी ॥ पुढें ओसंगा घेतला ॥३७॥ज्या ज्या मंदीरीं उपजला श्रीपती ॥ केशरकस्तूरीनें लिंपिल्या भिंती ॥ आरक्त चांदवे विराजती ॥मुक्तझालरी भोंवत्या ॥३८॥रत्नजडित पलंग ॥ त्यापुढें ठेविला रत्नखचित ॥ चौरंग त्यावरी यशोदा श्रीरंग ॥ घेऊनियां बैसली ॥३९॥ओसंगा घेतला चक्रपाणी ॥ श्वेत चामरें करीं घेऊनी ॥ ढाळिताती दोघीजणी ॥ यशोदेवरी स्वानंदें ॥४०॥तांबूल त्रयोदशगुणी ॥ विडे देती दोघीजणी ॥ एक पिकपात्र धरोनि ॥ उभी असे जवळिकें ॥४१॥कनकांबराची बुंथी ॥ घेऊनि बैसली यशोदा सती ॥ ओसंगा घेतला श्रीपती ॥ आनंद चित्तीं न समाये ॥४२॥भोंवते वेष्टिले विद्वज्जन ॥ गर्गमुनि पुढें होऊन ॥ पाहे बाळकाचें लक्षण ॥ नयनीं वदन विलोकी ॥४३॥जातक वर्णीत गर्गमुनी ॥ नंद यशोदा ऐकती श्रवणीं ॥ जें श्रवण करितां पापधुणी ॥ होय एकदां सर्वांची ॥४४॥हात पाहोनि गर्ग ॥ म्हणे इंदिरावर श्रीरंग ॥ धन्य यशोदे तुझें भाग्य ॥ न वर्णवे शेषातें ॥४५॥जें क्षीरसागरींचें निधान ॥ जें क्षीराब्धितनयेचें जीवन ॥ क्षितिधरावरी करी शयन ॥ तो हा निधान पुत्र तुझा ॥४६॥कमलनयन कमलवदन ॥ कमलनाभ कमलभूषण ॥ कमलप्रिय कमलशयन ॥ तो हा पूर्ण पुत्र तुझा ॥४७॥हा उपजला तुझ्या उदरीं ॥ परी कीर्ति करील त्रैलोक्यभरी ॥ यास असती बहुत वैरी ॥ परी नाटोपे कोणा हा ॥४८॥महाविषें स्तन भरोनी ॥ कोणी येईल कामिनी ॥ स्तन पाजितां चक्रपाणी ॥ तीस शोषोनि टाकील ॥४९॥चंडवायु उडवूनि यातें ॥ घेऊनि जाईल आकाशपंथें ॥ मर्दूनियां त्या दैत्यातें ॥ विजयी होईल पुत्र हा ॥५०॥आंगावरी येईल गाडा ॥ त्याचाही करील चुराडा ॥ दोनी वृक्ष कडकडा ॥ मोडूनि पडतील यावरी ॥५१॥हा होईल चित्तचोर ॥ गोरस उरों नेदी अणुमात्र ॥ ऐकतां हांसती सकळ विप्र ॥ यशोदा नंदा सुखावती ॥५२॥मायाचक्रचाळक चक्रपाणी ॥ मोहील अवघ्या गौळिणी ॥ यास थोर यमुनाजीवनीं ॥ महासर्पमय असे ॥५३॥तेथें विजयी होईल आपेंआप ॥ आणिक एक बापासी गिळील सर्प ॥ परी तेथेंही याचा प्रताप ॥ विशेष वाढेल जननीये ॥५४॥द्वादश योजनें महाअग्न ॥ ग्रासील हा न लागताम क्षण ॥ महापर्वत उचलोन ॥ नखाग्रींच धरील हा ॥५५॥गोरक्षण करील हा माते ॥ कंसास मृत्यु याचेनि हातें ॥ संहारील सर्व दैत्यांतें ॥ बंदींचीं समस्तें सोडवील ॥५६॥गुरुपुत्र गेला मरोन ॥ तो पुन्हां देईल आणून ॥ समुद्रांत एक पट्टण ॥ नवेंचि रचील अद्भुत ॥५७॥महादैत्य संहारुनी ॥ वरील मुख्य पट्टराणी ॥ आणिक सोळा सहस्त्र जणी ॥ एकलाचि पर्णील ॥५८॥षोडशसहस्त्र एक शत ॥ आणिक आठजणी विख्यात ॥ संतति वाढेल अपरिमित ॥ नाहीं अंत निजभाग्या ॥५९॥घेईल भक्तांचा कैवार ॥ उतरील धरणीचा सर्व भार ॥ याची लीला गातां सर्वत्र ॥ प्राणी तरती त्रिभुवनींचे ॥६०॥धर्माघरीं उच्छिष्टें प्रीतीं ॥ काढील हा श्रीपती ॥ होईल भक्तांचा सारथी ॥ लाज चित्तीं धरीना ॥६१॥दिवसेंदिवस लीलाचरित्र ॥ दावील गति चित्रविचित्र ॥ निजधामा जातां स्वगोत्र ॥ समागमें नेईल हा ॥६२॥ऐसें जातक ऐकतां श्रवणीं ॥ तटस्थ जाहलीं नंदराणी ॥ तों स्तनपान करितां चक्रपाणी ॥ परतोन पाहे द्विजाकडें ॥६३॥माझी लीला सांगितली सर्वत्र ॥ म्हणोनि हास्य करी राजीवनेत्र ॥ जो ब्रह्मानंद सर्वेश्वर ॥ लीलाकौतुक दावी तो ॥६४॥बारा दिवसपर्यंत ॥ सोहळा होतसे अद्भुत ॥ नंदें द्रव्य अपरिमित ॥ वांटिलें विप्रा तेधवां ॥६५॥तेरावे दिवशीं पाळणां ॥ पहुडविला वैकुंठराणा ॥ श्रीकृष्ण हें नाम जाणा ॥ गर्गें स्थापिलें जाणोनि ॥६६॥करितां नाना साधना ॥ न ये ब्रह्मादिकांच्या ध्याना ॥ त्यासी घालूनि पाळणां ॥ जो जो म्हणोनि हालविती ॥६७॥वेदशास्त्रां न ये आया ॥ भोगींद्र झाला हरीची शय्या ॥ तो पाळणां निजोनियां ॥ लीला दावी भक्तांतें ॥६८॥जो पयोब्धिहृदयनिवासी ॥ पद्मा सेवी पदपद्मांसी ॥ उरगरिपु वहन ज्यासी ॥ पाळणाम त्यासी पहुडविलें ॥६९॥जलजनाभ जलजलोचन ॥ जलधिशायी जलदवर्ण ॥ जय विजय कर जोडून ॥ द्वारीं उभे जयाच्या ॥७०॥सनकादिक सनत्कुमार ॥ हृदयीं चिंतिती निरंतर ॥ जें मन्मथशत्रुध्येय साचार ॥ नारददिकां गुह्य जें कां ॥७१॥जें मूळ आदिमायेचें ॥ जें पक्व फळ निगमवल्लीचें ॥ जें देवतार्चन कमलोद्भवाचें ॥ पाळण्यांत खेलतसे ॥७२॥जो विद्वज्जनमानसमराळ ॥ जो वैकुंठींचा वेल्हाळ ॥ निजभक्तवरद तमालनील ॥ तो पहुडला पाळणाम ॥७३॥जो अनंतगुणसंपन्न ॥ अनंतनेत्र अनंतवदन ॥ अनंतबाहु अनंतचरण ॥ त्यास जो जो म्हणोनि हालवी ॥७४॥जो अलक्ष्य अपरंपार ॥ जो आदिमायेचा निजवर ॥ जो त्रिभुवनाचा आधार ॥ जो वंद्य निगमागमां ॥७५॥जो विराट्वृक्षाचें मूळबीज ॥ जो योगियांची विश्रांतिशेज ॥ जो आदिप्रणवाचें निजगुज ॥ तो पाळणां पहुडविला ॥७६॥जो वेदविद्याचलदिनकर ॥ जो ब्रह्मांडनगरीचा स्तंभ थोर ॥ जो दानवसमरप्रतापधीर ॥ पाळणां तो पहुडविला ॥७७॥अज्ञानगजच्छेदकपंचानन ॥ जो मायाघोरविपिनदहन ॥ जो सर्वआनंद आद्यकारण ॥ ब्रह्म पूर्ण श्रीकृष्ण ॥७८॥पाळण्याभोंवत्या सुवासिनी ॥ शांति क्षमा दया उन्मनी ॥ उपरति सद्विद्या कामिनी ॥ जो ओ शब्दें हालविती ॥७९॥निर्वाणदीक्षा तितिक्षा स्वरुपास्थिती ॥ मुमुक्षा निष्कामना प्रतीती ॥ सुलीनता समाधि सद्गती ॥ लीला गाती आनंदें ॥८०॥परा पश्यंती मध्या वैखरी ॥ गजरें गाती चारी नारी ॥ चारी मुक्ति निर्धारीं ॥ चहूं कोनीं तटस्थ ॥८१॥घरांत मुख्य या सुंदरी ॥ इतर बैसल्या बाहेरी ॥ जागृती सुषुप्ति नारी ॥ त्यांस हरी दिसेना ॥८२॥असंभावना विपरीत भावना ॥ विक्षिप्ता त्यागिता येतां जाणा ॥ तुर्या दावी शहाणपणा ॥ जाणती असें बहुत मी ॥८३॥बारा सोळा चौदा नारी ॥ गलबला करिती बाहेरी ॥ चौसष्टी दाविती कलाकुसरी ॥ परी अंतरीं प्रवेश नव्हे ॥८४॥असो आतां सकल नितंबिनी ॥ ओंटी यशोदेची भरोनी ॥ अलंकार वस्त्रें अर्पूनी ॥ सदना आपुल्या त्या गेल्या ॥८५॥वस्त्रें भूषणें देऊन ॥ नंदें बोळविले ब्राह्मन ॥ गर्ग गौरविला संपूर्ण ॥ वस्त्राभरणीं तेधवां ॥८६॥गोकुळीं अवतरतां गोपाळ ॥ सकळ वृक्ष सदाफळ ॥ धेनु दुभती त्रिकाळ ॥ दुग्ध तुंबळ वर्षती ॥८७॥आधिव्याधिरहित लोक ॥ नाही चिंता दरिद्रदुःख ॥ शुष्क धरणीस अपार पिक ॥ पिको लागलें तेधवां ॥८८॥अवतरतांचि रमारमण ॥ जग जरारहित जाहलें तरुण ॥ विकल्प पाप समूळून ॥ देशधडी जाहलें ॥८९॥दरिद्री ते जाहले भाग्यवंत ॥ मूर्ख ते होती बोलके पंडित ॥ कुरुप ते जाहले रुपवंत ॥ देदीप्यमान तेजस्वी ॥९०॥अवतरतां श्रीकृष्णपरब्रह्म ॥ निःशेष गेलें रजतम ॥ गौळियां सुकाळ परम ॥ स्वानंदाचा जाहला ॥९१॥गृहीं प्रकाशतां प्रभाकर ॥ मग कैंचा उरेल अंधकार ॥ गृहस्वामी येतांच तस्कर ॥ पळोनि जाती चहूंकडे ॥९२॥कीं बोलतां ज्ञानवेदांत ॥ सकळ मतें होती कुंठित ॥ कीं सद्विवेक होतां प्राप्त ॥ संसारदुःख वितळे पैं ॥९३॥कीं प्रवेशतां वैराग्य शांती ॥ दुष्ट कामक्रोध पळती ॥ तैसा अवतरतां कमलापती ॥ दोषदुष्काळ पळाले ॥९४॥असो इकडे मथुरेप्रती ॥ दुश्चिन्हें कंसास जाणवती ॥ राजद्वारीं शुनी रडती ॥ विजा पडती सभेवरी ॥९५॥महास्फोट होऊनि धरा ॥ क्षणक्षणां कांपे थरथरां ॥ मेघ पडला नसतां धारा ॥ शोणिताच्या वर्षताती ॥९६॥कंस सभेसी चालिला ॥ उगाच मुकुट खालीं पडिला ॥ गेली सभेची सर्व कळा ॥ प्रेतवत वीर दिसती ॥९७॥आपुलें शिरीं तेल शेंदूर ॥ स्वप्नीं देखे कंसासुर ॥ दिवाभीतांचे घुंघाट स्वर ॥ दिवसाच कंस आयके ॥९८॥उगेंच छत्र मोडून पडलें ॥ कंसा वाटे मरण आलें ॥ कंसास्त्रियांनीं स्वप्नीं देखिलें ॥ महादुश्चिन्ह दारुण ॥९९॥विधवा स्त्रिया स्वप्नकाळीं ॥ ओंटी भरिती घेऊनि धुळी ॥ मंगळसूत्र गळसरी तोडिली ॥ काळपुरुषें अकस्मात ॥१००॥नाना विघ्नें देखोनी ॥ कंस भयभीत मनीं ॥ सदा जाळी चिंताग्नी ॥ कदा शयनीं नीज न ये ॥१॥प्रधानाशीं कंस विचार करी ॥ आमुचा वैरी उर्वीवरी ॥ अवतरला परी निर्धारीं ॥ ठायीं न पडे शोधितां ॥२॥कोणे ग्रामीं कोणे घरीं ॥ वाढतो न कळे माझा वैरी ॥ जो ठायीं पाडील निर्धारीं ॥ त्यासी इच्छिलें देईन मी ॥३॥शत्रू जों लहान आहे ॥ तों वेगें करावा क्षय ॥ दंदशूक लघु म्हणों नये ॥ देखतांचि वधावा ॥४॥तृणामाजी किंचित् अग्न ॥ तो जाळील नलगतां क्षण ॥ घर जों न पडे मोडून ॥ तों बाहेर आधीं व्हावें ॥५॥शस्त्राचा धाय जों न पडे ॥ तों आधींच वोढण करावें पुढें ॥ तैसा शत्रु जो न वाढे ॥ तों आधींच घात योजावा ॥६॥प्रधान म्हणे ते वेळीं ॥ जनवदंता ऐसी ऐकिली ॥ वैरी वाढतो गोकुळीं ॥ गौळियाघरीं म्हणोनियां ॥७॥लक्षानुलक्ष गौळिणी ॥ गोकुळीं असती बाळंतिणी ॥ परी वैरी असे कोण्या सदनीं ॥ तोचि ठायीं पाडिजे ॥८॥कापटयवेषें दैत्य बरवा ॥ धूर्त तार्किकी पाठवावा ॥ अरि ठायीं पाडोन वधावा ॥ नाना उपायेंकरोनी ॥९॥तों महाबळ नामें दैत्य ॥ कंसासी पैज बोलत ॥ मी विप्र होऊनि त्वरित ॥ पाळती घेतों गोकुळीं ॥११०॥कंस बहुत संतोषला ॥ महाबळ दैत्य गौरविला ॥ तो तत्काळ धरियेला ॥ विप्रवेष कापट्यें ॥११॥धोत्रें कळोत्रें नेसला ॥ यज्ञोपवीत रुळे गळां ॥ कापट्यवेष अवलंबिला ॥ हातीं पंचांग घेतलें ॥१२॥धोत्रें वोळी सरसावी ॥ टिळे वाटे लोकांस दावी ॥ मी ब्राह्मणच हें लटिकेंचि मिरवी ॥ परी अंतरीं कापट्य ॥१३॥लटिका दाखवी आचार ॥ परी अंतरीं दुराचार ॥ वृंदावनफळ वरीच सुंदर ॥ अंतरीं काळकूट भरियेलें ॥१४॥कीं बक पक्षियाचें शुष्क ध्यान ॥ कीं धनलुब्धकाचें तत्त्वज्ञान ॥ कीं दंभिकाचें भजन ॥ वरी वरी दावी असत्य ॥१५॥स्त्रीलंपटाचें विरक्तपण ॥ कीं वेश्येचें मुखमंडण ॥ कीं कोल्हाटियाचें शूरत्व पूर्ण ॥ वरी वरी व्यर्थ पैं ॥१६॥विश्वासघातक्याचे बोल ॥ वरी वरी दिसती रसाळ ॥ कीं मैंदाची शांति निर्मळ ॥ वरी धरीच व्यर्थ पैं ॥१७॥तैसा तो दैत्य महाबळ ॥ वरी वरी जाहला सुशीळ ॥ प्रवेशता जाहला गोकुळ ॥ धूर्त कुटिल दुरात्मा ॥१८॥पुसताहे लोकां सकळां ॥ कोणाचे घरीं होतो पुत्रसोहळा ॥ तों ते सांगती कृष्ण अवतरला ॥ नंदाचिये मंदिरीं ॥१९॥हरिवंशभागवतीं पाहीं ॥ महाबळ विप्राची कथा नाहीं ॥ शोध करितां सर्वांठायीं ॥ नारदपुराणीं देखिली ॥१२०॥तेथें ही कथा लिहिली जाण ॥ श्रोतीं न धरावा अनमान ॥ मुळावेगळी कथा पूर्ण ॥ सहसाही वाढेना ॥२१॥नाना पुराणींचे इतिहास ॥ बोलिला स्वामी वेदव्यास ॥ यालागीं कदापि दोष ॥ न ठेवावा ग्रंथातें ॥२२॥असो तो धूर्त महाबळ विप्र ॥ प्रवेशला नंदाचें मंदिर ॥ गौळी करिती नमस्कार ॥ भावें करोनि विप्रातें ॥२३॥बैसावया दिधलें आसन ॥ केलें ब्राह्मणाचें पूजन ॥ यशोदा कृष्णासी घेऊन ॥ स्तनपान करवीत ॥२४॥यशोदा म्हणे ब्राह्मणासी ॥ शुभग्रह पहा कृष्णासी ॥ जन्मकाळची दशा कैसी ॥ तें आम्हांसी सांगिजे ॥२५॥पूर्वीं गर्गें केलें जातक ॥ परमकल्यान शुभसूचक ॥ तुम्हीं सांगावें सम्यक ॥ दशा पाहोन कृष्णाची ॥२६॥तंव तो कापट्येंकरुन ॥ पंचांग पाहे उकलोन ॥ क्षणएक ग्रीवा तुकावून ॥ सांगता जाहला तेधवां ॥२७॥म्हणे गर्गादि ऋषीश्वर ॥ सकळ चुकले गुणाकार ॥ सर्वांचे मुळीं साचार ॥ कृष्ण उपजला जाण पां ॥२८॥यास उपजतां लागलें मूळ ॥ हा करील सर्वांचें निर्मूळ ॥ याच्या पायीं गोकुळ ॥ निर्दाळेल सर्वही ॥२९॥हा उपजला हो मूळीं ॥ करील स्वगोत्राची होळी ॥ तरी तुम्ही सकळ मिळोनि गौळी ॥ लेंकरुं बाहेर टाका हें ॥१३०॥गर्तेमाजी नेऊनी ॥ जितचि पुरावें ये क्षणीं ॥ तरीच कल्याण तुम्हांलागुनी ॥ निश्चयेंसीं जाणिजे ॥३१॥बाळ नव्हें हा काळ ॥ गिळील तुमचें कुळ सकळ ॥ ऐसें ऐकतांच वैकुंठपाळ ॥ काय चरित्र मांडिलें ॥३२॥जो सकळचराचरव्यापक ॥ जो मायाचक्रचाळक ॥ जग हाचि पट सुरेख ॥ परी तंतु देख श्रीकृष्ण ॥३३॥नाना परीचे विचित्र मणी ॥ परी ओंविले एकच गुणीं ॥ कीं अनेक तरंग सिंधुजीवनी ॥ परी उदक एकचि निर्धारें ॥३४॥कीं नाना घटीं एक दिनकर ॥ कीं बहु मंदिरें एक अंबर ॥ कीं एक सुवर्ण नाना अलंकार ॥ तैसा व्यापक श्रीहरी ॥३५॥कीं नाना मातृकांचा उच्चार ॥ परी त्यांत एकचि ॐकार ॥ नाना घटांचे आकार ॥ परी मृत्तिका एकचि ॥३६॥तैसा श्रीकृष्ण सर्वचित्तचाळक ॥ जो मनोबुद्धींचा प्रवर्तक ॥ तेणें मांडिलें हो कौतुक ॥ परम नाटकी श्रीहरी ॥३७॥बाहेर टाकावा बाळ ॥ ऐसें बोलतां महाबळ ॥ तों दह्यांचें मडकें सबळ ॥ कपाळावरी आदळलें ॥३८॥बोलतो उत्तरें अमंगळें ॥ म्हणोनि लाटणें आवेशलें ॥ मुखामाजी उभेंचि शिरलें ॥ कपटियाच्या तेधवां ॥३९॥ऐसें कौतुक गौळी पाहती ॥ तंव घरांतून देव्हारे पाट धांवती ॥ उरावरी धडधडां आदळती ॥ नाहीं शक्ति पळावया ॥१४०॥पाटे वरवंटे मोडिती पाय ॥ कपटिया तेथूनि पळों पाहे ॥ बाजही आडवी उभी राहे ॥ वाट नेदी दुर्जना ॥४१॥पाट चौक्या पाहारा अर्गळा ॥ घण कुदळी कुर्हाडी सबळा ॥ गोंवर्यांसी जीव आला ॥ पक्ष्यांसारिख्या धांवती ॥४२॥होती मुसळांचे मार ॥ धोत्र फिटोनि गेलें समग्र ॥ पंचांग फाटोनि जाहलें चूर ॥ जानवें गेलें तुटोनि ॥४३॥ढुंगणाचें धोत्र गळालें ॥ नागवाचि कपटी पळे ॥ पदार्थ तितुके धांवती बळें ॥ मार देती दारुण ॥४४॥गौळी हांसती सकळ ॥ आमच्या कृष्णासी ठेविला बोल ॥ परी त्याचें फळ तात्काळ ॥ प्राप्त जाहलें तयासी ॥४५॥गदगदां हांसती गौळिणी ॥ अपवित्र बोलिला पापखाणी ॥ जळो जळो त्याची वाणी ॥ बरा झोडिला भगवंतें ॥४६॥इकडे कपटी नागवाचि पळत ॥ पावला त्वरे मथुरेआंत ॥ चळचळाम कांपत रडत ॥ कंसाजवळी पातला ॥४७॥कंसासी म्हणे तुझा अरी ॥ वाढतो गोकुळाभीतरी ॥ तो अनिवार सकळ धरित्री ॥ निर्वैर करील वाटतें ॥४८॥थोर मार जो मज बैसला ॥ पदार्थमात्रासी जीव आला ॥ हे नव्हे मानवी कळा ॥ तो अवतरला श्रीविष्णु ॥४९॥कंसासी म्हणे महाबळ ॥ गोकुळीं वाढतो तुझा काळ ॥ तो दिसतो जरी बाळ ॥ परी नाकळे कृतांता ॥१५०॥कंसा मज वाटते पूर्ण ॥ कीं जवळी आलें तुझें मरण ॥ ऐकतां दचकलें मन ॥ कंसरायाचें तेधवां ॥५१॥केसरीचा प्रताप ऐकोन ॥ थरथरां कांपे वारण ॥ कीं गरुडाचें ऐकोन स्तवन ॥ उरग चित्तीं दचकती ॥५२॥ऐकोन सभाग्याची स्तुती ॥ दुर्जन दचके परम चित्तीं ॥ कीं वेदांतींच्या ऐकोन श्रुती ॥ मतवादी भयभीत ॥५३॥तैसाच कंस दचकोन ॥ म्हणे दिसतें वर्तमान कठीण ॥ आतां वैरियासी शोधून ॥ कोण मारील सत्वर ॥५४॥कीं व्याधि जों उद्भव न धरी ॥ तों निर्मूळ करावा लौकरी ॥ अग्नि आणि वैरी ॥ धाकुटा म्हणों नये कीं ॥५५॥लघु म्हणूं नये दंदशूक ॥ पुढें दुष्ट विघ्नकारक ॥ तों पूतना येऊनि संमुख ॥ पैज बोले कंसासी ॥५६॥क्षणामाजी तुझा वैरी ॥ शोधूनि मारीन निर्धारीं ॥ मी जाणें कपटकळाकुसरी ॥ आज्ञा देईं मज आतां ॥५७॥कंस परम संतोषला ॥ गौरवोनि निरोप दिधला ॥ कपटस्वरुप ते वेळां ॥ नटली रंभेसारखी ॥५८॥पायीं रुणझुणती पैंजण ॥ नेत्रीं सोगयाचें अंजन ॥ सर्व अळंकारीं नटली पूर्ण ॥ परम पापीण पूतना ॥५९॥कंस म्हणे पूतने अवधारीं ॥ गांवोगांवींचीं बाळकें मारीं ॥ त्यांत सांपडेल माझा वैरी ॥ तो तूं झडकरी वधीं कां ॥१६०॥आधीं पूतना परम चांडाळी ॥ त्यावरी कंसाची आज्ञा झाली ॥ येरीनें तेचि हृदयीं धरिली ॥ अतिप्रीतीनें तेधवां ॥६१॥आधींच शंख करावयाची हौस॥ त्यावरी पातला फाल्गुनमास ॥ कीं राजाज्ञा झाली तस्करास ॥ यथासुखें हिंडावया ॥६२॥आधींच जार दुराचारी ॥ तो स्त्रीराज्यांत कारभारी ॥ आधींच पैशुन्यदुष्ट अघोरी ॥ त्यावरी नृपति पाठिराखा ॥६३॥कीं मदिरा पाजिली मर्कटाला ॥ त्यांत भूतसंचारहीं जाहला ॥ त्यामाजी वृश्चिकें दंश केला ॥ तैसें जाहलें पूतनेसी ॥६४॥की मद्यपियानें देखिलें शिंदीवन ॥ कीं वमन देखोनि धांवे श्वान ॥ कीं काग क्षत देखोन ॥ अतिसाक्षेपें उकरी पैं ॥६५॥तैसी राक्षसी ते अवसरीं ॥ गांवोगांवीचीं बाळकें मारी ॥ प्रवेशताम लोकमंदिरीं ॥ न वारिती कोणीच ॥६६॥तीस देखोन म्हणती ॥ लक्ष्मीच आली की गृहाप्रति ॥ बाळें मारी गुप्तगती ॥ तें कोणास कळेना ॥६७॥ऐसी ते बाळकांची महामारी ॥ प्रवेशली गोकुळामाझारी ॥ स्तन मुखीं लावितांच झडकरि ॥ बाळें प्राण टाकिती ॥६८॥महाविषें भरोनि स्तन ॥ प्रवेशली यशोदेचें सदन ॥ यशोदा म्हणे बाळकृष्ण ॥ पहावया आली गोपी हे ॥६९॥पाळण्याजवळी आली पूतना ॥ दृष्टीं अवलोकी राजीवनयना ॥ ते बाळलीला देखोन मना ॥ परम सुख वाटतें ॥१७०॥नीलवर्ण केश कुरळ ॥ आकर्न नेत्र विशाळ भाळ ॥ दिव्य पिंपळपान सुढाळ ॥ झगझगीत सतेज ॥७१॥कर्णीं कुंडलें तळपती ॥ लघुदंत चौकीचे झळकती ॥ सुहास्यवदन श्रीपती ॥ कंठीं शोभती वाघनखें ॥७२॥पदक एकावळी मुक्ताहार ॥ तेणें शोभला बाल दिगंबर ॥ वांकी बिंदली परिकर ॥ तडित्प्राय झळकती ॥७३॥चिमणीं बोटें चिमणे हात ॥ चिमण्या मुद्रिका लखलखित ॥ चिमणीच कटी मेखळा झळकत ॥ क्षुद्रघंटा किणकिणती ॥७४॥पायीं पैंजण वाळे वाजती ॥ चरणांगुष्ठ धरिला हातीं ॥ वदनीं घालून रमापती ॥ चोखी प्रीतीकरुनिया ॥७५॥तो वैकुंठपती वरिष्ठ ॥ कां मुखीं घातला चरणांगुष्ठ ॥ तरी चरणीं गोडी आहे उत्कृष्ट ॥ ऐसें भक्त बोलती ॥७६॥जे ते भक्त चरणीं रंगती ॥ गोड म्हणोनि वाखाणिती ॥ ते गोडी पहावया श्रीपती ॥ जपत होता बहुत दिवस ॥७७॥तें गोकुळीं फावलें स्पष्ट ॥ म्हणवोनि चोखी चरणांगुष्ठ ॥ कीं स्वचरणींचा महिमा वरिष्ठ ॥ आबाळ लोक नेणती ॥७८॥जैसें पितयानें अमृतफळ आणिलें ॥ ते बाळकाहातीं दिधलें ॥ परी त्याची गोडी त्यासी न कळे ॥ वदनीं न घाली सर्वथा ॥७९॥तेंच फळ पिता चोखितां ॥ बाळ झोंबोनि लागे हाता ॥ तैसा हा जगत्पितयाचा पिता ॥ गोडी आधीं सेवीत ॥१८०॥गोडीनें चरण चोखी श्रीपती ॥ यालागीं भक्तांच्या मिठ्या पडती ॥ असो पालखाजवळी निश्चितीं ॥ पूतना ते उभी असे ॥८१॥पूतना उचली वनमाळी ॥ स्तन घातला मुखकमळीं ॥ परम आवडीनें ते वेळीं ॥ स्तनपान करीतसे ॥८२॥हातीं धरोनियां स्तन ॥ मुखीं घाली जगज्जीवन ॥ पूतनेच्या खांद्यावरी जाण ॥ एक हात ठेविला ॥८३॥विष शोषिलें संपूर्ण ॥ दुग्धही गेलें सरोन ॥ सर्वांगीच्या शिरा ओढून ॥ तुंबडी एकचि लागली ॥८४॥पूतनेसी नवल वाटले ॥ म्हणे विष शोषून बाळ वांचलें ॥ सर्वांग तिचें कांपों लागलें ॥ सोडी म्हणे श्रीकृष्णा ॥८५॥गोपाळा गोविंदा श्रीपती ॥ सोडीं सोडीं कां मजप्रती ॥ मी परतोनि न यें मागुतीं ॥ या गोकुळामाजी ॥८६॥सांवळे गोपाळे माझे आई ॥ सोडीं सोडीं कृष्णे कान्हाई ॥ म्हणोनि मुखाकडे ते समयीं ॥ पूतना विलोकी सद्गद ॥८७॥सोडीं वेधका वनमाळी ॥ तुझी माता कैसी वांचली ॥ धन्य ती यशोदा वेल्हाळी ॥ स्तनपान करावी तूंतें ॥८८॥माझा शोषिसी कां जीवप्राण ॥ सोडीं न यें मी आतां परतोन ॥ खालीं पडें मूर्च्छा येऊन ॥ तरी जगज्जीवन सोडीना ॥८९॥सकळ गात्रें शोषिलीं ॥ पूतना अवलोकी वनमाळी ॥ तंव ते मूर्ति सांवळी ॥ हृदयावरी विराजे ॥१९०॥अवलोकित कृष्णाचें वदन ॥ हृदयीं बिंबलें तेंच ध्यान ॥ मुखीं करी हरिस्मरण ॥ कृष्णा गोविंदा माधवा ॥९१॥जय जय मुकुंदा मुरारी ॥ पुराणपुरुषा श्रीहरी ॥ माझा भवपाश निर्धारीं ॥ छेदीं आतां विश्वेशा ॥९२॥जो सजलजलदवर्ण ॥ वदन उदार आकर्णनयन ॥ अवलोकितां सोडिला प्राण ॥ पूतनेनें तेधवां ॥९३॥स्थूल लिंग कारण महाकारण ॥ हरीनें शोषिलें न लागतां क्षण ॥ दश इंद्रियें पंच प्राण ॥ शोषी अंतःकरणचतुष्टयासी ॥९४॥अवस्था भोग भोगून स्थानें ॥ संपूर्ण शोषिलीं जगज्जीवनें ॥ पूतनेचें भाग्य वानावें कवणें ॥ केली धन्य भगवंते ॥९५॥महाभयानक विक्राळ वदन ॥ दंत दाढा भ्यासुर पूर्ण ॥ जिव्हा लांब सिंदूरवर्ण ॥ लळलळे मुखाबाहेरी ॥९७॥भाळीं चर्चिला शेंदूर ॥ बाबरझोटी भयंकर ॥ कीं हे ताटिकाचा निर्धार ॥ कृष्णावतारीं जन्मली हो ॥९८॥नरशिरांच्या रुळती माळा ॥ यशोदेनें देखिली ते वेळां ॥ हांक फोडोनि बोलावी सकळां ॥ धांवा धांवा म्हणतसे ॥९९॥गौळी पातले समस्त ॥ थरथरां यशोदा कांपत ॥ महाभयानक प्रेत ॥ राक्षसीचें पसरलें ॥२००॥गौळी पाहती सकळ ॥ तों तिच्या वक्षःस्थळीं घननीळ ॥ सच्चिदानंदघन निर्मळ ॥ स्तन मुखीं धरिलासे ॥१॥गौळियानें कृष्ण उचलिला ॥ यशोदेपाशीं दिधला ॥ अश्रू वाहती मातेच्या डोळां ॥ हृदयीं धरोनि स्फुंदत ॥२॥मोठा चुकला गे अनर्थ ॥ कैंची राक्षसी आली घरांत ॥ मागुती कृष्णवदन पाहात ॥ अश्रू पडती हरीवरी ॥३॥भ्याला असेल गे श्रीपती ॥ म्हणोनि आपुले पायींची माती ॥ कृष्णाचे ललाटीं लाविती ॥ नवलभक्ति तयांची ॥४॥एक करिती निंबलोण ॥ एकीं कृष्णाचें पाहोनि वदन ॥ म्हणति जाऊं ओंवाळून ॥ तुजवरोन डोळसा ॥५॥भालदोरी करुनि गोरटी ॥ घालिती हरीच्या निजकंठीं ॥ दृढ बांधिती रिठे गांठीं ॥ होईल दृष्टि म्हणवोनि ॥६॥श्रीकृष्णकथा प्रयाग थोर ॥ भावमाघमासी सुंदर ॥ येथें माघस्नान भक्तनर ॥ त्रिकाळ करिती अनुतापें ॥७॥की हा हरिविजयग्रंथराशी ॥ हे आनंदवन वाराणसी ॥ येथें जे होती क्षेत्रवासी ॥ ते कृष्णासी परम प्रिय ॥८॥जो भीमातीरविहार ॥ श्रीब्रह्मानंद जगदुध्दार ॥ जो श्रीधरवरद उदार ॥ त्याचें चरित्र परिसा आतां ॥९॥इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंश भागवत ॥ चतुर श्रोते परिसोत ॥ चतुर्थाध्याय गोड हा ॥२१०॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥अध्याय॥४॥ ॥ओंव्या॥२१०॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP