बाळराजा - संग्रह ६

मुलगा मोठा होऊन बापाला मदत करू लागतो, हीच वर्णने ओव्यातून येतात. मुलाबद्दल आईच्या भावना यातून स्पष्ट होतात.


१२६

भरली कृस्नाबाई पानी लागलं ओताला

सोन्याचं कडं माझ्या राघूच्या हाताला

१२७

तांबोळीनबाई पानं देई वीसतीस

बाळराय घोडीवर गनीस

१२८

तांबोळीनबाई पानं देई अणीदार

बाळराय घोडीवर जमींदार

१२९

मुंबईची मुंबादेवी, तुला सोन्याचं कमळ

तुझीया नगरी, माझ्या राघुला संभाळ

१३०

लोकाला लई लेक, माझा एकला शिरहरी

जहाजाला लावी दोरी

१३१

लावणीचा आंबा, पानी घालते वाटीवाटी

साउलीची आशा मोठी

१३२

धनसंपतेचा कोन करीतं हेवादावा

माझा बाळराय मालाचा गुंड नवा

१३३

दोन माझी बाळं, दोन माझे वाडे

लाडक्या लेकीचं करा माहेर मागेपुढे

१३४

दोन माझी बाळं, दंडीच्या दोन येळा

बया ठेवणीची चंद्रकळा

१३५

नागिनी पदमीनी पसरू नकां वाटंतिठं

माझा बाळराय येतुया अवशीपहांटं

१३६

लक्ष्मीआई आली दारला देते धका

जागं व्हाव जेठं लेका

१३७

थोरला माझा लेक वाड्याच्या बुरूज

त्याच्या जीवावरी न्हाई कुनाची गरज

१३८

हौस मला मोठी स्वैपाकामंदी हंडा

ताईत बाळराज सर्व्या संसारामंदी झेंडा

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP