कृषिजीवन - संग्रह २

शेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने, जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.


कृषिजीवन

२५.

शेताला गेली कुरी बैलाला म्हन काशी

सोन लाल पहिल्या ताशी.

२६.

शेताला गेली कुरी बांधाकडेला उभी केली

माझ्या बाळान बैलाला हाक दिली.

२७.

खळं भरील दान्यान बैल भारल्याती कुशी

सखा शेल्यान पाठ पुशी.

२८.

हाती घेऊनी गोफन बंधु उभा टेकावरी

नजर सर्व्या शेतावरी

२९.

शीवच्या शेतामंदी शाळू आलाया राखणीला

घुंगर लावल गोफणीला

३०.

लोक बोतत्यात बोलती वेशीला

माझ्या बंधुजीच्या ,जोड वावड्या राशीला.

३१.

वार सुट्येल कुटल मंम कोनी

राशीला वावड्या लावा दोनी.

३२.

हरचंदर वारा मधुनी घेघ्या घेतो

रामचंदर पानी नेतो.

३३.

जेवनाची पाटी नेता माझी मैना घामेजली

माझ्या बाळायान शिवची शेत केली

३४.

पिकल पिकल म्हणू बंधूची मालदांडी

सारा गाडीला पहिल्या तोंडी

३५.

पिकल पिकल म्हनु बंधुची चुनखडी

ऐकू येती भलंगडी

३६.

पिकल पिकल म्हनु बंधुजीच्या मांवदरी

कणगी बळद ज्येवचरी.

३७.

दुरुन ओळखते कोन निचळ चालणीचा

माझा बंधुराय,हिरवा जुंधळा पलणीचा

३८.

पहाटेच्या पारात कोन कोयाळ गीत गातो

ताईत बंधुजी उअसाहळदीला खत नेतो.

३९.

नागर्‍यापरायास माझा आगल्या गरजतो

बारा बैलाची नाव घेतो

४०.

नांगर्‍यापरायास आगल्या नटवा

त्याच्या खाकेला बटवा

४१.

आगल्यापरायास साद बारीक नांगर्‍याचा

खांद्या चाबूक घागर्‍याचा

४२.

नांगर्‍यापरायास आगल्याचा थाट

देते न्हाहारीला दहीभात

४३.

शिवंच्या शेतावरी गार सावली पांगायाची

तिथ वसती नांगर्‍याची

४४.

बारा बैलाचा नांगुर चाले कुद्याच्या फडावर

जराची अबदागीर अगल्या बाळावर

४५.

बारा बैलाची दावण मधी द्शिगीचा डाव रोचा

बंधुजी दंडिल्याचा, वाडा दावा.

४६.

बारा बैलाची दावण मधी म्हशीची म्होरकी

माझ्या बंधुजीची संपत मनासारखी.

४७.

बारा बैलाचा नांगुर चाले कुद्याच्या फडावर

पाप्या मानसाची नंदर माझ्या चालीच्या खोंडावर

४८.

बारा बैलायाचा,कुनबी तेगाराचा

माझ्या बाळायाच्या खांदी,आसूड घागर्‍याचा

४९.

बारा बैल तुझ्या शेती पानी धरनाच पिती

कुनब्या सायासाच किती ?

५०.

बारा बैलाचा नांगुर खोंड सुटली कुळवाला

जन बोलती बंधुला कुनबी कशान बळंवाला ?

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T12:26:16.6200000