कवी बी परिचय

कवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.


कवी बी परिचय

'बी' हे अपूर्व पण मनोहर आणि यथार्थ इंग्रजी नामाभिधान धारण करून ज्यांनी आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठीचिये नगरी' मधील विचाराचे व कल्पनेचे कुंज काही काळ निनादवून सोडले व तेथील रसिक रहिवाशांवर आपल्या गीतमाधुर्याची जबरदस्त मोहिनी घातली.

विद्यमान कविवृंदात वयाने व गुणांनी जे वंद्य व आदरणीय कवि समजले जातात त्यांच्यामध्ये कविवर्य 'बी' यांचे स्थान निःसंशय थोर आहे. ते नावाने जरी 'बी' असले तरी त्यांचे कर्तृत्व ऐ वन दर्जाचे आहे ही गोष्ट एखादा बालकवीहि कबूल करील. म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख व कृतीचा उल्लेख होताच आधुनिक तरुण कवींच्या माना मुजर्‍यासाठी खाली लवतात.

त्यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' ही वर्‍हाडात चिखलदरा येथे ता. १४ सप्टेंबर १८९१ रोजी लिहिली गेली. त्यावेळी ते सुमारे १९ वर्षांचे असावेत. ही कविता त्याच वर्षी कै. हरिभाऊ आपटे यांच्या 'करमणूक' पत्रात प्रसिद्ध झाली.

१९११ साली 'बी' हे अभिनव नाव धारण करून त्यांनी "टला-ट रीला-री । जन म्हणे काव्य करणारी ।" ही 'वेडगाणे' नावाची एक अत्यंत नादमधुर व तात्त्विक कविता 'मासिक मनोरंजनात'त प्रसिद्ध केली.

१९११ ते १९३३ पर्यंत, म्हणजे सुमारे एक तपभरच 'बी' कवींची प्रतिभा फुलून आली असे म्हणता येईल.

खरे सांगायचे म्हणजे 'बी' हे कवींचे कवि आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T21:29:40.7400000