लग्नातील गाणी - संग्रह ३

लग्नात मुली, स्त्रीया,आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.


लग्नातील गाणी

१.

नवरी आहे गोरी तिला हळद लावली थोडी

लेकीच्या करता जावयाची गोडी

माझी लेक आहे खडीसाखरेची पुडी

जावयाचा मान एवढा केला कशासाठी

लेकी राजबाई तुझ्या जीवासाठी

मोहराची वाटी ठेवली बोहोल्याच्या कोना

गोरेबाई माझी तुझ्या वराला दक्षिणा

लक्ष्मी आली घरा आता तू जाऊ नको

माझ्या बाळराजाला अंतर देऊ नको

लक्ष्मीबाई आली मागच्या दारान

कडा उघडावी धाकटया दिरान

लक्ष्मीबाई आली सई सांजच्या भरात

कुंकवाची पुडी साक्ष ठेविली दारात

पहिला दिवस पुसाव चांगला

हिरव्या चोळीवर काढला बंगला

दुसर्‍या दिवशी मित्र पुशी सोबत्याला

का रे गडया पिवळा घरी राणीचा सोहळा

तिसर्‍या दिवशी माय पुसे ब्राह्मणाला

मुहूर्त चांगला हिरवी चोळी कामिनीला

चवथ्या दिवशी घर गुलालांनी लाल

पेटचा हा लाल त्याचे शांतीक झाल काल

पाचव्या दिवशी लिंबा डाळिंबाची पाटी

गोर्‍या राधिकेच्या जवळी बाळ निजे नवसाचा

सातव्या दिवशी ब्राह्मणाला दिली गाय

ऐकते शांतीपाठ हरखून माय

आठव्या दिवशी पत्र फुलार्‍याला धाडा

गोर्‍या राधिकेला गुंफावा जाई तोडा

नवव्या दिवशी शेजेला फुल दाट

गोर्‍या राधिकेन केला हा थाटमाट

दहाव्या दिवशी वाजती चौघडे

बाई हशीत खुशीत निरोप माहेराला धाडे

बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा

हाती बेल तांब्या बहीण पुजिती तुळसा

बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा

सोनियाचा गोफ कमरी करदोडयाचा फासा

बहिणीला भाऊ मोठा दुर्लभ वाटीयला

समया कारण भाऊ आला भेटायला

बहीण भावंड आहेत समस्तला

बहिणीची माया लई माझ्या ग बंधूला

बहिणीच्या घरी भाऊ करतो देऊ देऊ

बहिणीच्या आशीर्वादान माडी कळसाला जाऊ

नको भावा म्हणू बहिणींनी नासल

बहिणीच्या आशिर्वादे धनधान्य ते सायल

बहिणीच्या आशिर्वादे भाऊ झालेत कुबेर

चिरेबंदी वाडे बांधले चहुखोर

२.

सई सई भाले

मोगरा डुले

बाबांना हिरा

मोत्यांना तुरा

उना वरथिन बान

मन्ही तुले आन

दन दन फुगडी

तुम्ही मन्ही जोडी

३.

असा मन्हा सासरा हातम्हान कासरा

बईलना बईलना

असा मन्हा जेढ गया म्हान गेढ

चांदीना चांदीना

अशा मन्ह्या जावा तिले कामना हेवा

असा मन्हा नवरा जस्त चंदनी भवरा

४.

ये रे चिडया येई र ऽ येई र ऽ

दखड काय मन्ह माहेर माहेर

माय त मन्ही मयानी मयानी

भाव-जाई चांदनी चांदनी

भाऊ मन्हा निठूर निठूर

मूय नही येन्हार येन्हार

धल्ला करे याद ना याद न

कव्हा येही मयना मयन

माय मन्ही सुकती सुकती

मयना कारन झुरनी झुरनी

भाडले ली बोलनी बोलनी

जाय त भाऊ लवकर लवकर

लई ये मन्ही ओडेर ओडेर

५.

दोन तीन बइलेस्ना लागव्यात ठुशी

बाई लागव्यात ठुशी

तठे मन्ही कारव्तायी इसरनी कशी

बाई इसरनी कशी

धाकल्या देरले गवसनी कशी

बाई गवसनी कशी

धाकल्या देरनी काय काय काय

दोन तीन चाबूक चमक्यावन्यात

बाई चमक्यावन्यात

दोन तीन चाबूक दूरना दुरी

बाई दूरना दूरी

मन्ह ऽ माहेर पंढरपुरी

बाई पंढरपुरी

पंढरपुरले काय बाई साजे

बाई काय बाई साजे

पंढरपूरले बांगडया साजे

ताई बांगडया साजे

येता जाता खुय खुय वाजे

बाई खुय खुय वाजे

पंढरपूरले काय बाई पाहू

बाई काय बाई पाहू

रखमाईन दरसन लेऊ बाई

बाई दरसन लेऊ बाई

६.

घाटावरथीन माय घाटावरथीन

उना एक जोगी माय उना एक जोगी

त्यान ऽ बिर्‍हाड माय त्यान ऽ बिर्‍हाड

चिचिना खालते माय चिचिना खालते

फुई मन्ही मयानी माय फुई मन्ही मयानी

बिर्‍हाड देखले चालनी माय बिर्‍हाड देखले चालनी

नका जाऊ फुईजी माय नका जाऊ फुईजी

लाडक्या वाहारी माय लाडक्या वाहारी

नवरा उना फिरी माय नवरा इमा फिरी

तोडेरना जोड लयना मात्र तोडेरना जोड लयना

७.

तांबाना घागर शिरी गयथू मी गंगावरी

तठे ये किरन हरि यांनी घरनी मन्ही मिरी

सोड सोड कान्हा सासूपासे सांगसू

सोड सोड कान्हा सासर्‍या पासे सांगसू

सोड सोड कान्हा देर पासे सांगसू

सोड सोड कान्हा नवर्‍या पासे सांगसू

खोड तुम्ही मोडसू मार तुले देसू

८.

मयना रानी खेये आंगन झायऽऽथोड

लवनीत फुल झाड मामाजीनी

मयनाना खेय आंगनी मोडना

भातकुल पियना गोड गोड

चांदीच्या थाट माट वाढनी दूध फेनी

जेवस हिरकनी मयनारानी

चांदीचा थाट मान्‌ वाढती पूरनपोयी

जेवस चाफेकयी मयनारानी

लाडकी ग लेक खिडकी हुबी र्‍हाये

बापाजीनी वाट पाहे मयनारानी

लाडकी ग लेक लाड सांगस बापाले

मोती मागे कापले मयनारानी

९.

पालाख पायना त्याले रेशमी दोरी

हालवस मयनागोरी जिजीबाई

पालाख पाळन महाली टांगना

तुन्या मामान धाडना मयनाबाई

पालख पायना येता जाता ग हालवा

मायबाइल बलहावा वहिनीबाई

आंथुन कया मऊ रेशमी पांघ्रूण

निजाऽस मन्ह बाय तान्ह

आथुनपलंगी पांघरुन साजे

लाडकीबाई निजे मयनाबाई

बाईना हातवड मोतियास्नी जायी

हासता पडे खयी गालव‍र्‍ही

मन्ही मयनारानी हायदीन न्हाई

त्यान पानी जाई शेवंतीले


काय गडणी केल म्याबी

एका जीवाच्या बाराजणी

नव्या घागरीन पाणी आणी

चल गडच्या बाजाराला

साळी खंडीतो हजाराला

चाटी राहिना उधार्‍याला

देते जमीन गुजराला

काय गडणी केल म्याबी

एका स्नेहाच्या काय देऊ

एक लवंग दोघी खाऊ

एका माहेरी दोघी जाऊ

एका रंगाच्या चोळ्या घेऊ

माझ्या अंगणात तुळशी वृंदावन

तुळशी वृंदावन चंदनाच झाड

चंदनाच झाड गुलाबाच फूल

देवा ज्योतीबाला त्याची भारी आवड

सई बनी ग बनी ग

कचली माझी वेणी ग

दिराला जेवू कशी वाढू ग

कशी वाढू ग

दुधात भाकरी सोड ग सोडू ग

सई बनी ग बनी ग

कचली माझी वेणी ग

नंदला जेवू कशी वाढू ग

धयात भाकरी सोडू ग सोडू ग

सई बनी ग बनी ग

कचली माझी वेणी ग

सासर्‍याला जेवू कशी वाढू ग

कशी वाढू ग

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T21:01:05.5030000