धर्मशास्त्रीय संकेत

सर्व सोळा संस्कारात उपनयनसंस्कार सर्वात श्रेष्ठ होय. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो.


उपनयन म्हणजे काय ?

गायत्रीमंत्राचा उपदेश, 'देवसवितरेष ते ब्रह्मचारी' आणि मंगलाष्टकानंतर बटूचे आचार्य जे मुखनिरीक्षण करतो, यापैकी प्रत्येकाला उपनयन समजणारे तीन पक्ष होतात. वेदाध्ययनाला सुरवात या दृष्टीने गायत्रीमंत्राच्या उपदेशाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात येते. आपल्या हिंदू धर्माचा, या विश्वाचा मूळ जो प्रजापति त्याला बटु(कुमर) अर्पण करणे हा ऐतिहासिक व अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणून त्याचे सोळा संस्कारात परंपरा या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. यज्ञोपवीत जानवे वगैरे प्रजापतीचे रूप घेण्याची साधने आहेत. उपनयन म्हणजे आपला मूळ जो प्रजापति, आत्म्याने त्याच्या जवळ जाणे, त्याची वस्त्रे, त्याची विद्या आपण मिळविण्याचा प्रयत्न करणे, केवळ या प्रमाणावरून पाहता ज्यांना वेदाधिकार पाहिजे असेल त्यांनी हा संस्कार करावयाचा आणि वैदिक व्हावयाचे असा मूळ उद्देश उपनयन संस्कारात दिसतो. सर्व सोळा संस्कारात उपनयनसंस्कार सर्वात श्रेष्ठ होय. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो. तसेच त्याला वैदिक धर्मात सांगितलेली कर्मे करण्याचाही अधिकार प्राप्त होतो.

शास्त्रतः हा संस्कार त्रैवर्णिकांना करण्याचा अधिकार आहे. परंतु सध्या हा संस्कार विशेषतः ब्राह्मणात, फार थोड्या क्षत्रियात आणि वैश्यात करण्यात येतो. याला दुसरा जन्म मानण्याची चाल आहे. पहिला जन्म आई-बापांपासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्रापासून आणि आचार्य यांच्यामुळे प्राप्त होतो, असे या संस्काराचे महत्त्व वेदांत वर्णिलेले आहे.

उपनयनाचा काल

प्रत्येक वर्णाच्या लोकांना उपनयनाचा काल वेगळा सांगितला आहे. आठ, अकरा व बारा अशा क्रमाने ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांना काल सांगितला आहे. अनुक्रमे सोळा, बावीस व चोवीस वयाच्या पुढे तरी उपनयन राहता उपयोगी नाही. (आश्व. १-१९)

उपनयन संस्कार बंद पडल्यास प्रायश्चित्त

उपनयन संस्कार तीन पिढ्या बंद पडला असल्यास चौथ्या पिढीत प्रायश्चित्त देऊन पुनः संस्कार सुरू करण्याविषयी सर्व ग्रंथकारांचे एकमत आहे. काही ग्रंथकारांच्या मताने बारा पिढ्यांपर्यंतही संस्कार बंद पडला असल्यास सुरु करता येतो आणि काहींचे मताने केव्हाही प्रायश्चित्तपूर्वक हा संस्कार पुनः सुरू करता येतो. या सर्वांची विचारसरणी त्या त्या ग्रंथात पाहणेच सोयीचे होईल. थोडक्यात त्यांचे स्वरूप असे-

अथ यस्य पिता पितामह इत्युनुपेतो स्यातां ते ब्रह्महसंस्तुतास्तेषामभ्यागमनं भोजनं विवाहविधि वर्जयेत् ।

तेषामिच्छितां प्रायश्चित्त यथा प्रथमेऽतिक्रमे ऋतुरेवं सवत्सरं प्रतिपुरुष संख्याय संवत्सरा यावन्तोऽनुपेताः स्युः ।

अथ यस्य पितामहादि नानुस्मर्यते उपनयनं ते स्मशानसंस्तुतास्तेषामभ्यागमनं विवाहमिति वर्जयेत्तेषामिच्छतां प्रायश्चित्त द्वादशवर्षाणि त्रैविद्यकं ब्रह्मचर्यं चरेत्तत उपनयनमथोदकोपस्पर्शनं पावमान्यादिभिः ॥ आपस्तम्बधर्मसूत्रम् ।

अर्थ - ज्यांचा बाप व आजा उपनयन न झालेला आहे आणि स्वतःचीही ज्यांची मुंज झालेली नाही, त्यांना ब्रह्महत्या करणारे असे ज्ञानी लोकांकडून म्हटले जाते. अर्थात् त्यांच्याशी सहवास, भोजन, विवाह वर्ज्य करावा. अशांची जर इच्छा असेल तर त्यांना पुढीलप्रमाणे प्रायश्चित्त द्यावे. जर प्रथमच कालातिक्रम झाला असेल तर एक ऋतूपर्यंत ब्रह्मचर्याचे सर्व नियमांप्रमाणे वागावे आणि नंतर उपनयन करावे; आणि यापुढे जितके पुरुष म्हणजे बाप, आजा वगैरे तितक्या पिढ्यांकरिता एक एक वर्षपर्यंत ब्रह्मचार्‍याच्या नियमांप्रमाणे राहून नंतर उपनयन करावे.

पितामह म्हणजे आजा. त्याच्या पूर्वीचे जर अनुपनीत असतील तर त्यांच्याशीही ब्रह्मघ्नाप्रमाणे सर्व व्यवहार वर्ज्य करावेत व इच्छा असल्यास पणजोबापासून प्रत्येक पुरुषाला बारा वर्षाप्रमाणे ब्रह्मचर्याचे नियम पाळून नंतर उपनयन करावे. नंतर पावमानी ऋचांनी (यदन्ति यच्च दूरके ०) दररोज पुढे अभिमंत्रण करावे.

काही गौण विधि

घाणा भरणे हा एक धार्मिक विधीच्यापेक्षाही महत्त्वाचा विधि होऊन बसला आहे. वास्तविक घाणा भरणे म्हणजे सर्व कार्याची तयारी झाल्यामुळे उखळ, मुसळ वगैरे व्यवस्थित बांधून बाजूस ठेवणे. परंतु त्याला बायकांच्या साम्रज्यात काही विशेष महत्त्व आले आहे.

मंडप प्रतिष्ठा याचाही असाच प्रकार आहे. मांडव न घालता मंडपाच्या वेगवेगळ्या भागावर स्थापन करावयाच्या देवता सुपात मांडून ठेवावयाच्या ही गोष्ट केवळ थट्टास्पद होऊन बसते. तसेच पूर्वांगात आणि उत्तरांगात अनेक विधि शिरले आहेत. ते काढून टाकून विधीचे स्वरूप मुख्य भागावर आणून बसविणे हे आपले कर्तव्य आहे.

अधिकारी

उपनयन करण्यास मुख्य अधिकारी बाप होय. त्यानंतर आजोबा भाऊ, जातीचा कोणी तरी हे होत. ज्याची मुंज करावयाची त्याच्यापेक्षा तो वडील असावा म्हणजे झाले.

N/A

References : N/A
Last Updated : December 12, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP