७.
कैलास माडी काचेच्या पायर्या, आर लावा त्याला, हाजाराची पैठणी मला, पाचशाचा मंदील त्याला, जरीच्या चोळीला इस्तर दिला, नक्षीच्या धोतराला चाटी गेला अमरावतीला, अमरावतीहून आणल्या पाटल्या, त्या माझ्या मनगटी दाटल्या. आरल कारल, सोन्याच सरल, सर वजरटीक सोनारान गाठवली, माझ्या गळ्याला दाटली, अशी नार कशी सभेशी उभी ? छ्त्तीसगावच्या कारभारी त्याची केली माती, मातीच केल कस, मला आल हासू, हसली गालातल्या गालात, मला पुसती रंगमहालात, रंगमहालातून चालल्या नावा तर x x x राव सर्वी काम सोडून मला आधी आळंदी दावा.
८.
झुण् झुण् झुण्यात एक पाय पुण्यात, पुण्याचा बाजार, म्हशी घेतल्या हजार, पावशेर दुधाचा केला खवा x x x x राव तुम्ही दमान जेवा पण भाजी तोंडी लावा.
९.
झूल झुंबराच, फूल उंबराच, कळी चाफ्याची, लेक बापाची, सून सासर्याची, रानी भ्रताराची, भरतार काय म्हनले नाही नाव कधी घेतल नाही.
१०.
काकरीत काकरी तुरीची, अवघड पायरी विहिरीची x x x राव म्हणतात भाकरी घेऊन ये न्याहरीची, तरच चोळी घेतो जरीची.
११.
नदीचे काठी तरंगते नौका x x x रावांचा नाव घेते सर्वजण ऐका.
१२.
चांदीचा वाडा, रुप्याच कडवेढा x x x रावांचा आला घोडा
दिवाणसाब वाट सोडा.
१३.
झुण झुण्यात, बसले मेण्यात, काळी चोळी अंगात गुलाल भांगात, मास मुठीत, लवंगेच्या गाठीत, खोबर्याच्या वाटीत सोडले सोगे x x x राव कचेरीत उभे.
१४.
मोहोळ गाव खेड, कळवातीनीचा महाल वेशीपुढे, स्वामी झाले वेडे, स्वामींना लागले छंद, छंदाला बाजूबंद, स्वामी गेले बार्शी, बार्शी घेतली गादी, आणली सतरंजी, पराज्याचा सुतार, मोठा कारागिर, जागा लागते सव्वा वीत, आणला पलंग, ठेवला घरी, स्वामी गेले शहराला, शहारापाठी घेतला चंद्रहार, चंद्रहाराच सोन मोठ नाजुकदार घडणीस लागले तीन वार, तिथ घेतली बोरमाळ, बिरुदी मासूळ्याची घडण काय, जोडव्याची घडण बरोबर नाय, वाकडी नथ, दुहेरी फासा, स्वामी गेले मुंबई देशा, तिथ घेतल्या साडया पैठण्या, साडयापैठण्यांचा रंग उदी माश्या नावाचा रंग घेऊ नका, फिक्क मलमली कुडत, जरतारी फेटा, सार्या सिणगाराला शोभा आली, तेथून स्वामी परत आले पहिला मुक्काम कुठे ? सांगलीच्या पेठ, तिथ घेतला मोत्याचा पदर, तेथून स्वामी परत आले. दुसरा मुक्काम कुठे ? कराड पेठ, तिथ मोटार चाले हवापरी, स्वामी आले आपले नगरीं, पाटपाणी करुन मंदिरी, पाची पक्कवानांची केली तैयारी, एवढयात आली, x x x रावांची स्वारी.
१५.
खण खण कुदळी, मण मण माती, सारीविल्या भिंती, चितारले खांब, आत्याबाईच्या पोटी जन्मले राम, रामन्हाई म्हनले, नाव न्हाई घेतल, पिवळ्या पितांबराचे सोडले झगे x x x शेताच्या बांधावर उभे.