सांस्कृतिक परंपरा

लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.


आपल्या घरी कोणी पै पाहुणा आला अगर पाव्हण्यापैकी या ना त्या कारणाने आपला कोणाशी संबंध आला म्हणजे मानवी स्वभावाला आपले म्हणून खास असे काही करावेसे वाटते. समोरचा माणूस बघून त्याच्या इतमामाप्रमाणे व आपल्या ऐपतीप्रमाणे अशा वेळी काही देवघेव केली जाते. आपला व इतरांचा मानपान राहील हे पाहिले जाते. विशेषतः स्त्रियांच्या जीवनात असे मानपान फार बारकाईने राखले जातात, सांभाळले जातात.

चारचौघीजणी लग्नकार्याच्या कारणाने, मुंजीच्या निमित्ताने, डोहाळजेवणाच्या निमंत्रणाकारणाने, बारशाच्या मंगल समारंभाच्या निमित्ताने किंवा नव्या नवरीच्या कोडकौतुकाच्या आनंदाकारणाने एकत्र आल्या म्हणजे आपला स्वतःचा मानपान चांगला कसा राहील याबद्दल फार दक्षता घेतात. अशा वेळी आपले स्वतःचे रहाते घर चंद्रमौळी असले तरीहि एखादा राजवाडा मागे सरावा अशा थाटाने त्यांना बोलावेसे वाटते. त्यासाठी आपल्या पतिदेवाचे नाव घ्यावयाच्या कारणाने त्या आपल्या कल्पनेला भव्य उड्डाण घ्यायला सांगतात. उत्तमोत्तम शब्दरचनेला सामोरी यायला लावतात. आणि लहान लहान पण यमकबद्ध अशी वाक्यरचना करीत फार चित्ताकर्षक बोलणी करू लागतात. कधी हे बोलणे लहानसे, आटोपशीर, असे असते तर कधी ते बरेच लांबतेहि. अशावेळी हे लांबलेले बोलणे, ऐश्वर्यशाली बोलणे, तर ती करतेच पण त्याचबरोबर आपली नाती गोती, हौसेमौजे कारणाने पतिदेवाचा होणारा प्रवास, विडा खाण्याच्या निमित्ताने एकत्र गोळा होणारा देशाचा भूगोल, सणासुदींचा वैशिष्ट्यपूर्ण, इतिहास, मायघरची चालरीत, सासूच्या घरचे वळण इत्यादि अनेक गोष्टींना गुंफीत भारी सुरेख वातावरण उभे करते. ऐकणाराची मति अशा वेळी गुंगून जाते आणि बोलणाराच्या चित्ताची सावधानता भंग पावते ! कारण या परीच्या बोलण्याकारणाने बुद्धिवैभवाची पारख होते, पठांतराची चाचणी घेतली जाते आणि घरच्या चालीरीतींचा थांगपत्ता लागतो ! म्हणून नव्या नवरीच्या जिवाची नुसती धांदल उडून जाते आणि म्हातार्‍या सवाष्णीची लाजून लाजून पुरेवाट होते.

स्त्रियांच्या तोंडवळणीं पडणार्‍या या प्रकारच्या बोलण्याला 'उखाणा' अगर 'आहाणा' म्हणतात. हा उखाणा कधी भव्यदिव्य विचार बोलून दाखवतो तर कधी थट्टामस्करी अगर विनोदहि निर्माण करून मोकळा होतो. त्यामुळे एकप्रकारच्या ईर्षेनेच पतिदेवाचे नाव घेण्यासाठी स्त्रिया उखाण्यांचा वापर करताना दिसून येतात. आपल्या पतिदेवाचे नुसतेच नाव घेतले तर त्याचे आयुष्य कमी होते या भीतीने व खुळ्या समजुतीने त्या उखाणे घालतात.

फुगडी खेळताना देखील मुलीबाळी असे उखाणे घालीत असतात आणि मोठ्या बायका सहजगत्या बोलताना सुद्धा म्हणींचा वापर करताना दिसून येतात. जी गोष्ट बोलायची ती साधी सरळ अशी न बोलताना काव्यमय रीतीने बोलणे त्यांना अधिक आवडते.

स्त्रियांच्या प्रमाणेच पुरुष मंडळीहि आपल्या पत्नीचे नाव घेताना क्वचित प्रसंगी उखाण्यांचा वापर करताना आढळून येतात. परंतु हा भाग अपवादात्मकच होय.

पतीचे नाव घेताना जसे उखाणे घालतात तसेच ते 'रुखवता'चे वेळीहि घालतात. मात्र या प्रकारच्या उखाण्यामध्ये अतिशयोक्तीची भाषा अधिक असते वा विनोदाला भरपूर वाव दिला जातो. म्हणून अशा उखाण्यांना फोडणी अगर लवंगी मिरचीची उपमा दिली जाते.

'रुखवता'साठी वापरल्या जाणार्‍या उखाण्यांच्यामुळे कित्येकदा लग्नघरातील वातावरण भारी तंग होऊन भांडणे उभी राहतात. परंतु-

"आला आला रुखवत, त्यावर ठेवला भोत,वाकडा तिकडा आणा घालू नका दुहीकडच जमलय गोत"

असा इषारा देऊन त्याला पायबंद घातला जातो ! आणि मुलीकडील मंडळींनी मुलाकडील मंडळींना व विशेषतः नवरदेवास आणलेल्या या 'न्याह्यारी'ला शोभा येईल याची खबरदारी घेतली जाते. म्हणून या प्रकारच्या बोलण्याचा समावेश जसा 'मानपानात' होतो तसाच तो 'आहेरा'तहि जमा होतो. त्यासाठी या प्रकारच्या बोलण्याची जेवढी चंगळ असते तेवढीच तारीफहि केली जाईल याबद्दल दक्षता घेण्यात येते. कारण या बोलण्यामुळे बोलणाराची चालरीत व त्याच्या घरचे वळण पारखण्याचा प्रघात पडलेला आहे.

त्यामुळे लुगडेचोळी देऊन, भांडीकुंडी घेऊन, पैसा अडका मोजून अगर करणीधरणी करूनहि जो मानपान लक्षात घेतला जाईल व ज्या आहेराची चर्चा होईल त्यापेक्षाही या बोलण्याकारणाने होणारा मानपान आणि आहेर अधिक मोलाचा ठरतो. कारण बाकी काहीहि नसले तरी चालेल पण चांगल्या वळणाची माणसे मिळावीत ही अपेक्षा मुलीचे लग्न करताना बाळगली जाते. त्याच प्रमाणे या उखाण्यासाठी वापरण्यात येणार्‍या भाषेवरून व कल्पनेवरून माहेरच्या घराण्याचे मोजमाप केले जाते. अशा वेळी एकच गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली जाते ती ही की, मुलगी आईकडून हे धडे घेते आणि सासरी ते पुढे मिरवीत रहाते ! म्हणुन हे उखाणे अतिशय मोलाचे मानले जातात. ह्या उखाण्यांचे अंतःकरण मोकळे असते, त्यामधील विचार खेळकर असतात आणि त्यांचेसाठी वापरली जाणारी भाषा चटकदार असते.

रामायणमहाभारतापासूनहि या उखाणे घालण्याच्या चालीरीतींचे धागेदोरे गवसतात. म्हणून परंपरेने बराच काळ चालत आलेले असे मायमराठीचे हे एक मौल्यवान लेणे समजले जाते.

 

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP