मंगलाचरण

निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.

Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.



नमोजी पंढरिराया ।
हत्कमलवासीया गुरुनाथा ॥१॥
तुमचा अनुग्रह लाधलों ।
पात्र झालों महा सुखा ॥२॥
सकळ संत करिती कृपा ।
दाविला सोपा निज मार्ग ॥३॥
निळा म्हणे दिवस रात्रीं ।
गातों वक्त्रीं गुण नाम ॥४॥


सकळा मंगळांचे धाम ।
ज्याचेनि विश्राम विश्रांती ॥१॥
तो हा पंढरीचा रावो ।
सकळां ठावो कल्याणा ॥२॥
ज्याचेनी सुखा सुखपण ।
ज्याचेनी त्रिभुवन रुपस ॥३॥
निळा म्हणे ज्याचेनि निगमा ।
आणिली गरिमा जाणिवेची ॥४॥



नमोजि विश्वतीता ।
विश्रवव्यापका श्रीअनंता ।
परात्परा सद्गुरुनाथा ।
ईश्रवरनियंता सकळादी ॥१॥
तुमचा अनुग्रहो झालिया ।
निरसे मोह ममता माया ।
करुनी उपदेश ब्रम्हया ।
निजात्मपदी स्थापिसी ॥२॥
सनकादिकांचे चिंतन ।
नाम तुमचे अनुसंधान ।
त्यातें स्वरुप स्थिती पावउन ।
ठेविसी निमग्न निजानंदी ॥३॥
शुक्र प्रल्हाद नारद ।
पावोनिया तुमचा बोध ।
करिती सदा ब्रम्हानंद ।
तारिती कीर्तने आणि‍का ॥४॥
निळा म्हणे परमानंदा ।
परात्परा सच्चिदानंदा ।
सद्गुरुराया निजात्मबोधा ।
कृपेस्तव लाहिजे तुमाचिये ॥५॥


परात्परा सच्चिदानंदा ।
परिपूर्णा जी आनंदकंदा ।
जगदीशा विश्रवंद्या ।
विश्वव्यापका अनंता ॥१॥
भक्‍तवत्सला कृपासिंधु ।
तापत्रयहरणा दीनबंधु ।
तुझ्या नामी अगाध बोधु ।
भक्त पावती भाविंक ॥२॥
परमपुरुषा गुणातीता ।
अव्यया अक्षरा जी अव्यक्ता ।
विश्रवमंगळा रुक्मिणी कांता ।
पुंडलिकवरदा पंढरीशा ॥३॥
निरंजना निर्विकारा ।
निर्विकल्पा जगदोध्दारा ।
वेदवेदांतसागरा ।
विश्रवंभरा कल्पादि ॥४॥
भावाभावविवर्जिता ।
सगुणनिर्गुणा गुणातीता ।
निळया स्वामी कृपावंता ।
चरणी माथा तुमचिये ॥५॥


आतां आठवूं पाउलें ।
सकुमार चांगले इटे ते ॥१॥
तेणें प्रसन्न्‍ होती गुरु ।
संत मुनिश्वरु करुणाब्धी ॥२॥
आदर त्यांचा ईटेवरी ।
तो मज निर्धारीं जाणवला ॥३॥
निळा म्हणे जिवीं ते ध्यातां ।
कृत्यकृत्यता करितील ॥४॥


वेदवक्ता नारायण ।
तोचि तो आपण सर्वदृष्टा ॥१॥
वदवी सेवकाची वाणी ।
आपुल्या गुणी प्रवर्तपुनी ॥२॥
परम गुह्यार्थ् तोचि प्रगटी ।
आपण पोटीं संचारोनी ॥३॥
निळा म्हणे विठ्ठल हरी ।
वक्ता वैखरी तो वाचा ॥४॥


अगा ये षड्गुण भाग्यवंता ।
समग्र लक्ष्मीचिया कांता ।
समग्र यशातें तूं धरिता ।
समग्र ऐश्रवर्यता तुज अंगी ॥१॥
समग्र औदार्यलक्षणीं ।
समग्र वैराग्याची खाणी ।
मग्र ज्ञानशिरोमणी ।
समग्र षड्गुणी संपन्ना ॥२॥
यशें थोरविला मारुति ।
विभीषण केला लंकापती ।
औदार्य देऊनी कर्णा हाती ।
कीर्ति दिगंती फाकविली ॥३॥
ज्ञानें उपदेशिला चतुरानन ।
ऐश्वर्य वाढविला अर्जुन ।
वैराग्यशुकार्ते बोधून ।
ब्रम्ह सनातन पावविला ॥४॥
निळा म्हणे इहीं अगाध लक्षणी ।
वंद्य सुरासुरां तूं त्रिभुवनी ।
माझी अलंकारुनियां वाणी ।
प्रवर्तवावी स्तवनीं आपुलिया ॥५॥

संत निळोबाराय गाथा (मंगलाचरण) समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : August 21, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP