अभंग ११ वा
कोणी निर्मियेली काया । कोण प्रकाशितो माया ॥१॥
कोणीं धरियेली धरणी । कोण ब्रह्मांडाचा धनी ॥२॥
कोणी आकाश धरियेले । कोठे खांब उभे केले ॥३॥
तुका म्हणे ऐसा धनी । ठाई पहावा शोधुनी ॥४॥

अभंग १२ वा
मुळापासुनी विस्तार । कैसा झाला तो ओंकार ॥१॥
कोठें प्राण तो राहतो । कोण जप चालवितो ॥२॥
अहो इडा पिंगळा जाण ।
त्याचें कोणतें ठिकाण ॥३॥ तुका म्हणे शोधुनी पाहें ।
सुषुम्ना ती कोठें आहे ॥४॥

अभंग १३ वा
महारुपाचे । कोठें राहिलें सांकडें ॥१॥
ब्रह्मा कैसा झाला जाण । सांगे त्रिकुटाची खूण ॥२॥
त्रिकुट नीजब्रह्मीं ठेला । सहस्त्रदळीं लावी त्याला ॥३॥
ब्रह्मरंध्री तो निवाला । अहं ब्रह्म कैसा झाला ॥४॥
तुका म्हणे सांगा खूण । तरी सद्गुरु म्हणेन ॥५॥

अभंग १४ वा
मेरुचिया माथा ऊर्ध्व गंगा वाहे । पक्षी तेथें आहे पंचरंगी ॥१॥
एकवीस पाय नऊ त्यासी शिरें । बावन्न हे परनेत्र तीन ॥२॥
मुखविण चारा चरे त्रिभुवनीं । वस्ती निरंजनीं निरंतर ॥३॥
ऐसा पक्षी बळी श्रीगुरुसमर्थ । तुका हृदयांत पोळी तया ॥४॥

अभंग १५ वा
होता पक्षी शुध्द सात्विक । त्याचे निळे दोन्ही पंख ॥१॥
तोचि पक्षी हृदयीं डोले । सोहं ऐसा शब्द बोले ॥२॥
त्याचा अणुएवढा डोळा । करी ब्रह्मांडाचा गोळा ॥३॥
ऐसे अनंत गोळे गिळी । तोचि पक्षी तुकयाजवळी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP